पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी. हा वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण असून मताने माध्व होता. त्याचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर झाला, असे म्हणतात. पण काही विद्वानांच्या मते तो बळ्ळारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड या गावी जन्मला. त्याच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते. पुरंदरदासाचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्याने शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले. विजयानगरच्या कृष्णदेवरायाच्या दरबारात तो रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होता. त्याने व्यवसायात अमाप पैसा मिळविला होता, तरी तो वृत्तीने कृपण होता. तथापि त्याची पत्नी सरस्वतीबाई ही तिच्या दानशीलतेमुळे नवऱ्याच्या रोषास पात्र झाली असता, तिने एका ब्राह्मणाला दान म्हणून दिलेली नथ ईश्वरी चमत्कारामुळे परत तिच्या नवऱ्याच्या हाती आली आणि तिची अब्रू वाचली. या चमत्कारामुळे तिम्मप्पा नायकाने धनदौलत सोडून मिक्षापात्र अवलंबिले, अशी एक आख्यायिका आहे.
दासपंथाचे संस्थापक श्रीपादराय यांचे एक महान शिष्य व्यासराय यांनी त्यास माध्व वैष्णव पंथाची दीक्षा दिली (१५२५) व पुरंदर विठ्ठल असे त्याचे नाव ठेवले. तथापि व्यवहारात ते नाव पुरंदरदास असेच राहिले. पुरंदरदास जसा महान भगवद्भक्त होता, तसाच मोठा संगीतज्ञही होता. कर्नाटक संगीत पितामह म्हणून त्यास गौरविले जाते. कर्नाटक संगीत शिकविण्यासाठी त्याने पाठ तयार केले, म्हणून त्यास आदिगुरू मानतात. कर्नाटक संगीताचे प्रमुख प्रवर्तक त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री यांना पुरंदरदासापासूनच प्रेरणा मिळाली. त्याच्या काळापासून ‘मायामालवगौळ’ हा राग अभ्यासकांना प्रारंभी शिकवला जाऊ लागला. त्याने रचलेले ‘कीर्तन’, ‘सुळादी’ आणि ‘उगाभोग’ हे काव्यप्रकार प्रसिद्ध आहेत. संस्कृत काव्यरचना करण्याची परंपरा मोडून त्याने देश भाषेत-कानडी भाषेत ‘देवरनाम’ नामक भक्तिरचना केल्या. त्याने सु. ४,७५, ००० पदे रचली असावीत, असे मानले जाते. तथापि त्यांपैकी काही हजार पदेच उपलब्ध आहेत. दक्षिण भारतात सर्वत्र गाइल्या जाणार्यास त्याच्या पदांमध्ये पुरंदर विठ्ठल असे कर्त्याचे नाव असते. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांनी महाराष्ट्रात वैष्णव धर्माचा प्रचार केला, त्याप्रमाणेच पुरंदरदासाने दक्षिणेत, विशेषतः कर्नाटकात भक्तिपंथास लोकप्रियता मिळवून दिली.
दिवेकर, गु. व्यं. रंगाचारी, पद्मा (इं.) रानडे, अशोक (म.)