‘पुदुमैप्पित्तन‌्’ : (१९०६–१९४८). आधुनिक तमिळ लघुकथाकार व समीक्षक. जन्म तिरुनेलवेली जिल्ह्यातील एका खेडेगावी. त्यांचे शिक्षण फारच थोडे झाले. विद्यापीठाच्या प्रवेश परिक्षेपर्यंतही ते पोहचू शकले नाहीत तथापि वाचनाचा त्यांना दांडगा हव्यास होता. इंग्रजी साहित्याचेही त्यांनी विपुल वाचन केले होते. मूळ नाव सी. वृद्धाचलम‌्. पुदुमैप्पित्तन‌् हे त्यांचे टोपणनाव. दिनमणि या प्रसिद्ध तमिळ दैनिकाचे एक संपादक म्हणून त्यांनी बरेच दिवस काम केले. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे लेखनास सुरुवात केली.

'पुदुमैप्पित्तन'

लघुकथा हा साहित्यप्रकार व्ही. व्ही. एस्‌. अय्यर यांनी प्रथम तमिळमध्ये आणला असला, तरी त्याला समृद्ध व लोकप्रिय बनविण्याचे श्रेय सर्वस्वी पुदुमैप्पित्तन‌् यांच्याकडेच जाते त्यांनी सु. २०० लघुकथा लिहिल्या. मुक्त कुचेल (१९३९), पुदुमैप्पित्तन‌् कथैकळ (१९४०), मणियोशै (१९४५), आण्मै (१९४७), कपाटपुरम्‌ (१९५१), विपरित आशै (१९५२), पुतिय ओळि (१९५३) इ. त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत.

‘पुदुमै’ म्हणजे नावीन्य किंवा नवल आणि ‘पित्तन’ म्हणजे आवड किंवा हव्यास असलेला. म्हणून पुदुकुमैप्पित्तन‌् या नावाचा अर्थ नाविन्याचा हव्यास असलेला असा होतो. त्यांचे हे नाव त्यांच्या लेखनशैलीचेच निदर्शक आहे. आपल्या ‘शापविमोचन’ ह्या कथेमध्ये त्यांनी रामाच्या पक्षपातीपणाबद्दल त्याची निंदा केली आहे, तर, ‘ईश्वर आणि कंदस्वामी पिळ्ळै’ ह्या कथेमध्ये शिव-पार्वतीवर टीका केली आहे. ईश्वरास कंदस्वामीच्या घरी आणून त्याला पृथ्वीवरील यातना, दुःख दाखवून या कथेत त्रस्त करून सोडले आहे. पुराणकथांच्या आधुनिक अर्थविवरणाची ही उत्तम उदाहरणे होत. काही जुन्या रूढींचा त्यांनी स्वीकार केल्याचीही काही उदाहरणे त्यांच्या कथांत आढळतात. ‘रज्जुसर्प’ ह्या कथेमध्ये त्यांनी काळाच्या भ्रामक स्वरूपाचे वर्णन केले आहे. ‘अहम्’ मुळेच काळाला महत्त्व आहे, अहम‌् नसेल तर काळही असणार नाही, असे ते प्रतिपादन करतात.

पुदुकुमैप्पित्तन‌् यांच्या सर्व लेखनात वास्तववादाचा अवलंब केलेला आढळतो. त्यांच्या कथांतील व्यक्तीरेखा जिवंत व प्रभावी आहेत. जीवनातील विकृतींचेही त्यांनी दर्शन घडविले आहे. नवरत्नजडित मंडपातही त्यांना, अन्य कुणास न दिसणारे, कोळ्याचे जाळे दिसते. सामान्य लोकांच्या मनात खोलवर डोकावून त्यांनी त्यांच्या भावना साकार केल्याचा प्रत्यय त्यांच्या अनेक कथांतून येतो. स्वतःच्या आयुष्यात ते निराश, दुःखी होते, याचे प्रतिबिंब त्यांच्या कथांतूनही उमटलेले दिसते. पुराण, परमेश्वर, काळ अशा विषयांबरोबरच सामाजिक किंवा राजकीय विषयही त्यांनी आपल्या कथांतून हाताळलेले आहेत. त्यांची विचारसरणी स्वतंत्र होती. कोणतेही सामाजिक, धार्मिक वा राजकीय बंधन ते मानत नव्हते. आपल्या चिकित्सक व सूचक लेखनाने समाजातील दोषांवर त्यांनी कठोर टिका केली आहे.

लघुकथेबरोबरच साहित्यसमीक्षा हा प्रकारही समर्थपणाने त्यांनी हाताळला. परभाषांतून तमिळ भाषेत अनुवादित झालेल्या साहित्याची समीक्षा करून मूळ लेखकांच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा त्यांनी तीत प्रयत्न केला. त्यांच्या ह्या समीक्षेमुळेच अनुवादित साहित्याला विशेष प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळाली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वि.स.खांडेकर यांच्या तमिळमध्ये अनुवादित झालेल्या काही कादंबऱ्यांवर त्यांनी केलेली टिका व त्यामुळे ह्या कादंबऱ्यांना लाभलेली लोकप्रयता. ⇨ ‘कल्कि’– आर. कृष्णमूर्ती (१८९९–१९५४) या नावाने प्रसिध्द असलेल्या तमिळ लेखकावर ‘रस-मट्टम’ या टोपणनावाने त्यांनी कठोर टिका केली. रस-मट्टम या नावाचे  दोन अर्थ होतात : एक म्हणजे रसाभास या अर्थाने त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला संतुष्ट करून स्वतःकडे कमीपणा घेतला आहे. दुसरा अर्थ समपातळी किंवा उतार अजमाण्यासाठी गवंडी लोक पाणसळ नावाचे जे साधन वापरतात ते. हे दोन्ही अर्थ त्यांना ह्या टिकेत अभिप्रेत होते. पुदुमैप्पित्तन‌् यांनी मुक्तच्छंदात काही काव्यरचनाही केली आहे तथापि त्यांची खरी प्रतिभा अविष्कृत झाली, ती लघुकथेमध्येच. तमिळ लघुकथेला त्यांनी एक नवे लोभसवाणे रूप प्राप्त करून दिले. त्यांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा प्रभाव होता असे जरी म्हटले जात असले, तरी तमिळ कथेच्या सध्याच्या वैभवाचे व समृद्धीचे बरेचसे श्रेय त्यांच्याकडेच जाते.

तिरुनेलवेली येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने तमिळ साहित्याची फार मोठी हानी झाली आहे.

वरदराजन्, मु. (इं.) जोशी , पु. दि. ब्रह्मे, माधुरी (म.)