पुण्याहवाचन : कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस केला जाणारा एक हिंदू विधी. विवाहादी संस्कार, यज्ञ, मूर्ती व मंदिर यांची स्थापना यांसारखी शुभ कार्ये चांगल्या मुहूर्तावर, चांगल्या दिवशी केली जातात.शुभ दिवसास पुण्याह असे म्हणतात. हा दिवस कसा ठरवावा हे सांगताना तैत्तिरीयब्राह्मणात (१·५·२·१) म्हटले आहे, की ज्या पुण्य म्हणजे शुभ नक्षत्रावर कर्म करावयाचे असेल, ते नक्षत्र सूर्योदयापूर्वी आकाशात पहावे. सूर्योदयानंतर ते नक्षत्र दिसणार नाही. ज्या जागी नक्षत्र पाहिले असेल, त्या ठिकाणी सूर्य आला म्हणजे तो ‘पुण्याह’ समजावा पण कर्मारंभी हा दिवस पुण्याह आहे, हे ब्राह्मणाकडून म्हणवून घेणे , यास पुण्याहवाचन म्हणतात. ब्राम्हणांना भोजन देऊन संतुष्ट करणे व त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे, हा या विधीतील महत्त्वाचा भाग आहे. वरुणदेवतेची पूजा करून हे पुण्याहवाचन होते. यजममानास ब्राह्मण आशीर्वाद देतात व त्यास मंत्रपूत जलाने अभिषेक करतात. या विधीमध्ये चारही वेदांतील आशीर्वादपर मंत्र म्हटले जातात. ‘स्वस्ति’ हा शब्द उच्चारूनही ब्राह्मण आशीर्वाद देत असल्यामुळे, या विधीस स्वस्तिवाचन असेही नाव आहे.
केळकर, गोविंदशास्त्री