पुणतांबे : (पुणतांबा). महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील शहर व प्राचीन क्षेत्रस्थान. लोकसंख्या २२,००० (१९७८ अंदाज). हे गोदावरी नदीच्या काठावर वसले असुन दौंड–मनमाड लोहमार्गावरील स्थानक आहे. हे सडकेने कोपरगावच्या आग्नेयीस २० किमी . व अहमदनगरच्या उत्तरेस ७२ किमी आहे. या प्राचीन क्षेत्री याज्ञवल्क्य ऋषींनी य़ज्ञ केला आणि त्यातून देवीची मूर्ती प्रकट झाली, अशा कथा आहे. तेथील पुण्यस्तंभावरूनच या गावाला पुण्यस्तंभ हे नाव पडले व याचाच अपभ्रंश पुणतांबे हा असावा. येथे गोदावरी नदीवर दोन घाट असून एक इंदुरची राणी अहिल्याबाई होळकरने,तर दुसरा शिवराम धुमाळने बांधला आहे.गावाची तटबंदी जमखिंडीकर पटवर्धन यांनी केली होती. हठयोगी चांगदेवाच्या ठिकठिकाणी तेरा योगसमाध्या असून, येथील समाधी ही अखेरची म्हणजे चौदावी असल्याची समजूत आहे.
येथील चांगदेवाचे मंदिर सोळाव्या शतकाच्या मध्यास बांधलेले असावे. व्यंकटेश व काशी विश्वेश्वर यांची मंदिरे प्राचीन असून, काळभैरवनाथाचे देवस्थान जागृत समजले जाते. येथे महादेव, विठ्ठल, दत्त, श्रीराम इत्यादींची तसेच मारुतीची २१ मंदिरे आहेत. दरवर्षी आषाढ व कार्तिक महिन्यांतील वद्य एकादशीस आणि महाशिवरात्रीस तसेच सबंध चैत्र महिन्यात येथे यात्रा असते. वेदविद्येच्या अध्ययन-अध्यापनाची येथे परंपरा आहे.
गूळ, साखर, धान्य इ. शेतमालाचे हे विपणन केंद्र असून, सोमवारी मोठा बाजार भरतो. येथे चांगदेव साखर कारखाना आहे. याच्या आसमंतात महाराष्ट्र राज्य कृषि-निगमाची शेते आहेत. शहरात महात्मा जोतिबा फुले शेतीशाळा, फळांची रोपवाटीका, प्राथमिक व माध्यमिक शाळा, धान्याचे गोदाम, पशुचिकित्सालय, दवाखाने इ. सुविधा आहेत.
चौधरी, वसंत