पीर : या फार्सी शब्दाचा अर्थ ‘गुरु’ वा ‘मोठी किंवा वडीलधारी व्यक्ति’ असा असला, तरी ⇨ सुफी पंथानुसार पीर हा ‘मुर्शिद’ म्हणजे आध्यात्मिक गुरू ठरतो. इस्लाममधील गूढवादी परंपरेत पीर ह्या अर्थीच शेख, मुर्शिद, उस्ताद ह्या संज्ञाही वापरल्या जातात. भारतात ‘पीर’ संज्ञा विशेष प्रचलित आहे. प्रेषिताच्या आध्यात्मिक उपदेशाचे स्पष्टीकरण करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष वंशातील व्यक्तीच पीर असतात, असे मानले जाते. मुरीदला म्हणजे मुमुक्षूला योग्य मार्गदर्शन करणारा पीर अर्थातच अनुसरणपात्र असावयास हवा. अध्यात्माच्या तीनही अवस्थांचे सैध्दांतिक आणि अनुभवसिध्द ज्ञानही त्याच्याजवळ असले पाहिजे. पीर हा मुमुक्षूला आध्यात्मिक शक्ती वा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून देतो आणि मग त्याला इतर सूफींच्या बरोबर राहण्याची अनुज्ञा देतो. ही देताना तो मुमुक्षूच्या मस्तकावर हात ठेवून त्याला ‘खिर्का’ म्हणजे फकिराची वस्त्रे देतो. दरवेशी पंथाच्या संस्थापकालाही पीर ही संज्ञा लावल्याचे आढळून येते.
सूफी पंथातील सर्वच पंथोपपंथांची सुरुवात चार पीरांनी केल्याचे मानले जाते. भारतातील चार प्रमुख सूफी परंपरांमध्ये चिश्तिया, कादिरीया व सुऱ्हावर्दीया या तीन परंपरा ख्वाजा हसन अल् बसरी ह्या पीराशी संबध्द आहेत आणि चौथी नक्शबंदिया परंपरा अबू बकरशी संबध्द आहे. चिश्तिया पंरपरेस भारतात विशेष महत्त्व असून, या पंथाचा भारतात प्रवेश ⇨ ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती (सु. ११४२–१२३६) यांच्यापासून झाला. कादिरी पंरपरा ⇨ अब्दुल कादिर जीलानी (सु. १०७८–११६६) यांनी प्रवर्तित केली. यांच्या मृत्यूनंतर सु. तीनशे वर्षांनी ही परंपरा भारतात मुहंमद गौस यांनी सुरू केली.
पंचपीर : राजस्थानमध्ये पंचपीर नावाने काही ऐतिहासिक वीर पुरुषांची पूजा होते. ह्या पंचपीरांची नावे अशीः पाबू, हरभू, रामदेव, मांगलिया मेहा व गोंगा. ह्या पंचपीरांच्या नावंत सर्वत्र एकवाक्यता आढळत नाही. भारतात पंचपीरांची व पीरांची अनेक स्थाने असून, त्यांचे उरूस वा यात्रा भरतात. त्यांना भाविक नवस बोलून त्यांना बकऱ्या-कोबंड्यांचे बळीही देतात. सर्वसामान्यपणे चुरमा हा पंचपीरांचा नैवेद्य असतो. हिंदुंप्रमाणेच मुसालमानांतही पंचपीरांची उपासना आहे. शिया पंथात मुहंमद, अली, फातिमा, हसन व हुसेन हे पंचपीर मानतात. राजस्थानात ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, हमजा, हाजी शकुरबार, शीरानी आणि सुझूनू हे पाच पीर मानतात. सुन्नी मुसलमान बहाउद्दीन झिकारिया, शाह सकी आलम, शाह शम्स तब्रीझ, शेख जलाल मकदूम व शेर फरीइद्दीन हे पंचपीर मानतात.
करंदीकर, म. अ.
“