पिसारेव्ह, डम्यीट्रयई : (४ ऑक्टोबर १८४०–१६ जुलै १८६८). रशियन समीक्षक आणि विचारवंत. जन्म ऑरेल प्रांतातील झ्नाम्यिस्कयी येथे. सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले (१८५६–६१).
विशुध्द कलावादाचा कडवा विरोधक म्हणून पिसारेव्हची ख्याती आहे. कलेचा विचार केवळ उपयुक्तवादी दृष्टीकोणातून केला गेला पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. शेक्सपिअरच्या नाटकापेक्षा बुटाची एक जोडी अधिक मोलाची आहे, हे त्याचे विधान प्रसिध्द आहे. औद्योगिकीकरणाचे महत्त्व, लोकशाही स्वातंत्र्य, बुध्दिवंत वर्गाची सामाजिक कर्तव्ये, स्त्रियांचे विमोचन इ. विषयांवर पिसारेव्हने केलेले लेखन वादग्रस्त पण महत्त्वाचे ठरले. समाजाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि भौतिक प्रगती अत्यंत महत्त्वाची असून ती साधण्याच्या आड जे जे येते ते विघातक होय, अशी त्याची धारणा होती. भावविवशता आणि स्वप्नाळूपणा ह्यांचा त्याने निषेध केला. विख्यात स्वच्छंदतावादी रशियन साहित्यिक अलिक्सांद्र पुश्किन ह्याच्या साहित्यावरही त्याने प्रखर टीका केली. रुस्कोये स्लोवो (इं. शी. द रशियन वर्ड), रासस्वेत (इं. शी. डॉन), द्येलो (इं. शी. डीड) आणि अत्येचेस्तवेन्नीये जापीस्की (इं. शी. नोट्स ऑफ फादरलँड) ह्या नियतकालिकांतून त्याचे लेखन प्रसिध्द झाले. स्खोलास्तिका XIX वेका (१८६१, इं. शी. स्कॉलेस्टिक्स ऑफ नाइंटिंथ सेंच्यूरी) रियालिस्ती (१८६४, इं. शी. द रिअलिस्ट्स), पुश्किन इ बिलीन्स्की (१८६५, इं. शी. पुश्किन अँड बिलीन्स्की) हे त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी काही होत. रीगाजवळील दुबूर्ती येथे त्याला अपघाती मृत्यू आला.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)