पिसू : सस्तन प्राण्यांच्या (उदा., कुत्रा, मांजर, उंदीर, माणूस इ.) व क्वचित पक्ष्यांच्या शरीरावर प्रौढावस्थेत बाह्य परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारा) म्हणून राहणाऱ्या व त्यांचे रक्त शोषून घेणाऱ्या या कीटकाचा समावेश सायफनॅप्टेरा गणामध्ये होतो. पिसवा हे अत्यंत लहान कीटक असून दोन्ही बाजूंनी ते चपटे असतात. त्यांना पंख नसतात. मुखाचे चूषकात (ओढून घेऊन शोषण करणाऱ्या अवयवात) रूपांतर झालेले असते. शृगिंका (सांधे असलेली लांब स्पर्शेंद्रिये) आखूड असून जंभ (जबडे) लांब व करवतीसारख्या दातांनी युक्त असतात. प्राण्यांच्या शरीरात हे जबडे सहज खुपसून पिसवा रक्त शोषून घेऊ शकतात. पायांची तिसरी जोडी लांब असल्यामुळे त्यांना सु. ३३ सेंमी. लांब उडी अथवा सु. २५ सेंमी. उंच उडी (त्यांच्या शरीराच्या लांबीच्या व उंचीच्या ५० ते १०० पट अंतराइतकी) मारता येते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
अंडी, अळी, कोश व पूर्णावस्था या पिसूच्या विकासाच्या अवस्था होत. बारीक, लंबगोल, सामान्यतः मऊ, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची प्रत्येक वेळी ८– १२ अंडी पोषकावर (परजीवीला आश्रय देणाऱ्या जीवावर) प्रत्यक्ष घातली जातात व ती पोषकाच्या हालचालींनी पसरतात. चार दिवसांनी त्यांतून अतिशय लहान, चपट्या, काटेरी, पांढऱ्या, करड्या वा फिक्कट पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. त्या घाण खाऊन वाढतात. दुसऱ्या जीवावर त्या अवलंबून नसतात. पंधरा दिवसांनी पूर्ण वाढ झाली असता त्या स्वतः भोवती पातळ, कथिलासारखा कोश निर्माण करतात. त्यातून पंधरा दिवसांनी पूर्ण वाढ झालेला कीटक (पिसू) बाहेर पडतो. याची लांबी सु. ०·३२ सेंमी. असते. पिसू काहीही अन्नग्रहण न करता पुष्कळ काळ जगू शकते. सर्वसाधारणपणे ती एक वर्षापेक्षाही जास्त काळ जगू शकते.
पिसूच्या सु. १,६०० जाती व उपजातींची नोंद झाली आहे. त्यांतील महत्त्वाच्या म्हणजे झेनोप्सायला केओपिस (उंदरावरील) नोसोप्सायलस फॅसिएटस (युरोपियन उंदरावरील) टिनोसेफॅलिडीस फेलिस (मांजरावरील) टिनोसेफॅलिडीस कॅनिस (कुत्र्यावरील) प्युलेक्स इरिटान्स (माणसावरील) एकिड्नोफॅगा गॅलिनॅसिया (उष्ण कटिबंधी कोंबड्यांवरील) टूंगा पेनेट्रान्स (माइटवरील) सेरॅटोफायलस नायजर (सामान्य कोंबडीवरील) या होत.
भारतात आढळणाऱ्या उंदरावरील पिसवा (झेनोप्सायला केओपिस) प्लेगचा प्रसार करतात असे आढळून आले आहे [→ प्लेग]. हा रोग पाश्चुरेला पेस्टिस या सूक्म्यजंतूंमुळे होतो. पिसू ज्या वेळी मनुष्याचे रक्त शोषते त्या वेळी सर्व रक्त तिच्या अन्ननलिकेत न जाता काही या सूक्ष्मजंतूंसह पुन्हा मनुष्याच्या शरीरात येते व त्यामुळे माणसाला प्लेग होतो. म्यूरिन टायफस [→ प्रलापक सन्निपात ज्वर], ट्युलॅरिमिया (पाश्चुरेला ट्युलॅरेन्सिस या सूक्ष्मजंतूंमुळे होणारा, प्लेगशी सदृश असलेला आणि उंदीर, ससे वगैरेंना होणारा व त्यांच्याद्वारे मानवाला होणारा रोग), रशियन मस्तिष्कशोथ (सायबीरियात आढळणारा मेंदूची दाहयुक्त सूज होणारा रोग), सशातील मिक्झोमॅटोसिस (मॉलिटर मिक्झोमी या व्हायरसामुळे होणारा संसर्गी व अतिशय मारक रोग) आदी रोग पिसवांच्या विविध जातींच्या द्वारे होतात. पाणपिसू ही आकाराने पिसूप्रमाणे दिसते पण नामसादृश्याखेरीज त्यांच्यात काही साम्य नाही [→ पाणपिसू].
नियंत्रण : पिसवांपासून विविध प्रकारचे सांसर्गिक रोग फैलावत असल्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे वा नाश करणे हे महत्त्वाचे आहे. आधुनिक कीटकनाशकांच्या वापराव्यतिरिक्त घरांची स्वच्छता ठेवणे, उंदरांचा नायनाट करणे, कुत्री, मांजरे, कोंबड्या हे पाळीव प्राणी स्वच्छ ठेवणे या प्राथमिक गोष्टी करणे आवश्यक असते. डीडीटी, क्लोरडान, लिंडेन, मॅलॅथिऑन, पायरेथ्रिन, लेथेन, थानाइट इ. कीटकनाशकांचा घरांच्या भिंती, छते यांवर फवारा मारल्यास पिसवांचा नाश होतो. मेंथॉलयुक्त मलमे, कार्बोलेटेड व्हॅसेलीन, कापराचे तेल, डायमिथिल थॅलेट, बेंझिल बेंझोएट, डाय-एथिल टोल्युअमाइड इ. पायांवरील कपड्यांच्या भागाला अथवा त्वचेला लावल्यास पिसवांचे प्रतिवारण (दूर पिटाळणे) होऊ शकते.
टोणपी, गो. त.
हिमपिसू : ॲप्टेरिगोटा उपवर्गातील कोलंबोला गणाच्या पोड्यूरिडी कुलातील हा कीटक होय. –५० से. ते ५० से. तापमान असलेल्या जगातील बहुतेक सर्व अतिथंड हिमाच्छादित प्रदेशांत हे कीटक आढळतात. त्यांच्या सु. १,१०० जाती आहेत. हिमपिसवा अत्यंत लहान असून त्यांच्या जीवनवृत्तात रूपांतरण (अंड्यांतून बाहेर पडल्यावर कीटकांची क्रमश: वाढ होऊन त्यांच्या शरीरात स्थित्यंतरे घडून येतात अशा निरनिरळ्या अवस्थांमधून कीटकांच्या होणाऱ्या विकासाला रूपांतरण म्हणतात) नसते. शरीर अनावृत (उघडे) असते अथवा त्यावर खवले व केस असतात. शृंगिका ४–६ खंडांची बनलेली असते. डोळे असतात वा नसतात. हिमपिसवांच्या पुष्कळ जाती ओलसर दमट जागी राहतात. गुहा, मुंग्यांची वारुळे, झाडांच्या साली, गवते ही त्याची वसतिस्थाने होत. अंड्यांमधून बाहेर आलेले कीटक ३ ते ५ मिमी. लांब, गडद निळसर काळे असून जमावाने वावरतात. बर्फाच्या पृष्ठांवर हिमपिसवा उठून दिसतात. कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), दगडफुले, डायाटम (एकपेशी व अतिसूक्ष्म वनस्पती), शैवले, परागकण, कुजके मांस हे त्यांचे मुख्य अन्न होय. मॅपलचा रस गोळा केलेली पात्रे, भूछत्रे लावलेले वाफे व पादपगृहातील (नियंत्रित परिस्थितीत वनस्पती वाढविण्यात येणाऱ्या बंदिस्त जागेतील) रोपे यांमध्ये क्वचित हिमपिसवा उपद्रवी असल्याचे आढळून आले आहे.
रानडे, द. र.
“