पिनीरो, आर्थर विंग : (२४ मे १८५५ – २३ नोव्हेंबर १९३४). इंग्रज नाटककार. लंडनमध्ये जन्मला. वडील सॉलिसिटर होते आणि ह्याच व्यवसायात आपल्या मुलाने पडावे ह्या दृष्टीने ते त्याला कायद्याचे शिक्षण देऊ पहात होते; परंतु कायद्याचा अभ्यास सोडून नट म्हणून तो प्रथम नाट्यक्षेत्रात आला. १८७६–८१ ह्या कालखंडात लंडनमधील ‘लायसिअम’ ह्या नाटकमंडळीत तो होता. तेथे असताना विख्यात इंग्रज अभिनेता हेन्री अर्व्हिंग ह्याच्याशी पिनीरोचा संबंध आला. नट म्हणून रंगभूमीवर वावरत असतानाच अर्व्हिंगच्या प्रेरणेने पिनीरो नाट्यलेखनही करू लागला. टू हंड्रेड पाउंड्स अ यीअर हे त्याचे रंगभूमीवर आलेले (१८७७) पहिले नाटक. पिनीरोची आरंभीची काही नाटके प्रहसनात्मकअसून त्यांतीलद मनी स्पिनर (१८८०), द मॅजिस्ट्रेट (१८८५) वस्वीट लव्हेंडर (१८८८) ही काही विशेष उल्लेखनीय होत. प्रहसनात्मक घटना निर्माण करण्यापेक्षा मानवी स्वभावातील विसंगतींवर त्याने विशेषभर दिला. पुढे पिनीरो गंभीर स्वरूपाच्या नाट्यलेखनाकडे वळला आणि आधुनिक समाजातील स्त्री-पुरुष संबंधांतून निर्माण होणाऱ्या समस्या आपल्या नाटकांतून मांडू लागला. द सेकंड मिसेस टँकरे (१८९३) ह्या त्याच्याअशाच एका समस्यात्मक नाटकाने एक प्रमुख इंग्रज नाटककार म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. पिनीरोच्या ह्या नाट्यकृतीवर इब्सेनच्या नाट्यदृष्टीचा आणि नाट्यतंत्राचा प्रभाव दिसतो. द नटोरियस मिसेस एब्स्मिथ (१८९५), दगे लॉर्डक्यू (१८९९), आयरिस (१९०१) ह्या त्याच्या अन्य नाट्यकृतींतूनही हा प्रभाव प्रत्ययास येतो.
पिनीरोच्या नाट्यकृती तंत्रदृष्ट्या अत्यंत सफाईदार आहेत. समकालीन नैतिक प्रश्नांविषयी त्यानेआस्था दाखविली तथापि अशा प्रश्नांची सखोल जाण, तसेच ते मांडण्यासाठी आवश्यक असलेली मोठ्या नाटककाराची प्रतिभा वा कल्पकता त्याच्या ठायी नव्हती. म्हणूनच आपल्या समस्यात्मक नाटकांतून मर्मग्राही शोकात्मिका तो निर्माण करू शकला नाही. व्हिक्टोरियन नाट्यकृतींमध्ये त्याला जाणवणारी यांत्रिकता आणि ठोकळेबाजपणा घालविण्यासाठी समस्यात्मक नाटके लिहून त्यांत नवता आणण्याचा मौलिक यत्न त्याने आस्थापूर्वक केला. लंडन येथेच तो निधन पावला.
बापट, गं. वि.