पित्रोनिअस : (? – इ. स. ६६). रोमनकवी. लॅटिनमधील Satyricon ह्या ठकसेनी पद्धतीच्या (पिकरेस्क) रोमान्सचा कर्ता. रोमन इतिहासकार टॅसिटस ह्याने बिथिनिआच्या कॉन्सलपदी काही काळ असलेल्या एका पित्रोनिअसची माहिती दिलेली आहे. हाच पित्रोनिअस Satyricon चाकर्ता असावा, असे आज सामान्यत: मानले जाते. टॅसिटसने पित्रोनिअसविषयी असे म्हटले आहे की, तो अत्यंत विलासी आणि उधळ्या होता ऐदीपणाने जगणे त्याला आवडत असले, तरी अधिकारपदी असताना विलक्षण कार्यतत्परता त्याने दाखविली होती; रोमन सम्राट नीरो (कार. इ. स. ५४–६८) ह्याच्या निकटवर्तीयांत पित्रोनिअसला प्रवेश मिळाला; भोगविलासांच्या बाबतीत अभिजात अभिरुची काय असू शकते, ह्याबाबत पित्रोनिअसचाच सल्ला नीरो वेळोवेळी मानू लागला. अशा तऱ्हेने अभिरुचीचा परीक्षक झाल्यामुळे ‘पित्रोनिअसआर्बिटर’ म्हणून तो ओळखला जातो. पित्रोनिअसचा मत्सर करणाऱ्या एका व्यक्तीने नीरोचे मन पित्रोनिअसविषयी कलुषित केल्यामुळे नीरोने पित्रोनिअसला क्यूमी येथे स्थानबद्ध केले. तेथेच त्याने एकाअभिनव पद्धतीने आत्महत्या केली. शरीरातल्या नसांना जखम करून त्यांतून रक्त वाहू द्यावे; त्या जखमा बांधाव्या; पुन्हाउघडाव्याअशा पद्धतीने सावकाश त्याने प्राणत्याग केला. हे करीत असताना त्याचे मित्रांशी गप्पा मारणे, हलकीफुलकी गीते ऐकणे इ. चालू होते.
पित्रोनिअसचा रोमान्स आज त्रुटित अवस्थेत उपलब्ध आहे. तो मुख्यत: गद्यात असला, तरी त्यात अधूनमधून पद्ये विखुरलेली आहेत. एंकोल्पिअस आणि ॲसिल्टस ह्या दोन लबाड माणसांची आणि गिटन ह्या त्यांच्या नोकराची दक्षिण इटलीतील भ्रमंती आणि साहसे हा ह्या रोमान्सचा विषय. पित्रोनिअसची वास्तववादी लेखन दृष्टी ह्या रोमान्समधून प्रत्ययास येते. पित्रोनिअसच्या काळात काही ग्रीक रोमान्सही लिहिले गेले होते. त्यांतील अद्भूतरम्यता, भावविवशता, तर्कबुद्धीला न पटणारे योगायोग, सद्गुणी, परिपूर्ण नायक घडविण्याची धडपड इ. वैशिष्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तर पित्रोनिअसचा वास्तववाद विशेष मौलिक वाटतो किंबहुना ग्रीक रोमान्सचे विडंबन करण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असेही वाटते. पित्रोनिअसने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा वास्तव जगाला जास्त जवळच्या आहेत. समकालीन समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, तल्लख विनोदबुद्धी, प्रभावी उपरोध प्रचुरता, वाङ्मयव्यासंग इ. पित्रोनिअसचे गुणही ह्या रोमान्समधून दिसून येतात. ट्रीमाल्चीओ नावाच्या गृहस्थाच्या घरी झालेल्या मेजवानीचे वर्णन हा उपलब्ध Satyricon मधील सर्वोत्कृष्ट भाग होय. संपत्ती आणि प्रतिष्ठितपणा ह्यांचे अभिरुचिशून्य प्रदर्शन कसे केले जाते, हे त्या वर्णनातून दिसते. लॅटिनचे बोलभाषेतील रूप ह्या वर्णनात आलेल्या संभाषणांतून पहायला मिळते. ह्या रोमान्समध्ये अशिष्ट वाटावा, असा काही भाग असला, तरी त्याच्या वाचनानंतर होणारा मुख्य संस्कार वेगवेगळ्या पातळ्यांवर होणाऱ्या उत्तम मनोविनोदनाचाच आहे. पित्रोनिअसने ह्या रोमान्समधून केलेले कला-साहित्यावरील भाष्यही मार्मिक आहे. लॅटिन साहित्यातील ल्युसिलिअस, व्हॅरो, हॉरिस आदी उपरोधकारांच्या परंपरेत पित्रोनिअसचे स्थानही महत्त्वाचे आहे.
कुलकर्णी, अ. र.