पिकांची फेरपालट : एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात. एकाच जमिनीत तेच तेच पिक वर्षानुवर्षे घेत गेले म्हणजे पीक चांगले येत नाही, असा शेतकर्‍यांचा शेकडो वर्षाचा अनुभव आहे पण या अनुभवाला शास्राची जोड नव्हती म्हणून पिकावर तेच पीक चांगले का येत नाही, कोणत्या पिकावर कोणते पिक चांगले येईल व कोणत्या पिकावर ते चांगले येणार नाही इ. गोष्टी त्यांना पुराव्यानिशी सांगता येत नव्हत्या.

एका पिकाचे दुसर्‍यावरचे परिणाम अनेक तर्‍हांनी व कारणांनी घडून येतात पण मुख्यत्वेकरून हे परिणाम एखाद्या पिकाने जमिनीतील पाणी व अन्नांश वाजवीपेक्षा कमीजास्त शोषून घेतल्यामुळे किंवा त्याने दुसर्‍या पिकाला किंवा स्वत:लासुध्दा अनिष्ट व अपायकारक असे काही द्रव्य जमिनीत सोडल्याकारणाने जास्त प्रमाणात दिसून येतात.

चांगल्या फेरपालटीमुळे जमिनीचा कस व पिकाऊपणा टिकून तो अनेकदा वाढतो. ⇨सनतागाच्या (सनहेंपच्या) किंवा इतर शिंबावंत [शेंगा धारण करणार्‍या ⟶ लेग्युमिनोजी] पिकांच्या बेवडामुळे किंवा ती जमिनीत गाडल्यामुळे तिच्यातील जैव पदार्थ व पोषक द्रव्ये वाढविण्यास मदत होऊन नंतर येणार्‍या गहू, ज्वारी, भाजीपाला इ. रब्बी पिकांचे उत्पन्न वाढते. फेरपालटीत निरनिराळ्या जातींच्या व निरनिराळ्या प्रकारच्या मुळव्याच्या पिकांचा समावेश होत असल्यामुळे जमिनीतल्या एकाच थरांतील अन्नांश नेहमी वापरला न जाता निरनिराळ्या थरांतील अन्नांश वापरला जातो व त्यामुळे सर्वच जमिन लवकर निकस होत नाही. ज्वारी बाजरीसारखी उथळ मुळ्यांची पिके वरच्या थरांतील अन्नांश जास्त प्रमाणात घेतात पण कापसासारख्या पिकांच्या मुळ्या जास्त खोल जात असल्यामुळे ज्वारीसारख्या पिकांच्या मुळ्यांनी वापरलेल्या थराच्या खालच्या थरामधून आपले अन्न ती पिके घेत असतात. यामुळे एकाच थरांतील अन्नांश एकदम फार कमी होत नाही. तसेच निरनिराळी पोषक द्रव्ये वापरणार्‍या पिकांचा फेरपालटितसमावेश केल्यामुळे जमिनीत पोषक द्रव्यांचा समतोल राखला जातो. उदा., ज्वारी, बाजरी, गहू यांच्यासारखी नायट्रोजन जास्त प्रमाणात शोषणारी पिके किंवा पोटॅश जास्त घेणारी कंदमुळांची पिके अथवा फॉस्फरस अधिक प्रमाणात घेणारी द्विदल व कडधान्यासारखी पिके त्याच जमिनीत दरसाल करीत गेल्यास त्या जमिनीत नायट्रोजन किंवा पोटॅश अथवा फॉस्फरसाची उणीव उत्पन्न होईल. अशा परिस्थितीत जमिनीतील पोषक द्रव्यांचा समतोल नष्ट होऊन पिकांच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होईल.

फेरपालटीमुळे मर्यादित खतांची चांगली काटकसर होऊन त्यापासून जास्तीत जास्त फायदा करून घेता येतो. ऊस, तंबाखू व बगायती कापूस यांसारख्या पिकांना भरपूर दिलेल्या खतपाण्याचा काही अंश फेरपालटीत येणार्‍या नंतरच्या पिकांना मिळून त्यांपासून सहजासहजी चांगले उत्पन्न मिळु शकते. 

फेरपालटीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्या पध्दतीमुळे काही किटक व रोग यांना आळा बसतो. कापसासारखे एकच पिक त्याच जमिनीत वर्षानुवर्षे घेत गेल्यास त्याच्यावरील बोंड अळीसारख्या कीटकाचा उपद्रव जास्त वाढतो, पिकावरील खर्च वाढतो व उत्पन्न घटते. त्याऐवजी फेरपालट पध्दतीप्रमाणे पिके घेतल्यास अशा कीटकांच्या खाद्यात खंड पडून व त्यांचा आसरा नष्ट होऊन त्यांना पायबंद बसतो. तसेच फेरपालटीमुळे अनेक तणांचाही बंदोबस्त करता येतो. ज्या पिकांची लागवड करण्यास नांगरट लागत नाही असे पिक त्याच जमिनीवर वर्षानुवर्षे करीत गेल्याल हरळी, कुंदा, लव्हाळा यांसारख्या तणांचा प्रदुर्भाव होतो व उत्पन्न घटते. पण अशा पिकांची फेपालट खोल नांगरट करावी लागणार्‍या ऊस, रताळी, हळद वगैरेंसारख्या पिकांशी केल्यास या तणांचा नायनाट करणे सुलभ होते.

फेरपालटीच्या पिकांच्या योजनेत दोन किंवा अधिक पिकांचा समावेश केल्याने बाजारातील शेतमालाच्या पडलेल्या किंमतीमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीचा धोका कमी होतो. तसेच प्रतिकुल हवामानामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याला दुसर्‍या पिकांतून उत्पन्न मिळते. अशा प्रकारे त्याला सर्व पिके बुडण्याचा व नुकसानीचा धोके राहत नाही. त्याचप्रमाणे ह्या पध्दतीमध्ये शेतकर्‍याला निरनिराळी सर्वसाधारण उपयोगाची पिके (उदा., धान्य, कडधान्ये, गळिताची पिके), नगदी पिके, वैरणीची पिके इत्यादींचा समावेश करून आपल्या कुटुंबाच्या व जनावरांच्या गरजा भागविणे शक्य होते. 

फेरपालटीमुळे जमिनीचा, शेतभांडवलाचा व शेतमजुरांचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो. तसेच निरनिराळ्या हंगामात येणारी निरनिराळी पिके घेता येत असल्यामुळे शेतकर्‍याला वर्षभर पुरेसे काम मिळते आणि एका ठरावीक वेळेला होणारी कामाची गर्दी व खर्च टाळता येतो. उपलब्ध असलेल्या साधनांचा किफायतशीर व चांगला उपयोग करता येतो. उत्पन्न हप्त्याहप्त्याने मिळत राहते. दाट वाढीमुळे जमीन पूर्ण झाकून टाकणारी भुईमूग, मूग, उडीद यांच्यासारखी पिके जर फेरपालटीत असली, तर त्यांच्यामुळे जमिनीची धूप थांबून तिचा कस व उत्पादनक्षमता सुधारतात. पट्टापेर पध्दत यामुळेच फायदेशीर होते. 

पण सर्वच परिस्थितींत पिकांची फेरपालट केलीच पाहिजे असे नाही. कोकणासारख्या जास्त पावसाच्या व उंचसखल दर्‍याखोर्‍यांच्या भागात भात हे एकच मुख्य पीक असल्यामुळे भातानंतर भातच घेणे बर्‍याच ठिकाणी क्रमप्राप्त होते पण दोन भात हंगामांमध्ये उन्हाळ्यांत ३-४ महिने जमिन पडीकच रहात असल्याकारणाने भात आणि पड यांची एक प्रकारची फेरपालटच होत असते. जास्त उताराच्या डोंगराळ जमिनीत गवतावर गवतच घेणे इष्ट असते. पुरामुळे नदीच्या पाण्यात बुडणार्‍या जमिनीत तेचतेच पीक सालाबाद घेत गेले तरी नुकसान होत नाही. कारण दरवर्षीच्या पुरातील गाळाने त्या जमिनीचा कमी झालेला कस भरून येत असतो.

पिकांच्या फेरपालटीत काही परिस्थितीत जमीन पड टाकणे (पडीत ठेवणे) इष्ट असते. ज्या भागात पाऊस फार कमी पडतो अशा टंचाईच्या भागात दरवर्षी पीक न घेता तीन वर्षातून दोन पिके घेतात.⇨ दुर्जल शेती पध्दतीत पिकांच्या फेरपालटीमध्ये जमिन पड ठेवण्यामुळे पुढील वर्षी जास्त पीक मिळते, असे आढळून आले आहे. ज्या वर्षी  जमीन पड ठेवतात त्या वर्षी जमिन नांगरून वरचेवर कुळवाच्या पाळ्या देऊन तणे वाढू देत नाहीत.

महाराष्ट्रात शाळूचे कोरडवाहू पीक ज्या जमिनीत घ्यावयाचे असते ती जमीन वर्षभर पड टाकतात. नंतर पुढील पावसाळ्यात उत्तरा नक्षत्रात पेरणी करतात. जमिनीला विश्रांती मिळाल्यामुळे पोषक अन्यद्रव्ये तयार होतात आणि जर वेळेवर पाऊस पडत राहिला, तर खत दिलेल्या बागायती पिकाइतकेच उत्पन्न येते. पड टाकलेल्या जमिनीत पावसाळ्यात सन ताग किंवा उडीद पेरून पीक फुलावर येण्याच्या सुमाराला जमिनीत गाडल्यास जमिनीतील अन्नांशाचे प्रमाण वाढते व तणांचाही बंदोबस्त होतो. 

कोकणातील वरकस जमिनीत तीन ते चार वर्षे नाचणी, वरी वगैरे पिके घेऊन शेवटच्या वर्षी कारळ्याचे पीक घेतात. व जमिनीचा कस कमी झाल्यामुळे ती ८-१० वर्षे पड टाकतात. जमिनीला विश्रांती मिळाल्यामुळे जमिनीचा कस सुधारतो. त्यानंतर ४-५ वर्षे पीक घेऊन ती जमिन पुन्हा पड टाकतात.

जमीन काही काळ पड ठेवणे इष्ट असले, तरी सर्वच शेतकर्‍यांना ते किफायतशीर होत नाही. पाण्याची सोय असलेल्या व बाजारपेठेनजीकच्या जमिनीत मुबलक खत घालून मिळेल तेवढे पिक घेण्याची शेतकर्‍याची प्रवृत्ती असते. मोठ्या प्रमाणात जिरायती शेती असलेल्या शेतकर्‍यांना आलटून पालटून काही जमीन पड टाकणे सहज परवडते. 


 चांगल्या फेरपालटीची पध्दत आखताना खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. (१) जमीन व हवामान लक्षात घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न देणार्‍या पिकांचीच फेरपालटीसाठी निवड करावी. अशी निवड करणे सोपे आहे कारण सर्वसाधारणपणे एकाच हवामानात व शेती प्रदेशात ऊस, कापूस, ज्वारी, आणि भाजिपाल्यांची निरनिराळी पिके चांगली येऊ शकतात. (२) जमिनीतला जैव पदार्थ व नायट्रोजनाचा अंश टिकविण्याठी गवती व शिंबावंत पिकांचा मुबलकपणे समावेश करावा. फेरपालटीसाठी योग्य शिंबावंत पिके म्हणजे उडिद, मूग, मटकी, सन, ताग, र्धैचा व शेवरी होत. सुधारलेल्या गवती पिकांत मारवेल, ब्ल्यू पॅनिक व गजराज गवत यांसारख्या पिकांचा समावेश होतो. (३) जास्त उत्पन्न देणार्‍या व तणांना अटोक्यात ठेवणार्‍या ऊस, तंबाखू आणि हिरवळीच्या खतांची पिके यांचा समावेश फेरपालटीत जरूर करावा. (४) जनावरांना चारा व इतर खाद्ये भरपूर देता यावीत म्हणून कडवळासारखी पिके, गजराज गवत, मका, शिंबावत पिके वगैरेंचा योग्य विचार करावा. (५) ऊस, कापूस, भाजीपाल्याची पिके तृणधान्याची पिके वगैरे निरनिराळ्या हंगामांत वाढणारी पिके फेरपालटीत यावीत म्हणजे शेतकर्‍यांना वर्षभर काम मिळून जमिनाचा व इतर भांडवलाचा जास्त उपयोग होऊ शकतो. (६) जास्तीत जास्त फायदा देणार्‍या पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्र राखून ठेवावे पण हे करताना जमिनीचा कस व तिची उत्पादनक्षमता घटणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागते. (७) फेरपालटीतल्या प्रत्येक मुख्य पिकाखालील क्षेत्र दरवर्षी जवळजवळ तेवढेच राहिल इकडे लक्ष असावे म्हणजे शेतकर्‍याच्या गरजा भागून नेहमीच्या उत्पन्नात फरक पडणार नाही.

काही महत्त्वाच्या फेरपालटी: भारतातील निरनिराळ्या जमिनींत व हवामानांत प्रचलित असलेल्या काही मह्त्तवाच्या फेरपालटी खाली दिल्या आहेत. त्या जरी सर्व दृष्टींनीशास्रशुध्द नसल्या, तरी त्यांची गणना चांगल्या फेरपालटीत करता येईल, असे त्याबाबतच्या विवेचनावरून दिसून येईल. 

भात-वाल इत्यादी : भात खरीप हंगामात घेतात व वाल, हरभरा, मसूर ही द्विदल वर्गाची पिके रबी हंगामात घेतात. यानंतर उन्हाळ्यात जमीन पड टाकतात. ही फेरपालट कोकण भागात आढळते. 

भातऊस : या फेरपालटीत खरिपात भात घेऊन रबी हंगामात व उन्हाळ्यात उसासाठी जमीन तयार करतात. पावसाळ्याच्या अगोदर सर्‍या पाडून सरीत ऊस लावून सर्‍या बुजवितात. चांगला पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर ऊस उगवून वाढीस लागतो. खात्रीच्या पाण्याची सोय असलेल्या व नियमित खरिप पाऊस असलेल्या पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व बिहार या राज्यांच्या काही भागांत ही फेरपालट करतात. 

सन तागगहू : सन ताग खरिपात गाडून तो पूर्ण कुजल्यानंतर ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करतात. ही पध्दत खात्रीच्या पावसाच्या प्रदेशांतच जास्त फायदेशीर असते. गहू बागायती असल्यास उत्पन्न चांगले येते, पण या पध्दतीत खरिपात सन तागऐवजा जे एखादे पीक घेता आले असते ते घेता येत नाही.

खरिप भाजीपाल्याची पिके-गहू : रबी हंगामात पाऊस चांगला असलेल्या भागात किंवा पाणी देण्याची सोय असलेल्या ठिकाणी ही पध्दत शक्य होते. खरिपात भेंडी, टोमॅटो, श्रावणी घेवडा इ. पिके घेऊन नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास जमीन तयार करून गहू पेरतात. गव्हानंतर उन्हाळ्यात जमीन पडीत राहून तिला विसावा मिळतो.

सन ताग रबी भाजीपाल्याची पिके : खरिपात सन ताग गाडून रबी हंगामात वांगी, कोबी, कॉलीफ्लॉवर, नवलकोल इ. भाज्या घेतात. सन ताग गाडल्यामुळे त्यांना लागणार्‍या भरपूर जैव खतावरचा खर्च वाचतो पण खरिपात दुसरे कुठलेही पीक मिळत नाही. शेणखत किंवा दुसरे जैव खत दुर्मिळ किंवा महाग असलेल्या भागात ही फेरपालट फायद्याची होते.

 सन तागरबी ज्वारी : खरिपात खात्रीचा पाऊस असलेल्या रबी ज्वारीच्या भागांत ही हंगामी फेरपालट करतात. या फेरपालटीत सन तागाची वाढ तीन ते चार आठवड्यांपेक्षा जास्त होऊ देऊ नये. नाही तर ज्वारी पेरावयाच्या अगोदर सन ताग जमिनीत पूर्ण न कुजल्यामुळे ज्वारीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. 

मूगरबी ज्वारी : ही फेरपालट खरिपात खात्रीचा पाऊस असलेल्या व भारी जमिनीच्या प्रदेशांत करतात. खरीप हंगामांत पाऊस समाधानकारक असल्यास मुगासारखे लवकर येणारे पिक घेता येते. नंतर जमिनीला कुळवाच्या पाळ्या वगैरे देऊन लगेच रबी ज्वारी घेता येते. मात्र हस्त नक्षत्राचा पाऊस चांगला झाला, तरच ज्वारीचे पीक चांगले येते. 

भुईमूगगहू : ही एक हंगामी फेरपालट आहे. यात गहू यशस्वी होण्यासाठी पाण्याची सोय असली पाहिजे. लवकर येणार्‍या भूईमुगाच्या जातीच या फेरपालटीत घेतल्या पाहिजेत. या फेरपालटीत गव्हाला खत देण्याची शिफारस असल्यामुळे गहू चांगला येऊ शकतो. 

बाजरीगहू : महाराष्ट्रात नासिक जिल्ह्यात व आसपासच्या भागात ही फेरपालट करतात. शास्रीय दृष्ट्या ही फेरपालट फारशी बरोबर नाही. कारण बाजरी व गहू ही दोन्ही तृणकुलातीलच पीके आहेत पण बाजरी हे खरिपात लवकर येणारे पीक असल्यामुळे व नंतर रबीमध्ये ३-४ पाण्यावरच गहू येत असल्यामुळे विहिरीच्या थोड्याशाच पाण्याची सोय असलेल्या शेतकर्‍यांना ही फेरपालट फार फायद्याची वाटते.

बाजरी-बटाटे : या दोन्ही पिकांना मध्यम हलक्या जमिनी मानवतात म्हणून या पिकांची फेरपालट महाराष्ट्रातल्या खेड, मंचर, चाकण या भागातच करतात. खरिपात बाजरी व त्याच वर्षाच्या रबी हंगामात बटाटे अशी ही फेरपालट आहे. बटाटा हे नगदी बागायती पीक असल्याने त्याला घातलेल्या भरपूर खताचा काहीसा भाग नंतर येणार्‍या बाजरीच्या पिकाला उपयोगी पडतो.

ज्वारीकापूस : ही एक कोरडवाहू शेतीतील वार्षिक फेरपालट आहे. यात एका वर्षी खरीप ज्वारी व दुसर्‍या वर्षी कापूस अशी पिके घेतात. ही फेरपालट फक्त खरिपात चांगला पाऊस पडणार्‍या भागात करतात. महाराष्ट्र, तमिळनाडू व कर्नाटक या राज्याच्या काही भागांत ही फेरपालट करतात. 

भूईमूगकापूस : हीसुध्द एक वार्षिक फेरपालट आहे. भूईमूग किंवा कापूस घेतल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात जमीन पडीत राहते आणि त्यामुळे पिकावरील कीटक व रोगजंतू यांना आळा बसतो. शिवाय ही दोन्ही पिके दोन निरनिराळ्या थरांतून अन्नांश घेतात व त्यामुळे जमीन लवकर निकस होत नाही. शिवाय कापसाला खत घालण्याची यात सोय असते.

बाजरीभुईमूग : महाराष्ट्रातील हलक्या जमिनीत प्रचलित फेरपालट भुईमूगानंतर बाजरी असल्यामुळे भुईमूगाच्या बेवडाचा बाजरीला फायदा मिळतो. 

ज्वारी किंवाबाजरीतंबाखू आणि तंबाखूमिरचीज्वारी : या फेरपालटीच्या पध्दती तंबाखू होणार्‍या काही भागांत पाळतात. तंबाखूच्या बेवडावरील ज्वारी अगर बाजरीचे पीक, तसेच मिरचीचे पीक आणि मिरचीच्या बेवडावरील ज्वारीचे पीक उत्तम येते. 

गहूहरभराकापूस : ही फेरपालट भारताच्या कपाशीची लागवड करणार्‍या काही भागांत प्रचलित आहे. 

कापूसज्वारीभुईमूग : मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत कोरडवाहू भागतील प्रचलीत फेरपालट. भुईमूगाच्या बेवडाचा फायदा कपाशीच्या पिकाला मिळतो आणि कपाशीच्या बेवडावर ज्वारी चांगली येते. 

सन तागऊसकापूस ऊसकापूसगहूसन ताग किंवा ऊसकापूसज्वारीसन ताग : या तीन फेरपालटीच्या पध्दती महाराष्ट्रातील कालव्याच्या क्षेत्रात पाळतात. त्यांच्यामध्ये सन तागाच्या बेवडाचा उसाच्या पिकाला आणि ऊसाच्या बेवडाचा कपाशीच्या पिकाला, ज्वारीला किंवा गव्हाला फायदा मिळून उत्पन्न वाढते. 

संदर्भ : 1. Aiyer, A. K .Y .N. Principles of Crop Husbandry in India, Bangalore, 1957.

   2. Arakeri, H. R. Chalam, G. V. Satyanarayana, P. Donahue, R. L.Soil Management in India, Bombay, 1962.

   3. Vaidya, V. G. Saharabuddhe, K.R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimeneation, Poona, 1972.

चौगुले, भा. आ.