पॉलिंग, लायनस कार्ल : (२८ फेब्रुवारी १९०१-१९ ऑगस्ट १९९४). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व जागतिक शांततेचे एक महान पुरस्कर्ते. ‘रासायनिक बंधाचे स्वरूप रेणूंचा विन्यास (रेणूंतील अणूंची अवकाशातील मांडणी) निश्चित करणारी मूलभूत तत्त्वे आणि जटिल पदार्थाच्या गुणधर्माचे स्पष्टीकरण करण्यासाठी होणारा त्यांचा उपयोग’ या विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९५४ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. जागतिक शांततेच्या संदर्भात अण्वस्त्रांचे चाचणी प्रयोग बंद करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नां बद्दल त्यांना १९६२ चे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. अशा प्रकारे दोन निरनिराळ्या विषयांत हे पारितोषिक पूर्णत: मिळवणारे पॉलिंग हे पहिले शास्त्रज्ञ होत. त्यांचा जन्म पोर्टलंड (ऑरेगन) येथे झाला. त्यांनी ऑरेगन स्टेट कॉलेजातून रासायनिक अभियांत्रिकीतील बी. एस्. ही पदवी १९२२ मध्ये आणि पॅसाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (कॅलटेकमधून) भौतिकीय रसायनशास्त्रातील पीएच्.डी. पदवी १९२५ मध्ये मिळविली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत पीटर डेबाय व आर्. सी. टोलमन यांच्यासमवेत आणि युरोपात आर्नोल्टझोमरफेल्ट, नील्स बोर, एर्व्हीन श्रोडिंजर व विल्यम हेन्री ब्रॅग या सुप्रसिध्द शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले. त्यांनी कॅलटेकमध्ये रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक (१९२७-२९), सहयोगी प्रध्यापक (१९२९-३१) व प्रध्यापक (१९३१-३४) या पदांवर काम केले. १९३६-५८ या काळात ते कॅलटेकमधील गेट्स अँड क्रेलिन केमिकल लॅबोररेटरीजचे संचालक होते. त्यानंतर ते सँता बार्बरा येथील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स या संस्थेत भौतीकिय व जीववैज्ञानिक संशोधन प्रध्यापक (१९६३-६७), सॅन डिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात (१९६७-६९) व पुढे स्टनफर्ड विद्यापीठात (१९६९-७४) रसायनशास्त्रचे प्रध्यापक होते. त्यांच्याच नावाने स्थापन केलेल्या लायनस पॉलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मेडिसिन या संस्थेचे ते १९७३-७५ मध्ये अध्यक्ष होते.
पॉलिंग यांच्या संशोधन कार्याचा मध्यवर्ती विषय बहुदा रासायनिक पदार्थांचे गुणधर्म त्यांच्या रेणवीय विन्यासाच्या संदर्भात अभ्यासणे हाच असल्याचे दिसून येते. सुरूवातीचे त्यांचे कार्य क्ष-किरणांच्या विवर्तन आकृतिबंधाचे [⟶क्ष- किरण] विश्लेषण करून त्यावरून स्फटिकिय संरचना निर्धारित करण्यासंबंधी होते. त्यानंतर ⇨पुंजयामिकीतील समिकरणे रेणवीय विन्यासाच्या सिध्दांताला आधारभूत होऊ शकतील असे समजून आल्यावर त्यांनी अनेक आणवीय उपआणवीय अविष्कारांच्या स्पष्टीकरणार्थ पुंजयामिकीतील पध्दतींचा उपयोग केला. या अभ्यासातून रासायनिक बंधांचे स्वरूप समजावून घेण्यास ते उद्युक्त झाले व सु. दहा वर्षांच्या काळात त्यांनी यासंबंधी कित्येक मूलभूत तत्त्वे शोधून काढली. या तत्त्वांमध्ये बंध परिकक्षांचे संकरण [⟶पुंज रसायनशास्त्र रासायनिक संरचना] व दिशायुक्त, संयुजेचा सिध्दांत [⟶संयुजा], संकर बंध परिकक्षा व पदार्थाचे चुंबकीय गुणधर्म यांतील संबंध, दोन अगर अधिक इलेक्ट्रॉनीय संरचना असलेल्या रेणूंचे अनुस्पंदन [⟶अनुस्पंदन] व अनुस्पंदनाद्वारे रेणवीय विन्यासाचे निर्धारण आणि आंतरआणवीय अंतरे व इतर संरचनात्मक लक्षणे यांचा इलेक्ट्रॉनीय विन्यासाशी असणारा संबंध, या तत्त्वांचा समावेश होता. रासायनिक बंधाच्या या अभ्यासाचा सारांश त्यांनी द नेचर ऑफ केमिकल बॉंड अँड द स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल्स अँड क्रिस्टल्स (१९३९) या ग्रंथरूपाने प्रसिध्द केला. त्यांच्या अनुस्पंदन सिध्दांतामुळे कार्बनी संयुगांच्या [ विशेषत: अरोमॅटिक संयुगांच्या ⟶अरोमॅटिक संयुगे] काही विशिष्ट गुणधर्मासंबंधी पुष्कळशी माहिती उपलब्ध झालेली आहे.
इसवी सन १९३४ पावेतो पॉलिंग यांचे बहुतेक संशोधन भौतिकी व भौतिकीय रसायनशास्त्र यांसंबंधी होते. तथापि नंतर हीमोग्लोबिन (रक्तातील तांबड्या कोशिकांतील-पेशींतील-प्रथिन) व इतर प्रथिनांविषयीच्या अभ्यासात रस वाटल्याने ते जीवरसायनशास्त्राकडे वळले. १९५० मध्ये त्यांनी आर्. बी. कोरी यांच्या समवेत ⇨अमिनो अम्लांच्या व पर्यायाने त्यांच्यापासून तयार होणार्या लहान पॉलिपेप्टाइडांच्या (प्रथिनांच्या) रेणवीय विन्यासासंबंधी संशोधन केले आणि त्यावरून पॉलिपेप्टाइडांच्या शृंखला (विशेषत: तंत्वात्मक प्रथिनांपासून तयार झालेल्या पॉलिपेप्टाइडांच्या शृंखला) विशिष्ट विन्यासाच्या सर्पिल आकाराच्या – सर्पिल) असतात, असे गृहीत मांडले. हे गृहीत पुढे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले असून त्याची सत्यता आता प्रस्थापित झाली आहे. पॉलिंग यांच्या पॉलिपेप्टाइडांच्या शृंखलांच्या या सर्पिल विन्यासाच्या गृहीताची पुढे एफ्. एच्. सी. क्रिक व जे. डी. वॉटसन यांना डीऑक्सिरिबोज न्यूक्लिइक अम्लाच्या [डीएनएच्या ⇨ न्यूक्लिइक अम्ले] विन्यासाची प्रतिकृती (मॉडेल) मांडण्यास मदत झाली.
यथायोग्य त्रिमितीय विन्यास दर्शविणारी एका प्रथिनाच्या रेणूची प्रतिकृती पॉलिंग यांनिच प्रथम तयार केली. प्रथिनांवरील या अभ्यासावरून त्यांनी प्रतिपिंडाच्या निर्मितीविषयीचा (सुक्ष्मजंतू, त्यांची विषे वा इतर विशिष्ट पदार्थांचा-प्रतिजनांचा-शरिरात प्रवेश झाल्यामुळे त्यांना विरोध करणार्या विशिष्ट पदार्थाची रक्तद्रवात निर्मिती होण्याविषयीचा) सिध्दांत मांडला मोठ्या रेणूंच्या आतरक्रियेमधील त्यांच्या विन्यांसातील पूरकत्वाच्या संकल्पनेवर पॉलिंग यांनी या सिध्दांतात विशेष भर दिला होता.
सी.डी. कॉरील यांच्याबरोबर पॉलिंग यांनी १९३४ च्या सुमारास हीमोग्लोबीन रेणूंवर ऑक्सिजनीकरणाच्या क्रियेमुळे (ऑक्सिजनाने संपृक्त होण्याच्या-जास्तीत जास्त प्रमाणात संयोगित होण्याच्या क्रियेमुळे) होणार्या परिणामांचे त्यांच्या चुंबकिय प्रवणता [चुंबकीकरण तीव्रता व चुंबकीकरण प्रेरणा यांचे गुणोत्तर” चुंबकत्व] मोजून विश्लेषण केले. १९४९ मध्ये त्यांनी एकापेक्षा जास्त प्रकारची हीमोग्लोबीनने मानवी शरीरात निर्माण होणे शक्य आहे, असे प्रतिपादन केले. दात्रकोशिका पांडुरोगात [” पांडूरोग] नीलांमधील रक्तातच तांबड्याकोशिकांचा दात्राकार (चंद्रकोरीसारखा आकार) दिसून येतो असे त्यांना वाटले(या रोगाचे हे आनुवंशिक कारण असल्याचे मागाहून प्रस्थापितही झाले). नंतर त्यांनी (प्रतिपिंडे व प्रतिजन यांच्या बाबतीत पूर्वी वापरलेली) पूरक विन्यासी रेणूंची संकल्पना तांबड्या कोशिकांना दात्राकार प्राप्त होतो, याच्या स्पष्टीकरणासाठी उपयोगात आणली. ऑक्सिजनाशी संयोग झाल्यामुळे त्यांचे स्वपूरकत् नष्ट होते आणि त्यामुळे रोहिण्यांमधील रक्तात त्यांचा दात्राकार नाहिसा होतो, असे त्यांनी प्रितिपादन केले. रेणवीय विकृतीचा हा त्यांचा शोध वैधक, जीवरसायनशास्त्र व अनुवंशिकी या विषयांत महत्त्वाचा ठरला आहे. १९६० नंतर त्यानी आपल्या संकल्पनाचा उपयोग मानसिक विकारांचा
रेणवीय आधार शोधणे, शुध्दीहरणाच्या (भूल देण्याच्या) रेणवीय यंत्रसंबधीचा सिध्दांत व प्रथिनांचा क्रमविकास (उत्क्रांती) या विषयांमध्ये केला. क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने सर्दीला प्रतिबंध होतो, असाही सिध्दांत त्याने मांडला आहे.
जानेवारी १९५८ मध्ये त्यांनी जगाच्या विविध भागांतून ११,०२१ शास्त्रज्ञांच्या सह्या घेऊन अण्वस्त्रांच्या चाचण्या बंद करण्याचे अमेरिकन सरकारला आवाहन केले. याच सुमारास त्यानी नो मोअर वॉर ! हा ग्रंथही लिहिला.
पॉलिंग हे अमेरिकेच्या नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे, लंडनच्या रॉयल सोसायटीचे, रशियाच्या अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व इतर अनेक संस्थांचे सदस्य आहेत. त्याना नोबेल पारितेषिकांखेरीज रसायनशास्त्रतील अनेक सन्मान, तसेच रॉयल सोसायटीचेही डेव्ही पदक (१९४७), अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्सचा फिलिप्स मेमोरियल पुरस्कार(१९५६), आंतरराष्ट्रीय लेलिन शांतता पारितोषिक (१९६८-६९), अमेरिकन सरकारचे राष्ट्रीय विज्ञान पदक (१९७५) इ. अनेक बहुमान मिळालेले आहेत.
जमदाडे, ज. वि.
“