पॉल, सेंट : (सु. ३- सु. ६७). ख्रिस्ती धर्मदूत. विशेषत: ज्यू जनतेचा धर्मदूत (अपॉसल ऑफ जेंटिल्स) म्हणून सेंट पॉल ओळखला जातो. तो ज्यू होता. मूळ नाव शौल (देवाला अर्पण केलेला) असे होते. आशिया मायनरमधील सिलिशियातील तार्सस या शहरी त्याचा जन्म झाला. तो बेंजामिनच्या कुळातील परोशी (ख्रिस्तकालीन कर्मठ यहुदी लोकांचा वर्ग) होता. ज्यू असूनही त्याच्या वडिलांनी स्वकर्तृत्वाने रोमन नागरिकत्व मिळवले होते. गॅमालिएल नावाच्या प्रख्यात ज्यू धर्मशास्त्रवेत्त्याजवळ तार्सस व जेरूसलेम येथे त्याने अध्ययन केले (बायबल – प्रेषिताची कृत्ये २२:३). तो ज्यू धर्माचा कट्टर पुरस्कर्ता व ख्रिस्तद्वेष्टा होता. येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले तेव्हा तो जेरूसलेममध्ये असावा असे मानले जाते तथापि त्याने येशू ख्रिस्तास प्रत्यक्ष पाहिले नाही, असे अभ्यासक मानतात.ख्रिस्ताचा अनुयायी सेंट स्टिव्हेन याचा दगड मारून वध करणार्या ज्यूंची वस्त्रे राखणारा, असा त्याचा बायबलमध्ये प्रथम उल्लेख आढळतो(प्रेषिताची कृत्ये ७:५,८).ख्रिस्तप्रणीत नव्या धर्मास त्याचा कडवा विरोध असल्यामुळे दमाक्रस ख्रिस्तानुयायांचा उच्छेद व छळ करण्यासाठी हुकूमनामा घऊन जात असता वाटेत त्याच्यासमोर सु. ३३ मध्ये दिव्य प्रकाश चमकला (बायबल प्रेषिताची कृत्ये ९ : ३) आणि ‘शौला तू माझा पाठलाग का करतोस’ अशी वाणी त्याला ऐकू आली. ‘तू कोण आहेस?’, ह्या शौलाच्या प्रश्नास, ‘तू ज्याचा छळ करतोस, तोच मी येशू आहे’, असे उत्तर त्याला मिळाले व दमास्कस शहरात जाण्याचा आदेशही मिळाला. तीन दिवस त्याची दृष्टी गेली होती तथापी वृनन्या नावाच्या एका ख्रिस्तानुयायाने त्याला स्पर्श करून त्यच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर त्याला पूर्ववत दृष्टी प्राप्त झाली. ह्या घटनेमुळे मतपरिवर्तन होऊन तो ख्रिस्तानुयायी बनला. त्याने पॉल हे नाव धारण केले. पॉल म्हणजे कनिष्ठ. तीव्र प्रतिकारास तोंड देऊन त्याने अतिशय जोमाने ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्याला अनेक वेळा दगडांचा वर्षाव, लाठीमार व कारावास यांनाही तोंड द्यावे लागले. धर्मप्रचारार्थ त्याने दूरदूरच्या प्रदेशांत तीन वेळा प्रदीर्घ प्रवास केला (इ. स. ४६ ते ४८, ४९ ते ५३व ५४ ते ५८). पश्चिमेकडे सायप्रस-आशिया मायनरपासून यूरोपपर्यंत त्याने शुभवर्तमानाचे (गॉस्पेल) लोण पोहोचविले. अरबस्तानलाही त्याने भेट दिली. (बायबल-गॅलॅशियाकरांस पत्र १ :१७). अनेक लहान मोठी चर्चेस उभारण्याचे महत्त्वाचे कार्यही त्याने पार पाडले. ख्रिस्ताचे वरिष्ठ शिष्य व पॉल ह्यांच्यातही एका महत्त्वाच्या बाबतीत धार्मिक मतभेद होता. ख्रिस्तशिष्यांच्या मते ज्यू नसलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारताना प्रथम ज्यू ध्रमतत्त्वे स्वीकारावीत. पॉलच्या मते व्याक्ती कोणत्याही धर्माची व देशाची असली, तरी तिला सरळ ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून तारणप्राप्ती करून घेता येते. त्याच्या या विचारप्रणालीमुळे त्यास ‘ज्यू नसलेल्यांचा धर्मदूत’ असे संबोधले जाते (बायबल-रोमकरांस पत्र ११ : १३). शुभवर्तमानाचा प्रसार करणे व चर्चला स्थैर्य आणने ह्या कार्यासाठी पोषक ठरणारी अनेक पत्रे पॉलने आपल्या मित्रांना व चर्चसंस्थांना उद्देशून लिहिली. नव्या करारात त्याचा समावेश केला आहे. ख्रिस्ती ईश्वरविद्येची (थिऑलॉजी) उभारणी बहुतांशी ह्या पत्रातील विचारांवरच झालेली आहे.
पॉलला रोमन नागरिकत्वाचे हक्क होते (बायबल-प्रेषिताची कृत्ये २२ : २५,२९). न्यायालयीन कामात दिरंगाई झाल्यास तो थेट सिझरकडे अपिल करी. निरो बादशाहाच्या अंमलात ख्रिस्ती अनुयायांचा जो अमानुष छळ झाला, त्यात पॉललाही सु. ६७ मध्ये हौतात्म्य प्राप्त झाले, असे मानण्यात येते.
नंतरच्या ख्रिस्ती धर्मविकासावर सेंट पॉलचा अत्यंत व्यापक असा ठसा उमटला. येशू ख्रिस्ताचा व त्याच्या सुरूवातीच्या अनुयायांचा संदेश निश्चित अशा धर्मसिध्दांतांच्या स्वरूपात सर्वप्रथम मांडणारा तोच तत्त्वज्ञ होय. त्याने ख्रिस्ताच्या जीवनातील मुख्य घटना व त्यांची शिकवण यांना सेमाइट व ज्यू विचारवंतांनी मांडलेल्या सिध्दांतांच्या धर्तीवर, पण अत्यंत सोप्या भाषेत सिध्दांतांचे स्वरूप प्रप्त करून दिले. त्यासाठी त्याने आपल्या पध्दतशीर अध्ययनाचा व ख्रिस्तपूर्व ग्रीकांश (हेलेनिस्टिक) पार्श्वभूमीचा उत्कृष्ट उपयोग करून घेतला. सेंट आल्बर्टस मॅग्नस, सेंट आनसेल्म, सेंट टॉमस अक्वायनस इ. मध्ययुगीन धार्मिक तत्त्वज्ञांवर त्याचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो. नव्या करारातील चौदा पत्रे (एपिसल्स) सेंट पॉलची पत्रे समजूत आहे तथापि त्यांतील चार (१,२ ही करिंथिअन्स तसेच गॅलॅशियन्स व रोमन्स) पत्रे मात्र त्याचीच असल्याचे सर्व बायबल अभ्यासक मानतात. उर्वरित पत्रांबाबत मात्र अभ्यासकांत मतभेद आहेत. ८० ते ९० च्या सुमारास लिहिलेल्या अक्ट्स ऑफ द अपॉसल्स ह्या सेंट ल्यूककृत ग्रंथात त्याचा मित्र सेंट पॉल याच्या चरित्राचा बराच भाग आलेला असून अभ्यासक तो बराचसा प्रमाणभूत मानतात.
संदर्भ : 1. Barclay, William, The Mind of St. Paul, Toranto, 1958.
2. Buck, C. H. Taylor, Greer, Saint Paul : A Study of the Development of His Thought, New York, 1969.
3. Pollock, John, The Apostle : A Life of Paul, New York, 1969.
आयरन, जे. डब्ल्यू.
“