पाँपेई : द इटलीतील प्राचीन नगरी. नेपल्सच्या आग्नेयीस सु. २० किमी.वर कँपेन्या प्रदेशात व्हीस्यूव्हिअस या ज्वालामुखी पर्वताच्या दक्षिण पायथ्याशी ती वसली असून, सार्नो नदीकाठचे बंदर म्हणूनही पाँपेई प्रसिद्ध आहे. या नगरीला पहिला भूकंपाचा धक्का इ.स. ६२ च्या फेब्रुवारीत बसला आणि त्यानंतर २४ ऑगस्ट ७९ रोजी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे सर्व शहर जमिनीत ४.६ मी. खोल गाडले गेले. या ज्वालामुखीसंबंधी इतिहासकार धाकटा प्लिनी (इ.स. ६२-११४) याने टॅसिटसला लिहिलेल्या पत्रात रोमांचकारी वर्णन केले आहे. येथील उत्खनित अवशेषांवरूनही या ज्वालामुखीच्या उद्रेकाची कल्पना येते. या अवशेषांत सु. २,००० मानवी सांगाडे मिळाले. पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते पाँपेईची लोकसंख्या उद्रेकाच्या वेळी २०,००० च्या आसपास असावी, असा अंदाज आहे.

 पाँपेईच्या अवशेषांचा प्रथम शोध सोळाव्या शतकात दोमेनिको फाँताना या वास्तुविशारदाने लावला. त्यानंतर १७४८ मध्ये पाँपेईच्या उत्खननास प्रारंभ झाला. १७६३ मध्ये पाँपेई असा उल्लेख असलेला एक कोरीव लेख मिळाला. त्यानंतर पुढे १८६० मध्ये जूझेप्पे प्योरेल्ली या इटालियन पुरातत्त्वज्ञाने काळजीपूर्वक उत्खननास सुरुवात केली. येथील अवशेषांचे गेली २००-२२५ वर्षे सतत उत्खनन चालू आहे तथापि अद्याप पन्नास टक्के अवशेष उपलब्ध् झाले नाहीत, असे तज्ञांचे म्हणणे आहे. पुरातत्त्वीय इतिहासात एवढे प्रदीर्घकाल उत्खनन झालेले हे एकमेव स्थळ असावे.

पाँपेई नगरीची स्थापना इ.स.पू. आठव्या शतकात ऑस्कन लोकांनी केली असावी. पुढे ते (इ.स.पू. सहाव्या-पाचव्या शतकांत) इट्रुस्कन व ग्रीक लोकांच्या आधिपत्याखाली गेले. इ.स.पू. ४२५ मध्ये सॅमनाइट लोकांनी त्याचा ताबा घेतला. इ.स.पू. ८० च्या सुमारास ल्यूशिअस कॉर्नीलिअस सला याच्या काळात रोमनांनी येथे वसाहत स्थापन केली. रोमन काळात सार्नो नदीवरील मोक्याचे बंदर तसेच वास्तुशिल्पासाठी कँपेन्यातील एक सुसंस्कृत नगर म्हणून त्यास इटलीत नावलौकिक लाभला होता.

 अनेक वर्षांच्या उत्खननांत येथील विस्तृत अवशेष उघडकीस आले आहेत. त्यांत अनेक कोरीव लेख असून यांत व्यापारविषयक माहितीबरोबरच शर्यती, स्पर्धा, निवडणुका, प्रेमी युगुलांची पत्रे इ. विषयांवरील मजकूर आहे. या नगराची रचना लंबवर्तुळाकृती असून त्याभोवती सु. ४ किमी.ची तटबंदी होती. येथील पाणीपुरवठा योजना, प्रशस्त बाजारपेठ, तिच्याजवळची ज्यूपिटर, मिनर्व्हा, अपोलो देवतांची सुरेख मंदिरे, ग्रोमा सर्वेक्षण यंत्रोच अवशेष आणि व्हीनस या नगरदेवतेचे नदीकाठचे मंदिर हे अवशेष उल्लेखनीय आहेत. काही घरांच्या भिंतीवर धार्मिक तसेच नित्याच्या जीवनातील दृश्ये व्यक्त करणारी चित्रे, चुनेगच्चीतील मूर्तिकाम, स्त्रियांची नावे व निवडणुकीतील घोषवाक्ये लिहिलेली आढळली. या काही अवशेषांखेरीज दारूचे गुत्ते, व्हेलॅरियम व ओडिओन ही दोन भव्य प्रेक्षागृहे असून त्यांतील एक रंगमंडल (अँफिथिएटर) आहे. काही तज्ञांच्या मते या जागी द्राक्षाची बाग असावी. हा गुरांचा बाजार असावा असेही एक मत प्रचलित आहे. पाँपेईत दोन भव्य व्यायामशाळा (पॅलेस्ट्रा) होत्या. एका क्रीडांगणात शंभर मानवी सांगाडे सापडले. त्यांतील एकाजवळ वैद्यकीय उपकरणांची पेटी होती.

 उत्खनित अवशेषांतून दोन हजार वर्षापूर्वीचे पाँपेई नगर जसेच्या तसे उभे करण्याचा पुरातत्त्ववेत्त्यांचा प्रयत्न आहे. तथापि येथील हवामान व उगवणाऱ्या वनस्पती यांमुळे वास्तु-अवशेषांच्या जतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात येथील काही अवशेषांची नासधूस झाली.

 आधुनिक पाँपेई हे पुन:स्थापित नगर असून ते प्राचीन पाँपेईच्या पूर्वेस वसले आहे. त्याची लोकसंख्या २२,७३२ (१९६८ अंदाज) होती. येथे गव्हाच्या खाद्य पदार्थाची व आवेष्टन खोक्यांची निर्मिती होते. येथील सांता मारीआ देल रोसार्यो हे चर्च कुमारी देवतेच्या मूर्तीकरिता प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्यपूर्ण भूगर्भवेधशाळा व खनिज-स्रोत हे प्रवाशांचे आकर्षक आहे.

संदर्भ : (1) Grant. Michael, Cities of Vesuvius : Pompeii and Herculaneum, London, 1971.

देशपांडे, सु.र.