पाल – १ : (पाली). महाराष्ट्रातील ⇨ खंडोबा  या लोकदेवतेचे प्रसिद्ध देवस्थान. ते सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. लोकसंख्या ५,६१३ (१९७१). सातारा-कराड रस्त्यावर काशीळ गावाच्या पश्चिमेस सु. ५.६ किमी., तारळी नदीच्या दोन्ही काठांवर वसले आहे. येथे जाण्यासाठी सातारा व कराडहून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मोटरींची सोय आहे. याचे मूळ नाव राजापूर होते, पण खंडोबाची निष्ठावान सेविका पालाई गवळण हिच्या नावावरून या गावाचे नाव पालाई-पाली-पाल असे झाले असावे.मराठी अंमलात पाल हे बाजारपेठेचे प्रसिद्ध

पालीचा खंडोबा

ठिकाण होते. येथील खंडोबाचे मंदिर आबा पाढोदे नावाच्या वाण्याने सु. ५०० वर्षा पूर्वी बांधले. मंदिराच्या गाभाऱ्याच्या मध्यभागी ०.०९ चौ.मी. मेघडंबरी असून तीमधील शाळुंकेवर खंडोबा व म्हाळसा यांची दोन प्रेक्षणीय स्वयंभू लिंगे आहेत. त्यांच्यापुढे गादीच्या बैठकीवर दोघांचे दोन मुखवटे ठेवलेले आहेत. मेघडंबरीमागे घोड्यावर सपत्नीक बसलेल्या खंडोबा व प्रधान हेगडी यांच्या पितळी मूर्ती आहे. मेघडंबरीच्या उजव्या हाताला बाणाई या खंडोबाच्या द्वितीय भार्येची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. गाभाऱ्यापुढे धनाजी जाधव याने ६ चौरस मीटरचा सोळाखांबी मंडप बांधला. या मंडपाच्या डाव्या कोपऱ्यात गणपती व उजव्या कोपऱ्यात विंध्यवासिनी यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराचे मुख्य शिखर जमिनीपासून सु. १५.५ मी. उंच आहे. यांची शिखरे मातीच्या विटांची असून त्यांवरील देवदेवतांच्या मूर्ती चे अलंकरण चुनेगच्चीत आढळते. या मंदिराच्या पूर्व दारासमोर खंडोबाचे एक लहानसे मंदिर आहे. त्यातील चतुर्भुज मूर्ती बैठी असून तिच्या हातांत खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपात्र ही आयुधे आहेत. मूर्तीच्या मांड्यांखाली मणी व मल्ल यांची मस्तके आहेत.

पौष शुद्ध त्रयोदशीपासून येथे ४-५ दिवस यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील भाविक लोक मोठ्या संख्येने येतात. त्यांत मुख्यतः मुंबईचे कोळी लोक व मांग-रामोशी असतात. यात्रेच्या वेळी खंडोबा व म्हाळसा यांचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या वेळी भाविक लोक लंगर तोडणे, जागरण, नैमित्तिक वाघ्यामुरळी बनणे, पशू बळी देणे व भंडारखोबरे उधळणे इ. विधी करतात.

कांबळे, य.रा.