पालघाट : भारताच्या केरळ राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण आणि खंड (गॅप). लोकसंख्या ९५,७८८ (१९७१). हे मदुराईच्या प. वायव्येस सु. १६४ किमी. तर कालिकतच्या आग्नेयीस सु. ११३ किमी. वर सह्याद्री पर्वतातील पालघाट खंडात पोन्नानी नदीकाठी वसले आहे. व्यापारी दृष्ट्या हे मोक्याच्या ठिकाणी असून आसमंतातील कृषी उत्पन्न, कापड, इमारती लाकूड यांचा व्यापार येथे चालतो. शहराच्या आसमंतातील सुपीक जमिनीतून व सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशातून कसावा, कॉफी, रबर, तांदूळ, मिरी, आले, सुपारी, केळी, ऊस, तंबाखू इ. उत्पादने घेतली जातात. तंबाखूवर प्रक्रिया करणे, भात सडणे विड्यानिर्मिती, कौले काथ्याचे दोन , रेल्वे स्लीपर, चाकू काड्यापेट्या तयार करणे, सुती कापड विणणे इ. उद्योगधंदे येथे चालतात. केरळ-तमिळनाडू यांदरम्यानच्या रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे हे एक प्रमुख केंद्र आहे. येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि कालिकत विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन महाविद्यालये आहेत. १८६९ पासून येथे नगरपालिका आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील उत्तर सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांदरम्यान २४ ते ३२ किमी. रुंदीचा पालघाट खंड (गॅप) आहे. अनेकदा ‘पालघाट खिंड’ या नावाने जरी संबोधिले जात असले, तरी त्याच्या आकारमानावरून त्यास ‘खंड’ म्हणणेच उचित ठरते. केरळ व तमिळनाडू राज्यांच्या सरहद्दीवरील ह्या खंडाच्या उत्तरेची सीमा निलगिरी पर्वताने, तर दक्षिणेची अन्नमलई, पर्वताने मर्यादित केली आहे. याची निर्मिती भूहालचालींमुळे झाली असावी. अन्नमलई पर्वताच्या उत्तर उतारावर उगम पावणारी पोन्नानी नदी ह्यातूनच पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. उत्तरेस तापीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतच्या सु. १,६१० किमी. लांबीच्या सह्याद्री पर्वतातील वाहतुकीस सुलभ असणारा हा एकमेव खंड आहे. केरळचा किनारा व द्वीपकल्पी भारताचा पूर्व भाग यांदरम्यानचा व्यापार, वाहतूक व लोहमार्ग यांद्वारे होते. बराचसा भाग जंगलवेष्टित आहे. अरबी समुद्रावरून येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे व बंगालच्या उपसागरावरून येणारे वादळी वारे या खंडातून सहजासहजी सह्याद्री पर्वत पार करीत असल्याने, दक्षिण भारताच्या हवामानावरही या खंडाचा थोडाबहुत परिणाम होतो.
“