पार्क, मंगो : (१० सप्टेंबर १७७१- ? १८०६). प. आफ्रिकेतील नायजर नदीचे समन्वेषण करणारा स्कॉटिश संशोधक. जन्म स्कॉटलंडकधी सेलकीर्क येथे. एडिंबरो विद्यापीठात वैद्यकाचा अभ्यास पूर्ण केल्यावर १७९२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतर्फे तो जहाजावरील साहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून सुमात्रास गेला.
तेथील वनस्पती आणि मासे यांचा त्याने अभ्यास केला. १७९५ मध्ये इंग्लंडमधील आफ्रिकन असोसिएशनतर्फे नायजर नदीच्या शोधसफरीवर त्याची नियुक्ती झाली. प्रथम गँबियातील पिसानिया (सध्याचे कारांटाबा) येथे पाच महिने मुक्काम करून तेथील स्थानिक भाषा तो शिकला.
२ डिसेंबर १७९५ ते २० जुलै १७९६ हा त्याच्या सफरीचा पहिला टप्पा. या काळात दोन मदतनीस घेऊन त्याने घोड्यावरून नायजर नदीच्या काठाकाठाने सेगू गावापर्यंत मजल मारली. या प्रवासात रानटी टोळ्यांचे हल्ले व लूटमार यांना त्याला तोंड द्यावे लागले. नदीच्या उगमाकडील हे अंतर १२९ किमी. होते तथापि पुढे वाहनाच्या अभावी अनेक हालअपेष्टा सोसून तो पिसानिया येथे १० जून १७९७ मध्ये परतला. या परतीच्या प्रवासात नदीकाठाने सु. ४८५ कि.मी., परिसराचे त्याने अवलोकन केले व त्याच वर्षी तो इंग्लंडला परतला.
१७९९ मध्ये त्याने ट्रॅव्हल्स इन द इंटीरियर ऑफ आफ्रिका हे आपल्या सफरीचे वर्णन करणारे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या वेळी ते विशेष गाजले. १८०५ साली तो शासकीय पथकाचा नेता म्हणून पुन्हा नायजर नदीच्या शोधसफरीवर निघाला. त्याच्या पथकात सैनिकही होते. पिसानियापासून नायजर नदीवरील बामाकोपर्यंतच्या प्रवासात प्रतिकूल हवामान, आजारपण इ. कारणांनी त्याच्या पथकातील फक्त अकराजणच जिवंत राहिले. पुढे पडावातून प्रवास करत सानसांडिंग येथवर ते आले.
पडावाच्या साहाय्याने १९ नोव्हेंबर १८०५ रोजी ते पुढील प्रवासास निघाले. त्या वेळी पार्कच्या पथकात केवळ चार यूरोपीय साथीदार आणि चार स्थानिक माणसे होती. नदीच्या मुखाकडे जवळजवळ दोनतृतीयांश अंतर प्रवास केल्यावर त्यांचा पडाव बूसा या द्रुतवाहातील खडकात अडकला. त्याच वेळी नदीकाठच्या गावाजवळ एका रानटी टोळीने त्यांच्यावर हल्लाही केला. तो चुकविण्यासाठी त्यांनी प्रवाहात उड्या घेतल्या, पण त्यातच ते बुडून मरण पावले.
शाह, र.रू.
“