पाया : कुठल्याही प्रकाराची लहान वा मोठी वास्तू, मग तो कुंपणाचा, पुलाचा अथवा इमारतीचा खांब असो किंवा भिंत असो या सर्वांना पाया ही अत्यंत आवश्यक बाब आहे, कारण या पायावरच संपूर्ण वास्तू उभी राहते. किंबहुना असेही म्हणता येईल की, पायाशिवाय वास्तूचे बांधकामच सुरू होऊ शकत नाही. सर्वसाधारणपणे जमिनीखालील ज्या भागावर वास्तूची सर्वंकष सुरक्षितता अवलंबून असते, त्या भागास वास्तूचा पाया संबोधितात. पायामुळे वास्तूवर येणाऱ्या, सर्व प्रकारच्या प्रेरणा जमिनीत योग्य ठिकाणी व्यवस्थितपणे पोहोचविल्या जातात.
पायाचा विचार करताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात : (१) पायाच्या ठिकाणच्या जमिनीची संपूर्ण तपासणी, (२) पायाबांधणीच्या वेळी लागणाऱ्या पाण्याचे (भूमिजलाचे) नियमन, (३) पायाचे विविध प्रकार, (४) कमजोर पायाच्या सामर्थ्यवाढीचे उपाय.
या गोष्टींचा विचार जितका अचूक व पद्धतशीर होईल त्यावर पायाची सुरक्षितता व त्याच्या बांधणीसाठी लागणारा खर्च अवलंबून असतो. त्यामुळे पायाबांधणीपूर्वी वास्तूच्या महत्त्वानुसार कमीअधिक प्रमाणात वरील गोष्टींचा साकल्याने विचार करावाच लागतो.
खोदाई : सर्वसाधारणपणे इमारतीचा पाया २ ते ५ मी. खोलीपर्यंत अपेक्षित असताना एखाद्या माणसास खोदता येईल असे चौकोनी खड्डे घेऊन त्यातील मातीच्या वेगवेगळ्या थरांचे निरीक्षण त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत केले जाते. तसेच विविध थरांतील मातीचे नैसर्गिक स्थितीतील नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत किंवा प्रत्यक्ष जागेवर चाचणी घेऊन मातीची भारवहनक्षमता, स्थिरता इ. गुणधर्म ठरविता येतात.
आंतरक छिद्रण : याहून जास्त खोलीवरील जमिनीची तपासणी करण्यासाठी ५० मिमी. किंवा त्याहून जास्त व्यासाचे आंतरक (दंडगोलाकार तुकडे) जमिनीत पाहिजे त्या खोलीपर्यंत घेतात. आंतरक घेण्यासाठी गिरमिट छिद्रक वापरून मातीचे नमुने घेतले जातात. घट्ट जमिनीत छिद्रे घेण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. यासाठी जमिनीत नलिका ठोकून तिच्यामधून टोकाशी पाण्याचा फवारा सोडला जातो. त्यामुळे आतील माती पाण्यासह बाहेर येऊन नलिका आणखी खोल घालता येते. पाण्यासह वर आलेली माती व गाळ एका हौदात साठवून निवळल्यावर खाली बसलेल्या मातीची शास्त्रीय तपासणी केली जाते. ही पद्धत अतिशय सुलभ व जलद असली, तरी या पद्धतीत भूस्तरांची नैसर्गिक अवस्था कळू शकत नाही. छिद्र घेताना मध्येच खडकाळ भाग लागल्यास तो दगडगोट्यांचा नसल्याची खात्री करण्यासाठी आणखी खोलवर छिद्रण करणे जरूरीचे असते. त्यासाठी जड, टोकदार व प्रबल अशा गोलाकार नळीचा उपयोग करून त्या नलिकेने खडकाळ भागावर आघात करून झालेले तुकडे पाण्याबरोबर वर काढले जातात. या आघात तंत्राने खडकाचे खोलवर नमुने घेता येतात. कधीकधी यासाठी नलिकेच्या टोकाला दगड कापण्यासाठी काळे हिरे असलेले कर्तन पाते बसवितात व ते फिरविल्याने नलिकेच्या आकाराचा दगड कापला जातो. तो बाहेर काढून त्या नमुन्याची नंतर तपासणी केली जाते.
चर अथवा खळगा करून त्यात जमा होणारे पाणी पंपाने उपसणे किंवा कूपनलिंकाचा वापर करून पाण्याचा उपसा करणे या भूमिजलाच्या नियमनाच्या प्रमुख पद्धती होत. पायाची खोली फार नसल्यास एक अथवा अनेक चर अथवा खळगे योग्य ठिकाणी घेतले जातात व त्यांत बाजूचे भूमिजल जमा होते.
असे जमा झालेले पाणी पंपाने उपसून बाहेर काढून भूमिजलाची पातळी खाली आणता येते (आ. ३). वाळू वा कंकरमिश्रित जमिनीतून पाणी काढण्यासाठी कूपनलिकेचा उपयोग करतात. या पद्धतीने पंपाच्या खालील जास्तीत जास्त ५ ते ६ मी. खोलीपर्यंतचे पाणी उपसता येते. यापेक्षा जास्त खोलीपर्यंत पाण्याची पातळी उतरवावयाची असल्यास कूपनलिका दोन अथवा अधिक टप्प्यांत वापराव्या लागतात (आ. ४). जेव्हा खोदाई पाण्याच्या पातळीपेक्षा फारच (१५-१६ मी. पेक्षा जास्त) खोलवर करावयाची असते तेव्हा पंपयुक्त खोल कूपनलिका वापरतात. या पद्धतीत १५० मिमी. ते ६०० मिमी. अथवा अधिक व्यासाची जमिनीत खोलवर जाणारी कूपनलिका घेऊन तिच्या तळाशी आतमध्ये विजेवर चालणारा व पाण्याखाली काम करू शकणारा अथवा हवेच्या दाबावर चालणारा लहान पंप सोडून त्याकरवी पाण्याचा उपसा केला जातो
(आ. ५). अतिशय खोल विहिरींच्या पायाचे काम करताना पाण्याचे नियमन करण्यासाठी संपीडित (दाबाखालील) हवेचा वापर करतात.
द्रव्यभराई,⇨विद्युत् तर्षण व पाणी गोठविणे या त्या विविध पद्धती होत. मात्र त्या सर्वच खर्चिक असल्याने जरूर तेथेच वापरल्या जातात. भारतात त्या
विशेष प्रचलित नाहीत. तुटक्या दगडाचे किंवा वाळूचे थर असताना बाहेरील पाणी पायाच्या जागी येण्यास प्रतिबंध करण्यासाठी पायाच्या जागेभोवती रिंगणाकार जागेत जरूर त्या खोलीपर्यंत सिमेंट अथवा चिकणमातीचा राळा करून गाराभराई केली जाते. घट्ट मातीत गाराभराईकरण शक्य नसल्याने अशा ठिकाणी रासायनिक द्रव्यभराईचा वापर करतात. ०.१ मिमी. किंवा त्याहून मोठ्या आकारमानाच्या वाळूच्या थरात कॅल्शियम क्लोराइड व सोडियम सिलीकेट ही दोन रासायनिक द्रव्ये जमिनीत नळीवाटे क्षेपित केली जातात. दोन्हींत रासायनिक प्रक्रिया होऊन चिकट द्रव तयार होऊन तो वाळूच्या कणांच्या पोकळीत जाऊन पाण्यास अवरोध निर्माण करतो.
मृत्तिका व गाळ्वट मातीची पारगम्यता अत्यंत कमी असल्याने त्यांतील पाण्याचा निचरा करण्यास विद्युत् तर्षण ही पद्धती वापरता येते. हीत दोन विद्युत् अग्रे एकमेकांपासून काही अंतरावर जमिनीत गाडली जातात. धनाग्राकडून ऋणाग्राकडे विद्युत् प्रवाह पाठविल्याने वाटेत येणार्याल मृत्तिका कणासभोवतालचे विद्युत् भारित जलकण ऋणाग्राकडे गोळा होतात. असे गोळा झालेले पाणी पंपाने बाहेर काढले जाते. या प्रकारात लोखंडी सळ्या धनाग्र आणि नलिका ऋणाग्र म्हणून वापरल्या जातात.
जेव्हा जमिनीची भारवहनक्षमता कमी असते व वास्तूवरील भार जास्त असतो तेव्हा उथळाकार स्वतंत्र पाये वापरल्यास त्यांचे आकारमान खूप मोठे होते व ते परस्परव्यापी होतात. अशा वेळी संपूर्ण वास्तूसाठी तिच्या तळ आकारमानाएवढा किंवा त्याहून मोठा अखंड पाया वापरतात. अशा पायास ‘तराफ्याचा पाया’ म्हणतात. हा पाया सर्वसाधारणपणे सलोह सिमेंट काँक्रीटचा असतो. या पायाचा तराफा वास्तूच्या प्रकारानुसार विविध प्रकारे बांधला जातो (आ. ७). जेव्हा जमिनीची भारवहनक्षमता अतिशय कमी असते तेव्हा ‘तरंगत्या पाया’चा वापर केला जातो. हा पायासुद्धा तराफ्याच्या पायासारखा अखंड असून तो पोकळ पेटीच्या आकाराचा पण अतिशय दृढ आणि वरील वास्तूच्या भिंती व स्तंभांशी एकसंघ असतो. ह्या पायाचे वजन व त्यावरील वास्तूचा भार हा त्या पायाने स्थानांतरित केलेल्या जमिनीच्या वजनाइतका असावा लागतो. यामुळे अशा पायावरील वास्तू या जमिनीवर तरंगत असल्याने अशा पायास ‘तरंगता पाया’ म्हणतात.
खोल पाया : आधार-स्तर खूप खोलवर असताना वास्तूचा भार जमिनीत वाहून नेण्यासाठी लांब व मजबूत अशा भारवाहकांची योजना करावी लागते. हे भारवाहक म्हणून स्तंभिका आणि ‘विहिरी’ यांचा उपयोग केला जातो. स्तंभिका आकारमानाने लहान पण लांब असतात, तर विहिरी या आकारमानाने खूप मोठ्या असून पुलांचे खांब किंवा अनेक मजली उंच इमारती अशा प्रचंड वास्तूंच्या पायासाठी वापरतात. स्तंभिकाचा वापर भारवहनशिवाय अन्य कारणाकरिताही केला जातो (उदा., जमिनीच्या दृढीकरणासाठी, आधार भिंतीसाठी इत्यादी).
ही खुंट अथवा सोट म्हणूनही ओळखली जाते. लाकडी खुंट १० ते ३० सेंमी. व्यासाचे सरळ, लांब व मजबूत अशा लाकडाचे असावे लागतात. जमिनीत ते कुजू नयेत म्हणून त्यांवर डांबर लावतात वा अन्य रासायनिक द्रव्याचे लेपन करतात. काँक्रीटची स्तंभिका सर्वसाधारणपणे आकाराने गोल किंवा चौकोनी, षट्कोनी वा अष्टकोनी असून ती पूर्वनिर्मित किंवा प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणीच ओतलेली अशी दोन्ही प्रकारची असू शकते. पोलादी स्तंभिका पोकळ किंवा पत्री प्रकारची असू शकते. पोकळ स्तंभिका नंतर काँक्रीटने भरली जाते. पत्री प्रकारच्या पोलादी स्तंभिका सर्वसाधारणपणे एकास एक ओळीने जोडून आधार भिंत तयार करण्यासाठी वापरतात. स्तंभिकेच्या प्रकाराची निवड ही वास्तूचा भार, आकार व बांधणी स्थलावर असणाऱ्या जमिनीची परिस्थिती यांनुसार करावी लागते. जेव्हा वास्तूच्या पायांवरील भार केवळ ऊर्ध्व (उभ्या) दिशेने न येता आडव्या दिशेनेही येतात तेव्हा उभ्या स्तंभिकांबरोबर तिरक्या स्तंभिकांचाही वापर करावा लागतो. स्तंभिकांचे विविध प्रकार आ. ८ मध्ये दाखविले आहेत.
स्तंभिकेची भारवहलक्षमताः ही तिचा आकार, प्रकार, ज्या जमिनीत ती घातली असेल त्या जमिनीचे गुणधर्म इत्यादींवर अवलंबून असते. स्थितिजन्य सूत्र, गतिजन्य सूत्र व प्रत्यक्ष भार चाचणी अशा तीन प्रकारे ती ठरविता येते. स्तंभिकेची बाजूशी असलेल्या जमिनीबरोबरील घर्षणशक्ती, स्तंभिकेचा आकार व आधार-स्तराची भारवहनक्षमता यांवरून स्थितिजन्य सूत्राच्या आधारे स्तंभिकेची भारवहनक्षमता ठरविता येते. गतिजन्य सूत्राचा उपयोग करण्यासाठी स्तंभिकेला जमिनीत ठोकताना लागणारी घणाची गतिज ऊर्जा व स्तंभिकेचे जमिनीत होणारे भेदन (वा अंतर्गमन) माहीत असणे आवश्यक असते. पायातील स्तंभिकांचे प्रमाण जास्त असल्यास काही स्तंभिका भार चाचणीसाठी जमिनीत घालून त्यांची प्रारंभिक भार चाचणी प्रत्यक्ष घेऊन स्तंभिकेची भारवहनक्षमता काढतात.
स्तंभिका रोवण्याच्या पद्धती : लाकडी, पोलादी किंवा काँक्रीटच्या पूर्वनिर्मित स्तंभिका वेगवेगळ्या पद्धतींनी जमिनीत रोवल्या जातात.
स्तंभिका घणाने ठोकून बसविण्याची पद्धत सर्वसामान्य होय. ज्या जमिनीत भूपृष्ठाखाली मध्येच दगडगोटा असण्याची शक्यता असते, तसेच ज्या ठिकाणी जवळच दुसरी इमारत किंवा वास्तू असून घणाच्या ठोक्याने तिची पडझड होण्याइतकी कंपने निर्माण होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी ही पद्धत शक्यतो वापरत नाहीत आणि वापरल्यास फार काळजी घेतली जाते. रेताड जमिनीत स्तंभिका जलदपणे रोवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. स्तंभिकेमधून नळीवाटे पाणी दाबाखाली स्तंभिकेच्या टोकास नेऊन तेथील छिद्रावाटे बाहेर टाकले जाते, त्यामुळे स्तंभिका खोलवर घालता येते. मात्र या पद्धतीत नंतर आत गेलेल्या पाण्याचा निचराही करावा लागतो. स्तंभिकेचा शेवटचा भाग अर्थातच घणाने ठोकून घट्ट बसविला जातो. कठीण जमिनीत अगोदर स्तंभिकेच्या आकारमानाहून जरा लहान आकारमानाचे विवर (छिद्र) आंतरक घेण्याच्या क्रियेने प्रथम घेऊन त्यात नंतर स्तंभिका ठोकून बसवितात. ही पद्धत कठीण जमिनीत किंवा चिकणमाती असलेल्या जमिनीतच शक्य होते, कारण स्तंभिका बसवेपर्यंत विवर तसेच रहावे लागते. या पद्धतीने स्तंभिका रोवणे सुलभ असले, तरी रोवलेल्या स्तंभिकांची भारवहनक्षमतादेखील कमी असते. आणखी एका पद्धतीत स्तंभिकेच्या व जमिनीच्या नैसर्गिक कंप्रतेचा (मुक्त कंपने होत असताना दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांच्या संख्येचा) उपयोग केला जातो. जमिनीच्या नैसर्गिक कंप्रतेइतकी कंप्रता स्तंभिकेला कृत्रिम रीत्या दिल्यास स्तंभिका केवळ आपल्या वजनाने सहज खाली जाऊ शकते. यासाठी स्तंभिकेच्या डोक्यावर कंपनयंत्र बसवून स्तंभिकेला पाहिजे तितकी कंपने देऊन ती जमिनीत बसविली जाते.
. पायाचे ठिकाण कोरडे असल्यास प्रश्नच नसतो, पण त्या ठिकाणी पाणी असल्यास वेगळे प्रश्न निर्माण होतात. शक्य असेल तिथे पाण्याला वेगळी वाट करून अथवा कुंडन बांध घालून पाणी काढून पायाचे ठिकाण कोरडे करावे लागते. ते शक्य नसल्यास आणि पाणी जास्त खोल नसल्यास पायाच्या ठिकाणी वाळूची पोती घालून पायाचे काम करण्यासाठी कृत्रिम बेट निर्माण केले जाते. पाण्याची खोली जास्त असल्यास पायाच्या ठिकाणी काम करण्यासाठी तराफे किंवा तरंगते धक्के उभे करावे लागतात. विहिरीच्या पायासाठी लागणारे कुसुल अभिकल्पानुसार किनाऱ्यावर भागशः बांधले जाऊन ते पायाच्या ठिकाणी आणले जाऊन विवक्षित ठिकाणी पाण्यात उभे सोडले जाते. कुसुलाची उंची पाण्याच्या खोलीपेक्षा अर्थातच जास्त असते. कुसुलाच्या भिंतींची तळाकडील कड मजबूत धातूची व जमीन भेदणारी असते. कुसुल जमिनीवर उभे टेकल्यानंतर ते स्वतःच्या वजनानेच उभेच्या उभे जमिनीत उतरेल अशा तऱ्हेने भिंतीच्या कडांखालील जमिनीची मनुष्यबळाने वा यंत्राच्या साहाय्याने सर्व बाजूंनी खोदाई केली जाते. स्वतःच्या वजनाने कुसुल खाली जात नसेल तेव्हा त्याच्या भिंतीवर बाहेरून कृत्रिम रीत्या वजन ठेवून ते खाली घालविण्याचे प्रयत्न केले जातात. कुसुल उतरविताना तळात एखाद्या ठिकाणी खडक लागल्यास तो छिद्रणयंत्राने किंवा सुरुंगाच्या दारूचा स्फोट करून फोडून काढला जातो. पायाच्या ठिकाणी ३ ते २० मी. इतक्या खोलीचे पाणी असल्यास लोखंडी टोप घातलेले व संपीडित हवेवर श्वासोच्छवास करणारे पाणबुडे पाण्याखाली पाठवून त्यांच्याकरवी खोदकाम केले जाते. खोदलेली माती व गाळ मनुष्यबळाने व यंत्राच्या साहाय्याने बाहेर काढला जातो आणि पुढील खोदाईसाठी जागा मोकळी केली जाते. कुसुलाचा खालचा भाग जसजसा जमिनीत उतरविला जाते, तसतसा वरचा भाग वाढविला जाऊन कुसुल आणखी खाली जरूर त्या खोलीपर्यंत उतरविले जाते. कुसुल शेवटपर्यंत उतरविण्यात अनेक अडचणी येतात. विहीर तिरकी होणे, जागेपासून बाजूस सरकणे, मधेच वाळूचा लोट अथवा अडथळा येऊन कुसुल अडून बसणे, मधेच पाण्याचा मोठा झरा लागणे यांसारख्या सर्व अडचणींवर मात करून कुसुल ओळंब्यात उतरविणे हे एक अत्यंत अवघड काम असते. कुसुल योग्य तऱ्हेने आधार-स्तरावर उभे केल्यानंतर त्याच्या तळाशी काँक्रीटचा जाड थर घातला जातो. मधल्या भागात दगडगोटे, मुरूम, रेताड माती अथवा कमी प्रतीचे काँक्रीट भरून विहिरीस स्थिरता आणली जाते. शेवटी माथ्याशी काँक्रीटचा दुसरा थर दिला गेल्यावर विहीर बांधून तयार होते (आ. १२). अशा विहीरीसाठी तळाशी व वरच्या बाजूस असे दोन्ही बाजूंस उघडे असलेले कुसुल वापरले जात असल्याने ही विहीर उघड्या कुसुलाची विहीर म्हणून ओळखली जाते.
पायाच्या ठिकाणी पाण्याची खोली कमी असताना वरून उघड्या पण तळाकडे बंद असलेल्या पेटीसारख्या कुसुलाचा वापर केला जाते (आ.१३). असे पेटीचे कुसुल कोरड्या जागेवर बांधून तरंगत्या स्थितीत पायाच्या ठिकाणी नेऊन पेटीत वाळू-माती, दगडगोटे इ. भराव घालून ते पाण्यात खाली उतरवले जाते. मात्र अशा बंद कुसुलाच्या तळाशी खोदाई करता येत नसल्याने ही बंद कुसुलाची विहीर कमी भार असलेल्या वास्तूंसाठी व आधार-स्तर लगेच पाण्याच्या तळाशी असेल तेव्हाच वापरता येते. पायाच्या ठिकाणी पाण्याची खोली २० मी. पेक्षा अधिक असेल तेव्हा विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रश्न तीव्र स्वरूपाचा होतो. त्यामुळे बाहेरील पाणी विहिरीत येऊन देण्यासाठी कुसुलाच्या तळाशी माणसांना काम करता येईल एवढी कोठी ठेवून ती वरून हवाबंद करून या कोठीत हवेचा दाब वाढविला जातो. अशा विहिरीस वायवीय कुसुलाची विहीर म्हणतात (आ. १४). तळाकडील कोठीत बाहेरच्या
पाण्याच्या दाबापेक्षा जास्त दाबाने हवा भरली जात असल्यामुळे बाहेरील पाणी आत येऊ शकत नाही व आत कोरडी खोदाई करता येते. खोलीतील कामगारांना नेण्याआणण्यासाठी व खोदलेली माती व गाळ बाहेर काढण्यासाठी कुसुलात उभे पोकळ नळ खालच्या खोलीपासून वरपर्यंत ठेवले जाऊन त्यांच्या वरील टोकास हवाबंद दरवाजे ठेवले जातात. खोदाई करून कुसुल जसजसे खाली उतरविले जाते तसतसा बाहेरील पाण्याचा दाब वाढत असल्याने आतील हवेचा दाबही त्या प्रमाणात वाढवावा लागतो. कुसुल शेवटी आधार-स्तरावर पोहोचल्यावर तळाकडील कोठी काँक्रीटने पूर्ण भरली जाते. अशी वायवीय कुसुले वजनाने आणि आकारमानाने अजस्र असल्याने अशा विहिरी बांधणे फार त्रासाचे असते. तरीही अशा विहीरी ४० मी. खोलीपर्यंत बांधल्याचे दाखले आहेत. यापेक्षा जास्त खोली असल्यास होणाऱ्या हवेच्या दाबाखाली माणसांना काम करणेही अशक्य होते. अशा वायवीय कुसुलाच्या कामात हवेच्या दाबाखाली काम करण्याचे प्रशिक्षण दिलेल्या कसबी कामगारांची जरूरी असते. हवेच्या अती दाबाखाली जास्त काळ काम केल्यास व दाबयुक्त हवेच्या वातावरणातून बाहेरील नेहमीच्या वातावरणात एकदम आल्यास कामगारांच्या प्रकृतीस अपाय होण्याचा संभव असतो. वायवीय कुसुलात काम करणाऱ्या कामगारांना पुढे सांधेदुखी व वक्रिमा (हवेचा दाब एकदम कमी झाल्याने हातापायांत व पोटात वेदना होणे) यांसारख्या कुसुलीय व्याधी जडतात याचे अंतिम परिवर्तन अर्धांगवायूतही होऊ शकते. या कुसुलीय व्याधी सर्वसाधारणपणे अती दाबाच्या अवस्थेतून अल्प दाबाच्या अवस्थेत येण्यामुळे होणाऱ्या विसंपीडनाने रक्तात नायट्रोजन वायूचे बुडबुडे निर्माण होण्यामुळे होतात. एकूणच अशा वायवीय कुसुलांच्या विहिरीचे काम फार त्रासाचे व जोखमीचे असल्याने ते फार योजनापूर्वक व सावधतेने करावे लागते.
कुंडन बांध : (कॉफर डॅम). जेव्हा एखादे बांधकाम (उदा., पुलाचा अथवा धरणाचा पाया, बंदरातील धक्का इ. ) पाण्यात करावयाचे असते तेव्हा अशा बांधकामाच्या जागी पाणी येऊ न देण्यासाठी तसेच तिचे बाहेरील पाण्याच्या मार्या पासून संरक्षण करण्यासाठी अशा जागेच्या चहूबाजूंस एक विशेष बांध घातला जातो, अशा बांधास कुंडन बांध म्हणतात. हा बांध त्या बांधकामाचा प्रत्यक्ष भाग नसल्याने ते पूर्ण झाल्यानंतर बांध काढून टाकला जातो. कुंडन बांधाचा अभिकल्प करताना बांधकामाच्या ठिकाणची पाण्याची खोली, पाण्याचा प्रवाह, लाटांचा परिणाम, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप, कुंडातील पाणी उपसल्यावर बांधातून होणारी पाण्याची गळती, पाण्याचा दाब या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यावरून कुंडन बांधाचा प्रकार व त्याचे आकारमान ठरविले जाते.
पायाची मजबुती : एखादा पाया चुकीच्या अनुमानावर अथवा चुकीच्या पद्धतीने बांधलेला असेल अथवा पाया बांधल्यानंतर शेजारी दुसर्यार वास्तूच्या पायाच्या खोदाईमुळे किंवा अन्य कारणाने पायास धोका निर्माण झालेला असेल किंवा बांधलेल्या जुन्या वास्तूवर जास्त भार आणावयाचा असेल तेव्हा त्या वास्तूच्या पायाची मजबुती करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे मजबुती करण्यात विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याने व वास्तूची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक, सावधानतेने व पूर्वनियोजनाने करावे लागते. पायाच्या मजबुतीच्या कामात प्रथम वास्तूला विविध प्रकारे घिरे अथवा नेटावे देऊन पायावर येणारा भार आधारावर घेऊन मग मूळच्या पायामध्ये बदल करणे वा नवीन पाया घालणे आणि शेवटी तात्पुरते आधार काढून टाकून परत वास्तूचा भार नवीन पायावर घेणे इ. क्रिया अंतर्भूत असतात. मजबुतीची पद्धत ठरविताना पायाचा प्रकार, त्यावर येणाऱ्या प्रेरणा, मजबुती करण्यास येणाऱ्या अडचणी वा बांधकामस्थलावरील परिस्थिती, मजबुती करण्यास येणारा खर्च इ. गोष्टींचा विचार करून ती ठरविली जाते.
“