पापुअन भाषासमूह :  न्यू गिनी (पापुआ) बेट व त्यालगतची बेटे तसेच नैर्ऋत्य पॅसिफिक महासागरातील मेलानीशिअन बेटे ह्या भागांत पिंगट काळ्या वर्णाचे आणि कुरळ्या लोकरी केसांचे लोक राहतात. त्यांपैकी मेलानीशियातील बरेचसे लोक मलायोपॉलिनीशियन (ऑस्ट्रोनेशियन) भाषाकुटुंबातील भाषा बोलतात.

उरलेल्या बोलींना पापुअन भाषासमुहातील बोली मानतात. टास्मानियातील नष्ट आणि अंदमानातील नष्टप्राय, तसेच समवंशीय जमातींच्या बोली ह्याच भाषासमूहातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सु. २४ लक्ष लोक ह्या ६५०-७०० पापुअन बोली बोलतात. एंगा ही बोली १३ लक्ष लोक बोलतात. पूर्व न्यू गिनीत इंग्लिश आणि स्थानिक बोली यांच्या मिश्रणाने बनलेली पोलीस-मोतू नामक बोली प्रादेशिक दळणवळणासाठी वापरतात.

ह्या सर्व बोलींची बरीच लहान लहान भाषाकुले असावीत, असा अंदाज होता. पश्चिम ईरीआन (इंडोनेशिया) मधील बोलींबद्दल अजूनही फार थोडी माहिती आहे. ऑस्ट्रेलियन न्यू गिनीमध्ये मात्र १९५० पासून बराच अभ्यास झाला आहे. त्यामुळे १६ लक्ष लोकांच्या ३५०-४५० बोली एका कुलात मोडत असाव्यात, असे दिसून आले आहे. इतरही बोली दूरान्वयाने संबंधित असण्याची शक्यता आहे.

संदर्भ : 1. Capell, A. Ed. A Linguistic Survey of the South Western Pacific, Noumea, 1961. 

             2. Sebeok. Thomas A. Ed. Current Trends in Linguistics, Vol. 8 (Papers by Wurm, S. A. 

                  Greenberg, y3wuoeph H.). The Hague, 1971. 

             3. Voegelin, C.F. Voegelin, F.M. “Languages of the World, “ Anthropological Linguistics, 7: 9,

                  Bloomington (Indiana), Dec. 1968.

केळकर, अशोक रा.