पादवेल : (हिं. पाप्री, पाप्रा, बनबैगन गु. वेनीवेल सं. वक्रा, गिरिपर्पट इं. इंडियन पोडोफायलम लॅ. पोडोफायलम हेक्झँड्रम किंवा पो. इमोदी कुल-बर्बेरिडेसी). जमिनीत मूलक्षोडाच्या (जमिनीखालील आडव्या खोडाच्या) साहाय्याने वाढत जाणारी ही मांसल ⇨ औषधी काश्मिरात व हिमालयात सिक्कीम ते हझारा या प्रदेशात २,८००-४,३५० मी. पर्यंत आढळते. जमिनीवरची फांदी सरळ व तिच्यावरची पाने एकाआड एक, दोन मोठी (१५-२५ सेंमी.), ३-५ भागांत विभागलेली, दातेरी व त्यांवर जांभळे ठिपके. पाने व फुलांचा दांडा १५-४५ सेंमी. फुले (२.५-५ सेंमी. व्यास) पांढरी किंवा गुलाबी, पेल्यासारखी, बहुधा एकेकटी. संदले तीन, पाकळ्यांसारखी व लवकर गळून पडणारी पाकळ्या सहा व केसरदले सहा [ → फूल] मृदुफळ लहान (२.५-५ सेंमी.) लांबट गोलसर, शेंदरी, मांसल, अनेक बीजी व खाद्य असते. सुक्या मूलक्षोडात पोडोफायलीन नावाचे रेझीन (१०-१२%) असते. ते तीव्र रेचक असून अधिक प्रमाणात घेतल्यास तीव्र दाह व मुरडा होतो. ते बहुधा बेलाडोना किंवा कोरफडीबरोबर मिश्रणात देतात. पोडोफायलोटॉक्सिन हाही एक मुख्य घटक असतो. मुळे व मूलक्षोड यकृताला उत्तेजक (पित्तवर्धक), रेचक आणि अनेक त्वचारोग व गुल्मवृद्धी यांवर उपयुक्त असतात. भारतात दरवर्षी सु. १०० टन पोडोफायलीन लागते परंतु जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश व उ. प्रदेश येथून सु. ५०-८० टन इतकाच पुरवठा होतो.
मे-ॲपल (पो. पेल्टॅटम) नावाची पादवेलीच्या वंशातील दुसरी अमेरिकन जाती हिमालयात (आतल्या रांगांत) ६२०-१,२४० मी. पर्यंत आढळते. तिची लागवडही करण्यात येते कारण तिचेही औषधी गुण वरच्याप्रमाणे आहेत परंतु तिच्यातील रेझिनाचे प्रमाण फक्त ४% असते.
परांडेकर, शं. आ.