पातकई  टेकड्या : भारत व ब्रह्मदेश यांच्या सरहद्दीवर असलेली टेकड्यांची मालिका. या टेकड्या २५° ३०’ उ. ते २७° १५’ उ. व. ९५° १५’ पू. ते ९६° १५’ पू. यांदरम्यान ईशान्य-नैर्ऋत्य पसरलेल्या असून, नैर्ऋत्येकडे त्या नागा टेकड्यांमध्ये समाविष्ट होतात. येथून पुढे ब्रह्मदेशात ह्यांना आराकान योमा पर्वतश्रेणी म्हणतात. यांची सरासरी उंची २,४३८–२,७४३ मी.पर्यंत असून सरमती (३,८२६ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. यांमुळे एका बाजूला ब्रह्मपूत्रामेघना खोरे व दुसऱ्या बाजूला इरावती-चिंदूविन खोरे असे विभाजन झाले आहे. वनाच्छादित पातकई टेकड्यांत तृतीयक काळातील खडक आहेत. लेडो-तौग्नी हा मार्ग यांतून काढला आहे. पांम्सॉ ही यांधील खिंड प्रसिद्ध असून ती भारत–ब्रम्हदेश यांधील दळणवळणाचा एक दुवा आहे. तेराव्या शतकात आहोम लोक या टेकड्या ओलांडून ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आले आणि तेथे त्यांनी वसाहती केल्या. या भागात नागा लोकांची वस्ती आहे.

तावडे, मो. द.