पाणघोडा : (हिप्पोपोटॅमस). याचा समावेश समखुरी (ज्याच्या खुरांची संख्या सम असते अशा) प्राण्यांच्या गणाच्या हिप्पोपोटॅमिडी कुलात करतात. या कुलात हिप्पोपोटॅमस आणि किरॉप्सिस हे दोन वंश आहेत. हिप्पोपोटॅमस या शब्दाचा अर्थ ‘नदीतील घोडा’ असा आहे. हा प्राणी आपला बराचसा वेळ पाण्यात घालवितो.
पाणघोडा हा एक मोठा, अवजड शरीराचा सस्तन प्राणी आहे. आकारमानाने हत्तीच्या खालोखाल याचा क्रम लागतो. एके काळी आफ्रिकेत नाईल नदीपासून गुडहोप भूशिरापर्यंत सगळ्या नद्यांतून हा आढळत असे परंतु हल्ली त्याच्या विस्ताराचे क्षेत्र बरेच मर्यादित झालेले असून सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागांत तो आढळतो. या प्रदेशात आढळणारी पाणघोड्यांची सामान्य जाती हिप्पोपोटॅमस अँफिबियस ही होय.
शरीराची डोक्यासकट लांबी ४ ते ५ मी. आणि उंची सु. १·५ मी. असते. वजन साधारणपणे ३ ते ५ टन असते. डोके चपटे व बोटके असते, डोळे आणि नाकपुड्या वर उचललेल्या असून कान लहान व लवचिक असतात. हा प्राणी पोहताना डोळे, नाकपुड्या आणि कान पाण्याबाहेर ठेवतो. मुस्कटाभोवती तुरळक राठ केस असतात व तो भलामोठा ‘आ’ वासतो. वरचा ओठ जाड आणि फुगीर असतो. सुळे व चौकीचे दात फार मोठे असून त्यांची अखंड वाढ होत असते. सुळे बाकदार असून त्यांची लांबी ६० सेंमी. व वजन २·३–२·७ किग्रँ. पर्यंत असू शकते.
पाय शरीराच्या मानाने अगदी आखूड असून प्रत्येकावर अगदी एकसारखी चार बोटे असतात. शेपूट तोकडे (सु. ६० सेंमी. लांब) असते व तिच्यावर थोडेफार केस असतात. तसेच मुस्कटावर व कानाच्या आतील बाजूसही थोडेसे केस असतात. शरीरावरील त्वचेवरचे केस इतके बारीक आणि इतके विरळ असतात की, त्वचा केशहीन असावी असे वाटते. त्वचा ग्रंथिमय असून तिच्यावर असलेल्या खास छिद्रांमधून फिक्कट गुलाबी रंगाचा दाट, तेलकट स्राव उत्तेजित अवस्थेत किंवा वेदना होत असताना बाहेर पडतो आणि त्वचेचे उन्हापासून व पाण्यापासून रक्षण करणे हे त्याचे कार्य असते. त्वचा जाड असून काही ठिकाणी तिची जाडी ५ सेंमी. असते. तिचा रंग गर्द करडा असतो. पाणघोडा हा कळप करून राहणारा प्राणी असून प्रत्येक कळपात २०–३० प्राणी असतात. ते नदीच्या पाण्यात डुंबत असतात किंवा किनाऱ्यावर भटकतात. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती व गवत हे यांचे अन्न होय. चरण्याकरिता रात्रीची वेळ ते विशेष पसंत करतात. नदीच्या काठी चरत असताना पुष्कळदा जवळपासच्या शेतांत शिरून ते पिकाचीही नासाडी करतात. हा प्राणी रवंथ करीत नाही.
पाणघोडा स्वभावतः निरूपद्रवी व गरीब वृत्तीचा आहे पण पिलांचे रक्षण करताना किंवा जखमी झाल्यावर तो अतिशय क्रूर बनतो. त्याची अमर्याद शक्ती व चापल्य (शरीर अवजड असले तरी) यांच्यामुळे तो प्रबळ शत्रू बनतो. हत्तींच्या प्रमाणेच वयस्क पाणघोडे कधीकधी ‘मत्त’ बनतात व कारणाशिवाय वाटेल त्याच्यावर हल्ला चढवितात.
मदकाल तीन दिवसांचा असतो. गर्भावधी सु. आठ महिन्यांचा असतो. मादीला प्रत्येक खेपेस एकच पिलू होते आणि त्याचे वजन सु. २७ ते ४५ किग्रॅ. असते. पिलाचा जन्म पाण्यात होतो. पाणघोड्याची वाढ सहाव्या वर्षी पूर्ण होते. तो ३० वर्षांपेक्षा जास्त जगतो. मांस, दात व कातडे यांकरिता त्याची शिकार करतात. दातापासून उच्च प्रतीचा हस्तिदंतसदृश पदार्थ मिळतो. एतद्देशीय लोक त्याचे मांस खातात. कातडीचे उत्तम सूप (मांसरस) करतात.
लायबेरिया आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात पाणघोड्याची किरॉप्सिस लावबेरिएन्सिस ही बुटकी जात आढळते. हा प्राणी अतिशय खुजा असून त्याची लांबी १·५ मी. व उंची सु. १ मी. असते. वजन १८० ते २७० किंग्रॅ. असते. शरीराच्या मानाने डोके बरेच लहान असते. कातडीचा रंग तकतकीत करडा काळा किंवा निळा काळा असतो.
प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळात पाणघोड्याच्या हल्ली आढळणाऱ्या जातीपेक्षा मुळीच निराळी नसलेली जात यूरोपच्या बहुतेक भागांत अस्तित्वात होती आणि माल्टा, क्रीट, सिसिली, भारत आणि ब्रह्मदेश यांत खुज्या जाती होत्या.
कर्वे, ज. नी.
“