पाणघड्याळ : (क्लेप्सिड्रा). हळूहळू वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर हे घड्याळ चालते म्हणून याला पाणघड्याळ म्हणतात. हिंदूंमध्ये सच्छिद्र ताम्रपात्राचा घटिकापात्र म्हणून मंगलकार्यात उपयोग करतात. प्राचीन काळी बॅबिलोनिया, ईजिप्त, ग्रीस वगैरे देशांत पाणघड्याळाचा वापर होई. याचे ख्रि.पू. १४०० इतके प्राचीन उल्लेख आहेत. ख्रि.पू. दुसऱ्या शतकात असे यांत्रिक रचनेचे घड्याळ ग्रीक शास्त्रज्ञांनी बनविले होते. मध्ययुगीन काळात गुंतागुंतीच्या यांत्रिक रचनेच्या बनविलेल्या घड्याळांवरून सूर्य, चंद्र, ग्रह यांची स्थिती दाखविली जाई चंद्राच्या कला, ताऱ्यांचे उदयास्त व भरती-ओहोटी हेही कळत असे. त्यात पाव तास घंटेच्या साह्याने दाखविले जात. साधी पाणघड्याळे स्वस्त पडत असल्याने अलीकडील यांत्रिक घड्याळे निघाल्यावरप सुद्धा अठराव्या शतकापर्यंत यांचा वापर होत होता.
एखाद्या भांड्यात तळाशी छिद्र ठेवून त्यातून पाणी बाहेर सोडणे अगर आत घेणे याला लागणाऱ्या वेळेवर आधारलेली घड्याळे अगदी साधी असत. अशा तऱ्हेने याचे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारात एखादे पाण्याने भरलेले भांडे हळूहळू रिकामे करावयाचे झाल्यास ते सारख्याच वेगाने रिकामे होत नाही. त्यामुळे हा प्रकार संपूर्ण कालावधी मोजण्यास उपयुक्त असला, तरी त्या कालावधीचे विभाग मोजणे यामुळे जमत नाही. दुसऱ्या प्रकारात आत येणाऱ्या पाणाची पातळी वाढत राहते वा वाढणाऱ्या पातळीने कालमापन सूचित होते. आत येणाऱ्या पाण्याचा वेग नियंत्रित व एकसारखा ठेवला, तर कालावधी व कालावधीचे विभाग दाखविणे शक्य होते. आकृती (अ) मध्ये दाखविलेले पाणघड्याळ हे छिद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वेळ दाखविते. आकृती (आ) मधील पाणघड्याळात (१) या तोटीवाटे (२) या नरसाळ्यात पाणी पडते. (३) हा शंकू (२) या नरसाळ्यात उलटा टांगलेला असतो. याचा उपयोग नरसाळ्यातून पडणाऱ्या पाण्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो. शंकूला जोडलेली (४) ही पट्टी आहे. तिच्यावर विषम प्रमाणात खुणा केलेली मोजपट्टी असून तिचा उपयोग नियंत्रक शंकूची बैठक कमीअधिक ठेवण्यास होतो. शंकू नरसाळ्याच्या जवळ किंवा दूर असण्यावर वेळेचा कमीअधिकपणा अवलंबून असतो. नरसाळ्यातील जादा पाणी (५) या तोटीने निघून जाते. नरसाळ्यातील नियंत्रित वेगाचे पाणी (६) या लहान टाकीत येते, (७) हा ठोकळा वर वर सरकतो, ही हालचाल दात्यांच्या साहाय्याने काट्याला पोहोचते व काटा (८) या तबकडीवर हळूहळू गोल फिरतो.
प्लेटो यांच्याजवळ सहा तासांचे पाणघड्याळ होते. त्यात शेवटी शिटी होत असे. गॅलिलीओ यांनी ⇨ उतरणीसंबंधीच्या प्रयोगात पाणघड्याळ वापरले होते. प्राचीन काळी ग्रीक व रोमन लोकांत न्यायालयात होणाऱ्या भाषणांना मर्यादा घालण्याकरिता पाणघड्याळाचा उपयोग करीत.
करमळकर, स. मा. खांडेकर, वि. ज.
“