पाणकावळा: पक्षी वर्गातील फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलातील पक्षी. याला करढोक असेही म्हणतात. भारतात याच्या दोन जाती आढळतात : लहान पाणकावळा आणि मोठा पाणकावळा. लहान पाणकावळ्याचे शास्त्रीय नाव फॅलॅक्रोकोरॅक्स नायजर आणि मोठ्याचे फॅलॅक्रोकोरॅक्स कार्बो आहे.

लहान पाणकावळा (फॅलॅकोक्रोरॅक्स नायजर)

लहान पाणकावळा भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा आणि बोर्निओमध्ये आढळतो भारतात हा सगळीकडे मुबलक आढळतो, पण हिमालयात किंवा इतर पर्वतराजींमध्ये तो आढळत नाही. समुद्रकिनाऱ्यावर जरी तो क्वचित आढळला, तरी गोड्या पाण्याजवळ तो नेहमी असतो. नद्यांपेक्षा तलाव, सरोवर, दलदलीच्या जागा त्याला जास्त पसंत पडतात. तलावातील पाण्याच्या वर आलेले खडक किंवा झाडांचे खुंट यांच्यावर पंख पसरून तो बहुधा बसलेला दिसतो. हे पक्षी एकेकटे किंवा त्यांचे लहान थवे असतात.

लहान पाणकावळा डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो. त्याची लांबी सु. ५० सेंमी. असते. शरीराचा रंग काळा असून त्यावर किंचित हिरवट रंगाची तकाकी असते. गळ्यावर पांढरा ठिपका असतो, चोच तपकिरी रंगाची असून तिच्या टोकावर तीक्ष्ण आकडी असते, पाय आखूड असून बोटे चपटी व पातळ त्वचेने जोडलेली असतात. शेपटी लांबट व ताठ असते. नर आणि मादी दिसण्यात सारखी असतात. 

लहान खेकडे, भैकेर, बेडूक व मासे यांवर तो उपजीविका करतो. तो उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करून ते पकडतो. जपानमधील कोळी पाणकावळ्याला शिकवून तयार करून मासे पकडण्याच्या कामी त्याचा उपयोग करून घेतात. हा उत्तम उडणारा आहे. 

याचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात जुलैपासून सप्टेंबर पर्यंत व दक्षिण भारतात नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत असतो. पाण्यात किंवा पाण्याच्या जवळपास असणाऱ्या झांडांवर हे पक्षी घरटी बांधतात. एकाच झाडावर अनेक घरटी असतात. कधीकधी तर कावळ्याचे किंवा बगळ्याचे रिकामे घरटे डागडुजी करून ते वापरतात. घरटे वाटीसारखे असते. मादी निळसर हिरव्या रंगाची तीन ते पाच अंडी घालते. अंड्याचे कवच कठीण असून त्यांच्यावर पांढरट भुकटीचा लेप असतो पण  तो लवकरच निघून जाऊन अंड्याचा मूळ रंग दिसू लागतो.

मोठा पाणकावळा पुष्कळदा लहान पाणकावळ्याबरोबरच राहत असलेला दिसतो. तो बदकाएवढा आणि काळा असतो पण विणीच्या हंगामात डोके आणि मान यांवर थोडी पांढरी पिसे उगवतात. शिवाय त्याच्या दोन्ही कडांवर मोठा पांढरा ठिपका असतो.

कर्वे, ज. नी.