चार्ल्‌स (शार्ल), झाक आलेक्सांद्र सेझार : (१२ नोव्हेंबर १७४६–७ एप्रिल १८२३) फ्रेंच भौतिकीविज्ञ. वायूच्या आयतनाचा (घनफळाचा) त्याच्या तापमानाशी असणाऱ्या संबंधाविषयीच्या नियमाचे सहशोधक. त्यांचा जन्म बोझांसी येथे झाला. काही काळ पॅरिस येथे नोकरी केल्यावर त्यांनी सु. अठरा महिने अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी भौतिकीविषयी व्याख्याने देण्यास सुरुवात केली व तेव्हा ते प्रयोगही करून दाखवीत असत. १७८५ साली त्यांची फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर नेमणूक झाली व नंतर त्यांची प्रायोगिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली व याच जागेवर त्यांनी मृत्यूपावेतो काम केले. या ॲकॅडेमीतील प्रायोगिक भौतिकीच्या वर्गाचे १८१६ पासून ते अध्यक्षही होते. 

 ‘वायुवरील दाब कायम ठेवला असता वायूचे आयतन त्याच्या निरपेक्ष तापमानाच्या सम प्रमाणात असते’ हा ⇨ऊष्मागतिकीतील नियम त्यांनी शोधून काढला, परंतु त्यांनी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले नाहीत. त्याचवेळी गे-ल्युसॅक या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांनी ह्याच नियमाविषयी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. त्यामुळे हा नियम ‘चार्ल्‌स नियम’ या नावाने किंवा ‘चार्ल्‌स-गे-ल्युसॅक नियम’ या नावानेही ओळखला जातो.  

त्यांनी १७८३ मध्ये सर्वप्रथम बलून फुगविण्यासाठी उष्ण हवेच्या ऐवजी हायड्रोजन वायूचा वापर केला. रॉबर्ट बंधूंच्या साहाय्याने त्यांनी एक पूर्णपणे विकसित असे बलून तयार केले. त्या बलूनमध्ये विशिष्ट झडपेची योजना करण्यात आली होती. बलून खाली उतरण्याच्या वेळी त्याच्यामधून वायू बाहेर सोडता येत असे. बलूनमधील वायू प्रसरण पावला, तर तो जादा वायू बाहेर सोडण्यासाठी एक नलिका बलूनला बसविली होती. त्यामुळे बलून फुटण्याची भीती नव्हती. बलूनवर विशिष्ट आवरणे दिलेली होती. त्यामुळे बलूनमधील हायड्रोजन वायू यत्किचिंतही बाहेर जाऊ शकत नसे. अशा रीतीने तयार केलेल्या बलूनच्या साहाय्याने रॉबर्ट व चार्ल्‌स यांनी १ डिसेंबर १७८३ रोजी पॅरिसमधून उड्डाण केले आणि ते पॅरिसपासून सु. ४३ किमी. वरील खेड्यात यशस्वीपणे उतरले. त्यांच्या ह्या महान प्रयत्नामुळे राजे सोळावे लुई यांजकडून त्यांना निवृत्तिवेतन देण्यात आले व सॉरबॉन येथे एक प्रयोगशाळा तयार करून देण्यात आली. त्यांच्या ह्या प्रसिद्धीमुळेच फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी त्यांना स्वतःचे प्राण वाचवता आले.

 चार्ल्‌स यांनी काही शास्त्रीय उपकरणे तयार केली होती. त्यातील उल्लेखनीय अशी उपकरणे म्हणजे एक प्रकारचा तरकाटा, छायाचित्रे मोठी करणारे उपकरण (मेगॅस्कोप) व स्फटिकांचे कोन मोजण्यासाठी उपयुक्त असणारा कोनमापक (गोनिओमीटर) ही होत.

ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

सणस, दि. बा.