पाडळ: (पाद्री, पाटल हिं. पांडरी, पदेर, पोदल गु. पडेली क. पादरिगिड सं. पाटला इं. ट्रंपेट फ्लॉवर लॅ. स्टेरिओस्पर्मम चेलोनॉइडिस, स्टे. टेट्रागोनम कुल-बिग्नोनिएसी). सु. १२–१८ मी. उंच आणि १–१·५ मी. घेर असलेला हा पानझडी वृक्ष भारतात दमट हवेतील जंगलात, महाराष्ट्रात विशेषतः कोकणात, कर्नाटकात, कारवार व कुमठ्याच्या जंगलात आणि श्रीलंकेत आढळतो. याच्या शाखा पसरट असून साल जाड व पिवळट असते. पाने मोठी, संयुक्त व पिसासारखी दले ३–५ जोड्या व शिवाय एक दल टोकावर दल २·५–५ सेंमी. लांब, दीर्घवृत्ताकृती, गुळगुळीत, तळाशी असमान व टोकाशी निमुळते फेब्रुवारी ते मार्चच्या सुमारास पाने गळतात आणि एप्रिलमध्ये नवीन पालवी येते. त्याच सुमारास (एप्रिल ते जूनमध्ये) फांद्यांच्या टोकांस लोंबत्या परिमांजऱ्यावर तुतारीसारखी सुवासिक पिवळी फुले येतात त्या वेळी हा वृक्ष शोभिवंत दिसतो. फुलाचा संवर्त ५ संदलांचा, जांभळट व घंटेसारखा असतो. पुष्पमुकुट बाहेरून व आतून लवदार, २ सेंमी. लांब व द्वयोष्टक (दोन ओठांसारखा) पाकळ्या काहीशा सुरकुतलेल्या, बाहेर वाकलेल्या व पिवळ्या असून त्यांवर तांबूस जांभळट रेषा असतात. केसरदले चार व एक वंध्य, तळाशी केसाळ. दोन किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट [⟶ फूल]. बोंडे ०·३–०·६ मी. लांब व १·३ सेमी. रुंद, साधारण चौकोनी, टोकदार व बाकदार असून त्यावर पांढरट ठिपके व आतल्या पिंगट पडद्यांवर खाचा असतात. फळ तडकून त्याची दोन शकले होतात. बिया लांबट, सपक्ष (पंख्यासारखा विस्तार असलेल्या), २–३ सेंमी. लांब असून त्यांवर खाली आडवी खाच असते. इतर सामान्य लक्षणे ⇨ बिग्नोनिएसी कुलात (टेटू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पाटल या नावाच्या वनस्पतीचा उल्लेख जुन्या संस्कृत ग्रंथांत व आयुर्वेद ग्रंथात आला आहे.
या झाडाची पाने गुरांना चारा म्हणून घालतात. लाकूड तपकिरी, कठीण, मध्यम टिकाऊ व लवचिक असून सुतारकामास सोपे असते धरबांधणी, सजावटी सामान, चहाची खोकी, शेतीची काही अवजारे, पडाव, वल्ही इत्यादींसाठी वापरतात. ही वनस्पती शीतल (थंड), वातहर (वायुनाशी) व ज्वरघ्न आहे. मुळे, पाने व फुले यांचा काढा तापावर देतात पानांचा रस लिंबाच्या रसाबरोबर उन्माद विकारावर उपयुक्त असतो. मुळांची साल मधुर असते मुळांचा फांट [⟶ औषधिकल्प] ज्वरात देतात.
देशपांडे, सुधाकर
“