पाडगावकर, मंगेश: (१० मार्च १९२९ –  ). मराठी कवी. जन्म वेंगुर्ल्याचा. प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. उच्च शिक्षण मुंबईत झाले. मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन ते बी. ए. आणि एम्.ए. ह्या परीक्षा पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले (१९५६, १९५८). ह्या दोन परीक्षांतील यशाबद्दल त्यांना अनुक्रमे ‘तर्खडकर सुवर्णपदक’ आणि ‘न. चिं केळकर सुवर्णपदक’ देण्यात आले. एम्.ए. होण्यापूर्वीच मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक (१९५१-५२), साधना साप्ताहिकात सहसंपादक (१९५३–५५) असा नोकऱ्या त्यांनी  केल्या होल्या. १९५७ मध्ये आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ‘असिस्टंट प्रोड्यूसर’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९६० ते ६२ ह्या काळात मुंबईच्या ‘सोमैया कॉलेज’ आणि ‘मिठीबाई कॉलेज’ मध्ये मराठीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर ‘प्रोड्यूसर’ म्हणून ते काही काळ होते (१९६४–७०). १९७० पासून ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिस’, मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून ते काम करू लागले. १९७६–७९ ह्या वर्षांसाठी मुंबई विद्यापीठात मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. १९५० मध्ये रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे ह्यांची कन्या यशोदा हिच्याशी त्यांचा आंतरधर्मीय विवाह झाला.

धारानृत्य (१९५०) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यातील कवितेवर बोरकरांच्या कवितेचे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. त्यानंतरच्या काव्यसंग्रहात जिप्सी (१९५२), छोरी (१९५४), उत्सव (१९६२), विदूषक (१९६६) व सलाम (१९७८) ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या कवितेचे स्वतंत्र पृथगात्म रूप त्यांतून व्यक्त होत गेले. मीरा बाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी केलेला मराठी पद्यानुवाद मीरा  ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे (१९६५). इंग्रजीतील लिम्‌रिकच्या धर्तीवर मराठीत त्यांनी काही वात्रटिकाही (१९६४) लिहिल्या आहेत. भोलानाथ (१९६३) आणि बबलगम (१९६७) हे त्यांच्या बालगीतांचे संग्रह. जिप्सी, छोरी व भोलानाथ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळालेली आहेत. 

पाडगावकरांनी लिहिलेले सुंदर, काव्यात्म ललित निबंध निंबोणीच्या झाडामागे (१९५३) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक अमेरिकन साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केलेले आहेत. तसेच जे. कृष्णमूर्तींची काही भाषणे त्यांनी अनुवादिली आहेत. त्यांनी संपादिलेल्या ग्रंथांत बोरकरांची कविता (१९६०), युगात्मा (१९७०), महात्मा गांधीवरील ललितलेखनाचा संग्रह), संहिता (१९७५, विंदा करंदीकर ह्यांची निवडक कविता) ह्यांचा अंतर्भाव होतो. 

बहुतेक सर्व आधुनिक कवींप्रमाणे पाडगावकरांची कविप्रकृतीही स्वच्छंदतावादी आहे. तीत समाजाभिमुखतेचीही एक धारा मिसळलेली आहे. पाडगावकरांची गणना प्रमुख नवकवींत होत असली, तरी नवकवितेत अनेकदा आढळणारी कटुता, वैफल्य, रचनेचे तेढेपण इत्यादींपासून ही कविता अलिप्त आहे. पाडगावकरांच्या रम्यत्वाने वेडावून जाणाऱ्या वृत्तीला सौंदर्याचा प्रथम आणि सर्वंकष प्रत्यय येतो, तो विविधरूपधारी निसर्गातून. निसर्गाची लसलसती, गूढरम्य विलसिते त्यांच्या सौंदर्यवृत्तीबरोबरच अध्यात्मवृत्तीचेही संतर्पण करतात त्यांना अंतर्मुख बनवितात त्यांच्या सर्जनशीलतेला आवाहन करतात. निसर्गाच्या जोडीने पाडगावकरांच्या कवितेत प्रेमभावनेच्याही अनेक गहिऱ्या छटा आविष्कृत झाल्या आहेत. प्रेमभावनेच्या उत्कट आविष्काराच्या दृष्टीने पाडगावकरांचे शर्मिष्ठा (१९५५) हे नाट्यकाव्य महत्त्वाचे. पाडगावकरांच्या ठिकाणच्या व्यापक सामाजिक जाणिवांमुळे भोगाइतकेच त्यागाचे, जीवनातील सुरूपतेप्रमाणेच कुरूपतेचेही दर्शन त्यांची कविता घडविते. पाडगावकरांची अलीकडील कविता उपहासउपरोधाने भरलेली दिसते. सलाम हा काव्यसंग्रह त्या दृष्टिने उल्लेखनीय आहे.

कुलकर्णी, गो. म.