मुकुंदराज : (चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध). विवेकसिंधूचा कर्ता मुकुंदराज हा मराठी वाड्.मयाच्या इतिहासातील एक वादविषय आहे. त्याचा काळ आणि स्थळ दोन्ही वादग्रस्त आहेत. त्याने आपला विवेकसिंधू हा ग्रंथ ११८८ मध्ये रचिला असे समजून आजपर्यंत बहुतेक सर्वांनी त्याला मराठीचा आद्य ग्रंथकार ठरविला आहे. परंतु त्याच्या ग्रंथातील कालोल्लेख (शके अकरा दाहोत्तरु । साधारण संवत्सरु । राजा शार्ङ्‌गधरु । राज्य करी ।। वि. १८·१४२) चुकीचा व म्हणून संशयास्पद आहे. चुकीचा अशासाठी, की त्यात शक-संवत्सरांचा मेळ बसत नाही. शिवाय विवेकसिंधूच्या आपण पाहिलेल्या एकूण ९२ हस्तलिखित प्रतींपैकी केवळ दोन प्रतीत वरील कालोल्लेखाची ओवी आढळली, असे त्याचे संपादक कृ. पां. कुलकर्णी सांगतात. त्यामुळे या ओळींचे संशयित्व दृढावते. त्यातून या काळाशी तत्कालीन राजवटीचा मेळ बसला असता, तर तो मान्य करण्यास थोडा तरी आधार होता परंतु वरील ओवीतील शार्ङ्‌गधर राजाचा पत्ता अजून तरी लागलेला नाही. तसेच ज्या जैतपाळ राजाने मुकुंदराजाकडून विवेकसिंधूच्या ‘ग्रंथरचनेचा रोळु करविला’ (वि. ७·१५५) त्याचीही निश्चित माहिती नाही. अशा परिस्थितीत वरील कालनिदर्शक ओळी प्रक्षिप्त समजून पुढे जाणे योग्य होईल, कारण ती ओवी प्रमाण मानल्यास अनेक प्रश्न निर्माण होतात व त्यांची उत्तरे मिळत नाहीत.

मग मुकुंदराजाचा काळ कोणता, या प्रश्नाचे उत्तर त्याने उल्लेखिलेल्या जैतपाळच्या काळावर अवलंबून आहे. हा जैतपाळ कोण याविषयी अभ्यासकांत मतैक्य नाही. सर्वच अंदाज आहेत. त्यापेक्षा खेडला (जि. बैतूल मध्य प्रदेश) येथील एक शिलालेख या जैतपाळावर अधिक प्रकाश टाकतो. हा लेख जैतपाळाच्या वेळचा म्हणजे शके १२८५ (इ. स. १३६३) मधील असून त्यात दिलेली त्यांची वंशपरंपरा विवेकसिंधूतील परंपरेशी जुळते. याला पूरक असा पुरावा महानुभावांच्या ग्रंथातून मिळतो. त्यातील मेघचंद्रकृत यक्षदेव-वृद्धान्वय नावाच्या ग्रंथात (सतरावे शतक) या जैतपाळाची वंशपरंपरा व मुकुंदराजाची गुरुपरंपरा सांगितली आहे. त्यावरून मुकुंदराजाने स्वतः उल्लेखलेले आपले परात्परगुरू हरिनाथ म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी होत हे स्पष्ट होते. या हरिनाथांनी आपला पहिला शिष्य राघव (म्हणजे लीळाचरित्रातील रामदेव किंवा दादोस) याला वेदान्त व दुसरा शिष्य नागेंद्र (म्हणजे नागदेवाचार्य) याला सिद्धान्त सांगितला. मुकुंदराज हा त्या राघवाचा शिष्य म्हणजे हरिनाथांचा (अर्थात चक्रधरांचा) प्रशिष्य. या परंपरेनुसारही मुकुंदराज उत्तरकालीनच ठरतो. त्याने विवेकसिंधूची रचना वृद्धावस्थेत (‘मज श्वासोन्मेषाचाहि श्रमु-‘वि. ७·१५४) केली हे खरे असेल, तर त्याचा काळा खेडला लेख व जैतपाळ यांच्या काळाशी म्हणजे शके १२८५ शी जुळता ठरतो. याचा अर्थ, मुकुंदराज मराठीचा आद्य कवी नसून तो ज्ञानेश्वरानंतर सु. पन्नास वर्षांनी होऊन गेला. त्याचे उत्तरकालीनत्व त्याच्या भाषेवरूनही कसे दिसते ते ह. ना. नेने ह्यांच्यासारख्या संशोधकांनी दाखविले आहे.

मुकुंदराजाच्या काळाप्रमाणे त्याच्या स्थळाचाही प्रश्नही विवाद्य आहे. ‘वैन्यगंगेचिया तीरी । मनोहर अंबानगरी’ हा विवेकसिंधूतील उल्लेख संदिग्ध स्वरूपाचा असल्याने मुकुंदराज अंबेजोगाईचा की अंभोऱ्याचा असा प्रश्न पडतो. पुरावे दोन्ही बाजूंनी दिले जातात पण वर उल्लेखलेल्या खेडला शिलालेखामुळे अंभोरा पक्षास बळकटी येतो. मुकुंदराजाचा या दोन्ही गावांशी संबंध आला असणे शक्य आहे.

मुकुंदराजाचे मुख्य ग्रंथ दोन : विवेकसिंधू आणि परमामृत. याशिवाय त्याने विवेकसिंधूचे तात्पर्य सांगणारा महाभाष्यम् हा संस्कृत ग्रंथही लिहिला असावा. मूलस्तंभ आणि पवनविजय हे ग्रंथही त्याच्या नावावर मोडतात. विवेकसिंधूची एकूण अठरा प्रकरणे असून त्यातील सतरावे प्रकरण भिन्न पाठांत दोनदा आले आहे. पैकी पहिला पाठ शांकरमताशी जुळणारा असून दुसरा महानुभावांच्या द्वैतमताशी जुळणारा व म्हणून कोणीतरी मागाहून घातलेला आहे, असे दिसते. विवेकसिंधूची ओवीसंख्या भिन्नभिन्न प्रतींतून १,६३० ते १,६८४ पर्यंत कमीजास्त आढळते. या ग्रंथात मुकुंदराजाने अद्वैत-सिद्धान्ताचे प्रतिपादन केले असून सर्वत्र शांकरमताचे म्हणजे शंकराचार्याच्या संन्यासमठाचे वातावरण आहे. आपल्या ग्रंथात वेदशास्त्राचा मथितार्थ असून त्याची ‘राहाटी’ उपनिषदांची आहे व त्यात शांकरोक्ति मांडली आहे असे तो म्हणतो (वि. १·११ १·२६ ७·१४७). अद्वैतमत मराठीत व्यवस्थितपणे मांडून दाखविणे ही त्याची मुख्य कामगिरी असून हे काम त्याने ज्ञानेश्वरांप्रमाणे रसवृत्तीच्या पद्धतीने नव्हे, तर तर्कपद्धतीने केले आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या प्रस्तावनेत त्याने अध्यात्मासारखा विषय रसवृत्तीने मांडणे योग्य नाही, तसे केल्यास ते ‘वाचेसि नागवणे’ होईल असे म्हणून ज्ञानेश्वरांवर प्रच्छन्न टीकाही केली आहे (वि.१. १७–२३). विवेकसिंधूची रचना ज्ञानेश्वरीच्या नंतर झाली याचा हा आणखी एक पुरावा म्हणता येईल. पण रसवृत्ती त्याज्य मानल्याने मुकुंदराजाचा ग्रंथ, त्यातील दृष्टांत देण्याची शैली वगळल्यास नीरस झाला आहे. त्यात तत्त्वचर्चा विपुल असली, तरी काव्य बेताचेच आहे कारण ग्रंथकर्त्याची मूळ भूमिकाच तत्त्वज्ञाची आहे कवीची नाही. म्हणून ‘मराठी भाषेच्या वेषातला शांकरमठातला सुबोध वेदान्तपाठ म्हणजे विवेकसिंधू होय’. ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेली व्याख्या यथार्थ वाटते. मुकुंदराजाचा परमामृत हा दुसरा ओवीबद्ध ग्रंथ आकाराने लहान, म्हणजे ३२३ ओव्यांचा असून तो विवेकसिंधूचा संक्षेप असल्याप्रमाणे आहे. मुकुमदराजाचा संबंध अप्रत्यक्षपणे का होईना, महानुभाव पंथाशी पोहोचतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. पण त्या पंथाच्या द्वैती मताचा प्रभाव त्याच्यावर पडलेला नाही. तो पक्का अद्वैती आहे.

संदर्भ : १. कानोले, वि. अं. मुकुंदराजाची अंबानगरी कोणती? नांदेड, १९६१.

            २. कुलकर्णी, कृ. पां. संपा. श्रीमुकुंदराजकृत श्रीविवेकसिंधु, पुणे, १९५७.

            ३. जोशी, म. रा. मनोहर अंबानगरी, नागपूर, १९७९.

            ४. तुळपुळे, शं. गो. संपा. मराठी वाङ्‌मयाचा इतिहास, खंड १ ला, पुणे, १९८४.

तुळपुळे, शं. गो.