पाटील, पांडुरंग चिमणाजी: (१९ जून १८७७ – ७ ऑगस्ट १९७८). महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कृषितज्ञ. जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य. त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील वडगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले.१९०५ साली शेतकीची एल्.एजी. ही पदवी परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयात त्यांची कृषिक्षेत्र अधिक्षक म्हणून नेमणूक झाली. पुढे १९०८ साली ते डेक्कन विभागाचे कृषी निरीक्षक झाले. १९१२ मध्ये इंग्लंड, डेन्मार्क इ. देशांतील शेतीची पाहणी व अभ्यास करण्यासाठी त्यांना सरकारतर्फे पाठविण्यात आले. १९१४ साली कृषी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनतर कृषी अर्थशास्त्र या विषयाचा अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात अभ्यास करून त्यांनी १९२२ मध्ये एम्.एस्सी. पदवी मिळविली. ब्रिटिश सरकारने १९२४ मध्ये त्यांना रावबहादूर हा किताब दिला. १९२५ साली पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात येऊन पाटील यांची या विषयाचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी ते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम करीत होते व या महविद्यालयाला कृषी संशोधन संस्थेचे स्वरूप देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. ते मुंबई विद्यापीठाचे फेलो व काही वर्षे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. त्यांनी कृषी अर्थशास्त्राविषयी लिहिलेल्या संशोधनात्मक प्रबंधाला मान्यता देऊन मुंबई विद्यापीठाने त्यांना डी. एस्सी.ही पदवी व मूल सुवर्णपदक सन्मानपूर्वक दिले. १९३२ साली सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी ग्वाल्हेर संस्थानात कृषी, सहकार व विकास यांच्या पाहणीसाठी नेमलेल्या आयोगावर काम केले. १९४१–४५ या काळात ते कोल्हापूर संस्थानाच्या राजप्रतिनिधी मंडळात शिक्षण, शेती, पशुसंवर्धन, सहकार व स्थानिक स्वराज्य या खात्यांचे मंत्री होते. त्या वेळी त्यांनी शिक्षण, शेती व सहकार या क्षेत्रांत बऱ्याच उपयुक्त सुधारणा घडवून आणल्या. मुंबई सरकारने नेमलेल्या मूलोद्योग शिक्षण समितीवर त्यांनी काम केले आणि त्या वेळी मूलोद्योग शिक्षणातील शेतीच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आवर्जून प्रतिपादन केले. त्यांच्या शताब्दी नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोल्हापूर येथे त्यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सन्माननीय डी. लिट्. ही पदवी खास समारंभपूर्वक अर्पण केली.
पाटील यांनी १९०८ मध्ये कृषी निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर शेतीच्या नव्या अवजारांच्या व शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचारकार्यास प्रारंभ केला. त्यांनी नव्या अवजारांच्या बरोबरच नव्या खतांचा व बियाणांचाही प्रचार केला. लोखंडी नांगर व इतर औतांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन त्यांत आवश्यक त्या सुधारणा सुचवून व त्याप्रमाणे किर्लोस्कर आदि कारखान्यांकडून सुधारित औते तयार करवून घेऊन त्यांचा शेतकऱ्यांमध्ये त्यांनी प्रसार केला. त्यांनी ‘रुंद सरीची मांजरी पद्धत’ ही उसाच्या लागवडीची नवीन पद्धत शोधून काढली व आज जवळजवळ सर्व महाराष्ट्रात हीच पद्धत वापरात आहे. किफायतशीरपणे मोठ्या प्रमाणावर गूळ तयार करण्यासाठी यांत्रिक चरकांचा व एकत्रित असलेल्या अनेक चुलाणांचा वापर त्यांनी सुरू केला. १९१९ साली अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे उभारण्यात आलेल्या साखर कारखान्याच्या उभारणीत पाटील यांच्या ऊसविषयक संशोधनाचा मोठा वाटा होता.
कृषी अर्थशास्त्रीय संशोधनावर आधारित अशा ४-५ पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. याशिवाय त्यांनी क्रॉप्स ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी वुइथ देअर जिऑग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स (१९२१), फुड प्रॉब्लेम ऑफ इंडिया इन जनरल अँड कोल्हापूर स्टेट इन पर्टिक्युलर (१९४८), रिजनल सर्व्हे ऑफ इकाॅनॉमिक रिसोर्सेस, इंडिया, कोल्हापूर (१९४८) इ. ग्रंथही त्यांनी लिहिले. विविध क्षेत्रांतील आपले अनुभव त्यांनी माझ्या आठवणी (१९६४) या आत्मचरित्रपर ग्रंथात विशद केले आहेत.
मराठा समाजाची संघटना व्हावी व त्याचात शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सत्यशोधक समाज, शिवाजी मराठा सोसायटी, डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था इ. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते कोल्हापूर येथे मृत्यू पावले.
त्यांचे थोरले पुत्र मेजर जनरल शंकरराव थोरात यांनी भारतीय लष्करात बहुमोल कामगिरी केलेली आहे.
जोशी, वा. ना.