पाउंड, एझरा : (३० ऑक्टोबर १८८५ – १ नोव्हेंबर १९७२). जागतिक कीर्तीचा वादग्रस्त अमेरिकेन कवी आणि समीक्षक. आयडाहो राज्यातील हेली ह्या लहानशा शहरी त्याचा जन्म झाला. १८८९ मध्ये नोकरीच्या निमित्ताने त्याचे वडील फिलाडेल्फिया राज्यातील विन्कोट ह्या गावी राहू लागले. पाउंडचे आरंभीचे काही शिक्षण चेल्टनहॅम मिलिटरी अकॅडमीत आणि विन्कोट येथील शाळेत झाले. न्यूयॉर्क येथील हॅमिल्टन कॉलेजात पीएच्. बी. चा अभ्यास करून ती पदवी १९०५ मध्ये त्याने मिळविली. पुढील वर्षी पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून तो एम्.ए. झाला. त्यानंतर डॉक्टरेट मिळविण्याचा त्याचा विचार होता परंतु एका वर्षातच त्याने तो सोडून दिला. ग्रीक, लॅटिन, अँग्लो-सॅक्सन अशा विविध भाषांचे ज्ञान त्याने मिळविले होते. फ्रेंच, प्रॉव्हांसाल, इटालियन, स्पॅनिश इ. रोमान्स भाषांचा त्याचा विशेष अभ्यास होता. इंग्रजी साहित्याचाही त्याने उत्तम व्यासंग केला होता.
क्रॉफर्ड्झव्हिल, इंडियाना येथील ‘वाबाश प्रेसबिटेरियन कॉलेजा’त रोमान्स भाषांचा प्राध्यापक म्हणून १९०७ मध्ये त्याची नेमणूक झाली. तथापि १९०८ मध्ये ही नोकरी सोडून त्याने यूरोपला प्रयाण केले. तेथे काही काळ घालविल्यानंतर अमेरिकेत येऊन लेखक म्हणून जगण्याचा त्याने प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरल्यामुळे त्याने पुन्हा यूरोपला जाण्याचा निर्णय घेतला (१९११). त्यानंतर इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड ह्या देशांत त्याचे वास्तव्य झाले. तेथील प्रागतिक आणि प्रयोगशील नियतकालिकांशी व लघुमासिकांशी त्याचा संबंध आला. डब्ल्यू. बी. येट्सशी आणि त्याच्या वाङ्मयीन वर्तुळाशी पाउंडचा परिचय १९११ पूर्वीच झालेला होता आणि विख्यात इंग्रज तत्त्वज्ञ टॉमस अर्नेस्ट ह्यूम ह्याच्या प्रतिमा विचाराचाही त्याच्यावर प्रभाव पडलेला होता. अ लूमे स्पेंतो हा पाउंडचा पहिला काव्यसंग्रह १९०८ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर पंधरांंहून अधिक संग्रह प्रकाशित झाले. आर्षता आणि आधुनिकता ह्यांचा एकत्रच प्रत्यय देणाऱ्या त्याच्या कविता आरंभी वादग्रस्त ठरल्या तथापि पुरातन काव्यपरंपरेवरील प्रभुत्व आणि नवे प्रयोग करण्याचे सामर्थ्य ह्या गुणांमुळे कवितेच्या क्षेत्रात त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थानही निर्माण झाले. १९१२–१४ ह्या काळात प्रतिमावाद्यांचे नेतृत्व पाउंडने केले त्यांचा पहिला जाहीरनामा लिहिला त्या संप्रदायातील कवींच्या कवितांचा एक प्रतिनिधिक संग्रहही संपादिला (१९१४). प्रसिद्ध् अमेरिकन प्राच्यविद्याविशारद अर्नेस्ट फ्रॅन्सिस्को फेनलोसा (१८५३–१९०८) ह्याच्या निधनोत्तर पाउंडच्या हाती आलेल्या पौर्वात्य साहित्याच्या आधारे पाउंडने काही चिनी कवितांची तसेच जपानी ते नाट्यांची इंग्रजी भाषांतरे केली (१९१५–१७).
पाउंडचे वास्तव्य १९११ ते १९२० ह्या कालखंडात मुख्यतः लंडनमध्ये होते. १९२० मध्ये तो पॅरिसला आला. ह्याच वर्षी त्याचे ह्यू सेल्विन मॉबरली हे दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले. ह्यू सेल्विन मॉबरली आणि १९१९ मध्ये प्रकाशित झालेले ‘होमेज टू सेक्स्टस प्रोपर्शस’ ही पाउंडची दोन विशेष महत्त्वाची काव्ये. ‘होमेज टू सेक्स्टस प्रोपर्शस’ हे ब्रिटिश साम्राज्यावरील भाष्य होय. ह्यू सेल्विन मॉबरलीमध्ये भ्रष्ट, यांत्रिक, अधःपतित अशा आधुनिक संस्कृतीवर पाउंडने उपरोधपूर्ण टीका केलेली आहे. विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ काव्य म्हणून ह्यू सेल्विन… चा उल्लेख केला जातो. १९१५ पासून पाउंडने एक दीर्घकाव्य लिहिण्यास आरंभ केला होता. या काव्यातच्या भागांना त्याने ‘कँटोज’(काव्यसर्ग) असे म्हटले. हे काव्यसर्ग म्हणजे मानवाच्या विद्रोही वृत्तीतून निर्माण झालेल्या संस्कृतिविनाशाची दर्शने आहेत, असे मानले जाते. मानववंशशास्त्र, आधुनिक इतिहासातील व्यक्ती आणि घटना यांचे संदर्भ, अपरिचित वाङ्मयीन उल्लेख, चिनी काव्यातील आविष्काररीती इत्यादींचा स्वच्छंदी वापर ह्या काव्यात पाउंडने केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना हे काव्य दुर्बोध वाटते आधुनिक काव्याच्या आकलनासाठी मानवी इतिहास आणि संस्कृती ह्यांचा परिचय अगत्याचे आहे, असे पाउंडचे मत होते.
आर्थिक महामंदीची लाट १९३० मध्ये जगावर आली. तिने अंतर्मुख होऊन अर्थशास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासाकडे वळला. चुकीच्या अर्थविषयक दृष्टिकोणामुळे जगात युद्धे होतात, अशी पाउंडची धारणा झाली. अर्थविषयक सुधारणांचा त्याने ध्यास घेतला. राजकारणातही त्याने रस घेतला आणि इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनी ह्याची प्रशंसा केली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इटली व अमेरिका ह्यांच्या युद्ध पेटू नये म्हणून पाउंडने व्यक्तिगत प्रयत्न केले. १९४१ ते १९४३ ह्या वर्षांत रोमच्या नभोवाणीवरून त्याने अनेक भाषणे केली. त्यांत अमेरिकेवर अनेकदा उघड टीका असे. १९४५ मध्ये देशद्रोहाच्या आरोपावरून अमेरिकन सरकारने त्याला अटक करून पीसाजवळील कैद्यांच्या एका छावणीत ठेविले. तथापि तेथील हालअपेष्टा सहन करीत कन्फ्यूशसचे तत्त्वज्ञान इंग्रजीत अनुवादण्याचा उपक्रम सुरू केला. पीसन कँटोजसारखे काही काव्यसर्ग लिहिले. न्यायालयीन चौकशीसाठी पाउंडला वॉशिंग्टनला आणण्यात आले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तीत पाउंड हा बुद्धिभ्रष्ट (इन्सन) झालेला असून आपला बचाव करण्याच्या दृष्टीने आपल्या वकिलांशीही संवाद साधण्याच्या मनःस्थितीत नाही, असे सिद्ध झाले. परिणाम त्याची चौकशी झाली नाही आणि मनोरुग्णांच्या एका इस्पितळात त्याला बारा वर्षे काढावी लागली. तेथे असताना त्याचे लेखन मात्र चालूच होते. पीसन कँटोज ह्या नावाने त्याने लिहिलेल्या काव्यसर्गांना तो इस्पितळात असताना ‘बोलिंगेन अवॉर्ड’ देण्यात आले (१९४९). १९५८ मध्ये त्याच्यावरील आरोप मागे घेण्यात आले आणि इस्पितळातूनही त्याची मुक्तता झाली. त्यानंतर तो इटलीत परतला. व्हेनिसमध्ये त्याचे निधन झाले.
आधुनिक कवींचा आद्य मार्गदर्शक म्हणून पाउंडचे कार्य आधुनिक इंग्रजी साहित्यात महत्त्वाचे मानले जाते. विख्यात इंग्रज कवी टी. एस्. एलियट ह्याच्या द वेस्ट लँड ह्या दीर्घकाव्याचे साक्षेपी संपादन पाउंडने केले होते. रॉबर्ट फ्रॉस्ट आणि डी. एच्. लॉरेन्स ह्यांच्या कवितेची दखल घेऊन तिचे मूल्यमापन करणाऱ्या आरंभीच्या समीक्षकांमध्ये पाउंडची गणना होते. जेम्स जॉइसलाही पाउंडचे उत्तेजन लाभले होते.
संदर्भ : 1. Eliot, T.S. Ezra Pound: His Metric and His Poetry, New York, 1917.
2. Emery, clark, Ideas into Action: A study of Pound’s Cantos, Coral Gables (Florida), 1958.
3. Fraser, G. S. Ezra Pound, Edinburgh and London, 1960.
4. Kenner, Hugh, The Poetry of Ezra Pound, Norfolk (Conn.). 1951.
5. Leary, Lewis, Ed. Motive and Method in the Cantos of Ezra Pound, New York, 1954.
6. Sutton, Walter, E., Ed. Ezra Pound: A Collection of Critical Essays, Englewood Cliffs (N.J.), 1963.
हातकणंगलेकर, म. द.
“