पॅराग्वाय नदी : दक्षिण अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाची व पाराना नदीची प्रमुख उपनदी. लांबी २,५५० किमी. आणि जलवाहनक्षेत्र सु. ९,८४,२०० चौ. किमी. पॅराग्वाय हे नाव नदीकाठी आढळणाऱ्या तुरेवाल्या पॅराग्वाय पक्ष्यांवरून आले असावे. पूर्वी या नदीकाठचे इंडियन लोक तुऱ्यांची शिरस्त्राणे घालीत, म्हणून या नदीस ‘रिव्हर ऑफ कॉकेड्स’ असेही म्हणत. दक्षिण-मध्य ब्राझीलमधील माटू ग्रोसू पठारप्रदेशात समुद्रसपाटीपासून केवळ ३०० मी. उंचीवर ही उगम पावते. उगमापासून केवळ २४० किमी. अंतरावरील कासेरेस येथे तिचा प्रवाह ८३ मी. रुंद व ६ मी. खोल असून मुखापासून येथपर्यंतचा प्रवाह नौकानयनयोग्य आहे. उगमापासून २७३ किमी. अंतरावरच तिचे गाळमैदान (पूरमैदान) सुरू होते. येथे तिची उंची समुद्रसपाटीपासून केवळ १२२ मी. आहे व येथून पुढे नदीचा उतार एका किमी.ला केवळ २ सेंमी. इतका अल्प आहे. प्रथम ब्राझीलमधून व पुढे ब्राझील-पॅराग्वाय सरहद्दीवरून सु. १,५३० किमी. अंतर उत्तर-दक्षिण दिशेत वाहत जाऊन ती पुढे पॅराग्वायमध्ये प्रवेश करते. त्यानंतर पॅराग्वायच्या मध्यातून ३२० किमी. दक्षिणेस वाहत जून पॅराग्वाय-अर्जेंटिना सरहद्दीदरम्यानच्या आसूनस्यॉनजवळ पील्कोमायो नदीस मिळते. हा संयुक्त प्रवाह पॅराग्वाय-अर्जेंटिना सरहद्दीवरून २९ किमी. दक्षिण-नैर्ऋत्येस वाहतो, कोर्येंतेसजवळ पूर्वेकडून येणाऱ्या पाराना नदीला मिळतो व पुढे हा संयुक्त प्रवाह अर्जेंटिनात प्रवेश करतो.
पॅराग्वाय अत्यंत संथ नद्यांपैकी एक असून तिच्या उत्तर व दक्षिण भागांत पाऊस भिन्न काळी पडतो. त्यामुळे नदीस वर्षभर भरपूर पाणी असते. नदीतून सरासरी १,९२६ क्यूमेक्स पाणी वाहते परंतु पुराच्या वेळी हे प्रमाण २,८३२ क्यूमेक्सपर्यंत वाढते आणि त्यावेळी ९९,९७४ चौ. किमी. प्रदेशात पुराचे पाणी पसरल्यामुळे (नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्र ९,८४,२०० चौ. किमी.) विस्तीर्ण प्रदेशात दलदल निर्माण झालेली आहे. विशेषत: अर्जेंटिनाच्या बाजूचे काठ उथळ व सपाट असल्याने त्या बाजूस १० ते १५ किमी. पर्यंत पुराचे पाणी पसरते. पील्कोमायोशिवाय आपा, झाउरू, सिपुतूवा, सँवों लोरेन्सू, ताक्वारी या पॅराग्वायच्या अन्य प्रमुख उपनद्या आहेत. कॉरुंबा, कूयबा, इश्पिरँसा ही ब्राझीलमधील बंदरे , तर आसूनस्यॉन हे पॅराग्वायमधील बंदर या नदीवर आहे.
डिसूझा, आ. रे. यार्दी, ह. व्यं.