पवित्र व पवित्रेतर :(सेक्रिड अँड प्रोफेन ). धर्मामध्ये विश्र्वातील सर्व पदार्थांचे वर्गीकरण पवित्र, अपवित्र व लौकिक अशा तीन प्रकारांमध्ये केले जाते. ‘पवित्र व पवित्रेतर’ या संज्ञेत या तीनही पदार्थांचा अंतभार्व होतो . ज्या पदार्थांमध्ये अलौकिक अशी सत् शक्ती वा पुण्य असते, तो पवित्र होय. उदा., वेद, बायबल, कुराण, इझ्राएल, आर्यावर्त, काशी, पूजनीय मूर्ती, मंदीर, तीर्थक्षेत्र, गंगा व तिच्यासारख्या नद्या, मंत्र, धर्मगुरू, धार्मिक व्यक्ती, गाय, अश्वत्थादी वृक्षवनस्पती, कर्मकांड इत्यादी. ज्य़ा पदार्थामध्ये अलौकिक अशी असत् शक्ती वा पाप असते, तो अपवित्र होय. उदा., प्रेत, रजस्वला, शरीरमल, गावडुक्कर, खुनी मनुष्य, परधर्मीय वा सुतकी व्यक्ती इत्यादी. ज्या पदार्थामध्ये सत् वा असत् अशी कोणतीच अलौकिक शक्ती नसते, तो लौकिक पदार्थ होय. उदा., बाभळीचे झाड, म्हैस, शेळी, मेंढी, रस्त्यातला दगड इत्यादी. या तीन पदार्थांपैकी पवित्र व अपवित्र पदार्थांना एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. कित्येकदा लौकिक पदार्थही पवित्र व अपवित्र पदार्थांपासून वेगळे ठेवावे लागतात.
या तीन पदार्थांचे एक विश्व न मानता त्यांची वेगवेगळी दोन विश्वेही मानली जातात. त्यांपैकी एका विश्वात भयावह व निषिद्ध असे पवित्रापवित्र पदार्थ असतात, तर दुसऱ्या विश्वात लौकिक पदार्थ असतात. पहिल्या विश्वातील दोन्ही पदार्थ संसर्गजन्य रोगांप्रमाणे असतात. त्यामुळे काही विशिष्ट संदर्भात व्यवहारोपयोगी लौकिक वस्तू त्यांच्या संपर्कात आली, की ती व्यवहारात त्याज्य बनते. उदा., पूजेच्या वेळचे काही पदार्थ किंवा प्रेताच्या संपर्कात आलेले काही वस्त्रादीपदार्थ सर्वसामान्य व्यवहारात वापरले जात नाहीत. मात्र अशा सर्वच पदार्थांना हा नियम लागू नसतो. काही पदार्थ शुद्ध करून पुन्हा वापरण्याची परवानगी असते , तर अपवित्र पदार्थाच्या संपर्कातील काही पदार्थ कायमचे टाकावे लागतात. अशा पवित्रापवित्र पदार्थांची भीती वाटते. त्यांना दूर ठेवले नाही, तर धार्मिक मनुष्य, देवमूर्ती, मंदिर इ. स्वतः भ्रष्ट होण्याचा आणि प्रेत, रजस्वला, सुतकी व्यक्ती इ. पदार्थ इतरांना भ्रष्ट करण्याचा धोका संभवतो. त्यामुळेच या पदार्थांच्या भोवती ⇨निषिद्धांचे एक गूढ वलय निर्माण होते. निषिद्धांच्या द्वारे पवित्रापवित्र पदार्थ लौकिक पदार्थांपासून वेगळे केले जातात. पवित्र व अपवित्र पदार्थ परस्परविरुद्ध असले. तरी ते दोन्ही भयावह, निषिद्ध व लौकिकाहून भिन्न असल्यामुळे परिणामांच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात समान मानले जातात. आदिम मानवामध्ये तर ही गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते. कारण, पवित्र व अपवित्र पदार्थ निषिद्ध आहेत, एवढेच त्याला माहीत असे त्यामुळेच काही प्राचीन भाषांतून एकाच शब्दाचे पवित्र व अपवित्र असे दोन्ही अर्थ आढळत असत. म्हणूनच या दोन्ही पदार्थांचे मिळून एक विश्व बनते. दुसऱ्या विश्वात लौकिक पदार्थ असतात. त्यांचा सर्वसामान्य व्यवहारात निर्भयतेने आणि निःशंकपणे उपयोग केला जातो. उदा., बाभळीचे झाड, अनेक धातू, दगड इ. लौकिक असल्यामुळे त्यांचा इंधनादी व्यवहारांत उपयोग होतो. ही दोन विश्वे परस्परांपासून पूर्णपणे भिन्न व परस्परविरुद्ध असतात. एकातून दुसऱ्यात प्रवेश मिळविणे अत्यंत अवघड व घातक असते. धार्मिक विधींच्या द्वारेच या दोनविश्वांत संपर्क स्थापित करता येतो. एरव्ही अशा पदार्थांचा स्पर्श वा दर्शनही टाळावे लागते नाही तर संकटे येतात. उदा., देवपूजा करण्यापूर्वी स्नान करावे लागते तसेच प्रेताचे विसर्जन करताना विशिष्ट धार्मिक विधी करावे लागतात. याउलट, पवित्रापवित्र पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर पुन्हा लौकिक अवस्थेत जाण्यासाठीही विशिष्ट विधी करावे लागतात. उदा.,ज्यू लोक पवित्र धर्मग्रंथांच्या वाचनानंतर हात धुतात. प्रेताला स्पर्श केला असेल, तर स्नान केल्याशिवाय भोजनादी लौकिक व्यवहार करता येत नाहीत. मुसलमान लोक हाज यात्रेला प्रारंभ करताना पवित्र अवस्था ( इहराम) धारण करतात आणि यात्रा संपविताना त्या अवस्थेचा त्याग करून मग घरी परततात.
विशिष्ट पदार्थच का पवित्र मानले जातात, याविषयी वस्तुनिष्ठ असे उत्तर देता येणे अवघड आहे. कधीकधी एखादी वस्तू कृत्रिम पद्धतीने वा योगायोगानेच पवित्र मानलेली दिसते. परंतु सामान्यतः विस्मयजनक, सामर्थ्यशाली, महान, प्राचीन व प्रभावी असल्यामुळे जी गोष्ट दैवी व अलौकिक वाटते, तिला पवित्र मानण्याची मानवी प्रवृत्ती असते. विशिष्ट पदार्थांतून पवित्रता केंद्रित झाली आहे. असे मानले जाते. देवाला प्रिय असलेला वा त्याच्या संपर्कात आलेला पदार्थही पवित्र मानला जातो. पवित्र पदार्थाच्या सान्निध्यामुळेही इतर वस्तूंना पावित्र्य प्राप्त होते. विशिष्ट पदार्थांतून दैवी शक्तीचा आविष्कार होतो, अशा समजुतीनेही त्यांना पवित्र मानले जाते. सेमिटिक लोकांना सुपीक स्थाने व हिरवळ निर्माण करणारे झरे पवित्र वाटत. कारण हे दैवी शक्तीने घडते, असे त्यांना वाटे. हिंदूंना तारे, नद्या, सरोवरे, निर्झर, पर्वत इ. पवित्र तीर्थे वाटतात. परंपरा, सामाजिक रूढी, दैवी दृष्टान्त इ. कारणांनी काही पदार्थ पवित्र मानले जातात. धर्मगुरू, पुरोहित, शामान, राजा इ. व्यक्ती तुळस, वड, पिंपळ इ. वनस्पती गाय, मोर इ. प्राणी गंगा, यमुना इ. नद्या कैलास, सिनाई, फूजियामा इ. पर्वत रविवार, रमजान, एकादशी इ. काळ कुराण, बायबल, वेद इ. धर्मग्रंथ आर्यावर्त, इझ्राएल इ. भूमी देव , पती इत्यादींची नावे नद्यांचे संगम, गुहा, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, ॐसारखी अक्षरे, काही ध्वनी, गायत्री सारखे मंत्र, पूजेच्या वस्तू, विशिष्ट अंक, पुराणकथा, कर्मकांड, विशिष्ट लोक, विधी, यज्ञ, धर्मकृत्ये, संस्कार, उत्सव इ. असंख्य पदार्थ पवित्र मानले जातात.
प्रारंभीच्या काळात पवित्रता ही ⇨ जादूटोणा, कर्मकांड इत्यादींशी निगडित होती परंतु नंतर ती प्रामुख्याने नैतिकतेशी संबद्ध मानली जाऊ लागली. लोकांना पवित्र वस्तू हा एक मोठा ठेवा वाटतो. तपश्चर्येच्या पवित्र शक्तीने युक्त झालेले लोक देवांशीही स्पर्धा करू शकतात. अनेकदा पवित्रतेची तुलना विजेशी केली जाते. विजेप्रमाणेच पवित्रतेपासून सामर्थ्य मिळते, तिच्यापासून धोकाही संभवतो आणि संपर्कात येणाऱ्या पदार्थांतून ती संक्रमित होते. पवित्र वस्तूमध्ये एक प्रकारचे सृजनशील व उपकारक सामर्थ्य असते. त्यामुळे आदर व प्रेम वाटून मन तिच्याकडे ओढ घेते. याउलट, त्या वस्तूमध्ये विनाशक सामर्थ्यही असल्यामुळे तिची भीती वाटून तिच्यापासून दूर रहावे असेही वाटते. अशा रीतीने, पवित्र वस्तूविषयी माणसांची प्रतिक्रिया संमिश्र असते. उदा.,बेचुआनस हे मगर कूळातील लोक मगरीला पवित्र मानतात. तिला पूर्वज मानतात. तिच्या नावाने शपय घेतात परंतु तिचे दर्शन घेतले तर डोळे सुजतात, या कल्पनेने तिला पाहणेही निषिद्ध मानतात. आरोग्य, शक्ती, अन्न, यश, पराक्रम, प्रभाव इ. गोष्टी म्हणजे पवित्र पदार्थांकडून मिळालेले वरदानच असते परंतु पवित्र शक्ती नियंत्रणात ठेवणे व तिला व्यवहारातील हितासाठी अनुकूल बनविणे, हे अत्यंत अवघड असते. पवित्र मानल्या जाणाऱ्या पदार्थांचा उपयोग पूजा, यज्ञ, व्रत इ. धार्मिक विधींतून करावयाचा असतो व तसा उपयोग करण्याचा अधिकार प्रामुख्याने पुरोहितादी विशिष्ट व्यक्तींनाच असतो. त्यांनीही ते विधी विशिष्ट अवस्थेतच पार पाडावयाचे असतात. पहिल्या फळासारख्या पहिल्या वस्तूतील भीषणता नियंत्रित करण्याचे सामर्थ्य फक्त पवित्र व्यक्तींमध्येच असते, म्हणून पहिली फळे त्यांना अर्पण केली जातात. पवित्र व्यक्तींना इतरांपेक्षा अधिक निषेध पाळावे लागतात. त्यांना नवे निषेध निर्माण करता येतात.
पवित्र पदार्थाचा अल्पसा अंश घेतला, तरी त्यात संपूर्ण पदार्थाइतकेच पावित्र्य असते. उदा., गंगेच्या पाण्याचा एक थेंब हा संपूर्ण गंगेइतकाच पवित्र असतो. वेगवेगळ्या पवित्र पदार्थांमध्ये तारतम्य मानले जाते. उदा., हिंदू लोकांना श्रुती व स्मृती या दोन्ही पवित्र वाटत असल्या, तरी श्रुती स्मृतींपेक्षा अधिक पवित्र वाटतात. काही पदार्थ कायमचे पवित्र असतात, तर काही पदार्थांना विशिष्ट संदर्भात वा अवस्थेतच पवित्र मानले जाते. पवित्र शक्तींना प्रसन्न करण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. पवित्र वस्तूंभोवती एक प्रकारचे गूढ, रहस्यमय वलय निर्माण केलेले असते. लौकिक विश्वातील लोकांना त्या वस्तूंविषयी अज्ञानात ठेवले जाते. ग्रीक साहित्यात पवित्रतेचे दैवतीकरण केल्याचे उदाहरण आढळते. सर्वसामान्य लोकांना पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश निषिद्ध असल्यामुळे कित्येकदा गुन्हेगार लोक अशा स्थानी आश्रय घेत. चोरलेल्या वस्तू अथवा प्राणी तेथे नेऊन ठेवले जात. त्यांना आणण्यासाठी इतरांना तेथे जाता येत नसल्यामुळे त्यांना संरक्षण लाभत असे. सेमिटिक लोकांत अशा घटना घडल्याचे आढळते. परंतु हिब्रू लोकांनी या प्रथेत बदल करून गुन्हेगारांना पवित्र ठिकाणीही पकडण्याचा कायदा केला.
पावित्र्याची कल्पना सर्व काळांत, देशांत व धर्मांत आढळत असली, तरी कोणत्या पदार्थांना पवित्र मानावयाचे याविषयी बहुधा भिन्नभिन्न कल्पना असतात. किंबहुना एका जनसमुहाला पवित्र वाटणारा पदार्थ दुसऱ्या जनसमूहाला लौकिक वाटण्याची शक्यताच जास्त असते. उदा., हिदूंना गाय पवित्र वाटते त्यांना गोमांसभक्षण निषिद्ध असते. याउलट, मुसलमान व ख्रिस्ती लोकांना गाय ही लौकिक वाटते म्हणून तिचे मांस खाणे निषिद्ध नाही. ⇨ देवक पदार्थांच्या बाबतीत तर ही गोष्ट स्पष्टपणे दृग्गोचर होते. एखाद्या कुलाला एखादा पदार्थ देवक म्हणून पवित्र वाटतो. पवित्रतेच्या कल्पनेमुळेच अन्न, स्त्रिया, उपयुक्त वस्तू इत्यादींच्या प्राप्तीसाठी एक कुल दुसऱ्या कुलावर अवलंबून असते. जटा, मुंडन, वस्त्रे इत्यादींद्वारे येणाऱ्या बाह्य पवित्रतेपेक्षा सत्यादी सद्गुणांनी येणारी पवित्रता श्रेष्ठ होय, असे उच्च धर्म तत्त्वतः मानतात. म्हणूनच पाण्यामुळे व्यक्ती पवित्र बनत असती, तर मासेही पवित्र बनले असते, असे बौद्ध म्हणतात.
कोणत्या पदार्थाला पवित्र मानावे या बाबतीत जितकी मतभिन्नता दिसते, तितकी अपवित्र पदार्थांच्या बाबतींत दिसत नाही. अनेकदा अपवित्र पदार्थ अस्वच्छतेशी निगडित असतो, हे त्याचे कारण असावे. सामान्यतः सर्वच लोक प्रेत, रजस्वला स्त्री, राक्षस, पिशाच, संभोगादी कृत्ये, अमावास्या, डावा पाय, डावा हात इ. गोष्टींना अपवित्र मानतात. अपवित्र पदार्थांमध्ये मृत्यू, रोग, साथी, अव्यवस्था, गुन्हे इ. विनाशक आणि नकारात्मक शक्ती एकत्रित झालेल्या असतात. डावखोरा माणूस हा जादूटोणा करणारा, असुराने पछाडलेला व म्हणून अपवित्र असतो, असे मानण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते. काही ख्रिस्ती संतांनी बालपणी आपल्या आईचा डावा स्तन पिण्यास नकार दिल्याच्या कथा सांगितल्या जातात. पवित्र पदार्थाप्रमाणेच अपवित्र पदार्थाची भीती वाटते पण त्याच्याविषयी पूज्यभाव वाटत नसतो. धार्मिक विधी आणि गोमूत्र, गोमय, रक्त, पाणी, अग्नी इ. पदार्थांमुळे अपवित्रता दूर करता येते, असे मानतात. अपवित्राला पवित्र बनविण्याचे सामर्थ्य मंत्र, कर्मकांड यांना वा धर्मगुरू, शामान इत्यादिकांना असते, असेही मानले जाते.
जगातील सर्वच वस्तू पवित्र मानणे शक्य नाही किंवा जगातील वस्तूंचे पवित्र व अपवित्र असे फक्त दोनच वर्गही मानता येत नाहीत. कारण, तसे मानल्यास लोकांच्या सामान्य व्यवहारासाठी वस्तूच उरणार नाहीत व सगळी समाजव्यवस्था कोलमडून पडेल. म्हणून व्यवहारोपयोगी अशा लौकिक वस्तूंचा एक स्वतंत्र वर्ग मानलेला असतो. ज्यात पवित्र्य नाही असा लौकिक पदार्थ उपद्रवकारक मानला जात नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे त्याची भीती वाटत नाही, त्याप्रमाणेच त्याच्याविषयी पूज्यभावही वाटत नाही. त्याच्याविषयी फारसे निषेध निर्माण होत नसतात. मात्र त्या लौकिक वस्तूवर पवित्र वा अपवित्र वस्तूचा प्रभाव पडलेला असतो. पाणी पिणे, फळे खाणे हे लौकिक कृत्य निषिद्ध नव्हे, परंतु हेच कृत्य एखाद्या पवित्र वा अपवित्र पदार्थाशी संबद्ध असल्यास निषिद्ध ठरते. लौकिक विश्वाच्या अशा निस्तेज अस्तिवाला चैतन्य, नित्यनूतनत्व आणि सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी पवित्र वस्तूच्या पावित्र्याची गरज असते. लौकिक पदार्थ हे प्रारंभी हीन मानले जात नसत परंतु पवित्र पदार्थांचे माहात्म्य वाढल्यामुळे लौकिक पदार्थांनाही हीन व तिरस्कृत मानून अपवित्राच्या वर्गात ढकलण्याचे प्रयत्न झाले. इंग्रजीतील ‘प्रोफेन’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘उपयोगासाठी ठेवलेला’ म्हणजे ‘लौकिक’ पदार्थ असा होता परंतु नंतर तो शब्द ‘अपवित्र’,‘भ्रष्ट’ इ. अर्थानीही वापरला जाऊ लागला.
पदार्थांची पवित्रापवित्र आणि लौकिक ही विभागणी व्यक्तीच्या आत्मिक विकासासाठी उपयुक्त असल्यामुळे धर्माच्या क्षेत्रात देवकल्पनेप्रमाणेच ती महत्त्वाची असते. परंतु या विभागणीमुळे व्यक्तिव्यक्तींमध्ये भेद निर्माण होतात. कुणी श्रेष्ठ, तर कुणी कनिष्ठ अशी विषमता निर्माण होते. काही व्यक्तींना विशेष अधिकार प्राप्त हेतात, तर काही व्यक्तींचे हक्कहिरावून घेतले जातात. पुरोहित व सामान्य लोक यांना वेगळे करण्यासाठी कृत्रिम कर्मकांड येते. स्त्रियांवर बंधने येतात. देवाला काही वस्तू, स्थाने व व्यक्ती अधिक प्रिय, तर काही अप्रिय असे मानून संकुचितपणाला प्रोत्साहन दिले जाते. कित्येक वेळा सामान्य जनांची पिळवणूक होते अथवा त्यांच्या प्रगतीचा मार्ग कुंठित केला जातो. एकंदरीत पवित्रापवित्र विचारात बुद्धिनिष्ठेपेक्षा अंधश्रद्धेला महत्त्व येते.
संदर्भ:Caillois, Roger Trans. Barash, Meyer, Man and the Sacred, New York, 1960.
साळुंखे, आ.ह.
“