पवार, शरच्चंद्र गोविंदराव: (१२ डिसेंबर १९४०—). महाराष्ट्र राज्याचे सहावे मुख्यमंत्री व एक तडफदार राजकीय नेते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील काटेवाडी (बारमती तालुका) या लहान खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदाराव हे सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या मातोश्री शारदाबाई पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांना लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याचे बाळकडू लाभले. त्यांचे शालेय शिक्षण काटेवाडी – बारामती येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. विद्यार्थिदशेपासून ते राजकीय कार्याकडे आकृष्ट झाले. यूथ काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर यूनेस्कोच्या निमंत्रणावरून त्यांनी युरोप–अमेरिका–जपान यांचा दौरा केला आणि कैरो व टोकिओ येथील आंतरराष्ट्रीय युवा परिषदांस ते उपस्थित राहिले. या दौऱ्यात त्यांनी त्या देशांतील अनेक प्रकल्पांना भेटी दिल्या व विशेषतः तेथील युवक वर्गाच्या राष्ट्रीय कार्यातील सहभागाचे निरीक्षण केले. युवक चळवळीतील त्यांचे कार्य प्रभावी ठरल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रकाशन विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. यशवंतराव चव्हाणांशी त्यांचा उत्तरोत्तर संबंध वाढत राहिला. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते काँग्रेस पक्षातर्फे बारामती मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. त्या वेळेपासून १९७८ च्या निवडणुकीपर्यंतच्या सर्व निवडणुकांत ते तेथून निवडून आले आहेत. बारामती तालुक्याचा अर्धा भाग पाटाच्या पाण्याखाली येतो व अर्धा भाग निर्जल, नापिकी व दुष्काळी आहे. गेल्या १०-११ वर्षात त्यां नी १२५ पेक्षा अधिक पाझर तलाव निर्माण करून तेथील शेतजमीन सुधारली. अत्यंत हलाखीत राहणाऱ्या व काबाडकष्टाने कसेबसे जीवन कंठणाऱ्या तेथील जनतेला त्यामुळे हुरूप आला. काही दिवस ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सचिव होते याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व काँग्रेस फोरम फॉर सोशॉलिस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात प्रथम त्यांचा राज्यमंत्री म्हणून १९७२ मध्ये शिरकाव झाला. १९७४ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला. त्या वेळी शिक्षण व युवा कल्याण ही खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर पुन्हा १९७६ मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल झाले आणि त्यांच्याकडे कृषा खाते आले. १९७७ मध्ये वसंतराव पाटील मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांकडे गृहखाते आले. १९७८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वसंतराव पाटलांच्या नेतृत्वाखालील संयुक्त मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उद्योग व श्रम ही खाती सोपविण्यात आली.
या मंत्रिमंडळातून शरद पवार इतर चार मंत्र्यांसह राजीनामे देऊन बाहेर पडले (१२ जुलै १९७८). या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने इंदिरा काँग्रेस व जनता पक्ष यांच्याशी महाराष्ट्र काँग्रेसने युती न करता विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असा निर्णय घेतला ( १६ जुलै १९७८ ). त्यानुसार १७ जुलैला वसंतराव पाटलांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. शरद पवारांनी आपल्या अनुयायांसह जनता, शे. का. व इतर मित्रपक्ष यांच्या साहाय्याने नवे मंत्रिमंडळ बनविले (१८ जुलै १९७८). देशात हुकूमशाही प्रवृत्तीचा धोका असून त्यासाठी लोकशाहीवादी पक्षांशी युती करणे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, अशी भूमिका शरद पवारांनी स्वतःच मांडली आहे. शरद पवारांचे राजकीय व्यक्तिमत्व व कर्तृत्व हे यशवंतराव चव्हाणांच्या प्रभावाखाली घडले, असे म्हटले जाते. ते पुरोगामी विचारसरणीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचे संघटनात्मक कौशल्य व प्रशासकीय कार्यक्षमता उल्लेखनीय ऐहे. ते महाराष्ट्रातील सर्वांत लहान वयाचे मुख्यमंत्री ठरतात.
शरद पवारांनी महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्रातील अनेक संघटनांतून विविध पदांवर काम केले आहे. ॲमच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे तसेच आशियाई कबड्डी संघटनेचेही ते अध्यक्ष आहेत. ते अत्यंत क्रीडाप्रेमी असून महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्र विकसित करण्यात त्यांना विशेष आस्था आहे. त्यांची वृत्तीही अभ्यासू कार्यकर्त्याची आहे. त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. त्यांत सर्व स्तरांतील लोक आहेत. सदू शिंदे या प्रसिद्ध कसोटी क्रिकेटपटूच्या प्रतिभा या कन्येशी त्यांचा विवाह झालेला असून त्यांना सुप्रिया नावाची एक मुलगी आहे. क्रीडाक्षेत्राबरोबरच शिक्षण, शेतीसुधारणा, आरोग्यविषयक संस्थाही ते चालवितात. या संस्थांद्वारे एक इंग्रजी माध्यमाची शाळा व मुलामुलींसाठी वसतिगृहे चालवून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. शेतीसंस्थेमार्फत शेतीसंशोधन, विस्तार, पशुसंवर्धन इ. सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आरोग्यविषयक संस्थेमार्फत ग्रामीण रुग्णांना आरोग्यसेवा व पुणे शहरात रुग्णालय चालविले जाते.
देशपांडे. सु. र.
“