परिरंभ: (लॅ. पेरिसायकल). वाहिनीवंत (वाहक घटकयुक्त) वनस्पतींच्या (नेचाभ पादप म्हणजे नेचाच्या स्वरूपाच्या वनस्पती व बीजी वनस्पती यांच्या) अक्षीय (खोड व मूळ) भागांतील वाहक ऊतक तंत्राच्या (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाच्या संस्थेच्या) भोवती [⟶रंभ] एक किंवा अनेक अवाहक कोशिकांचा थर आढळतो, त्याला परिरंभ म्हणतात. मूलतः या ऊतकाला ⇨ मध्य त्वचेच्या सर्वांत आतील ऊतक [⟶ अंतस्त्वचा] व ⇨ परिकाष्ठ या दोन्हीमधले ऊतक असे मानतात. मुळे आणि खालच्या दर्जाच्या वाहिनीवंत वनस्पतींच्या खोडात हे आढळते. तथापि उच्च वर्गीय वाहिनीवंत वनस्पतींत परिकाष्ठ व मध्यत्वचा यांच्यामध्ये हे आढळतेच असे नाही. काही फुलझाडांच्या खोडात याचा पूर्ण अभाव असतो, तर काही वनस्पतींच्या मुळांमध्ये हे ऊतक सलग नसून अंतस्त्वचेला जेथे रंभाच्या आदिपरिकाष्ठाचा भाग स्पर्श तेथे ते खंडित असते.परिरंभात मुख्यत: ⇨मृदूतक अधिक असते तथापि अनेकदा त्यात दृढ सूत्रे आढळतात व त्रिज्येच्या दिशेत एक किंवा अनेक थर आढळतात. अनेक खोडांतील आदिपरिकाष्ठाबाहेरच्या दृढसूत्र समूहाचा उगम परिरंभात नसून परिकाष्ठाच्या आरंभीच्या भागात असतो. मुळांमध्ये द्वितीयक वाढ असल्यास पहिल्या त्वक्षाकराचा [⟶ त्वक्षा] उगम या परिरंभात होतो. तसेच द्वितीयक वाढीच्या सुरुवातीस पहिल्याने ऊतककर येथेच तयार होतो. मुळावर येणारी बाजूची मुळे (उपमुळे) निर्माण करणारी ⇨विभज्या (सतत नवीन कोशिका व त्यांचे समूह बनविणारा भाग) परिरंभात बहुधा आदिप्रकाष्ठासमोर उगम पावते.

पहा: शारीर, वनस्पतींचे.

परांडेकर, शं. आ.