परळी – सज्जनगड : महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील समर्थ संप्रदायाचे पवित्र क्षेत्र. लोकसंख्या १,७५० (१९७१). सातारा शहराच्या नैऋत्येस सु. १० किमी. उरमोडी नदीच्या खोऱ्यात परळी गाव आहे. हे शिलाहारांच्या आधिपत्याखाली (अकरावे ते बारावे शतक) होते. येथील शिलाहारकालीन एक शिलालेख पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. येथील पाच हेमाडपंती मंदिरांपैकी महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचे नक्षीयुक्त स्तंभ व द्वारशाखा वैशिष्ट्यपूर्ण असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस कामशिल्पे आहेत. येथील दीपमाळ व इतस्ततः विखुरलेले वीरगळ लक्षवेधक आहेत.
गावापासून सु. १ किमी. अंतरावर सह्याद्रीच्या एका अलग फाट्यावर ३१८·५० मी. उंचीचा सज्जनगड असून त्याचा परिघ १,६६८ मी. आहे. गडाला सु. ७५० पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार आहे जवळजवळ तेथपर्यंत जीपरस्ताही तयार झाला आहे. साताऱ्याहून परळी-सज्जनगडास जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या मोटारगाड्यांची सोय आहे. किल्ल्यावर श्रीसमर्थ मठ असून, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेला पलंग, भांडी तसेच समर्थांची कुबडी, काठी, तसबीर इ. वस्तू ठेवलेल्या आहेत. गडावर श्रीराममंदिर व त्याच्या गाभाऱ्याखाली समर्थांची समाधी असून, परिसरात हनुमान व आंग्लाई यांची मंदिरे, भग्न मशीद व दोन तळी आहेत. माघ वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी (दासनवमी) पर्यंत येथे मोठी यात्रा भरते. शिवाय रामनवमीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गडावर यात्रेकरुंसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधली असून तेथे रामदासी सांप्रदायिकांची व इतर यात्रिकांची वस्ती असते.
हा किल्ला शिलाहार राजा पहिला भोज याने बांधला असावा तथापि येथील बहुतेक अवशेष आदिलशाही व मराठा अंमलांतील असून, येथे असलेल्या सतराव्या शतकातील दोन फार्सी लेखांत यास ‘किले परेली’ असे म्हटले आहे. १६७३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतल्यावर समर्थ रामदास येथे राहू लागले. रामदासांनी या किल्ल्यावर प्रमुख संतमंडळी बोलावून रामाचा मोठा उत्सव केला व या किल्ल्याचे सज्जनगड असे नाव ठेवले असे म्हणतात, तर काहींच्या मते शिवाजीने हे नाव ठेवले. समर्थांच्या निधनानंतर (१६८१) छत्रपती संभाजी राजांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी येथील राममंदिराचा विस्तार केला. या क्षेत्रस्थानास शिवाजी महाराजांनी वृत्ती करून दिल्या आहेत. समर्थ रामदासांच्या समाधीचे मुसलमानी रूप आहे. शाहूचे राज्य सुरू झाल्यापासून हा किल्ला सतत मराठी राज्यात मोडत होता.
कांबळे, य. रा.
“