परधान: मध्य प्रदेश राज्यातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती महाराष्ट्रातील विदर्भातही आढळते. १९७१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ३,९८५ होती. परधान, देसाई, पठारी, पनाल या नावांनीही ते ओळखले जातात. या प्रत्येक नावाची व्युत्पत्ती जमातीत सांगितली जाते. गोंडांच्या आश्रयाने व त्यांच्या आसपास हे राहतात. मूळ गोंड ज्या सात भावांपासून झाले, त्यांतल्या सातव्या भावाचे हे वंशज आहेत, असे गोंडी दंतकथा सांगते. गोंडांची ही एक गौण शाखा असून गोंडांचे हे राजघराण्यातले प्रधान, पुजारी व भाट आहेत. आंध्र, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व ओरिसा या ठिकाणी जिथे जिथे गोंड वस्ती आहे, तिथे तिथे काही परधानही आढळतात. यांचे रीतिरिवाज व कुळगोत्रे गोंडांप्रमाणेच आहेत धार्मिक विधींतील वस्तू व अंत्यसंस्काराच्या वेळेचे कपडे ते घेतात, म्हणून गोंड यांना कमी लेखतात. मध्य प्रदेशात यांना परगनिहा, देसाई अशीही बिरुदे आहेत. छत्तीसगढच्या बाजूला त्यांना ‘परधान पठारिया’ म्हणतात. बालाघाटाच्या बाजूला त्यांना ‘मोकाशी’ म्हणतात. गोंडांना रामराम करताना परधान त्यांना ‘बाबू जोहार’ असे म्हणतात पण गोंड परधानांना ‘जोहार पठारी’ असे म्हणतात. परधान किंगरी उर्फ एकतारी घेऊन तिच्यावर गोंडांची पुराणगीते गात असतात. गोंडांच्या वंशावळी व दैवतकथा यांच्याबद्दल तंतोतंत माहिती त्यांना असते. गोंडांच्या घरी जाऊन गाणी गाऊन ते देतील ती भीक घेऊन उदरनिर्वाह करणे, ही पूर्वपरंपरा असल्यामुळे परधान लोकांना गौणत्व आले आहे. जिथे लग्नसमारंभ व दुसरे काही कार्य असेल, तिथे त्यांना जावे लागते. त्यामुळे ते एका जागी स्थिर राहू शकत नाहीत. भटकत राहिल्यामुळे पुष्कळदा मिळेल त्याच्या हातचे अन्नही त्यांना भक्षण करावे लागते.
परधानांत राजपरधान, गोंडा परधान आणि थोटिया परधान असे तीन पोटभेद आहेत. राज गोंड पुरुष व परधान स्त्री यांच्यापासून झालेली संतती म्हणजे राजपरधान. पूर्वी बडा देवाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला ब्रह्मचर्य पाळावे लागे. एकदा पुजारी स्त्रीच्या नादी लागून पळाला. त्या देवाची पूजा करायला कोणी राहिले नाही. त्या वेळी एक किंगरी स्वर्गातून एका राजपरधानाच्या मांडीवर पडली. तेव्हापासून पुजाऱ्यांना लग्न करण्याची अनुज्ञा बडा ऊर्फ बुढा देवाने दिली. थोटिया ही परधानांची मूलतः अनौरस संतती आहे. गोंडा परधान म्हणजे गोंडा व परधानांची मिश्र संतती. याशिवाय चंद्रपूर भागात माडे ऊर्फ माडिया गोंड आहेत, तसेच माडे परधान आहेत. छत्तीसगढातल्या मैदानी भागातल्या परधानांना खलोटिया परधान म्हणतात. छिंदवाड्यात देवगढच्या परधानांना देवगढिया परधान म्हणतात. छत्तीसगढात उपाध्यायाचे काम करणारे जे परधान आहेत, त्यांना गैता म्हणतात. बांबू कापून बुरूडकाम करणाऱ्यांना काडेर असे नाव आहे. चंद्रपूरजवळ परधानांचे दोन भाग आहेत : गोंड-पठारी व चोर-पठारी. रायपूर भागात गोंड स्त्रियांना इतर जातींपासून झालेल्या संततीला पठारी म्हणतात.
मुले-मुली वयात आल्यानंतर विवाह होतात. लग्नात देज देण्याची प्रथा आहे. मुलाकडे देज देण्यास पैसे नसल्यास तो मुलीच्या घरी काम करतो. बहुतेक विवाह वडीलधाऱ्या व्यक्ती ठरवितात. वधूने काळ्या पोतीची माळ घातली की, ती पत्नी झाली असे समजतात.
परधानांत नवरामुलगा लग्नाच्या वेळी वधूच्या घरी जातो, त्या वेळी त्याच्या हातात खंजीर असतो आणि त्याने घोंगडी पांघरलेली असते. तिथे एक वर्तुळ काढलेले असते. त्याला तो पाच प्रदक्षिणा घालतो व वधूचा हात पकडतो. तिने मूठ घट्ट वळलेली असते, ती सोडवून तो तिच्या करंगळीत एक लोखंडाची अंगठी घालतो. नंतर आपला उजवा पाय तिच्या पायावर दाबून धरतो आणि हा लग्नविधी संपतो. त्यांच्यात घटस्फोटास मान्यता आहे तसेच सख्ख्या भावाची विधवा पत्नी धाकट्या दिराबरोबर लग्न करू शकते.
प्रेत पुरण्याची व जाळण्याची पद्धत त्यांच्यात रूढ आहे. अग्निदहनाचे विशिष्ट संस्कार असून ते मृताचा ज्येष्ठ मुलगा करतो. दहाव्या दिवशी स्त्रिया रक्षा गोळा करतात. सहा महिन्यानंतर किंवा वर्षाने श्राद्ध करतात. वर्षानंतर मृताच्या नावाने कुंडनामक एक विधी करतात.
संदर्भ :1. Russell, R. V. Hira Lal, Tribes and Castes of the Central Provinces of India, Vol. IV., Delhi, 1975.
भागवत, दुर्गा
“