पन्ना: मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे ठिकाण व पूर्वीच्या पन्ना संस्थानची राजधानी. हिऱ्यांच्या खाणीमुळे विशेष प्रसिद्ध. लोकसंख्या २२,३१६ (१९७१). हे रेव्याच्या पश्चिम वायव्येस सु. ११३ किमी. झांशी–सटाणा या मार्गावर झांशीच्या आग्नेयीस सु. १७७ किमी. स. स. पासून २४३·८ मी. उंचीवर वसले आहे. पूर्वी येथे गोंड लोकांची वस्ती होती, परंतु तेराव्या शतकात हे रेव्याच्या वाघेलांच्या ताब्यात गेले. १४९४ मध्ये यावर सिकंदर लोदीने आक्रमण केले होते. १५६३ मध्ये हे रामचंद्र देवाच्या व सतराव्या शतकात राजा छत्रसालच्या ताब्यात आले. १६७५ मध्ये राजा छत्रसालने येथे राजधानी केल्याने याचे महत्त्व वाढले. येथे नगरपालिका (१९२१) असून हे शेतमाल, लाकूड, विणलेले कापड यांचे व्यापारकेंद्र आहे. हातमागावर कापड- विणणे, हिरे साफ करणे व कापणे इ. उद्योगधंदे चालतात. येथे महाविद्यालय व अवदेश प्रतापसिंग विद्यापीठाशी संलग्न असलेली कायदेशाळा आहे. येथे अनेक मंदिरे असून त्यांमध्ये रुद्र प्रतापसिंगाने बांधलेले श्रीबलदेवजी मंदिर, हिंदु-मुसलमान असा भेदभाव न मानता त्यांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वामी प्राणनाथांची संगमरवरी दगडांची समाधी (१७९५) या वास्तू प्रेक्षणीय आहेत.

पवार. चं. ता.