पनामा कालवा: अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा व मध्य अमेरिकेतील पनामा संयोगभूमीवर पाणशिडीच्या तत्त्वावर बांधलेला हा कालवा १५ ऑगस्ट १९१४ रोजी जहाज वाहतुकीस खुला करण्यात आला. १५५० च्या सुमारास पोर्तुगीजांनी आणि नंतर स्पॅनिश दर्यावर्दीनी मांडलेली ही कालव्याची योजना तीन शतकांनी फलद्रूप झाली. १८४८ मध्ये कॅलिफोर्निया राज्यात सोन्याचा शोध लागल्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना या संयोगभूमीवरील कालव्याची आवश्यकता वाटू लागली. या दृष्टीने अमेरिकन कंपन्यांनी या संयोगभूमीवर १८५५ मध्ये लोहमार्ग पूर्ण केला. त्यानंतर या मार्गावरील वाहतुकीला महत्त्व प्राप्त होऊन कालव्याची निकड वाढली. परंतु मध्यंतरी १८६१ ते १८६५ अमेरिकेच्या अंतर्गत यादवीमुळे सुविख्यात फ्रेंच अभियंता लेसेप्स याने १८७९ मध्ये एक कंपनी काढून कालव्याचे हक्क कोलंबियाकडून मिळविले. तथापि स्थापत्यविषयक काही अडचणी, रोगराई, कुशल कामगारांची कमतरता यांमुळे १८८९ पर्यंत कालव्याच्या कामात अत्यल्प प्रगती झाली व एक नवीन पनामा कालवाकंपनी स्थापण्यात येऊन तिच्याकडे ४ कोटी डॉलरांना सर्व हक्क सुपूर्त करण्यात आले. त्यानंतर कोलंबिया व अमेरिका यांचे कराराबाबत एकमत न झाल्याने अमेरिकेने पनामातील बंडखोरीस उत्तेजन देऊन पनामा हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले व त्याच्याकडून पनामा कालव्यासाठी १६ किमी. रुंदीची पट्टी १ कोटी डॉलर व वार्षिक भाडे अडीच लक्ष डॉलर ठरवून १९०३ च्या करारान्वये कायम भाडेपट्ट्याने घेतली. या भागास पनामा कालवा विभाग म्हणतात. त्यावर अमेरिकेची अधिसत्ता आहे.
पनामा कालव्याच्या कामास प्रथम १९०४ मध्ये व नंतर १९०८ मध्ये सुरुवात होऊन ते १९१४ साली पूर्ण झाले. अटलांटिकमधील लिमॉन उपसागरापासून पॅसिफिकमधील पनामा उपसागरापर्यंत एकूण अंतर ८२ किमी. असून, त्यातील प्रत्यक्ष कालव्याचा भाग ५१· ५ किमी. चा व उरलेला भाग दोन्ही बाजूंच्या सागरी संपर्काचा आहे. या कालव्याच्या मध्यभागी चॅग्रेस नदीला धरण बांधून स.स. पासून २६ मी. पाण्याची पातळी ठेवणारे गाटून नावाचे एक विस्तीर्ण सरोवर निर्माण केले आहे. कॅरिबियन समुद्रापासून वेडीवाकडी वळणे घेत हा कालवा वायव्येकडून आग्नेयीकडे पॅसिफिक महासागराला मिळतो. क्रिस्तोबलपासून सु. १२ किमी. पर्यंत समुद्रसपाटीच्या मार्गानंतर तीन जलपाशांमध्ये पाणी भरून, जहाज २६ मी. उंच गाटून सरोवरात घेतले जाते. नंतर गाटून सरोवर व गेलर्ड खिंड मिळून ५२ किमी. अंतर गेल्यावर ते जहाज मीगेल येथील जलपाशाच्या मिरफ्लॉरिस या छोट्या सरोवरात १६ मी. पर्यंत उतरविले जाते. त्यानंतर दोन जलपाशांतून जहाज बॅल्बोआपाशी समुद्रसपाटीजवळ आणले जाते. याप्रमाणे उलटसुलट वाहतूक चालते. कालव्याच्या तळाशी रुंदी ३० मी. पासून ३०० मी. पर्यंत आहे. प्रत्यक्ष कालव्यातून जाण्यास जहाजास ८ तास व संपूर्ण क्षेत्रातून बाहेर पडण्यास १५ तास लागतात. जून १९७५ अखेरीस संपणाऱ्या एका वर्षात या कालव्यातून ६,७५० जहाजे अटलांटिककडून पॅसिफिककडे व ६,८५९ उलट दिशेने गेली व त्यांपासून १४·२ कोटी डॉलर जकात मिळाली. यांपैकी ३२·३ लक्ष डॉलर भाड्यापोटी पनामा सरकारला द्यावी लागली. या कालव्यासाठी अमेरिकेने आतापर्यंत पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
तेलवाहू, लढाऊ जहाजे, खनिजे तसेज अन्नधान्य नेणाऱ्या बोटी यांसारख्या प्रचंड जहाजांना या कालव्यातून जाता येत नाही. नेहमीच्या सागरगामी बोटी कालव्यातून सहज जाऊ शकतात. सर्व राष्ट्रांच्या सर्व प्रकारच्या जहाजांना हा कालवा वाहतुकीस खुला आहे. या कालव्यामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडून पश्चिम किनाऱ्यास जाण्यासाठी केप हॉर्नचा सु. १४,५०० किमी.चा वळसा वाचला. तसेच यूरोपकडून ऑस्ट्रेलियाकडे व पूर्व आशियाकडे जाण्याचा मार्ग ३,२०० किमी.नी कमी झाला, तर उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा आणि द. अमेरिकेचा पश्चिम किनारा यांतील अंतर ५,००० किमी.नी कमी झाले. यामुळे वेळ व इंधन यांत बचत होऊन पॅसिफिक महासागरातील बाजारपेठा जगाला सोयीच्या झाल्या.
आठल्ये, द. बा.