पतंगी: (हिं. पतंग क. पर्तंगा इं. लॉगवुड ट्री, कँपेची ट्री लॅ. हीमॅटॉक्सिलॉन कँपेचियानम कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-मिमोजॉइडी). सुमारे ९–१३ मी. उंच असलेल्या ह्या शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) व लहान काटेरी वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका (मेक्सिको) व वेस्ट इंडीज असून तो इतरत्र उष्ण प्रदेशात बागेतून व कुंपणाच्या कडेने शोभेकरिता लावतात. हीमॅटॉक्सिलॉन या वंशात एकूण तीन जाती असून पतंगी ही एकच जाती भारतात आणून लावलेली आढळते. याचे खोड खोबणीदार (पन्हळी) असून साल पिंगट व लहान तुकड्यांनी सोलून निघून जाते. पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त व पिसासारखी विभागलेली असून दलांची संख्या सम असते. पानांच्या बगलेत येणाऱ्या कणिश फुलोऱ्यावर लहान, सुवासिक व पिवळी फुले ऑक्टोबरात येतात पाकळ्या पाच केसरदले सुटी, सरळ व तळाशी केसाळ आणि एका किंजदलाची [⟶फूल] बनलेली, शिंबा (शेंग) सपाट, भाल्यासारखी व बिया १–३ असतात. नवीन लागवड बियांनी किंवा कलमांनी करता येते. १०–१२ वर्षांनंतर झाडाचा उपयोग करता येतो. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
पतंगीचे मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन व बहुधा गर्द रंगाचे लाकूड) फार उपयुक्त असते. टॅनीन आणि १०% हीमॅटॉक्सिलीन (C16H14O6·3H2O) या नावाच्या जांभळ्या व लालसर रंगद्रव्याकरिता ते प्रसिद्ध आहे. ते हरतऱ्हेच्या कापडांचे धागे, रेयॉन, नायलॉन, ताग, लोकर, कातडी इ. वस्तू रंगविण्यासाठी तसेच शाईच्या कारखान्यात वापरतात. जीवविज्ञानाच्या प्रयोगशाळेत ते सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केलेल्या कोशिकांच्या (पेशींच्या) किंवा ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांच्या) निरीक्षणाकरिता वापरले जाते उत्तम काळी शाई बनविण्यासाठी रंगद्रव्य वापरतात. लाकूड कठीण, टिकाऊ पण ठिसूळ असले, तरी त्याला चांगली झिलई करता येते. ते सजावटी सामान आणि कलात्मक वस्तू यांकरिता उपयुक्त असते. मध्यकाष्ठात रेझीन, क्वेर्सिटीन, बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) तेलाचा अंश, ऑक्झॅलिक व ॲसिटिक अम्ले इ. असतात. ह्या वनस्पतीचा काढा टॅनिनामुळे स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असून आमांश, अतिसार, अग्निमांद्य (भूक मंदावणे) व श्वेतप्रदर (पांढरी धुपणी ) या विकारांवर गुणकारी आहे. वेस्ट इंडीज व गियाना येथे ही वनस्पती औषधाकरिता वापरात आहे. रंगाकरिता ही वनस्पती फार पूर्वीपासून उपयोगात आहे. फुलांतील मध उत्तम प्रतीचा असतो.
परांडेकर, शं. आ.