पट्रॅस: ग्रीसमधील तिसऱ्या क्रमांकाचे व्यापारी शहर, बंदर व ॲकीया प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,१२,२२८ (१९७१). अथेन्सच्या पश्चिमेस सु. १७६ किमी. पेलोपनीससच्या वायव्येस पट्रॅसच्या आखातावर वसले आहे. ॲकीयन नेता पॅट्रिअस याच्या नावावरून या शहरास हे नाव पडले असावे. पेलोपनीशियन युद्धात अथेन्सच्या बाजूला होते नंतर ते ‘ॲकीयन संघा’ चे सभासद झाले (इ. स. पू. ३००). इ. स. पू. ३१ मधील ऑक्टियमच्या युद्धानंतर रोमन सम्राट ऑगस्टसने तेथे वसाहत स्थापिली. त्यानंतर ३०० वर्षे ते व्यापारी केंद्र होते. येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य सेंट अँड्रू यास येथेच सुळी देण्यात आले. आठव्या-नवव्या शतकांत येथे निर्वासितांचा लोंढा आला. बायझंटिन अंमलात पट्रॅस तलम वस्त्रांच्या उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध होते. पुढे ते व्हेनिशियनांच्या ताब्यात गेले (१४०८). नंतर त्याच्या अंमलासाठी व्हेनिशियन व तुर्क यांत स्पर्धा लागली. ग्रीसच्या स्वातंत्र्याची चळवळ येथेच सुरू झाली (१८२१). तुर्कांनी शहर सोडण्यापूर्वी जाळले (१८२८). ऑर्थडॉक्स चर्चचे पीठ १८९९ पासून येथे आहे. तत्पूर्वी शहराची नवीन आयताकार बांधणी करण्यात आली. हे लोहमार्गांनी कॉरिंथ, अथेन्स व कलामे या शहरांना जोडले असून येथे विमानतळही आहे. येथे कापड, कागद, मद्य यांच्या निर्मितीचे अनेक उद्योगधंदे असून ऑलिव्ह तेल, फळे, दारू, कमावलेली कातडी, बेदाणे, मनुका, तंबाखू यांची येथून निर्यात होते. येथील मध्ययुगीन किल्ला, सेंट अँड्रूचे चर्च, रोमन जलसेतू या प्राचीन वास्तू व विद्यापीठ आणि आलिशान निवासस्थाने प्रसिद्ध आहेत.
सावंत, प्र. रा.