पट्टिताश्म : (नाइस). हातनमुन्यात किंवा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता ज्याच्यात स्पष्ट अशी पट्टित (पट्टे असलेली) संरचना दिसते असा रूपांतरित (तापमान व दाब यांच्यातील बदलाचा परिणाम झालेला) खडक. सहज फुटणारा ⇨ सुभाजा हा रूपांतरित खडक व पट्टिताश्म यांच्यात स्पष्ट अशी रेषा आखता येत नसली, तरी सुभाजापेक्षा पट्टिताश्म भरडकणी असून पट्टिताश्मातील सुभाजन व ⇨ पाटन सुभाजातल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे (अखंड) निर्माण झालेले नसते. त्यामुळे पट्टिताश्म सुभाजाइतक्या सहजतेने फुटत नाही व याचे फुटलेले पृष्ठ सुभाजाच्या मानाने बरेच खडबडीत असते. पट्टिताश्म हा मध्यम ते भरडकणी पट्टित संरचनेचा तीव्र रूपांतरित खडक आहे. मूळ खडकाचे रासयानिक संघटन, रूपांतरणाची तीव्रता (दाब व तापमान यांतील फरकाचे मान) व खडकात खनिज समाविष्ट होणे आणि त्यातून बाहेर पडणे या घटकांमधील गुंतागुंतीच्या आंतरक्रियांनुसार पट्टिताश्माचे खनिज संघटन वैशिष्ट्यपूर्ण ठरत असते. मात्र साधारणपणे पट्टिताश्माचे रासायनिक संघटनेेे ⇨ ग्रॅनाइटाप्रमाणे असते. कारण ग्रॅनाइटांचे रूपांतरण होऊन तयार झालेले ग्रॅनाइट पट्टिताश्म हे सर्वसामान्यपणे आढळणारे पट्टिताश्म आहेत. ग्रॅनाइटात बहुधा क्वॉर्ट्झ व फेल्स्पार (ऑर्थोक्लेज) ही खनिजे विपुल प्रमाणात असतात. यांशिवाय पट्टिताश्मात क्लोराइट, अभ्रक, अँफिबोल, सिलिमनाइट, कायनाइट इ. खनिजे असतात. कधीकधी यांपैकी एखादे खनिज विपुल प्रमाणात असते व त्याचे नाव पट्टिताश्माला देतात उदा., कृष्णाभ्रकी वा हॉर्नब्लेंडी पट्टिताश्म.
पट्टिताश्मातील पट्टे क्षितिजसमांतर अथवा अगदी तिरपे असतात. पट्ट्यांची दिशा ही रूपांतरणाच्या वेळी असणाऱ्या दाबावर (प्रतिबलांवर) अवलंबून असते परंतु मूळ खडकांतूनही पट्टन येऊ शकते. एकाआड एक सुभाजा व कणमय पट्टे आल्याने पट्टिताश्मी संरचना तयार झालेली असते. हे पट्टे संघटन वा वयन (पोत) भिन्न असल्याने तयार झालेले असतात. म्हणजे पट्ट्यांतील खनिजांचे प्रमाण वा खनिजांच्या कणांचे आकारमान निरनिराळे असते. कृष्णाभ्रक, हॉर्नब्लेंड यांसारखी गडद रंगाची (मॅफिक) व पत्रित रचना निर्माण करू शकणारी खनिचे आणि क्वॉर्ट्झ, फेल्स्पार यांसारखी फिकट रंगाची (फेल्सिक) व कणमय खनिजे वेगळी होऊन पट्टिताश्मातील गडद व फिकट पट्टे तयार झालेले. असू शकतात. घटक खनिजे, रूपांतरणाची प्रक्रिया व मूळ खडक अथवा उत्पत्तीनुसार पट्टिताश्मांचे पुढील गट केले जातात.
(१) प्रथमिक : हे पट्टित संरचना असलेले पातालिक (खोल जागी तयार झालेले) अग्निज खडक असतात. स्फटिकीभवन सुरू झालेला दाट शिलारस घन होताना त्यातील प्रवाही हालचालींमुळे पट्टित संरचना तयार होते. कारण यातील चपट्या वा तंतुमय खनिजांची समांतर मांडणी झालेली असते. या पट्टिताश्माचे संघटन बहुधा ग्रॅनाइटासारखे असते. कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील ⟶ आर्कीयन खडकांचा बराच मोठा भाग अशा पट्टिताश्मांचा आहे उदा., आर्कीयन खडक असलेले आणि भूसंरचनेच्या दृष्टीने स्थिर अथवा अचल असणारे स्कँडिनेव्हिया, कॅनडा इ. प्रदेश. अशा प्रेदशांना ढाल क्षेत्रे म्हणतात.
(२) अंतःक्षेपित : अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) खडकांतील स्तरण पातळ्यांत वा पर्णनामाध्ये ग्रॅनाइटी द्रव्याचे अंतःक्षेपण होऊन मिश्र उत्पत्तीचा पट्टिताश्म तयार होतो. काही आर्कीयन ढाल क्षेत्रांतील अँफिबोलाइट वा हॉर्नेब्लेंड सुभाजांमध्ये असे अंतःक्षेपण झालेले आढळते. कधीकधी स्फटिकी सुभाजांतील समांतर प्रतलांत ग्रॅनाइटी द्रव्याचे अंतर्वेशन होऊन (घुसून) मिश्राश्म (मिग्मॅटाइट) नावाचे पट्टिताश्म तयार होतात.
(३) ऑर्थो-पट्टिताश्म : मूळच्या अग्निज खडकाचे गतिज रूपांतरण [ ⟶ रूपांतरित खडक] होऊन हे पट्टिताश्म तयार होतात.
(४) पॅरा-पट्टिताश्म : मूळच्या गाळाच्या खडकांचे रूपांतरण होऊन हे पट्टिताश्म निर्माण होतात. गाळाच्या खडकांतील निरनिराळ्या वयनाच्या व संघटनाच्या थरांचे रूपांतरणानंतर पट्टे तयार होतात. गिरजनन (जेथे पर्वत निर्माण होतो त्या) पट्ट्यात खोल जागी उच्च तापमान आणि दाबाने गाळाचे पुनर्स्फटिकीभवन होऊन असे पट्टिताश्म तयार होतात. कॉर्डिएराइट, कायनाइट, सिलिमनाइट ही या पट्टिताश्मांची खास खनिजे आहेत.
यांशिवाय डोळ्याप्रमाणे अथवा बदामाप्रमाणे दिसणरे क्वॉर्ट्झ व फेल्स्पार यांचे स्फटिक अभ्रकी पत्रांनी वेढले जातात. अशा प्रकारची भिंगाकार संरचना पट्टिताश्मात असल्यास त्याला ऑगेन पट्टिताश्म म्हणतात. तसेच दंडाच्या आकाराची खनिजे व खनिजांचे जुडगे (पायरोक्सीन, अँफिबोल) यांच्या लांब बाजू रूपांतरणाने समांतर होऊन पेन्सिल पट्टिताश्म तयार होतात.
रूपांतरित खडक जगभर विस्तृत पसलेले असून पट्टिताश्म हे त्यांपैकी प्रमुख खडक आहेत. काहींच्या मते भूकवचाचा झाकलेला बहुतेक भाग पट्टिताश्मांचा असावा. कँब्रियन-पूर्व काळातील शैलसमूहांत (उदा., आर्कीयन) व गिरिजनन पट्ट्यात (उदा., हिमालय) पट्टिताश्म आढळतात. भारतामध्ये विशेषतः तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, बंगाल, बिहार, ओरिसा इ. राज्यांत पट्टिताश्म आढळतात. त्यांपैकी घुमटी, बळ्ळारी, बंगाली, निलगिरी, दार्जिलिंग, द्वीपकल्पी, सालेम, चँपियन, बालाघाट, आर्काट इ. नावांनी ओळखले जाणारे पट्टिताश्म महत्त्वाचे आहेत [ ⟶ घुमटी पट्टिताश्म चँपियन पट्टिताश्म द्वीपकल्पी पट्टिताश्म बंगाली पट्टिताश्म बळ्ळारी पट्टिताश्म बुंदेलखंडी पट्टिताश्म]. महाराष्ट्रात चंद्रपूर व रत्नागिरी, तसेच थोड्या प्रमाणात भंडारा, नागपूर व नांदेड जिल्ह्यांत पट्टिताश्म आढळतात.
विविध प्रकारच्या बांधकामांसाठी पट्टिताश्मांचा उपयोग होतो उदा., राजस्थानातील काही देवालये.
ऑस्ट्रियातील एट्र्सगबिर्ग येथील धातुकांच्या (कच्च्या घातूच्या) शिरा ज्यांत आहेत त्या खडकासाठी नाइस (पट्टिताश्म) ही संज्ञा प्रथम तेथील खाणकामागारांनी वापरली. शिरेजवळील अशा खडकात बदल झालेले असल्याने कुजलेला व झिजलेला अशा अर्थाच्या स्लाव्होनिक शब्दावरून नाइस हे इंग्रजी नाव आलेले आहे.
पहा : रूपांतरित खडक सुभाजा.
ठाकूर, अ. ना.