पटनाइक, कालीचरण: (२३ डिसेंबर १९००– ). प्रसिद्ध ओडिया नाटककार, कवी व पत्रकार. जन्म कटक जिल्ह्यातील बारांब गावी. गया येथील बनवारी मिश्रा तसेच खुर्दा येथील बसुदेव महापात्र यांच्याजवळ संगीत, नृत्य व नाट्य या विषयांचे त्यांनी अध्ययन केले. संगीत, नाटक, दिग्दर्शन इ. विषयांत त्यांना प्रथमपासूनच विशेष रुची होती. १९२५ मध्ये त्यांनो ‘सखीगोपाल नाट्यसंघ’ नावाची संस्था स्थापन केली. ओरिसातील आद्य व्यावसायिक नाटकमंडळी स्थापन करण्याचे (१९३९) श्रेयही त्यांच्याकडे जाते. नाटकांतून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा प्रघातही त्यांनीच पाडला. ओडिया रंगभूमीच्या विकासात त्यांचे कार्य मोठे मानले जाते.
संगीत-नाटक अकादमीचे ते अधिछात्र (फेलो) होते (१९६८). कटक येथील उत्कल साहित्य समाजातर्फे ‘नाट्याचार्य’ आणि गजपती महाराजांतर्फे ‘कविचंद्र’ हे बहुमानाचे किताब त्यांना प्राप्त झाले. ओरिसा संगीत नाटक अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तसेच उत्कल विद्यापीठातील कला मंडळाचेही ते सभासद आहेत.
आतापर्यंत त्यांच्या पन्नासावर साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. गीतसंग्रह, नाटके, कथासंग्रह या प्रकारांतील त्यांची ही साहित्यनिर्मिती आहे. कला हांडिआ मेघ (१९१७), बउल बेणी (१९२०), चंद्रिका (१९५०), फुलरेणु (१९५१), गीत मंजरी (१९५३), शिशु खेळागीत (१९५३) इ. त्यांचे उल्लेखनीय गीतसंग्रह असून त्यांच्या कथांचा बनफूल हा एकमेव संग्रह प्रकाशित झालेला आहे.
त्यांच्या नाटकांची संख्या तिसावर आहे. त्यांची नाटके प्रायोगिक दृष्ट्या विशेष यशस्वी ठरली. १९४० ते १९५० च्या दरम्यान त्यांनी आपल्या व्यावसायिक नाटक मंडळीतर्फे अनेक नाटके रंगभूमीवार आणली. दुसऱ्या महायुद्धाच्या व १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील त्यांची नाटके विशेष गाजली. भात (१९४५) हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक. त्याचे शंभरावर प्रयोग झाले होते. त्यांची नाटके पौराणिक, राजकीय व सामाजिक अशा विविध विषयांवर आहेत. साहित्यिक दृष्ट्या मात्र समीक्षक त्यांच्या नाटकांचा दर्जा सामान्यच मानतात. ध्रुवनाटक (१९२०), किशोरचंद्रानन चंपू (दुसरी आवृ. १९४०), जयदेव (१९४६), रक्तमाटि (१९४७), बनमाला (१९५०) इ. त्यांची नाटके विशेष उल्लेखनीय होत.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)