पंप : लौकिक अर्थाने पाणी खालून वर काढण्याचे यांत्रिक साधन. सामान्य माणसाची पंपाची व्याख्या जरी या प्रकारची असली, तरी आधुनिक यांत्रिक उद्योगात व यांत्रिक अभियांत्रिकीत ही व्याख्या अगदीच अपुरी पडते. वाफक (बॉयलर) संभरण पंप, यंत्रातील प्रेरित वंगण व्यवस्थेतील पंप, (दाब) वर्धक पंप वा द्रवीय प्रेषण व्यवस्थेतील पंप यांसारखे पंपद्रव (पाणी) खालून वर उचलण्याचे कार्य करीत नाहीत किंवा फार तर अगदी थोड्याशा उंचीवरच नेतात. तसेच ते केवळ पाणीच नव्हे तर तेल, दूध, सांडपाणी इ. द्रवही हाताळतात. तेव्हा सर्व दृष्टींनी विचार करता पंपाची पुढीलप्रमाणे व्याख्या करणेच योग्य ठरेल. ‘कोणत्याही द्रववाहिनीत बसविलेले यंत्र जर त्याला बाहेरून मिळालेली ऊर्जा त्या द्रवाला प्रदान करीत असेल, तर ते यंत्र पंप होय’.

ज्याप्रमाणे विविध उद्योगांत द्रव हाताळावे लागतात त्याचप्रमाणे हवा व इतर औद्योगिक वायूंचीही हाताळणी करावी लागते. खाणीतून हवा खेळवावी लागते व त्यासाठी मोठाले पंखे वापरावे लागतात, काही ठिकाणी वस्तूंच्या परिवहनासाठी संपीडित (दाबयुक्त) हवेचा वापर करतात व काही ठिकाणी (उदा., वातचलित हत्यारात) खूप दाब दिलेली (संपीडित) हवाही वापरावी लागते. या गोष्टी साधण्यासाठी जी यंत्रे वापरली जातात ती एक प्रकाराचे पंपच असतात पण अशा यंत्राचा विचार येथे केलेला नाही [ ⇨ पंखा भाता वातचलित हत्यारे संपीडक].

आ. १. दक्षिण भारतातील टोपली पंपइतिहास : मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर पाणी आणण्याचा किंवा ते वाहून दूर नेण्याचा प्रश्न मानवाने विविध पद्धतींनी सोडविला. या कामासाठी प्रथम मानवी शक्तीचाच उपयोग होणे क्रमप्राप्त होते व तीच योजिली गेली. आ. १ मध्ये दाखविलेले टोपलीचे साधन शेतात अगदी थोड्या उंचीवर पाणी चढविण्यासाठी वापरीत. विहिरीतील पाणी काढण्यासाठी भांड्याला दोरी बांधून ते हाताने वर ओढीत. पाणी वाहून

नेण्यासाठी कावड किंवा नुसतीच भांडी वापरीत. पुढे यांत सुधारणा होऊन काही साधी लाकडी साधने वापरण्यास सुरुवात झाली. कोकणात शेतातील पन्हळीतील पाणी भाजीपाला वगैरेंच्या वाफ्यांना देण्यासाठी शेलन्याचा वापर होऊ लागला. सु. १२ ते १५ सेंमी. रूंद व १·५ सेंमी. जाड व ५० सेंमी. लांब अशी फळी घेऊन ती मध्यभागी थोडी अरुंद करतात व फळीला थोडा बाकही देतात. या फळीच्या दोन्ही कडांना २–२·५ सेंमी. उंचीच्या पट्ट्या लावल्या की. शेलने तयार होते. हे ओणव्याने वापरतात. विहिरीतील व नदीतील पाणी शेताला देण्यासाठी प्रथम ओक्ती किंवा होकटी (आ. २) अस्तित्वात आली (हे साधे व कार्यक्षम साधन जगात अनेक ठिकाणी वापरले जाते ईजिप्तमध्ये त्याला ‘शादूफ’ म्हणतात). नंतर विहीरीतून भांडे दोरीने वर काढण्यासाठी हातरहाट व जास्त प्रमाणात पाणी मिळण्यासाठी पायरहाट सुरू झाले. पुढे मानवी शक्तीऐवजी जनावराचा उपयोग करण्याची कल्पना आली आणि पायरहाटाचे बैलरहाटात (आ. ३) पर्यवसान झाले. मोटही प्रचारात आली. पुरातन काळी वापरात असलेल्या साधनांसारखी काही साधने भारतात अजूनही प्रचारात आहेत. बंगालमधील डोण, कोकणातील ओक्ती, दक्षिण भारतातील टोपली पंप ही याची काही उदाहरणे आहेत. तंत्रज्ञानात पुढारलेल्या परदेशांशी संबंध आल्यानंतर  भारतातही पंपांचा वापर सुरू झाला.

बादल्यांचा अखंड शृंखलेचा उपयोग करणारे ‘पर्शियन चक्र’ सुप्रसिद्ध असून यात आडव्या अक्षावर बसविलेल्या एका चक्रावरून बादल्यांची शृंखला सतत फिरत असते. हे चक्र फिरविण्यासाठी दंतचक्रांद्वारे जनावरांच्या शक्तीचा उपयोग करतात.

आ. 2. ओक्ती किंवा होकटीयूरोप खंड सांस्कृतिक दृष्ट्या पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत अगदी मागासलेले होते. मात्र पुरातन काळात आर्किमिडीज (इ. स. पू. सु. २८७–२१२) या ग्रीक शास्त्राज्ञांनी एक स्क्रू पंप तयार केला होता [ ⟶ आर्किमिडीज स्क्रू ]. यूरोपात सुरू झालेल्या यंत्रयुगाने तेथे फार झापाट्याने प्रगती झाली व तेथील तंत्रज्ञानाचा प्रसार भारतातही झाला. पंधराव्या शतकात विहिरीतील पाणी काढण्यासाठी लाकडी दट्ट्याचे पंप यूरोपात सर्वत्र वापरात होते. सोळाव्या व सतराव्या शतकांत पाणी वर खेचण्याचे कार्य कोणकोणत्या तेऱ्हेने करता येईल याचा प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ व व्यावहारिक यंत्रज्ञ विचार करीत होते, असे जी. ॲग्रिकोला  (१५५६) व ए. रॅमेली (१५८८) यां च्या  लेखनावरून दिसून येते. ॲग्रिकोला यांनी सोळाव्या शतकातील खाणीमघील पा णी उ प स ण्या च्या व इतर प्रकारच्या दट्ट्याच्या पंपांचे आपल्या De Re Metallicaया ग्रंथात सविस्तर वर्णन व उत्तम चित्रण केलेले होते. रॅमेली यांनी शंभराहून जास्त प्रकारच्या पंपाचे वर्णन केलेले होते. या काळातील प्रयत्‍नांतूनच वारा वा आ. ३ बैलरहाटपाणी यांवर अवलंबून नसलेल्या स्वक्रिय पंपाचे यशस्वीपणे कार्य करणाऱ्या टॉमस न्यूकोमेन यांच्या वाफ एंजिनाचा १७१२ मध्ये शोध लागला. याच काळात ⇨ द्रायुयामिकी या विषयात महत्त्वाचे संशोधन झाल्यामुळे समाधानकारक असे पंप तयार करणे अभियंत्यांना सुलभ झाले. अठराव्या शतकाच्या शेवटी पश्चाग्र (पुढे-मागे होणाऱ्या) गतीच्या दट्ट्याच्या पंपाची जागा (विशेषतः थोड्या उंचीवार पण मोठ्या प्रमाणावर पाणी चढविण्यासाठी) केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करून दाब वाढविणाऱ्या) पंपाने घेण्यास सुरुवात झाली. या पंपाची इंग्‍लंड व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत विशेष प्रगती झाली. १८१८ मध्ये अमेरिकेत प्रचारात आलेला मॅसॅचूसेट्स केंद्रोत्सारी पंप हा या संदर्भात महत्त्वाचा टप्पा गणला जातो. ब्लेक (१८३०), अँड्रूज (१८३९) व जॉन ग्वीन (१९४९) यांनी निरनिराळ्या अभिकल्पांचे (आराखड्यांचे) पंप तयार केले. ग्वीन यांच्या अभीकल्पानुसार तयार केलेला पिट्सबर्ग येथील पंपाचा व्यास ३·६ मी. होता. ब्रिटनमध्ये व्हाइट लॉ, जे. जी. ॲपोल्ड आणि हेन्री बेसेमर यांनी १८५१ साली भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनाच्या अगोदर १०–१५ वर्षे केंद्रोत्सारी पंपासंबंधी स्वतंत्रपणे संशोधन केले आणि या प्रदर्शनात ॲपोल्ड, बेसेमर व ग्वीन यांनी आपापले पंप चाचणीसाठी सादर केले होते. या चाचण्यांमुळे केंद्रोत्सारी पंपांचा अभिकल्प पुढील शंभर वर्षांकरिता प्रमाणभूत होण्यास मदत झाली.


वर्गीकरण : पंपांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी करावे लागते : (अ) संपर्क पंप व असंपर्क पंप, (आ) बाह्य शक्ती लागणारे व न लागणारे पंप. संपर्क पंपांच्या वर्गात यांत्रिक शक्ती वा मनुष्य बळ (हातपंप) वापरणारे निर्वात पंपासह सर्व पंप येतात, तर असंपर्क प्रकारचा एकच पंप असून तो म्हणजे ⇨ विद्युत् चुंबकीय पंप होय. (अ) वर्गातील सर्व पंपांना बाह्य ऊर्जेचा (यांत्रिक वा विद्युत) पुरवठा करावा लागतो पण अशी ऊर्जा न लागणाऱ्या पंपांचा प्रकारही आहे.

व्यवहारात जास्तीत जास्त वापरले जाणारे पंप संपर्क जातीचे असतात. यांचे वर्गीकरण पुढील प्रकारे करताता : (अ) स्पष्ट विस्थापन पंप, (आ) अस्पष्ट विस्थापन पंप, पहिल्या प्रकारात पुन्हा (१) पश्चाग्र गतीचे व (२) चक्रीय गतीचे असे दोन भाग पडतात. अ (२) मध्ये पंपाच्या काही भागांना पश्चाग्र गतीही दिलेली असते. (आ) वर्गातील पंप हे चक्रीय गतिक प्रकाराचे असतात. (अ) व (आ) मध्ये न मोडणारे असेही काही संकीर्ण प्रकार असून हवा उचल पंप हा या प्रकाराचे उदाहरण आहे.

स्पष्ट विस्थापन पंप : यांत्रिक रचनेच्या दृष्टीने याचे वर म्हटल्याप्रमाणे दोन प्रकार आहेत. पहिल्या रचनेत द्रवाला शक्ती प्रदान करणारा भाग सरळ रेषेत पुढे-मागे होतो, तर दुसरीत तो एका आसाभोवती चक्रीय गतीने फिरतो. पहिल्या प्रकारात सर्व तऱ्हांचे दट्ट्याचे व बुडक्याचे (लांब दट्ट्याचे) पंप येतात आणि दुसऱ्या प्रकारात दंतचक्रांचा पंप, पात्यांचा पंप व तत्सम रचनेच्या पंपाचा अंतर्भाव होतो.

आ.४.एकक्रिय पश्चाग्र गती पंप (१) सिलिंडर, (२) दट्ट्या, (३ अ) तळ झडप, (३ आ) चोषण झडप, (४) चोषण नळ, (५) चोषण हवापात्र, (८) प्रदान नळ.

पश्चाग्र गती पंप : याचे मुख्य भाग म्हणजे सिलिंडर, दट्ट्या व त्याचा दांडा किंवा बुडक्या, चोषण (वर ओढून घेण्याच्या क्रियेसाठी असणारा) व प्रदान नळ आणि त्यातील चोषण व प्रदान झडपा. आ. ४ मध्ये दाखविलेल्या या प्रकाराच्या पंपाला दोन्ही नळांना सिलिंडराच्या जवळ हवापात्रे जोडलेली आहेत. दट्ट्या उजवीकडे सरकू लागला की, सिलिंडरामध्ये हवेचा दाब कमी होत जातो. पाण्याच्या (द्रवाच्या) साठ्याच्या पृष्ठभागावरील हवेच्या दाबामुळे चोषण नळाच्या तळातील तळ झडप व वरील चोषण झडप या उघडून पाणी सिलिंडरात येऊ लागते. ही क्रिया दट्ट्या धावेच्या उजव्या टोकाला पोहोचेपर्यंत चालू राहते. दट्ट्या टोकाला पोहोचून डावीकडे सरकू लागताच चोषण झडप व तळ झडप या बंद होतात. प्रदान झडपेवरील पाण्याच्या किंवा हवेच्या दाबामुळे ती पूर्वी बंद असते व दट्ट्या डावीकडे सरकू लागल्याबरोबर पाण्यावर दाब पडून तो झडपेवरील दाबापेक्षा अधिक झाला की, ही प्रदान झडप उघडून नळातून पाण्याचे प्रदान होऊ लागते व ही धाव पुरी होईपर्यंत ते चालू राहते. दट्ट्या उजवीकडे पुन्हा सरकू लागताच प्रदान झडप बंद होते व चोषण नळातील झडपा उघडल्या जाऊन नवीन आवर्तनाला सुरुवात होते. दट्ट्याच्या चोषण होत नाही म्हणून या प्रकारच्या पंपाला एकक्रिय पंप म्हणतात.

या पंपाचे प्रदान अर्थातच अंतरित (मधे मधे थांबणारे) असते. प्रदान नळाला जोडलेल्या हवापात्रामुळे पाणी प्रदान धावेत प्रथम त्या पात्रात जाते व तेथील दाब पुरेसा वाढल्यावर नळातून ते सरकू लागते पण चोषण धावेत हेच पात्रात साठलेले पाणी प्रदान नळात शिरू लागते व अशा तर्‍हेने त्याचे प्रदान जवळजवळ अखंडित चालू राहते. चोषण नळाला लावलेल्या हवापात्रामुळे पंपाची व्यापीय (पाणी सिलिंडरात ओढण्यासंबंधीची) कार्यक्षमता सुधारते. या प्रकारच्या पंपांची एकूण कार्यक्षमता साधारण ५० ते ६०% असते. हा पंप एंजिनाने, विद्युत् चरित्राने (मोटरने) किंवा हातानेही चालविता येतो.

सिलिंडरच्या दोन्ही टोकांना चोषण व प्रदान नळ झडपांसहित जोडले की, याचाच द्विक्रिय पंप होतो. यात अर्थात दट्ट्याच्या प्रत्येक धावेत त्याच्या एका बाजूला चोषण व दुसऱ्या बाजूला प्रदान होऊन पाणी अव्याहत येते राहते.

या दोन्ही प्रकारच्या पंपांत एका आवर्तनात सतत बदलणाऱ्या दट्ट्याच्या गतीमुळे पाण्याचा दाब सतत बदलत असतो. पाण्याच्या दाबातील बदल दोहोंकडील नळांचा व्यास व लांबी यांवरही (घर्षण व निरूढी म्हणजे जडत्व यांमुळे) अवलंबून असतो. कधीकधी चोषण झडपेजवळ दाब इतका कमी होतो की, त्यामुळे नेहमीच्या तापमानातसुद्धा द्रवाचे बाष्पीभवन होऊ लागते व द्रवप्रवाह मध्येच खंडित होतो. हा त्रासही हवापात्रामुळे बराचसा टाळला जातो.

केंद्रोत्सारी पंपातील विलक्षण प्रगतीमुळे व त्यांची निगा राखणे पश्चाग्र गतीच्या पंपापेक्षा सोपे असल्याने पश्चाग्र गतीच्या पंपाचा वापर बराचसा कमी झाला आहे. तरीपण काही ठिकाणी त्यांचा वापर अपरिहार्य असतो. लहान व्यासाच्या नलिका कूपातून १५ ते १२५ मी. खोलीवरून द्रव वर काढण्यासाठी हे उपयुक्त ठरतात. या पद्धतीत प्रत्यक्ष पंप द्रवाच्या साठ्याच्या पृष्ठभागापासून जास्तीत जास्त ८ मी. उंचीवर बसवावा लागतो. पंपातून येणारा द्रव एकाला एक असे नळ जोडून वरपर्यंत आणतात. दट्ट्याचा दांडा या नळातून वरपर्यंत आणलेला असतो व चालक यंत्रणेला तेथे तो जोडलेला असतो.

पश्चाग्र गतीचे पंप : विशेष श्यान (दाट) पदार्थ, उदा., वितळलेले डांबर, अशुद्ध खनिज तेल, सर्व प्रकारची कार्बनी तेले वगैरे खेचण्याच्या कामी फार उपयुक्त होतात. या पंपात दट्ट्याऐवची बुडक्या वापरणे जास्त रूढ आहे.

आ. ५. पात्यांचा पंप : (१) दंडगोल स्थिर कवच, (२) फिरता रूळ, (३) पाते.चक्रीय गती पंप : पात्यांचा पंप : याची रचना व कार्यपद्धती ह्या आ. ५ वरून ध्यानात येतील. पंपाच्या दंडगोल कवचात एक आपल्या आसाभोवती फिरणारा रूळ बसविलेला असतो पण हा आतील रूळ कवचाच्या आतील परिघावर एका ठिकाणी सतत (रेषीय) स्पर्श करीत राहील  इतकी त्याची मध्यरेषा कवचाला विकेंद्री (वक्राच्या मध्यरेषेपासून दूर) ठेवलेली असते. आतील रुळाला अरीय दिशेने चौकोनी छेदाच्या लांबट खाचा असतात व त्यात जुळत्या छेदाची पाती ठेवतात. रूळ जेव्हा फिरतो तेव्हा ही पाती खाचांत स्प्रिंगांच्या मदतीने पुढे-मागे होतात. यात जेवढी पाती असतील तेवढे स्वतंत्र पंपच बनतात, असे म्हणता येईल. या पंपाला झडपांची आवश्यकता नसते. पंपाचे आकारमान सामान्यतः लहान असते व म्हणून मिळणाऱ्या द्रवाची राशीही लहान असते.

आ.६. पात्याचा हातपंप : (१) कवच, (२) चौकोनी खीळ, (३) पाते (४) विभाजक पडदा, (५ अ, आ) चोषण कक्ष, (६ अ, आ) चोषण झडपा, (७ अ, आ) प्रदान झडपा , (८) हस्तक

पात्यांच्या पंपाचा एक प्रकार घरगुती कामासाठी वापरात आहे. एखाद्या गावात नळयोजना असते पण पाण्याला पुरेसा दाब नसतो व पाणी पहिल्या मजल्यावरसुद्धा चढत नाही. अशा ठिकाणी हा पात्यांचा हातपंप (आ. ६) वापरतात. पंपाच्या चोषण तोंडाला नळयोजनेचा नळ जोडतात व या नळातील पाणी वरच्या मजल्याला मग सरळ देता येते. पंपाची रचना व कार्यपद्धती आकृतीवरून स्पष्ट होते.

पंपाचा आकार साधारण बंद पातेल्यासारखा असतो. पंपाच्या कवचात (१) एक मध्यवर्ती खीळ (२) असून तिच्यावर एक दुहेरी पाते (३) आहे. या पात्याखालील चोषण कक्षाचे योग्य तर्‍हेच्या पडद्यांनी (४) दोन भाग (५ अ, आ) केलेले असून प्रत्येक भागात एक चोषण झडप (६ , ) ठेवलेली आहे. तसेच पात्याच्या प्रत्येक भागात एक भोक असून त्यावर दाराच्या फळीसारख्या बिजागरीवर बसविलेल्या झडपा आहेत. याच प्रदान झडपा (७ अ, आ) होत. पंपाची खीळ पुढच्या झाकणाच्या बाहेर आणून तिच्यावर एक हस्तक (८) बसवितात. हस्तकाची मूठ हाताच्या मुंठीत पकडून हस्तक पुढे-मागे हालवला की, पंप चालू होतो. माणसाला हस्तक साधारण ६०° तून फिरविता येतो. आकृतीत हस्तक सव्य फिरत असून डावी प्रदान झडप बंद आहे. तिच्यातून पूर्वी वर आलेले पाणी प्रदान नळातून जात आहे. याच वेळी डावी चोषण झडप उघडून तीतून पाणी प्रदान झडपेच्या खाली येऊन साठत आहे. उजव्या बाजूला त्या प्रदान झडपेखाली पूर्वी साठलेले पाणी ती उघडून तिच्या वरच्या बाजूला येण्याच्या तयारीत आहे. हस्तक मागे जाताना ही (उजवी) प्रदान झडप बंद होऊन वर आलेले पाणी प्रदान नळातून ढकलले जाईल व तिच्या खाली नवे पाणी येऊन साठेल. हा पंप अर्थात द्विक्रिय प्रकाराचा आहे.


आ. ७. दंतचक्र पंप : ल - दात्याची लांबी.दंतचक्र पंप : (आ.७). या पंपाची रचना पात्यांच्या पंपापेक्षाही साधी असते. यात दोन लहान दंतचक्रे असतात व त्यांचे दाते साधे सरळ असून त्यांची संख्याही लहान ( ६ ते २०) असते. या दात्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शक्य तितके लांब करतात (आकृतीमध्ये दात्याच्या लांबीचे माप असे दर्शविले आहे). यातील चालक चक्र त्याच्या दंडावर चावीने बसवितात व दुसरे सुटे फिरते. जास्त दाब द्यावयाचा असल्यास दोन्ही चक्रे कवचाबाहेर निराळ्या दंतचक्रांनी जोडतात. चक्रांच्या भोवती योग्य आकाराचे कवच असते पण महत्त्वाचे म्हणजे, दात्यांची टोके व कवच यांमधील फट शक्य तितकी बारीक करणे जरूरीचे असते. या पंपाची कार्यपद्धती त्याच्या आकृतीवरून सहज समजू शकेल. दोन दात्यांमध्ये आलेला द्रव मागील दात्याने प्रत्यक्ष पुढे ढकलला जातो. कोणत्याही दोनदा त्यांमधील पोकळीचा स्वतंत्र पंप बनतो. पंप लहान असतो आणि प्रदानही थोडे असते. यातून मिळणाऱ्या द्रवाला १४० किग्रॅ./सेंमी. १ इतका दाब देता येतो. अर्थात या उच्च दाबासाठी पंपाचे अभिकल्पनही (आराखडा तयार करणेही) चांगले करावे लागते. दाब कमी असला, तर पंपाचे प्रदान ७५ लि. / से. पर्यंत असू शकते. असे पंप मुख्यतः वंगण तेल पुरवठ्यासाठी वापरतात.

आ. ८. स्कूर पंप : (१) स्कू घूर्णक, (२) दंतचक्रे.स्क्रू पंप : स्क्रूवरील नट फिरू न दिला, तर स्क्रू फिरविल्यावर तो स्क्रूच्या अक्षीय दिशेने सरकतो. याच तत्त्वावर आ. ८ मध्ये दाखविलेल्या स्क्रू पंपाची रचना केलेली आहे. पंपांत आलेला द्रव स्क्रूभोवती फिरू नये म्हणून त्याला अटक हवी. ही दुसऱ्या स्क्रूने करतात. स्क्रू हे पंपाचे घूर्णक (फिरणारे भाग) बनतात. त्यांना उजवे डावे आटे पाडतात व हे दोन्ही घूर्णक आपपल्या दंडगोल कवचात फिरतात. त्यांचे चालन आकृतीत दाखविल्याप्रमाणे दंतचक्रांनी होते. कवचाच्या मध्यातून द्रव आत शिरतो व दोन्ही टोकांकडून त्याचे चोषण होते. द्रवाचे प्रदानही कवचाच्या मध्यातूनच पण वरच्या बाजूने होते. डाव्या उजव्या आट्यांमुळे पंपावर अक्षीय जोर येत नाही. हा पंप जास्त श्यान द्रवांसाठी विशेष उपयुक्त असतो.

पडदा पंप : पश्चाग्र गतीच्या पंपातील दट्ट्या किंवा बुडक्या यांच्याऐवजी एक पडदा वापरात येतो आणि तसे केल्यास चल घटकांत ठेवावयास लागणारी अगदी लहान सूट (फट) टाळता येते आणि भरणपेटी व टोपण [ ⇨ झिरपबंदी]  यांची गरजही उरत नाही. म्हणून गढूळ, श्यान अपरदन (झीज) करणाऱ्या वगैरे प्रकारच्या द्रवांसाठी हा पंप उपयुक्त ठरतो. तसेच दट्ट्याच्या बाजूने होणारी द्रवाची गळती चालण्या सारखी नसेल तेथेही या प्रकारचा पंपच वापरतात. या प्रकारच्या पंपाचे विविध रचना प्रकार असून तो कसल्या कामासाठी वापरावयाचा आहे यावर तो प्रकार अवलंबून असतो. मोटारगाडीच्या पेट्रोल टाकीतून कारब्युरेटराला पेट्रोल देणे, इमारतींच्या खोल पायात जमणारे गढूळ पाणी उपसणे, मृत्तिका उद्योगातील मातकट द्रव हाताळणे अथवा रसायन उद्योगातील अम्ले किंवा क्षार (अल्कली) पंप करणे या कामासाठी असे पंप योजतात.

आ.९. मोटारगाडीचा पेट्रोल पडदा पंप : (१ अ, आ ) कवचाचे भाग, (२) पडदा (३) सळी, (४) पेट्रोल प्रवेशमार्ग, (५) चोषण झडप, (६) प्रदान झडप, (७) पेट्रोल प्रदान मार्ग, (८)तरफ, (९) कॅम, (१०) स्प्रिंग.पडदा पंपाचा एक प्रकार आ. ९ मध्ये दाखविला आहे. हा आकारमानाने लहान असून मोटारगाडीच्या टाकीतील पेट्रोल कारव्ब्यु रेटराला देण्यासाठी याचा वापर करतात. याचे चालन एंजिनाच्या कॅम दंडावरील एक स्वतंत्र कॅम [⇨ कॅम] व तरफ यांच्याद्वारा होते. आकृतीत दाखविल्याप्रमाणे पंपाचे कवच दोन भागांत असून त्यात मध्ये लवचिक आणि द्रवबंद कापडाचा पडदा पकडलेला असतो. कापडाचा लवचिकपणा व तसेच आयुष्य वाढावे म्हणून त्याला सभोवार एक-दोन चुण्या पाडलेल्या असतात. पडद्याला मध्यभागी एक सळीचा तुकडा लावलेला असतो. त्याचे दुसरे टोक वर उल्लेखिलेल्या तरफेने खाली खेचले जाते. कवचाला उजवीकडे चोषण मार्ग व डावीकडे प्रदान मार्ग जोडलेले आहेत. पडद्याला लावलेल्या सळीच्या खालच्या टोकात एक गाळा काडलेला असतो व त्यात तरफेचे टोक गेलेले असते. ते खाली जाताना पडदा ओढला जाऊन चोषण होते. याच वेळी स्प्रिंग दाबली जाते. सळीच्या दुसऱ्या धावेत स्प्रिंग तिला वर ढकलत असते व या वेळी पेट्रोलचे प्रदान होत राहते. स्प्रिंगेच्या दाबाने प्रदान धाव घडविल्यामुळे पेट्रोलाच्या मार्गात कधीही स्प्रिंगेच्या दाबापेक्षा जास्त दाब निर्माण होत नाही.

वरील चक्रीय व पडदा स्पष्ट विस्थापन पंप दिसण्यात लहान व रचनेत साधे असले, तरी आधुनिक प्रगत व गुंतागुतीच्या यंत्रासाठी हे फार उपयुक्त ठरले आहेत. मोठाले स्वयंचलित लेथ किंवा दाबयंत्रे यांतील निरनिराळ्या क्रिया घडविण्यासाठी वाफकाच्या ज्वालकाला करावयाचा तेल इंधन पुरवठा, तसेच मोठ्या जेट विमानाला लागणारा इंधन पुरवठा यांसाठी अशा तऱ्हेचे पंप वापरले जातात.


आ.१०. चक्रीय गतिक पंपाच्या नोदकांच्या जाती : (अ) अरीय प्रवाही, (आ)मिश्र प्रवाही, (इ) अक्षीय प्रवाही. अस्पष्ट विस्थापन पंप : या प्रकारच्या पंपांना ‘चक्रीय गतिक (रोटोडायनॅमिक) पंप’ असेही सामान्य प्रचारातले नाव आहे. केंद्रोत्सारी पंप याच वर्गात मोडतो. केंद्रोत्सारी पंप अरीय प्रवाहाचा असून चक्रीय गतिक प्रकारातील आणाखी प्रकार म्हणजे अर्ध-अक्षीय, मिश्र किंवा स्क्रू पंप (वर वर्णिलेला नव्हे) व अक्षीय प्रवाही किंवा प्रचालक पंप होत. या तीन प्रकारांच्या पंपांच्या नोदकांतील (फिरत्या भागांतील, पंख्यांतील) फरक आ. १० वरून दिसून येतो. या प्रकाराच्या पंपांच्या काऱ्यामागील तत्त्व स्पष्ट विस्थापन प्रकारच्या पंपांच्या आधारभूत तत्त्वापेक्षा अगदी निराळे आहे. स्पष्ट विस्थापन प्रकारच्या पश्चाग्र किंवा चक्रीय गतीच्याही पंपात त्यातील चल घटक (दट्ट्या) पंपातील पाण्याला आपल्या बरोबर पुढे रेटतो पण चक्रीय गतिक पंपात तसे काही घडत नाही. नळमार्गात चल घटक मध्येच घातला, तर त्याच्यामुळे केवळ द्रवाच्या दाबात वाढ केली जाते आणि या वाढीमुळेच पाणी पुढे सरकते. या गोष्टीमुळे या पंपांच्या प्रदानाच्या राशीचे (पाण्याच्या वेगाचे, कारण नळाचे आकारमान कायमच असते) मान नुसत्या पंपाचे आकारमान व धावांची संख्या यांवरच अवलंबून न राहता पाण्याच्या गतीला पुढे होणाऱ्या रोधावरही अवलंबून राहते. जलवाहिनीत जेथे हे पंप बसविलेले असतील तेथे जलीय ढाळाची उंची एकदम वाढविण्याचे तेवढे कार्य हे पंप करतात (जलीय ढाळ म्हणजे जलवाहिनीतील स्थैतिक दाब दाखविणारा वक्र वाहिनीच्या अक्षावरील एखाद्या बिंदूपासून वक्रापर्यंतचा लंब तेथील दाबाच्या प्रमाणात असतो).

आ.११. साधा केंद्रोत्सारी पंप : (१) कवच, (२) दंड (३) नोदक (पात्यांसहीत), (४)नोदकाच्या सभोवतालच्या कवचातील पोकळ, (५) चालक यंत्राशी (एंजिनाशी वा विद्युत् चलित्राशी) जोडणी, (६) दंडाचे गोलक धारवे, (७)भरणपेटी व टोपण, (८) पंपाची बैठक, (९) पाणी पंपात येण्याचे तोंड (चोषण नळ), (१०) पाणी बोहेर जाण्याचे तोंड.

केंद्रोत्सारी पंप : सर्व तऱ्हांच्या पंपांत या प्रकारच्या पंपांचा वापर सर्वाधिक आहे. सुरुवातीच्या काळात या पंपाकडे तंत्रज्ञ थोडे साशंकतेने पाहत असत, पण या पंपावर इतके संशोधन झाले की, तो आता कोणत्याही. प्रकारच्या कामासाठी चालू शकतो वा त्या कामाला योग्य असे त्याचे अभिकल्पन करता येते. याचा वापर सांप्रत शेती व्यवसायापासून तो अणुऊर्जानिर्मितीसारख्या अत्यंत प्रगत उद्योगापर्यंत केला जात आहे. पश्चाग्र गती पंपाच्या मानाने याची रचना सोपी असते याला चोषण नळातील तळ झडपेशिवाय इतर झडपांची आवश्यकता नसते पण बनावट मात्र जरा अवघड असते.

रचना व भाग : या पंपाची रचना व तो दिसायला कसा असतो याची कल्पना आ. ११ मध्ये दाखविलेल्या अगदी साध्या प्रकारच्या पंपाच्या रेखाचित्रावरून येईल. पंपाचा कार्यकारी व मुख्य भाग म्हणजे त्याच्या दंडावर बसविलेला व त्याबरोबर फिरणारा नोदक होय. याला वक्र पाती असतात व त्यांच्यामधून जाताना पाण्याला (द्रवाला) वेग दिला जातो. या नोदकाच्या सभोवार एक कवच असते. पंख्याच्या मध्य भागांशी अक्षीय दिशेत येईल अशा तऱ्हेने चोषण नळ कवचाला जोडलेला असतो. प्रदान नळ कवचाच्या परिधापासून स्पर्शरेषेच्या दिशेने निघतो. याशिवाय पंपाला जरूरीप्रमाणे धारवे (फिरता दंड योग्य ठिकाणी रहावा याकरिता त्याला देण्यात येणारे आधार बेअरिंग), दंड फिरताना हवाबंदीसाठी भरणपेटी व टोपण, चालक यंत्राच्या दंडाला पंपदंड जोडण्यासाठी युग्मक वगैरे भागही लागतात. वापराच्या सोयीच्या दृष्टीने चोषण नळाच्या पाण्यातील टोकाशी तळ झडप व प्रदान नळात कवच्याच्या जवळच एक साधी बंदी झडप ठेवतात. पंपाच्या कवचाला अगदी वरच्या ठिकाणी एक भोक पाडून त्याला एक नसराळे (फनेल) लावतात. पंप चालू करताना जरूर पडल्यास त्यात पाणी भरण्यासाठी हे नसराळे लागते. या नसराळ्याच्या नळीला ती बंद करण्यासाठी एक चावीही असते. तसेच कवचाला हवा जाण्यासाठी एक बंद करता येण्यासारखे भोकही असते.

कार्यपद्धती : प्रथम पंपातील सर्व पोकळी आणि पंपाला जोडलेला चोषण नळ पाण्याने भरलेले आहेत असे समजू. पंप चालू करताच नोदक फिरू लागला की, पात्यांच्या मधील जागेतील पाण्याला पाती ऊर्जा प्रदान करतात आणि त्यामुळे पाण्याला प्रेरित आवर्ताची (गोल फिरण्यास लावण्याची) गती मिळून त्यावर गतिक दाब येतो. या दाब वृद्धीमुळे ते नोदकाच्या परिघाकडे वेगाने सरकू लागते आणि त्याच्या पूर्वीच्या जागीचा दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा बराच कमी होतो. या दाबन्यूनतेमुळे चोषण नळातील पाणी नोदकाच्या तोंडातून आत येते व त्यालाही पुन्हा प्रेरित आवर्त गती मिळून ते पुढे सरकते आणि अशा रीतीने पाणी वर खेचण्याचे कार्य चालू राहते.

सुरुवातीलाच पंप पाण्याने (खेचावयाच्या द्रवाने) भरलेला आहे, असे समजावे लागले याचे कारण म्हणजे नोदकाच्या फिरण्याने उत्पन्न होणाऱ्या प्रेरित आवर्त गतीने होणारी दाबवृद्धी ही पंपात असलेल्या पदार्थाच्या घनतेच्या सम प्रमाणात असते. जर पंपात हवाच असेल, तर हा वाढलेला दाब व त्यामुळे नोदकाच्या तोंडाशी होणारी दाबन्यूनता पाण्याच्या घनतेच्या मानाने अगदी अल्पच ठरते व त्यामुळे पाणी वर येऊ शकत नाही. म्हणून पंप कार्यप्रवण होण्यासाठी तो पंप करावयाच्या पदार्थानेच भरलेला असावा लागतो. पंपात नसराळ्याने पाणी भरीत असता एका निराळ्या भोकातून हवा बाहेर पडत असते. भोकातून पाणी येऊ लागले की, नसराळ्याची चावी आणि हे भोकही बंद करतात. मोठ्या पंपातील हवा काढून टाकण्यासाठी एक स्वतंत्र उत्क्षेपक (हवा बाहेर काढण्याचे साधन) वापरतात.


प्रकार : निरनिराळ्या उद्योगांत वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी केंद्रोत्सारी पंप वापरताना त्यांच्या रचनेत आपोआपच वैचित्र्य व विविधता आली. यामुळे त्याचे निरनिराळे प्रकार झाले आहोत. त्यांतील मुख्य पुढीलप्रमाणे आहेत : (१) आडव्या किंवा उभ्या दंडाचे, (२) एक द्वारी किंवा द्विद्वारी चोषण पद्धतीचे, (३) क्षैतिज विभाजित किंवा लंब विभाजित कवचाचे, (४) शंक्वाकृती कवचाचे किंवा परिपात्यांचे (नोदकाभोवतीच्या स्थिर पात्यांचे) व (५) एकपदी किंवा बहुपदी.

(१) सामान्य वापरातील पंपाचा दंड बहुतेक आडवा ठेवतात एण विशिष्ट ठिकाणी तो उभा ठेवावा लागतो. उदा., नलिका कूपातील पंप.

आ.१२. परिपात्यांचा (विसरण पात्यांचा) किंवा टरबाइन पंप : (१) कवच, (२) दंड, (३) नोदक, (४) परिपाती, (५) प्रदान.

(२) आ. ११ मघील पंपाचे चोषण त्याच्या एकाच बाजूने होते. द्विद्वारी पंपात ते दोन्ही बाजूंनी होण्याची सोय असते. पहिल्या प्रकारात नोदकाच्या दोन्ही बाजूंकडील दाबात फरक असतो व दंडावर प्रदान दाब–चोषण दाब या दाबांतराने उत्पन्न होणारी प्रेरणा अक्षीय दिशेने येते. द्विद्वारी पंपात ही प्रेरणा टाळली जाते. द्विद्वारी पंप हे सामान्यतः कमी प्रदान शीर्ष (द्रव वर उचलण्याची उंची) आणि जास्त द्रव राशी अशा उद्देशासाठी वापरतात.

(३) साधारण मोठ्या पंपांचे कवच सोईसाठी दोन वा अधिक भागांत करतात. विभाजन पातळी उभी किंवा आडवी ठेवता येते. आडवी (साधारण दंडाची मध्य रेषा धरून) ठेवल्यास नळांची सोडवासोडव न करता नोदक उचलता येतो व पंपाच्या आतील इतर भागांचे निरीक्षण, निगा, दुरुस्ती इ. कामे करणे शक्य होते.

(४) चक्रीय गतिक तऱ्हेच्या सर्व प्रकारच्या पंपांत नोदकामुळे त्यातून जाणाऱ्या पाण्यात गतिक दाब उत्पन्न होतो असे वर म्हटले आहे. या दाबजननाबरोबरच पाण्याचा वेगही वाढतो. हा अपरिहार्यतेने मिळणारा वेग पुढे अनावश्यक व अनिष्ट ठरत असल्यामुळे नोदकाच्या व कवचाच्या अभिकल्पात तो शक्य तितका कमी करण्याचे, वेग ऊर्जेचे दाब उर्जेत रूपांतर करण्याचे उपाय योजतात. पहिला उपाय म्हणजे नोदकाची पाती फिरण्याच्या उलट दिशेला शक्य तितकी वळवितात. पात्यांच्या टोकांचा नोदकाच्या परिघाच्या स्पर्शरेषेशी होणारा कोन सु. २०° होईपर्यंत असे वळण कार्यक्षमता वाढीच्या दृष्टीने फायदेशीर असते. असे करूनही नोदकावरून बाहेर पडणाऱ्या पाण्याला बराच वेग राहतो. पुढचा उपाय म्हणजे पंपाचे कवच शंक्वाकृती करून त्यात येणाऱ्या पाण्याचा वेग कमी करतात. शंक्वाकृती कवचाच्या ऐवजी किंवा त्याच्या जोडीलाही नोदकाच्या सभोवार पात्यांचा दुसरा संच (परिपाती) ठेवून (आ. १२) त्याद्वारा उमलती प्रोथे (निर्गम मार्ग) तयार करतात. या प्रोथांतून पाणी जाताना त्याचा वेग कमी होऊ़न दाब वाढतो. या प्रोथांतून पाणी समच्छेदाच्या अथवा शंक्वाकृती कवचात व तेथून प्रदान नळात जाते.

अशा रचनेच्या पंपांना टरबाइन पंप व या परिपात्यांना विसरण पाती असेही म्हणतात.

आ.१३. बहुपदी केंद्रोत्सारी पंप : (१) चोषण मार्ग, (२) दंड, (३) नोदक, (४) परिपाती, (५) प्रदान मार्ग.(५) आ. ११ मधील पंप हा एकपदी आहे. जेव्हा दंडावर एकापेक्षा अधिक नोदक बसवितात तेव्हा तो बहुपदी पंप होतो. उदा., त्रिपदी. पंचपदी वगैरे. प्रदान शीर्ष बरेच मोठे असते तेव्हा बहुपदी पंप वापरावा लागतो. अशा पंपाचा एक नमुना आ. १३ मध्ये दाखविला आहे. हा पंप पंचपदी असून यात पहिल्या नोदकाचे प्रदान हे दुसऱ्याचे चोषण होते. अर्थात पहिल्याचा प्रदान दाब हाच दुसऱ्या पदाचा चोषण दाब असतो व याच्या प्रदानाचा दाब आणखी पुढे वाढतो. असेच पुढील पदांतही होत जाते. सामान्यतः बहुपदी पंपात समच्छेदी कवच व परिपात्यांचे संच ठेवले जातात. प्रत्येक नोदकामुळे पाण्याचा गतिक दाब वाढतो, पण त्याचबरोबर पंपाच्या दंडावरील अक्षीय दाबातही वाढ होत जाते. हा दाब चोषण तोंडाच्या दिशेने असतो. बहुपदी पंपात बहुधा हा दाब नगण्य नसतो व या दाबाचे संतुलन करणे आवश्यक असते. बहुपदी पंपात बहुधा जलसंतुलन वापरतात. याच्या एका प्रकारात शेवटच्या नोदकानंतर पंपाच्या दंडावर एक खास चकती बसवितात व तिच्या नोदकाकडील बाजूला शेवटच्या पदाचे प्रदान पाणी झिरपत राहील असे करतात. या पाण्याच्या दाबामुळे दंडावर उलट दिशेने आवश्यक त्या महत्तेची प्रेरणा उत्पन्न करता येते आणि अशा तऱ्हेने दंडाचे संतुलन होते. या प्रेरणेची महत्ता चकतीच्या व्यासावर अवलंबून असते.

आ.१४. केंद्रोत्सारी पंपाच्या नोदकांचे निरनिराळे प्रकार : (अ) व (आ) उघडा, (इ)अर्धा उघडा, (ई) पूर्ण झाकलेला-एकाच बाजूला चोषण (एकद्वारी), (उ) पूर्ण झाकलेला-दोन्ही बाजूंना चोषण (द्विद्वारी).

नोदकांचे प्रकार : केंद्रोत्सारी पंपाच्या नोदकांचे निरनिराळे प्रकार आ. १४ मध्ये दाखविले आहेत. नोदकांना पाती असतात व ती मुख्यतः नोदकाच्या तुंब्यावर आधारलेली असतात. काही वेळा त्यांना एवढाच आधार असतो व पात्याच्या दोन्ही कडा टोकापर्यंत मोकळ्या असतात, या नोदकांना उघडे नोदक म्हणतात. आ. १४ मधील () व () हे दोन्ही या प्रकारचे आहेत. पात्यांच्या कडांना एका बाजूने जर एक पत्रा मारला (अर्थात नोदक प्रत्यक्षात एकसंध ओतीव असतात), तर अर्धा झाकलेला नोदक (आ. इ) व पत्रा दोन्ही कडांवर असेल, तर पूर्ण झाकलेला नोदक (आ. ई व उ ) म्हणतात. (ई) मधील नोदक पूर्ण झाकलेला पण एकद्वारी व (उ) मधील पूर्ण झाकलेला द्विद्वारी आहे. उघडे नोदक लहान पंपात थोड्या शीर्षासाठी, अर्धे झाकलेले मध्यम शीर्षासाठी आणि पूर्ण झाकलेले मोठ्या शीर्षासाठी व मोठ्या प्रदान राशीसाठी वापरतात.

पाण्याखालचा पंप : केंद्रोत्सारी पंपाच्या चोषण खोलीची मऱ्यादा साधारण ६·५मी. पेक्षा जास्त असू शकत नाही. पंप बसविलेल्या विहिरीतील पाणी जर या अंतरापेक्षा जास्त खाली गेले, तर पंप खाली उतरवावा लागतो. ही अडचण टाळण्यासाठी पंप सदैव पाण्याखालीच राहील अशा तऱ्हेने तो एका तरत्या भागावर बसवितात. या तरणीच्या वर चालक भाग (विद्युत् चलित्र किंवा पेट्रोल अथवा डीझेल एंजिन) बसवितात व त्याने चालणारा पंप मात्र पाण्यात बुडलेला राहतो. या रचनेत प्रदान मार्ग मात्र प्लॅस्टिक किंवा रबराचा असावा लागतो. या व्यवस्थेत पाण्याच्या पातळीच्या खाली जाण्याने पंपाच्या काऱ्यात खंड पडण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.


मिश्र प्रवाह पंप : या पंपातील पंख्याचा एक प्रातिनिधिक नमुना आ. १० (आ) मध्ये दाखविला आहे. या पंपांचा उपयोग सामान्यतः मोठी प्रदान राशी आणि मध्यम उंचीचे शीर्ष असणाऱ्या परिस्थितीत करतात.

आ.१५. अक्षीय प्रवाहाचा किंवा प्रचालक पंप : (अ) उभा छेद (आ) आडवा छेद (इ) परिघी छेद (आ मधील क्ष-क्ष येथील) : (१) आगम मार्गदर्शक पातीसंच, (२) फिरणार्‍या नोदकाची पाती, (३) निर्गम मार्गदर्शक पातीसेच.

अक्षीय प्रवाह पंप : यांना प्रचालक पंप असेही म्हणतात. मुख्यतः खूप मोठी प्रदान राशी अगदी थोड्या शीर्षाविरुद्ध उचलावयाची असेल तेथे या जातीच्या पंपाचा वापर सुयोग्य ठरतो. याच्या नोदकाचा आकार आ. १० (इ) मध्ये दाखविलाच आहे. तरीपण विजेच्या पंख्यासारखाच हा नोदक दिसण्यात असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे. या पंपाची रचना व उभारणी आ. १५ मध्ये दाखविली आहे. या पंपाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आटोपशीर रचना व बांधणी आणि उच्च विशिष्ट वेग होय (याच्या स्पष्टीकरणासाठी खाली पहा). यात सामान्यतः पात्यांचे तीन संच असतात : (१) आगम मार्गदर्शक पातीसंच, (२) फिरणाऱ्या नोदकाची पाती व (३) निर्गम मार्गदर्शक पातीसंच. आगम संचामुळे पंपात येणाऱ्या पाण्याला जर घूर्णी गती असली, तर ती काढून टाकून त्याला अक्षीय गती दिली जाते. नोदकाची पाती आता पाण्याला घूर्णी गती देतात. या वेळी पाण्याचा दाबही वाढतो. निर्गम संच पुन्हा त्याला अक्षीय गती देतो. पाण्याला घूर्णी गती देणे व पुन्हा ती काढून टाकणे या एकाच मार्गाने पाण्याला गतिक दाब देता येतो व अरीय केंद्रोत्सारी पंपातही हेच घडते. पाण्याला गतिक दाब देण्याचा चक्रीय गतिक पंपात अन्य मार्ग नाही.

पंपाचे कार्यमान व त्याचे आलेख : प्रत्येक पंपातून प्रती सेकंद मिळणाऱ्या द्रवराशीशी  द्रवाचा दाब, पंपाला पुरवलेली अश्वशक्ती (अश.) व पंपाची एकूण कार्यक्षमता या बाबींचा संबंध असतो. पंपाच्या एकूण कार्यमानाची कल्पना येण्यासाठी तो त्याच्या अभिकल्पित वेगाने चालवितात आणि निरनिराळ्या प्रदान राशींच्या वेळी जरूर त्या गोष्टींची वाचने घेतात व जरूरी गणनही करतात. ही वाचने व गणनाने आलेल्या गोष्टी आलेख कागदावर स्थापित करून आ. १६ मध्ये दाखविल्याप्रमाणे आलेख काढतात.

दाबमापकावरून दाब सरळ वाचता येतो. विद्युत् चलित्र किंवा एंजिन यांची उपयुक्त अश. (उ. अश.) ही पंपाची आदान अश. असते.

पंपाची उपयुक्त अश. 

=

पाण्याचे वजन(किग्रॅ./से.,Xएकूण शीर्ष(मी.)

७५

आ. १६. केंद्रोत्सारी पंपाच्या कार्यमानाचे आलेख : (अ) द्रवाचा दाब – द्रवराशी आलेख (आ) कार्यक्षमता – द्रवराशी आलेख (इ) अश्वशक्ती - – द्रवराशी आलेख.

पंपाची कार्यक्षमता (काक्ष.)

=

पंपाची उ. अश.

चालक यंत्राची उ. अश.

या आलेखांवरून पुढील गोष्टी दिसून येतात. (१) प्रदान शून्य असताना दाबाची कमाल मऱ्यादा असते. जसजसे प्रदान वाढत जाते तसतसा दाब कमी होत जातो. (२) शून्य प्रदानात पंपाला लागणारी अश. शून्य नसते. प्रदानाबरोबर ती वाढत जाते, एका विशिष्ट प्रदान मूल्याला तिचे कमाल मूल्य असते व नंतर ती पुन्हा कमी होत जाते. शून्य प्रदानातील अश. ही पंपातील पाणी खळबळविण्यात वाया जाणारी शक्ती असते. (३) शून्य प्रदानात काक्ष. ही शून्य असते. प्रदानाबरोबर ती वाढत जाते, एका विशिष्ट ठिकाणी तिला कमाल मूल्य मिळते व पुन्हा ती जरा जलद कमी होत जाते. ज्या बिंदूला कमाल काक्ष. असते तो पंपाचा अभिकल्पन, बिंदू होय. त्या बिंदूच्या कोटीवर असणारी दाब व प्रदान यांची मूल्ये मिळतील अशा तऱ्हेनेच पंप चालविणे फायदेशीर असते व त्या वेळी त्या कोटीवरीलच अश. पंप घेतो.


स्वच्छ आणि नैसर्गिक तापमानातील पाणी वापरून मिळालेल्या आलेखांना प्रमाण आलेख म्हणतात. पाण्याच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे गुणधर्म असणारे द्रव पंप हाताळीत असता मिळणारे आलेख प्रमाण आलेखाहून वेगळे असतात. अशा गुणधर्मात विशिष्ट गुरुत्व, तापमान, श्यानता, अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) पदार्थाचे प्रमाण इ. येतात. प्रमाण आलेखांवर होणारा काही गुणधर्मांचा परिणाम गणनाने काढता येतो. उदा., जास्त वि. गु. असेल, तर त्याने प्रमाण शीर्ष व प्रमाण अश. यांना गुणिले असता द्रवाशी संबंधित मूल्ये मिळतात. नाहीपेक्षा प्रत्यक्ष प्रयोगाने परिणाम समजून घ्यावे लागतात.

विशिष्ट वेग : मूळ पंपाशी भूमितीय एकता राखून १ मी. शीर्षाखाली पाणी पंप करीत असता १ अश. उत्पन्न करण्याइतका जर एक लहान नमुना पंप तयार केला, तर त्याचा वरील प्रदानासाठी जो वेग ठेवावा लागेल त्याला विशिष्ट वेग (वि. वे.) म्हणतात. यात पंपाच्या अभिकल्पासाठी ज्या तीन मूलभूत गोष्टी – शीर्ष, प्रदान राशी व वेग–वापरतात त्यांचाच उपयोग केला जातो. वि. वे. चे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

पंपाची वि. वे.

=

०.११५५ X फ X √ रा

३/४

यात, = प्रती मिनिट फेरे, रा = प्रदान पाण्याची राशी (लि./से.) आणि = शीर्ष (मी. ). या तीनही राशी मूळ पंपासंबंधित आहेत.

चक्रीय गतिक पंपांच्या वि. वे. च्या सीमा ९० ते, १,१०० अशा आहेत. वि. वे. च्या अंकावरून नोदकाचे स्वरूप व सामान्य आकारमान निश्चित होते. या अंकाच्या सम प्रमाणात नोदकाची परिघाजवळची रुंदी वाढते, तर त्याचा व्यास व्यस्त प्रमाणात बदलतो. त्याच प्रमाणे नोदकाच्या आतील पाण्याच्या प्रवाहाची दिशाही या अंकाबरोबर बदलते. अरीय प्रवाह, मिश्र प्रवाह आणि अक्षीय प्रवाह अनुक्रमे वाढत्या वि. वे. अंकाचे सामान्यतः निदर्शक असतात. वरील वि.वे.चे सूत्र ध्यानात घेता, पंपातून मिळणारे शीर्ष व मिळणारी द्रवराशी यांच्याइतकाच पंपाचे फेरे हा महत्त्वाचा घटक आहे, असे दिसून येते. उपलब्ध चालक एंजिन वा विद्युत् चलित्र यांचे फेरे लक्षात घेऊन पंपाचा वेग ठरवावा लागतो.

कोटरीभवन : पंपाच्या नोदकाच्या तोंडाशी किंवा पश्चाग्र गतीच्या पंपात चोषण झडपेशी बाहेरील वातावरणीय दाबापेक्षा दाब कमी झाला, तरच पाण्याचे पंपात चोषण होते पण हा दाब जर  पाण्याच्या बाष्पीभवन बिंदूच्या जवळपास (अंदाजे २·५ मी.) गेला, पाण्याचे बाष्प व्हायला लागून त्याचे बारीक बारीक बुडबुडे बनतात. पुढे या बुड़बुड्यांवर दाब आला की, ते फुटतात व फुटताना ते धातुभागावर आंघांत करतात व त्या वेळी धातूचा कण उडून जातो. या प्रकाराला कोटरीभवन म्हणतात. कोटरीभवनामुळे  यंत्राचा भाग खाल्ला जातो म्हणून चोषण भागात निरपेक्ष दाब बाष्पीभवन बिंदूइतका कमी होऊ देत नाहीत [ ⇨ द्रायुयामिकी].

परीक्षण : कुठल्याही पंपाचा एक ठराविक अभिकल्पित वेग असतो व त्या स्थिर वेगातच त्याचे परीक्षण करतात. परीक्षणाच्या उद्देशांत (१) तो जास्तीत जास्त किती खोलातून पाणी (द्रव) खेचू शकेल ते काढणे, (२) पंपाचे एकंदर स्थैतिक शीर्ष (तळापासून जास्तीत जास्त किती उंचीवर पाणी जाऊ शकेल ती उंची) ठरविणे, (३) स्थैतिक शीर्ष  आणि प्रदान राशीचा संबंध दाखविणे, (४) सर्वांत अनुकूल परिस्थितीत पंपाला लागणारी अश. व त्या वेळची त्याची एकूण काक्ष. काढणे, (५) ताशी लागणारी इंधन वा ऊर्जा यांची राशी ठरविणे वगैरेंचा समावेश होतो. जरा जास्त तपशीलवार परीक्षण केल्यास आ. १६ मध्ये दाखविल्याप्रमाणे आलेख मिळू शकतात.

बाह्य यांत्रिक शक्ती न लागणारे काही पंप : लेखाच्या सुरुवातीच्या भागात पंपांचे वर्गीकरण देताना बाह्य शक्ती न लागणाऱ्या पंपांचे एक वर्ग असल्याचे म्हटले आहे, या पंपाचा प्रथमच येथे विचार केला आहे. हे पंप उपलब्ध असलेल्या पाण्याचीच शक्ती वापरतात.

आ. १७. यांत्रिक जलीय दाबवर्धक : (१) मोठा सिलिंडर, (२) दट्ट्या, (३) दट्ट्याचा (संयुक्त) दांडा, (४) लहान सिलिंडर, (५) बुडक्या, (६) कमी दाबाचे पाणी, (७) मोठ्या सिलिंडराचा निकास, (८) उग्र दाबाचे पाणी. यांत्रिक जलीय दाबवर्धक : पहिला प्रकार म्हणजे एक साधा पश्चाग्र गतीच्या पंपाचाच प्रकार आहे. जेथे पुष्कळ पण  थोड्या शीर्षाचे पाणी उपलब्ध असते व बऱ्याच उंचीवर त्यातील काही हवे असते अशा ठिकाणी हा पंप वापरता येतो. याचे तत्त्व आ. १७ मध्ये दाखविले आहे. यात एक मोठ्या व्यासाचा सिलिंडर व दट्ट्या असतो आणि या दट्ट्याच्या दांड्याच्या दुसऱ्या टोकाला सरळ एक बऱ्याच लहान व्यासाचा बुडक्या जोडलेला असतो. हा बुडक्या दुसऱ्या एका सिलिंडरात मोठ्या दट्ट्याबरोबर पुढे-मागे होतो. मोठ्या सिलिंडरात कमी शीर्षाचे पाणी दट्ट्याच्या दोन्ही बाजूंना चालक माध्यम म्हणून कार्य करते. हेच पाणी लहान सिलिंडरालाही पुरविले जाते पण त्या सिलिंडराचे (पंपाचे) प्रदान पाणी उच्च शीर्षाचे होते. नीच आणि उच्च शीर्ष दट्ट्यांच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतात. चालक पाण्याचा कमी दाब आणि हवा असलेला उच्च दाब यांचे प्रमाण हवे तेवढे (व्यावहारिक मऱ्यादा सांभाळून) ठेवता येते व त्या प्रमाणात मोठा दट्ट्या व बुडक्या यांच्या आडव्या क्षेत्रफळाचे प्रमाण ठेवतात. हा जोडपंप माणसाच्या देखरेखीशिवाय अव्याहत सुरळीत चालावा म्हणून योग्य प्रकारची झडपांची योजना करावी लागते. या पद्धतीचा बराच विकास झाला असून एका ठिकाणी १० मी. शीर्षाच्या पाण्याचा चालनासाठी उपयोग करून १०० मी. उंचीवर प्रती मिनिट २७० लि. या वेगाने पाणी पुरविणारा संच बनविण्यात आला आहे. याची एकूण कार्यक्षमताही ८०%  पेक्षा जास्तच आहे.

जलीय पंप : वरील पंपाइतकीही सामग्री न लागणारा व अगदी  साध्या रचनेचा असा हा पंप असून तो वरीलप्रमाणेच खालच्या पाण्याचा काही भाग उंचावर नेतो. या पंपाची रचना आ. १८ मध्ये दाखविली आहे. (१) हे थोड्या उंचीवरचे पाण्याचे तळे आहे. यातून (२) या नळाने पाणी (३) या पेटीत  सोडलेले आहे. पेटीला (४) ही पेटीत उघडणारी झडप (फुकटी झडप) बसविलेली आहे. तसेच तिला (६) हे हवापात्र लावलेले असून त्यातून (७) या नळाने (८) या उंचावरील टाकीत पाणी जाण्याची व्यवस्था आहे. हवापात्राच्या तळाशी (५) ही आणखी एक झडप (प्रदान झडप) असून ही हवापात्रात उघडेल अशी बसविलेली आहे.


आ. १८. जलीय पंप : (१) कमी शीर्षाचा जलाशय, (२) जलवाहक नळ, (३) झडप पेटी, (४) फुकटी झडप, (५) प्रदान झडप, (६) हवापात्र, (७) पाणी वर नेणारा नळ, (८) उंचावरील टाकी.सुरुवातीला नळ (२) पासून पुढील सर्व भाग रिकामे आहेत असे समजू. नळातून पेटी (३) हीत पाणी येऊ लागेल. फुकटी झडप (४) ही आपल्या वजनामुळे उघडी आहे व पेटी भरली की, या झडपेच्या द्वारे पाणी  बाहेर पडून फुकट जात राहील पण असे होताना (२) मधील पाण्याचे प्रवेगीकरण होईल व त्यामुळे पेटीतील पाण्यात स्थैतिक दाबाच्या जोडीला गतिक दाब उत्पन्न होईल. अर्थात फुकट्या झडपेतून वाहणाऱ्या पाण्याचाही वेग वाढत जाईलच. आता काही सेकंदांत पेटीत दाब पुरेसा वाढून फुकटी झडप वर ढकलली जाऊन बंद होते व आणखी दाबवृद्धी होऊन प्रदान झडप (५) उघडते. लगेच पेटीतील पाणी हवापात्रात शिरते. अशा दोन-तीन आवर्तनांत हवापात्रात दाब पुरेसा वाढून (७) या नळातून (८) या टाकीत पाणी पडू लागते. हवापात्रामुळे पाण्याचे प्रदान अखंड चालू राहते. या क्लृप्तीची कार्यक्षमता अंदाजे ५५ ते ६०% असते. वरील यांत्रिक पंपाप्रमाणे यात वाटेल तितक्या उंचीवर पाणी चढवणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नसते. फुकट जाणारे पाणी परिस्थितीनुसार उपयुक्त पाण्याच्या साधारण ३ ते ५ पट असते.

आ. १९. हवा उचल पंप : (१) हवेचा प्रवेश मार्ग, (२) पाण्याचा निर्गम मार्ग (उ) उपयुक्त उंची, (ड) नळाची डूब.

संकीर्ण पंप : हवा उचल पंप : हा बाह्य शक्ती वापरणारा पंप आहे. या पंपाची रचना आ. १९ मध्ये दाखविली आहे. अरुंद खोल विहिरीसाठी (नलिका कूपासाठी) हा पंप चांगला उपयोगी आहे. यात एक जरा मोठासा नळ जमिनीपासून विहिरीच्या तळापर्यंत उभा ठेवलेला असतो. कूपाच्या तोंडाशी जमीनीवर एक हवा संपीडक (दाबयुक्त हवा पुरविणारे साधन) असते व त्यातील हवा एका बारीक नळीने मोठ्या नळाच्या खालच्या तोंडाशी नेतात. तेथे या बारीक नळीचे तोंड वळवून मोठ्या नळाच्या तोंडात सोडतात. नळीतील हवा पाण्यात जाताच तिचे लहान लहान बुडबुडे बनतात व ते पाण्यात तरंगू लागतात. या बुडबुडेमिश्रित पाण्याचा स्तंभ मोठ्या नळाच्या बाहेरील पाण्याच्या तेवढ्याच उंचीच्या स्तंभापेक्षा हलका  असतो व बाहेरील पाण्याच्या दाबामुळे तो वर वर सरकून मोठ्या नळातून जमिनीवरील टाकीत पाणी पडते.

आ. २० पाणबंद विद्युत् चलित्राचा खोल नलिका कूप पंप : (१) पाण्याची पातळी, (२) केबल, (३) प्रदान नळ, (४) पंप, (५) विद्युत् चलित्र.उपयुक्त उंची जर नळाची डूब हिच्यापेक्षा कमी असेल, तर या पंपाची निष्पत्ती बरी होते. : उ हे प्रमाण ड ३०–३२ मी. असता ४ असते पण १०० मी. असता १ पर्यंत ते खाली येऊ शकते. या पंपाचा खरा फायदा म्हणजे यात जलपृष्ठाखाली कसलेच चल भाग नसतात. त्यामुळे पाण्यात तरंगणाऱ्या व स्तू मु ळे त्यात बिघाड हो ण्या ची शक्यताच नसते. मात्र याची काक्ष. २०% ते ४०% असते.

केंद्रोत्सारी पंपाचा एक खास प्रकार : बऱ्याच खोल नलिका कूपातील पाणी काढण्यासाठी कसल्याही प्रकारचा पंप जमिनीवर ठेवला, तर तो उपयोगी पडणार नही. तो पाण्याच्या नजीकच ७ मी. च्या आत न्यायला हवा. एका प्रकारात विद्युत् चलित्र जमिनीवर उभे बसवितात व त्याच्या दंडाला एक लांब दांडा जोडून तो कूपात सोडलेल्या एका बहुपदी केंद्रोत्सारी पंपाच्या दंडाला जोडतात. हा दांडा पंपाच्या प्रंदान नळातूनच नेतात. दुसऱ्या एका प्रकारात चलित्र पाणबंद रचनेचे करून त्याला जोडलेल्या पंपासकट कूपात सोडतात. अशा प्रकारच्या पंपाची सामान्य रचना आ. २० मध्ये दाखविली आहे. चलित्राला वीजपुरवठा पाणबंद अशा मजबूत केबलींनी अर्थातच करावा लागतो. हाही पंप बहुपदीच असावा लागतो.

आ. २१. वाफेचा अंतःक्षेपक पंप : (१) वाफेचा नळ, ९२) अंतःक्षेपकात येणार्‍या संभरण जलाचा प्रोथ, (३) संभरण जलाचा नळ, (४) वाफ-पाणी मिश्रण ग्राहक प्रोथ, (५) संभरण जल वाफकाला देणारा नळ, (६) बंदिस्त जागा, (७) उत्प्रवाह द्वार, (८) संभरण जल पातळी, (९) वाफकातील पाण्याची पातळी.वाफेचा अंतःक्षेपक पंप : हा वाफेवर चालणार पंप असून यात हलते फिरते भाग नसतात. वाफकाला संभरण पाणी पुरविण्यासाठी त्याच वाफकातील वाफ, एवढेच नव्हे तर वाफकातील दाबापेक्षा कमी दाबाचीही दुसरी वाफ, वापरता येते हे या पंपाचे वैशिष्ट्य आहे. या पंपाच्या काऱ्याचे तत्त्व स्पष्ट करणारे रेखाचित्र आ. २१ मध्ये दाखविले आहे. वाफेचा नळ (१) याला पुढे एक प्रोथ लावलेला आहे. या प्रोथाच्या सभोवती दुसरा एक प्रोथ (२) असून तो वाफकाला द्यावयाच्या पाण्याचा नळ (३) याला लावलेला आहे. प्रोथ (२) च्या समोर थोडी फट ठेवून प्रोथ (४) बसविलेला आहे पण वाफ-पाण्याच्या गतीच्या संदर्भात तो उमलता आहे. या प्रोथाच्या मागे (५) हा नळ लावलेला असून तो वाफकाला जोडलेला असतो. प्रोथ (२) व (४) यांच्या तोंडाभोवती भांड्यासाठी बंदिस्त जागा (६) असून या जागेला (७) हा नळ जोडलेला आहे. (६) मध्ये आलेले अतिरिक्त वाफ-पाणी यातून बाहेर पडते. वाफेच्या नळाला लावलेल्या प्रोथातून वाफ बाहेर पडताना तिच्या दाब-ऊर्जेचे वेग-ऊर्जेत रूपांतर होऊन तिला खूप वेग मिळतो. ही वाफ प्रोथ (२) मधून जाताना (१) च्या भोवतालच्या जागेत अंशतः निर्वात तयार होतो व तेथे (३) मधून पाणी येऊन पुढे ते वाफेत मिसळते व (४) मधून पुढे जाते. (१) भोवतालच्या जागेत पुन्हा दाब कमी होतो व पुन्हा पाणी येते व अशा तर्‍हेने पाण्याचा प्रवाह चालू होतो. प्रोथ (४) मध्ये योणाऱ्या वाफ व पाणी यांच्या मिश्रणालाही खूप वेग असतो व ते (४) मधून जाताना या वेग-ऊर्जेंचे परत दाब-ऊर्जेत रूपांतर होते. या क्रियेत मिळणारा दाब मिश्रणाला वाफकात ढकलण्यासपुरेसा असतो. (२) मधून जर पाणी जास्त आले, तर ते. (६) या जागेत सामावले जाऊन (७) या नळाने बाहेर जाते.


निर्वात पंप : आतापर्यंत वर्णिलेल्या पंपात प्रदान द्रवाचा दाब हा नेहमी वातावरणाच्या दाबापेक्षा अधिक असला पाहिजे, असे गृहीत घरलेले आहे. औद्योगिक विधीत काही क्रिया-प्रक्रिया अशा असतात की, तेथील दाब वातावरणीय दाबापेक्षा कमी ठेवला, तरच त्या शक्य होतात किंवा निदान काटकसरीने व चांगल्या तर्‍हेने साधता येतात. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपाना निर्वात पंप म्हणतात. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांना निर्वात पंप म्हणतात. यांचे रासायनिक, भौतिक, यांत्रिक, इलेक्ट्रॉनीय वगैरे पुष्कळ प्रकार आहेत. अलीकडील काळात त्यांच्या अभिकल्पात व रचनेतही खूपच प्रगती झाली असून त्यांच्या साहाय्याने चोषलेल्या पात्रात १०-१२टॉरपर्यंत (१ टॉर =  १ मिमी. उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाचा दाब) निर्वात मिळू शकतो [à निर्वात].

विद्युत् चुंबकीय पंप: पंपाचे वर्गीकरण  संपर्क व असंपर्क पंप असे दोन वर्ग सांगितले आहेत. आतापर्यंतचे निर्वात पंप धरून सर्व प्रकारांचे पंप संपर्क प्रकारांचे आहेत. चल भाग किंवा द्रव पंप करणारे माध्यम (हवा, पाणी, वाफ) यांचा पंप करावयाच्या द्रव्याशी प्रत्यक्ष संपर्क होतो. मुख्य म्हणजे ते भौतिक पदार्थ असतात पण विद्युत् चुंबकीय पंप हा पूर्ण (व्यावहारिक अर्थाने) असंपर्क प्रकारचा आहे. अणुकेंद्रीय विक्रियकात [à अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] उत्पन्न होणाऱ्या अत्युच्च तापमानातील उष्णतेचा विनिमय करण्यासाठी द्रव घातू (उदा., द्रव सोडियम) वापरतात. हे घातू चांगल्या प्रतीचे उष्णता व विद्युत् संवाहक असतात. अणुकेंद्रीय विक्रियकात वापरावयाच्या साधनात हलते भाग, धारवे वगैरे जवळजवळ नसावेतच कारण त्यांची काही काळाने काही दुरुस्ती व नियमित देखभाल करणे फारच धोक्याचे असते. वरील प्रकारचा पंप या सर्व अटी पूर्ण करणारा असा आहे. [à विद्युत् चुंबकीय पंप].

घनद्रव्य पंप : वर वर्णन केलेले सर्व पंप द्रव वा वायू अवस्थेतिल द्रव्यांकरिता वापरावयाचे आहेत. तुकड्यांच्या किंवा धान्यासारख्या दाणेदार स्वरूपातील घनद्रव्यांकरिता वापरण्यात येणाऱ्या पंपांचेही स्पष्ट विस्थापन व चक्रीय गतिक असे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारचा पंच कोळशासारखे मोठाले खडे वर नेण्यासाटी तर दुसऱ्या प्रकाराचे पंप धान्यासारख्या पदार्थांकरिता वापरतात. [à धनद्रव्य पंप].

हातपंप : स्पष्ट विस्थापन प्रकारातील अर्धचक्रीय (दोलित) गतीचा पात्यांचा पंप आ. ६ मध्ये दाखविला आहे. हा हातपंपच आहे पण वर्णनाच्या ओघात तो तेथे आला आहे. इतर प्रकारचे हातपंप आता येथे दिले आहेत.

घरगुती रॉकेल पंप : मोठ्या (१८ लिटरच्या) डब्यातून बाटलीत रॉकेल काढून घेण्याचा पंप हा पातळ पत्र्याऱ्याचा आणि अगदी साध्य रचनेचा असतो. दट्ट्या (पत्र्याऱ्याची चकती) नळीत (सिलिंडरात) सैलसा असतो व तो जरा भराभर वरखाली केला की, नळीच्या तळातील भोकावर असलेली झडप उघडून रॉकेल नळीत येते. नंतर दट्ट्या खाली जाताना त्याच्या खालील रॉकेलावर दाब पडून झडप बंद होते आणि दट्ट्याच्या भोवतालच्या फटीतून (रॉकेल नळीत येते. नंतर दट्ट्या खाली जाताना त्याच्या खालील रॉकेलावर दाब पडून झडप बंद होते आणि दट्ट्याच्या भोवतालच्या फटीतून रॉकेल दट्ट्याच्या वरच्या बाजूला येते. दट्ट्याच्या पुढील वर येण्याच्या घावेत ते वर उचलले जाऊन तोटीतून बाहेर पडते. रॉकेल वर उचलले जात असताना दट्ट्याच्या कडेने अर्थातच थोडेसे गळते (याकरिताच दट्ट्या भराभर वरखाली करावा लागतो). दट्ट्या वर येत असता खाली चोषण पुन्हा होत असते.

वक्रनलिका पंप : वरील प्रकारच्या उपयोगासाठीच ही वक्रनलिका वापरतात. हिचा एक आधुनिक प्रकार आ. २२ मध्ये दाखविला आहे. यातील नळीच्या एका टोकाला एक शाखा असून या शाखेला एक भाता लावला आहे. डोक्याच्या खाली एक चावी आहे. नळीची लांब बाजू डब्यात सोडतात व चावी असलेली आखूड बाजू बाहेर धरतात पण तिचे टोक डब्यातील द्रवाच्या पातळीच्या खाली असावे लागते. चावी बंद ठेवून भाता वापरला की, लांब बाजूतील हवा बाहेर पडून डब्यातील तेल चावीपर्यंत येते. चावी उघडली की, प्रवाह चालू होतो व जोपर्यंत हे नळीचे तोंड तेलाच्या पातळीच्या खाली असते तोपर्यंत तो चालू राहतो. नको असल्यास चावी बंद करता येते. डब्यातील नळी मात्र भरलेलीच रहाते व चा वी उघडताच तेल योण्यास पुन्हा सुरुवात होते. याचे सर्व भाग प्लॅस्टिकचे असतात.

आ. २२. चोषणाने चालू होणाऱ्या प्रवाहाचा वक्रनलिका पंप.

प्लॅस्टिकचाच पण जरा निराळ्या तत्त्वावर (दाबाने चालू होणाऱ्या प्रवाहाच्या तत्त्वावर) चालणारा वक्रनलिका पंपाचा आणखी एक प्रकार आहे. वर भाता असलेले एक प्लॅ स्टि क चे पोकळ बूच व त्यातून घातलेली एक नळी अशी याची रचना असते. याचा उपयोग मोठ्या बाटलीतून वेळोवेळी थोड़ा थोड़ा द्रव काढून घेण्यासाठी (उदा., शाईच्या शिशातून दौत भरून घेणे) चांगला होतो. बूच बाटलीला घट्ट बसवून नळीचे एक टोक बाटलीच्या तळापर्यंत नेतात व दुसरे बाहेरच राहते पण पुन्हा हे टोक बाटलीतील द्रवाच्या पातळीच्या खाली असावे लागते. भाता दाबल्याने द्रवावरील हवेचा दाब वाढतो व त्यामुळे नळीतून द्रव येतो व पातळ्यांतील फरकामुळे त्याचा प्रवाह चालूही रहातो. प्रवाह बंद करण्यासाठी बाहेरील टोक उंच करतात.

आ. २३. विहिरीवरचा हातपंप : (१) सि लिं ड र, (२) दट्ट्या, (३) दट्ट्याचा दांडा, (४) दट्ट्यातील भोक, (५) भोकावरील झडप, (६) हस्तक, (७) चोषण नळ, (८) चोषण झडप. (अ) मध्ये दट्ट्या वर गेलेला असून (आ) मध्ये तो खाली जात आहे.

विहिरीवरचा हातपंप : हा पंप व आ. ६ मधील व इतर पंप यांतील फरक असा आहे की, या पंपाने पाणी फक्त पंपाच्या पातळीतच वर आणले जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला शीर्ष (दाब) नसते. याची रचना आ. २३ मध्ये दाखविली आहे. याची रचना साधी असून त्याला खाली चोषण नळ लावलेला आहे. सिलिंडरात दट्ट्या एंजिनातल्याप्रमाणे गळबंद आहे. दट्ट्यात काही भोके असून त्यांवर झडपा असतात (आकृतीत एकच भोक व त्यावरील झडप दाखविलेली आहे). या फक्त वरच उघडतात. दट्ट्या खाली जात असता या प्रदान झडपा उघडून दट्ट्याच्या खालच्या बाजूने पाणी नुसतेच त्याच्या वरच्या बाजूला येते. दट्ट्याच्या पुढील वरच्या धावेत ते उचलले जाऊन तोटीतून बाहेर पडते. आ. २३ (अ) मध्ये दट्ट्या वर गेलेला असून त्याच्या खाली  विहिरीतील पाणी चोषले गेले आहे व वरचे पाणी तोटीतून बाहेर ढकलले गेले आहे. आ. २३ (आ) मध्ये दट्ट्या खाली जात असून या घावेत फक्त पाण्याचा स्थानवदर होत आहे.


आ. २४. सायकल पंप : (१) सिलिंडर, (२) दट्ट्याचा दांडा, (३) दट्ट्याची वरची चकती, (४) चामड्याची वाटी (वॉशर), (५) आतली चकती, (६) नट, (७) लवचिक नळी, (८) टायरातील रबरी नळीत ज्यातून हवा भरली जाते ते भोक. सायकल पंप: सायकलीच्या चाकावरील टायराच्या आतल्या रबरी नळीत हवा भरावयाचा हा पंप आहे. वर आलेले हातपंप नुसते उचल पंप म्हणजे तेल किंवा पाणी भांड्यांच्या किंवा  विहिरीच्या काठावर आणणारे आहेत पण या पंपाच्या प्रदानाला दाब येऊ शकतो व म्हणून हा दाब पंप आहे. याची रचना आ. २४ मध्ये दाखविली आहे. या पंपाचे भाग म्हणजे सिलिंडर, दट्ट्या व त्याचा मुठीसह दांडा हे आहेत. टायरातील नळीत हवा भरण्याचे त्याचे कार्य साध्य होण्यासाठी लागणारी लवचिक नळी व दट्ट्या वर जात असताना भरलेली हवा परत पंपात येऊ नये म्हणून टायरातील नळीवर बसविलेली झडप (व्हॉल्व्ह ट्यूब) ही साहाय्यक साधनेही त्याच्या काऱ्याला आवश्यक असतात. पंपाचा कार्यकारी भाग दट्ट्या असतो. हा त्याच्या दांड्याच्या टोकाला बसविलेला असून त्याच्या टोकाला प्रथम एक लो खं डा ची चकती, ति च्या पु ढे चामड्याची वाटी (वॉशर) व त्या वाटीत पुन्हा एक दुसरी चकती आणि नंतर एक नट ब स वि ले ला असतो. नट फिरवून घट्ट बसविला म्हणजे दट्ट्या पूर्ण होतो. पंप वापरताना त्याला लवचिक नळी व तिच्या टोकाला झडप (टायरातील नळीवरील) ह्या बसविलेल्या असतातच.

दांडा मागे ओढताना दट्ट्याच्या पुढील बाजूला सिलिंडराचे घनफळ वाढत जाते आणी दाब कमी होत जातो. या दाबन्यूनतेमुळे वाटीची कडा आत वळते व सिलिंडरात वाटी थोडी सैल होते. याच वेळी कडेच्या बाजूने वरची हवा दट्ट्याच्या खाली जाऊन तेथील दाब वातावरणीय दाबाइतका होतो. दट्ट्या खाली ढकलताना मग ही हवा दाबली जाऊन झडपेतून टायराच्या नळीत शिरते.

फुटबॉलच्या आतील रबराच्या पिशवीत हवा भरण्यासाठी याच प्रकारचा पंप वापरतात  पण त्याच्या सिलिंडराच्या टोकालाच एक एकमार्गी प्रदान (गोलिका झडप बसविलेली असते.

स्टोव्हतील पंप : स्टोव्ह व पेट्रोमॅक्स दिवा यांतील पंप सारखेच असून खुद्द दट्ट्याही सायकलच्या पंपासारखाच चामड्याची वाटी असलेला असतो. मात्र स्टोव्ह व दिव्याच्या पंपालाच प्रदान झडप जोडलेली असते. दट्ट्या चामड्याच्या वाटीचाच असल्याने चोषण झडप लागत नाही. प्रदान झडपेच्या घटकाची रचना आ. २५ मध्ये दाखविली आहे. पंपाचा सिलिंडर (१) याच्या तळाला भोक असून त्यातून जाणारी एक नळी (२) आट्यांनी तळाच्या झाकणात घट्ट बसते. या नळीला वरच्या टोकाला नटाचा आकार असतो व तो फिरवून हा झडप घटक दुरुस्तीसाठी बाहेर काढता येतो. या नळीवर खालच्या टोकाला एक दूसरी नळी (३) बसते. तीत (४) हा ल्हानसा दट्ट्या असून त्याच्या खालील स्प्रिंग (५) त्याला जोडलेली आहे. या नळीच्या दट्ट्याच्याच जागी (६) हे भोक असून वरून हवा आली की, दट्ट्या खाली दाबला जाऊन भोक मोकळे होते व हवा टाकीत जाते. नळी(३) च्या तळालाही भोक (७) असून वरून हवा येत नसताना टाकीतील हवा वा रॉकेल त्यांतून वर येऊन दट्ट्याला वर सरकवते व भोक (६) बंद करते. यामुळे टाकीतील हवा बाहेर जाऊ शकत नाही.

कोष्टक क्र. १. भारतात बनणाऱ्या पंपांसंबंधीत तपशील (१९७१) 

पंप प्रकार: (१) आडवा दंड, उभी कवच विभागणी, बाजूला मध्यावर चोषण, एकपदी. (२) आडवा दंड, उभी कवच विभागणी, द्विचोषणी, एकपदी (३) आडवा दंड, आडवी कवच विभागणी, बाजूला मध्यावर चोषण, (अ) एकपदी, (आ) द्विपदी (४) आडवा दंड, उभी कवच विभागणी, विसारकयुक्त, बाजूच्या मध्यावर चोषण, बहुपदी (३–१० पदे) (५) आडवा दंड, आडवी कवच विभागणी, द्विचोषणी, एकपदी (६) उभा दंड, (अ) खोल विहिरीचे टरबाइन पंप (माथ्याला दंतचक्रे, कप्पी, विद्युत् चलित्र), (आ) अक्षीय प्रवाहाचे (७) एकठोकळी पंप (८) घरगुती स्वयंजलभरणी (९) पश्चाग्र गतीचे (१०) शीतनकाचे (११) शेती व विशेष कामाचे मोठे (१२) साखा व राळा यांसाठी न चोंदणारे (१३) वाहितमलाचे (१४) रासयनिक द्रव्ये हाताळण्याचे, आसवनीतील (बिअरसारख्या द्रव्याच्या कारखान्यातील) (१५) अग्निशामक (१६) कागद व लगदा उद्योगांतील लगदा हाताळण्याचे. (वरील पंपांसंबंधीची तांत्रिक माहिती खाली दिली आहे). 

पंप प्रकार क्रमांक 

प्रदान नळ व्यास (मिमी.) 

शीर्ष मीटर 

प्रदान मर्यादा (लिटर/से.) 

अश्र्वशक्ती 

दंडाचा वेग 

२५-६५०

३-७५

२-१,८००

०.२५-५००

नी.म.उ.

५०-३००

३-३६.५

१३.६-६००

५-२०

नी.म.

३ (अ) 

५०-५०० 

३-५० 

९-१,१०० 

२-९०० 

नी.म. 

(आ) 

५०-१५० 

८-१५० 

९-१०० 

६-२५० 

नी.म. 

४ 

५०-१०० 

३८-२१० 

९-३८ 

८-१५० 

म.उ. 

५ 

७५-४०० 

६-५० 

११-७५७ 

५-५०० 

नी.म. 

६ (अ) 

७५-६०० 

१-१० 

२२७-१,१७५ 

०.५-३० 

नी.म.उ. 

(आ) 

३००-७५० 

१.५-६ 

३८-१,१३५ 

२-१५०* 

नी.म.उ. 

७ 

१२-१५० 

३-६७ 

०.२५-९० 

०.५-३० 

नी.म.उ. 

८ 

२५-७५ 

१८-६० 

३८-१५ 

०.२५-२५ 

म. 

९ 

२०-४० 

८-७६ 

२५-०.३८ 

०.१७-१.५ 

नी. 

१० 

१२-२० 

१.५-३.५ 

०.३-०.६ 

०.१-०.२५ 

उ. 

११ 

५००-७५० 

९ 

१,३६३ 

२५० 

नी. 

१२ 

५०-१०० 

९-२४ 

५-४० 

५-२० 

नी.म. 

१३ 

५०-४५० 

६-४१ 

५९१० 

०.६-३५० 

नी.म. 

१४ 

२५-१५० 

६-६० 

०.७६-९५ 

३-४० 

म.उ. 

१५ 

४०-१५० 

१२-१४८ 

२.५-९५ 

३-२५० 

म. 

१६ 

१००-१५० 

८-५५ 

६-१५१ 

७.५-१२५ 

म. 

[नी.= नीच वेग म.=मध्यम वेग: उ.= उच्च वेग * पदांच्या संख्येनुसार]. 


आ. २५. स्टोव्हच्या पंपातील टोकाची प्रदान झडप : (१) पंपाचा सिलिंडर, (२) सिलिंडराच्या टोकाची नळी, (३) दूसरी नळी, (४) लहान दट्ट्या, (५) स्प्रिंग, (६) द ट्ट्या च्या बाजूचे भोक, (७) नळी ३ च्या तळाचे भोक, (८) पंपाचा दट्ट्या.

डोळ्यात औषधाचे थेंब टाकण्या चा थें ब क (ड्रॉपर), अंतःक्षेपण (इंजेक्शनाची) पिचकारी, ग्लिसरीन पिचकारी, ओंगण पिचकारी (ग्रीज गन), मोटारगाडीच्या विद्युत् घटमालेत अम्ल घालण्या ची पिचकारी वगैरे साधनेही ‘पंप’ या सदरात मोडू शकतात.

भारतीय पंप उद्योग : भारतात शक्तिचलित पंप बनविण्यास एक-दोन साहसी उद्योजकांनी १९२५ च्या सुमारास सुरुवात केली. ह्या काळात त्या वेळच्या हिंदुस्थान (ब्रिटिश) सरकारचे धोरण देशी धंद्यांना उत्तेजन देण्याऐवजी ब्रिटिश मालाची आयात करण्यासच प्रोत्साहन देण्याचे असे. तसेच देशी माल घेण्यास लोकही  नाखूष असत. त्यामुळे या कारखानदारांना परदेशी मालाशी स्पर्धा करूनच आपला माल विकावा लागे. अर्थातच अशा परिस्थितीत धंदा कसाबसाच चालत होता पण हे कारखानदार तग धरून राहिले होते. मग दुसरे महायुद्ध (१९३९–४५) सुरू झाले व परदेशी पंपाची आयात कठीण झाली. युद्धामुळे मागणीही वाढली व त्यामुळे धंद्याला तेजी आली आणि १९४७ पर्यंत संघटित पंप कंपन्यांची संख्या आठवर गेली.

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सुरू क र ण्या त आलेली ‘अधिक घान्य पिकवा’ हि मोहीम व अनेक राज्यांत तदनुषंगिक नलिका कूप खणण्याचा हाती घेतलेला कार्यक्रम यांमुळे पंपांची मागणी वाढली व ती पुरी करण्यासाठी कारखानेही पुढे सरसावले आणि १९५० पर्यंत असलेले आठ कारखाने (वार्षिक क्षमता ३५,००० पंप) १९५६ पर्यंत म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेअखेर २७ (वार्षिक क्षमता ६८,००० पंप) झाले. यानंतरच्या पंचवार्षिक योजनांत जलसिंचाई, वीज, पंपाची जरूरी लागणारे रसायन, साखर, कागद यांसारख्या उद्योगांना उत्तरोत्तर महत्त्व देण्यात आले आणि त्यामुळे पंप कारखान्यांची संख्या वाढली आणि चुन्यांचा विस्तारही करण्यास परवानगी देण्यात आली. १९७७ साली या संघटित उद्योगाची पंप बनविण्याची वार्षिक क्षमता ३,५०,००० किंवा थोडी अधिक होती.

लघू व मध्यम उद्योगक्षेत्रांतही पंप बनविले जातात पण त्यांच्या उत्पादनाचे आकडे मिळू शकत नाहीत. असे असले तरी या क्षेत्रांतील पंपाची संख्याही मोठी आहे. मात्र ते लहान व बरेचसे हाती चालविण्याचे असतात. हे कारखाने संबंध देशभर पसरलेले आहेत.

या उद्योगात गुंतलेल्या मोठ्या कारखान्यांची संख्या ६२ होती  पण त्यातील १३ आता लघु-मध्यम वर्गात घातले गेले आहेत. हे सर्व कारखानेही जवळजवळ देशभर विखुरलेले असून त्यांत लहान, मध्यम व मोठ्या शक्तीचे आणि सामान्यतः सर्व प्रकारचे पंप बनविले जातात. मात्र फार मोठ्या शक्तीचे पंप अजूनही आयातच होतात. कारखान्यातून बनणाऱ्या पंपात पश्चाग्र प्रकारचे व चक्रीय गतिक प्रकारचे, नीच, मध्यम व उच्च वेगाचे आणि शीर्षाचे, आधुनिक बांधणीचे व प्रगत अभिकल्पाचे असे  पंप आहेत. या क्षेत्रातील भारताचे उत्पादन व तंत्रज्ञान इतके वाढले आहे की, आता भारत आफ्रिका खंडातील व आग्नेय आशियातील देशांना पंपांची निऱ्यातही करतो. तयार होणाऱ्या पंपांत सर्वांत जास्त खप केंद्रोत्सारी पंपांचा आहे. सध्याच्या पंपांत सर्वांत मोठ्याच्या प्रदान नळाचा व्यास १५० सेंमी. असून त्याचे प्रदान ६,००० लिटर प्रती सेकंद आहे. देशात बनणाऱ्या अनेक प्रकारांच्या पंपांचा तपशील कोष्टक क्र. १ मध्ये दिला आहे.

मोठ्या कारखान्यांच्या पंपाच्या उत्पादनाचे आकडे कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहेत. त्यात अर्थातच सर्व जातींचे पंप समाविष्ट आहेत. यातील ९५% उत्पादन शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांचे आहे.

कोष्टक क्र.२. भारतातील पंपाचे उत्पादन (संघटीत कारखाने) 

वर्ष 

पंप(नगरसंख्या) 

किंमत (कोटी रु.) 

१९७२ 

३,०३,६६८ 

— 

१९७३ 

३,३५,४१६ 

२१·८३ 

१९७४ 

२,७२,७४९ 

२५·८३ 

१९७५ 

२,९०,००० 

२५·१८ 

मोठ्या, मध्यम व लघू क्षेत्रांतील कारखान्यांतून मिळून सु. ६ लक्ष पंप प्रतिवर्षी तयार होतात असा अंदाज आहे.

कोष्टक क्र. ३भारताची पंपांची निर्यात. 

वर्ष 

किंमत (कोटी रु.) 

१९७२ 

— 

१९७३ 

२१·८३ 

१९७४ 

२५·८३ 

१९७५ 

२५·१८ 

भारतातून होणाऱ्या पंपांच्या निऱ्यातीविषयी कोष्टक क्र. ३ वरून कल्पना येईल.

इ. स. १९७७ मध्ये भारतात ५३ मोठे का र खा ने आणि सु. ४०० लहान कारखाने पंप त या र क री त होते. यां पै की २० हून जास्त कारखानदार पंपाची निऱ्यात सातत्याने करतात. सामान्यतः डीझेल पंप संच, केंद्रोत्सारी पंप, टरबाइनपंप, विद्युत् पंप संच इ. निऱ्यात करतात. डीझेल पंप संच बांगला देश, इराण, लिबिया, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमीर राज्ये व नायजेरिया केंद्रोत्सारी पंप व सुटे भाग सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, बांगला देश व सूदान टरबाइन पंप संयुक्त अरब अमीर राज्ये, द. येमेन, मलेशिया, बांगला देश, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान व यूगोस्लाव्हिया विद्युत् पंप सिंगापूर, सूदान, ब्रह्मदेश, सिरिया, थायलंड, मलेशिया तसेच ब्रिटन व इतर यूरोपीय देशांत निऱ्यात केले जातात. तसेच काही भारतीय कारखानदारांनी मलेशिया, मॉरिशाससारख्या इतर देशांत उत्पादनही सुरू केले आहे. निऱ्यातीचे वरील आकडे लहान वाटले, तरी प्रगत देशांच्या मालाशी होणाऱ्या स्पर्धेत भारतीय पंप टिकाव धरू शकतात, हे त्यातून सिद्ध झाले आहे.

प्रमुख कारखाने : भारतात सांप्रत बहुतेक सर्व प्रकारचे पंप तयार होतात हे कोष्टक क्र. १ वरून दिसून येते. आयातही फक्त अत्याधुनिक व अजस्त्र शक्तीच्या पंपांपुरतीच मऱ्यादित आहे. देशातील महत्त्वाचे कारखाने (कंपन्या) पुढे दिले आहेत (१९७१).

(अ) वार्षिक १०,००० (जास्त करून केंद्रोत्सारी). पंपांपेक्षा अधिक क्षमतेचे : (१) किर्लोस्कर ब्रदर्स लि., पुणे  कारखाने–किर्लोस्करवाडी व देवास (२) दंडायुधपाणी फाउंड्री लि., कोईमतूर (३) पी. एस‌्. अँड सन्स, कोईमतूर (४) बेस्ट अँड कं. लि., मद्रास (५) ब्रिटिश इलेक्ट्रिकल पंप लि., कलकत्ता (६) फोर्ज अँड ब्लोअर कं. लि., अहमदाबाद व (७) ज्योति लि., बडोदे.

(आ) वार्षिक ३,००० पंपांपेक्षा अधिक क्षमतेचे : (१) मॉडर्न एंजिनिअरिंग अँड मोल्डिंग कंपनी लि., अहमदाबाद (२) विजय फाऊंड्री लि., कोईमतूर (३) सुबय्या फाऊंड्री लि., कोईमतूर

(इ) पश्चाग्र गतीच्या प्रकार पंपांना सर्वांत कमी मागणी असते. हे पंप तयार करणारी कंपनी एकच आहे व ती म्हणजे शुक्ल मानसेत इंडस्ट्रीज लि., मुंबई. या कंपनीचे वार्षिक उत्पादन ७०० पंप आहे.

(ई) नलिका कूपातून पाणी काढण्याचे टरबाइन पंप पुष्कळ कंपन्या तयार करतात. त्यांतील काही महत्त्वाच्या पुढील आहेत : (१) ज्योति लि. बडोदे (२) जॉनस्टन पंप इंडिया लि., कलकत्ता (३) मॅकनील बेरी अँड कं. लि., मुंबई (४) गार्डन रीच वर्कशॉप, कलकत्ता (५) मोदी ब्रदर्स लि., मुंबई (६) रस्टन अँड हार्न्स्बी (इंडिया) लि. मुंबई (७) किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्करवाडी (८) डेल्टा एंजिनिअरिंग वर्क्स लि., मीरत.

(उ) पेट्रोल वगैरे वितरणाचे पंप बनविणाऱ्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत कंसात वार्षिक उत्पादन दिले आहे : (१) ताहिरा इंडस्ट्रीज (१,२००) (२) लार्सन अँड टुब्रो लि. (७५०) (३) मर्कन्टाइल इंडस्ट्रियल कॉरे (७२०). या सर्व कंपन्या मुंबईतील आहेत.

किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीच्या किर्लोस्करवाडी येथील कारखान्यात १९२५ च्या सुमारास विहिरीवरील हातपंप बनविले जात होते. हे पंप रावी, गंगा व कावेरी या नावांनी बाजारात विकले जात असत. यानंतर या कारखान्यात केंद्रोत्सारी पंप तयार होऊ लागले. सध्या या कंपनीच्या कारखान्यात पुष्कळ प्रकारांचे पंप बनविले जात आहेत. त्यांत पुढील प्रकारांचा समावेश आहे : (१) निर्वात पंप, (२) खाण पंप, (३) वाफकांचे संभरण पंप, (४) गाळ काढण्याचे, (५) सिंचाई पंप, (६) पाणीपुरवठा व्यवस्थेतील, (७) कागद, सिमेंट, साखर, खनिज तेल, रसायन यांसारख्या प्रक्रियाप्रमुख उद्योगांत लागणारे पंप, अंतर्ज्वलन एंजिनांत लागणारे वंगण तेलाचे पंप इंडइक्विप प्रा. लि.,मुंबई (प्रतिवर्षी ७,२००)ही कंपनी बनविते.

पंप बनवणाऱ्या प्रमुख कारखान्यांची राज्यवार संख्या पुढीलप्रमाणे आहे : तमिळनाडू २१, महाराष्ट्र २१, प. बंगाल १०, गुजरात ४, दिल्ली व उ. प्रदेश ४, आंध्र प्रदेश १ आणि केरळ १. 

संदर्भ : 1. Addison, H. A Treatise on Applied Hydraulics, Aberdeen, 1969.

    2. Addison, H. Pump Users Handbook, London, 1958.

    3. C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products, Vol. VII, New Delhi, 1971.

    4. Kristal, F. A. Annet, F.A. Pumps, Types, Selection, Installation, Operation and Maintenance, New York, 1953.

    5. Stepanoff, A. J. Centrifugal and Axial Flow Pumps : Theory, Design and Application, New York, 1957.

    6. पिंपळे, अ. वि. जलयंत्रे, नागपूर, १९७४.

फाटक, श. ग. ओगले, कृ. ह.