पंचजन :वैदिक वाङ्मयात पंचजन किंवा त्यांच्या समानार्थक पंच मानव, पंच कृष्ट्यः, पंच क्षितयः, पंच चर्षण्यः इ. उल्लेख अनेक ठिकाणी येतात पण त्यांच्या योगे नक्की कोणते पाच जन विवक्षित होते, हा प्रश्न वादग्रस्त झाला आहे. ऐतरेय ब्राह्मणात (१) देव, (२) मनुष्य, (३) गंधर्व व अप्सरा, (४) सर्प आणि (५) पितर हे पंचजन, असे म्हटले आहे. औपमन्यव ऋषीच्या मते, चार वर्ण आणि निषाद हे या संज्ञेने विवक्षित आहेत. हे मत सायणाचार्यांस मान्य होते. कै. सातवळेकरांनी पंचजन म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे, पण थोडा फरक करून बहुजन किंवा आम जनता असा अर्थ केला आणि अत्री ऋषीने या पंचजनांसाठी घेतलेले कारवासादी कष्ट यांचा संबंध जोडला आहे. यास्काचार्यांच्या मते, गंधर्व, पितर, देव, असुर आणि राक्षस हे पंचजन होते परंतु ऋग्वेदातील त्यांची वर्णने या मताच्या विरुद्ध जातात. पंचजनांमध्ये सोम असतो, पंचजन सरस्वती नदीच्या काठी आहेत, इंद्र हा पांचजन्य (पाच जनांचा) आहे इ. विधानांवरून, पंचजन या संज्ञेने अनु, द्रुह्यु, यदु, तुर्वश आणि पुरु हे ऋग्वेदातील काही सूक्तांत एकत्र निर्दिष्ट केलेले पाच आर्यवंश अभिप्रेत असावेत, हे मत सर्वांत सयुक्तिक वाटते. शतपथ ब्राह्मण आणि ऐतरेय ब्राह्मण यांत पंचजन हे भरतांचे विरोधी होते, असे म्हटले आहे, ऋग्वेदातील दाशराज्ञ युद्धाच्या वर्णनात हीच परिस्थिती आढळते.
मिराशी, वा. वि.