हिमाचल प्रदेश विद्यापीठ : हिमाचल प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. २० जुलै १९७० रोजी स्थापना. सिमला येथे निसर्गरम्य ठिकाणी सु. ८० हेक्टर परिसरात विद्यापीठाचे मुख्यालय वसले आहे. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक आणि संलग्नक आहे. विज्ञान, कला, सामाजिकशास्त्रे आणि भाषा या विद्याशाखांतर्गत वेगवेगळ्या विषयांचे २९ विभाग येथे आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यभर पसरले असून त्यास ३२० महाविद्यालये संलग्न आहेत. पदवी, पदव्युत्तर पदवी, एम्.फिल, पीएच्.डी. इ. अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची व मार्गदर्शनाची सुविधा विद्यापीठात आहे. कुलगुरू हा विद्यापीठाचा सवेतन सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असून राज्याचे राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती असतात.

 

परिसरातील पूर्णवेळ नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंसाठी व विशेषतः महिलांसाठी दूरस्थ शिक्षण उपलब्ध व्हावे, म्हणून विद्यापीठात दूरस्थ शिक्षण संचालनालय स्थापन करण्यात आले आहे (१९७०). नेहरू अभ्यास केंद्र, आदिवासी अभ्यासकेंद्र, विवेकानंद केंद्र, दीनदयाल उपाध्याय अध्यासन इ. विशेषेकृत अध्ययन केंद्रे विद्यापीठात आहेत. यांशिवाय हिमालयीन प्रक्षेत्रात सामरिक आणि पर्यावरणीयदृष्टीने अध्ययन आणि संशोधन करण्यासाठी विद्यापीठात एकात्मिक हिमालयीन अभ्यासकेंद्र स्थापन केले असून त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे (२००२). विद्यापीठाच्या केंद्रिय ग्रंथालयात आजमितीस २,१०,००० पुस्तके असून ३४५ नियतकालिके येथे नियमित येतात.

 

भटकर, जगतानंद