शांतिनिकेतन : भारतीय गुरुकुलपद्धतीचा शैक्षणिक महाप्रयोग जिथे साकार केला, तो परिसर. हा प्रयोग विश्वविख्यात कवी व शिक्षणमहर्षी ⇨ रवींद्रनाथ टागोर यांनी साकार केला. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर गावानजिकचा शांतिनिकेतनचा हा विस्तृत परिसर, कोलकात्याच्या पश्चिमेस सुमारे १३० कि.मी. अंतरावर आहे. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी १८६३ च्या सुमारास हा विस्तृत परिसर खरेदी करून ध्यानधारणेसाठी तेथे ‘शांतिनिकेतन’ नावाचे एक कुटीर बांधले. पुढे रवींद्रनाथांनी संवर्धित केलेले येथील शैक्षणिक संकुल त्याच नावाने ओळखले जाऊ लागले. रवींद्रनाथांनी २२ डिसेंबर १९०१ रोजी तेथे पहिली खुली आश्रमशाळा सुरू केली. याच परिसरात ⇨विश्वभारती  या संस्थेची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. पुढे शांतिनिकेतन व निकटच्या श्रीनिकेतन यांच्या परिसरातच १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठाची विधिवत स्थापना करण्यात आली.

रवींद्रनाथांना खेडुतांबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्यातून श्रीनिकेतन ही ग्रामीण जनतेसाठी कृषिशिक्षण, कुटीरोद्योग इत्यादींचे प्रशिक्षण देणारी व प्रयोग करणारी संस्था निर्माण झाली. बोलपूरजवळील सुरुल या गावी लॉर्ड सिंह यांची जमीन होती, ती विकत घेऊन तेथे १९२२ मध्ये श्रीनिकेतनचे काम सुरू झाले. गांधीजींच्या १९२१ सालच्या असहकाराच्या चळवळीची थोडीशी पार्श्वभूमी यामागे होती. श्रीनिकेतनच्या कार्यात पिअर्सन आणि लेओनार्ड एल्महर्स्ट या ध्येयवादी इंग्रजी कृषितज्ज्ञांचे साहाय्य लाभले होते. श्रीनिकेतनमध्ये मलेरिया निर्मूलनापासून अनेक कुटीरोद्योगांपर्यंत विविध उपक्रम व प्रशिक्षणाच्या सोयी तसेच प्रयोग करण्यात येत. येथील प्रशिक्षणाचा रोख ग्रामीण जनतेच्या प्रगतीवर होता. श्रीनिकेतनात रवींद्रनाथांचे नाट्यप्रयोग तसेच ऋतूंचे उत्सवही करीत असत. एकूण रवींद्रनाथांच्या सर्वांगीण शिक्षण-दृष्टीचे श्रीनिकेतन हे एक प्रतीक म्हणता येईल.

शांतिनिकेतन हे विविध विद्या-कलांच्या वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणाचे मोठे संकुल असून त्याची जडणघडण रवींद्रनाथांनी आपल्या हयातीत केली. शांतिनिकेतनच्या इतिहासात विश्वभारती विद्यापीठाचा स्थापनापूर्व सुमारे अर्ध्या शतकाचा – कालखंड (१९०१ ते १९५१) विशेष महत्त्वाचा आहे. विद्या-कलांच्या अध्यापनाचे अनेक उपक्रम आणि प्रयोग रवींद्रनाथांनी या पहिल्या कालखंडात केले. ते सर्व उपक्रम, प्रयोग व पद्धती विश्वभारती विद्यापीठाच्या स्थापनेनंतर आधुनिक विद्यापीठीय संरचनेतून नियमितपणे चालू आहेत.

भारतातील तरुणांमध्ये पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती रवींद्रनाथांना मान्य नव्हती. यासाठी प्रचलित शिक्षणपद्धतीत आमूलाग्र सुधारणा करावयास पाहिजे आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण थांबवावयास हवे, असे त्यांना वाटत होते. रवींद्रनाथांना प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचे, विशषतः ऋषिमुनींच्या गुरुकुलपद्धतीचे, विशेष आकर्षण होते. या दृष्टीने रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन येथे विद्यालयाची स्थापना केली. आपल्या शालेय जीवनातील काही कटू आठवणी लक्षात घेऊन त्यांनी शांतिनिकेतन येथे विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि आनंद मिळेल, असे वातावरण निर्माण केले. रवींद्रनाथ मुलांबरोबर खेळत असत, त्यांना गोष्टी सांगत, छडीचे अस्तित्वही जाणवू देत नसत. मुले आणि शिक्षक एकाच कुटुंबाचे घटक असल्याप्रमाणे वागत. मुलाचे मन हे बीजासारखे असून योग्य वातावरणात त्याला कोंब फुटावा, असे त्यांना वाटत असे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे आणि स्वावलंबनाचे वातावरण निर्माण केले. रवींद्रनाथांच्या शाळेत वर्गखोल्या नव्हत्या आणि बाकेही नव्हती. रवींद्रनाथांनी निवडलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, आंब्याच्या झाडाखाली मोकळ्या वातावरणात अध्ययन-अध्यापनाचे कार्य चालत असे.

रवींद्रनाथांनी एका ठिकाणी म्हटले होते की, “आमच्या दृष्टीने आदर्श अशी शाळा शहरांच्या गजबजाटापासून दूर, मोकळ्या वातावरणात, झाडांच्या छायेखाली भरेल. अध्यापक आपले अध्यापनाचे काम करत असताना अध्ययनही करतील आणि विद्यार्थी शांततेच्या वातावरणात शिकतील आणि वाढतील. शक्य तेथे विद्यालयांना जोडून बागा आणि शेते असतील. विद्यार्थी शेतीच्या कामात मदत करतील. जनावरांना चरावयास नेतील आणि गाईची धार काढतील. फुरसतीच्या वेळेत जमिनीत खड्डे घेऊन ते झाडे लावतील व त्यांना पाणी घालतील. वर्गांचे काम झाडाखाली चालेल आणि विद्यार्थी शिक्षकांबरोबर रानावनातून हिंडतील. अशामुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सानिध्य प्रस्थापित होईल. मात्र ती गोष्ट केवळ भावनिक न राहता, काम आणि कष्ट यातून साध्य होईल’’.

शांतिनिकेतन जागतिक स्तरावर एक आदर्श संस्था मानली जाते. परदेशांतील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ही संस्था म्हणजे एक आदर्श सांस्कृतिक केंद्र आहे. शांतिनिकेतनच्या उभारणीत रवींद्रनाथांनी सी. एफ. अँड्र्यूज आणि डब्ल्यू, डब्ल्यू, पिअर्सन या दोन शिक्षणतज्ज्ञांचे साहाय्य घेतले. डिसेंबर १९२१ मध्ये रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन येथील शाळेचे विश्वभारती या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात रूपांतर केले. अभ्यास आणि संशोधन या माध्यमांद्वारे पूर्वेकडील देशांच्या संस्कृतींची एकात्मता साधणे, हे विश्वभारतीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. आशिया खंडातील एकात्म सांस्कृतिक विचाराच्या माध्यमातून पश्चिमेकडील संस्कृती समजावून घेणे, हेही विश्वभारतीचे उद्दिष्ट होते. हे करण्याने पूर्व-पश्चिमेमध्ये विचारांची देवणघेवाण होईल आणि जागतिक शांततेचा मार्ग मोकळा होईल, असे रवींद्रनाथांना वाटत होते. १९६०च्या कायद्याप्रमाणे विश्वभारती ही संस्था ‘सार्वजनिक संस्था’ म्हणून नोंदण्यात आली.

ललित कला व त्यांच्याशी संबंधित अनेक विषय येथे शिकविण्यात येतात. तसेच वेदवाङ्‌मय, प्राचीन संस्कृत व बौद्ध वाङ्‌मय तसेच संस्कृत, प्राकृत, पाली, तिबेटी, चिनी भाषा यांची प्रगत केंद्रे येथे सुरू करण्यात आली. १९२७ मध्ये हैदराबाद संस्थानच्या निजामाने दिलेल्या देणगीतून इस्लामिक अभ्यासाचे केंद्र सुरू झाले. मुंबईच्या पारशी जमातीने दिलेल्या देणग्यांतून येथे एक कायमचे ‘झोरोस्ट्रिअन’ अभ्यास-केंद्र सुरू झाले. अनेक विभागांबरोबर शांतिनिकेतनमध्ये पाठ भवन (शाळा), शिक्षा भवन (महाविद्यालय), विद्या भवन (संशोधन संस्था), चिना भवन (भारत-चीन अभ्यास केंद्र), कला भवन ( कला आणि हस्तव्यवसाय केंद्र) आणि संगीत भवन (संगीत आणि नृत्य केंद्र) इ. प्रगत शिक्षणविभाग आहेत.

रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन येथे असलेली जमीन, इमारती, ग्रंथालय इत्यादींचा न्याय बनविला व त्या न्यासास स्वतःचे नोबेल पारितोषिकाचे पैसे, त्यांच्या बंगाली तसेच इंग्रजी पुस्तकांच्या विक्रीचे पैसे व मानधन देणगी म्हणून दिले. काही वर्षांनी शांतिनिकेतनमध्ये ग्रामीण पुनर्रचना विभाग `श्रीनिकेतन’ नावाने जोडण्यात आला. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रयोग करावेत व त्यांची फलिते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावीत अशी अपेक्षा आहे. तसेच कृषी आणि पशुपालन यांबाबतीत विद्यार्थ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हावा, म्हणून हा विभागच प्रयत्नशील आहे.

विश्वभारती येथील जीवन-पद्धती आदर्श आहे. तसेच विद्यार्थ्यांचा दिनक्रमही ठरलेला असतो. शिक्षक-विद्यार्थी एकत्र खेळ खेळतात. येथील वसतिगृहे वैशिष्ट्यपूर्ण असतात. ‘विचार-स्वातंत्र्य’ हे शांतिनिकेतनचे वैशिष्ट्य आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांना सामूहिक जीवनाचा आनंद मिळतो. शांतिनिकेतनमध्ये धर्म, वंश, जात, स्त्री-पुरुष या प्रकारचे भेदाभेद मानत नाहीत. दर बुधवारी विश्वभारतीच्या सर्व संस्था बंद असतात. हा प्रार्थना दिवस असतो. विश्वभारतीचे स्वतःचे नियतकालिक आहे. येथे एक समृद्ध ग्रंथालय, उत्तम वैद्यकीय व्यवस्था असलेला दवाखाना, सुसज्ज अभ्यागतगृह इ. सुविधा आहेत. येथे नेहमी संगीत, नृत्य आणि नाट्याचे सामूहिक कार्यक्रम होतात.

विसाव्या शतकात शांतिनिकेतनची सतत प्रगती व भरभराट होत गेली. शांतिनिकेतनच ही एक जीवनशैली आहे आणि भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याचे काम ती अव्याहतपणे करीत आहे.

पहा : टागोर, रवींद्रनाथ.

गोगटे, श्री. ब. जाधव रा.ग.