हिमाचल प्रदेश : हिमालयाच्या कुशीतील एक भारतीय घटक राज्य. त्याचा विस्तार ३०° ते ३३° उत्तर अक्षांश आणि ७६°३५’ ते ७९° पूर्व रेखांश या दरम्यान आहे. क्षेत्रफळ ५५,६७३ चौ.किमी. लोकसंख्या ६८,५६,५०९ (२०११). याच्या उत्तरेस जम्मू व काश्मीर, पश्चिमेस पंजाब, नैर्ऋत्येस हरयाणा, दक्षिणेस उत्तर प्रदेश, आग्नेयीस उत्तरा-खंड ही राज्ये आणि पूर्वेस तिबेट हा चीनचा स्वायत्त विभाग आहे. सिमला (शिमला, लोकसंख्या १,४४,९००-२०११) ही हिमाचल प्रदेशाची राजधानी आहे. राज्यातील ते सर्वांत मोठे व थंड हवेचे आरोग्यधाम आहे.

भूवर्णन : हिमालयातील स्थानामुळे हिमाचल प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेत टोकाची तफावत आढळते. छायामय दऱ्या व खोरी, खडबडीत सुळके, हिमनद्या, अफाट पाइन वने, खळखळाट करत वाहणाऱ्याद्या, समृद्ध वनस्पती व प्राणिजीवन ही वैशिष्टपूर्ण भूदृश्ये हिमाचल प्रदेशराज्यात आढळतात. येथील खोल दरी प्रदेशातील सस.पासूनची किमान उंची ३०० मी. असून ती कमाल ८,५९८ मी.पर्यंत वाढत गेलेली आढळते. हिमालयाच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या व एकमेकींना समांतर असणाऱ्या तीन प्रमुख पर्वतश्रेण्या येथे आढळतात. प्राकृतिक दृष्ट्या त्यांपैकी सर्वांत उत्तरेकडील श्रेणीला ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री, मधल्या श्रेणीला लोअर हिमालय किंवा हिमाचल आणि हिमालयाच्या पायथ्याकडील श्रेणीला शिवालिक टेकड्या किंवा आउटर हिमालय म्हणतात. हिमाद्री पर्वतश्रेणीतील झास्कार पर्वतश्रेणी सर्वांत उंच असून तिची सस.पासून उंची सु. ८,००० मी. आहे. त्यातून अनेक हिमनद्या वाहतात आणि हा भूप्रदेश बाराही महिने बर्फाच्छादित असतो. येथे माणसांची किंवा पशुपक्ष्यांचीही वसती नाही. लेसर हिमालय किंवा हिमाचल पर्वतश्रेणीची सरासरी उंची ४,५०० मी. आहे. या पर्वतश्रेणीत धवलधार व पीरपंजाल या पर्वतरांगा असून या भागाला अल्पाइन विभाग असेही म्हणतात. या प्रदेशाच्या दक्षिणेला पंजाबच्या पठाराजवळ शिवालिक टेकड्या असून ह्या आउटर हिमालयाची सस.पासून उंची ९०० ते १,५०० मी. आहे. या पर्वतराजीच्या उत्तरेकडील सांरचनिक खोऱ्यातील समांतर पर्वतश्रेणींना दून (डून) म्हणतात. या दूनपैकी डेहरा, कोहत्री, चौखंबा, पट्टी व कोटा ही प्रमुख असून डेहरा हे सर्वांत मोठे, सुपीक, चांगले जलसिंचित व विकसित आहे. त्यातून सोंग नदी वाहते. येथील खोऱ्यांमध्ये कांग्रा (कांगडा) सर्वांत मोठे खोरे असून येथे मैदानी समतल जमीन आहे. शिवाय महसू, रामपूर, स्पिती, लाहूल बास्पा ही येथील अन्य खोरी होत. राज्यात रावी, बिआस, सतलज, चिनाब आणि यमुना या प्रमुख नद्या असूनकाही सरोवरे आहेत. रावी ही कांग्रा जिल्ह्यातील धवलधार पर्वताच्या हिमाच्छादित बारा बंगहाल श्रेणीत उगम पावते, तर यमुना नदीचा प्रवाह जम्नोत्री हिमनदीतून सुरू होतो. लेसर हिमालयामधून अनेक प्रवाह यमुनेला मिळतात. चिनाब नदी पीरपंजाल आणि हिमाद्री यांमधील सांरचनिक द्रोणीमधून १६० किमी. वायव्येस वाहते. बिआस नदी गुरुदासपूरजवळ आणि सतलज भाक्राजवळ पंजाबात प्रवेश करते.

हवामान : हिमाचल प्रदेशाच्या हवामानात उंचीनुसार प्रदेशपरत्वे विविधता आढळते. अगदी उत्तरेकडील हिमाद्री पर्वतश्रेणी कायम बर्फाच्छादित असल्यामुळे तेथील हवामान अतिथंड असते. तेथील बर्फाच्या थरांची जाडी २५ ते ३० मी. आढळते मात्र लेसर हिमालय भागात हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. उंच माथ्याच्या भागात अल्पाइन किंवा आर्क्टिक प्रकारचे शीत हवामान आढळते. पंजाबच्या पठारी प्रदेशाला लागून असलेल्या शिवालिक प्रदेशात जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. तेथील सरासरी पर्जन्यमान १८३ सेंमी. असून तो मुख्यत्वे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात पडतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान २०° से. असते तर हिवाळ्यात विशेषत: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत ते ४.४° ते –६° से.पर्यंत आढळते. या काळात बर्फ पडतो, कडे कोसळतात, भूमिसर्पण होते आणि रहदारी ठप्प होते. कधीकधी उणे सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. मनाली-लेहसह अनेक राज्यमार्ग बर्फ पडल्यामुळे वाहतुकीस बंद होतात. वार्षिक जलवायुमानाचा विचार करता राज्यात उबदार व आल्हाददायक हवामान मे ते जुलैचा मध्य व सप्टेंबरचा मध्य ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा यांदरम्यान असते. दून खोऱ्यांमध्ये उन्हाळ्यात तापमान वाढते आणि सरासरी सु. २२५ सेंमी. पाऊस पडतो.

लेसर हिमालयात व शिवालिक प्रदेशात घनदाट जंगले आहेत. त्यांत देवदार, चीड (पाइन), बांज, कैल इ. वृक्ष असून पर्वतांच्या उतारावर गवताची कुरणे आढळतात. या अरण्यमय भागामुळे अरण्यावलंबी अनेक व्यवसाय तिथे चालतात. तसेच गवताच्या मुबलकतेमुळे मेंढपाळी व्यवसायही चालतो. जंगलात अस्वले, नीलगाय, चिंकारा, रानकोंबड्या, तांबडा पंडक (पँडा), खवल्या मांजर, लांडगा, हरिण, काळवीट, याक व सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. दुर्मिळ व सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हिमचित्ता येथे आढळतो. तिबेटी अरगली मेंढ्या येथे आहेत. राज्यात दोन राष्ट्रीय उद्याने आणि ३२ वन्य जीव अभयारण्ये आहेत.

इतिहास : या पर्वतीय राज्याचा इतिहास गुंतागुंतीचा व पंजाब राज्याच्या ऐतिहासिक घडामोडींशी संलग्न आहे. वेद काळात (इ. स. पू. १५००– ५००) येथे आर्यांनी वसती केली होती व पुढे ते येथील मूळ रहिवाशांत सात्मीकृत झाले. त्यानंतर मौर्य साम्राज्य काळात (इ. स. पू. ३२१–१८५), गुप्त काळात (३२०–५५५) आणि मोगल काळात (१५२६–१७६१) हा प्रदेश त्यांच्या अखत्यारीत होता. मोगल सत्तेच्या र्‍हासानंतर लडाखच्या राजांनी त्यावर अधिसत्ता प्रस्थापित केली. त्यांचे नियंत्रण लाहूल व स्पिती या बौद्धधर्मीय भागांवर १८५० पर्यंत होते. तत्पूर्वी १८४० च्या सुमारास शिखांच्या अखत्यारीत गेले. त्या वेळी तेथील छोटे संस्थानिक व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवून होते आणि व्यापाऱ्यांकडून कर वसूल करीत. तत्पूर्वी गुरख्यांच्या सैन्याने १८१४ मध्ये आक्रमण करून तेथील बराच प्रदेश पादाक्रांत केला होतो परंतु सगौली करारानुसार गुरखा सैन्याने सिमल्यासह जिंकलेला सर्व प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केला. ब्रिटिशांच्या ताब्यात हा प्रदेश आल्यानंतर त्यांनी येथील समशीतोष्ण कटिबंधीय हवामान व विलोभनीय सृष्टिसौंदर्य यांचा विचार करून हिमाचल प्रदेशातील सिमल्याच्या विकासास प्रारंभ केला. ब्रिटिश निवासस्थान म्हणून मृमून नामक पहिली वास्तू १८२२ मध्ये बांधली. पुढे लॉर्ड ॲमहर्स्ट (कार. १८२३–२८) याने १८२७ मध्ये एक उन्हाळी शिबिर (कॅम्प) घेतले. त्यानंतर अल्पकाळातच तेथे अनेक बंगले बांधले गेले आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरलची ती जणू उन्हाळी राजधानीच झाली. पुढे सिमल्यास एक गिरिस्थान व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली. १८६५–१९३९ दरम्यान ते ब्रिटिश भारताच्या ग्रीष्मकालीन राजधानीचे ठिकाण होते. तिबेटचा दर्जा व त्याच्या सरहद्दीबाबत विचारविनिमय करण्यासाठी १९१४ मध्ये चीन, तिबेट व ग्रेट ब्रिटन यांच्या प्रतिनिधींची संयुक्त परिषद येथे भरली होती. ब्रिटिशांनी हा प्रदेश पादाक्रांत केल्यानंतर अँग्लो-शीख युद्धे (१८४५–१८५०) सुरू झाली. त्यांत शिखांचा पराभव होऊन सतलज व बिआस यांमधील प्रदेश कायमचा इंग्रजांना मिळाला. स्वातंत्र्यानंतर १९४८ ते १९७१ दरम्यान हिमाचल प्रदेशाच्या आकारात आणि प्रशासनात अनेक बदल झाले. एप्रिल १९४८ मध्ये हिमाचल प्रदेश या नावाने केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात येऊन त्यात सु. २७,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापलेल्या भूतपूर्व ३० संस्थानांचा समावेश करण्यात आला. पुढे १९५४ मध्ये त्या प्रदेशात ‘क’ दर्जा असलेल्या बिलासपूर संस्थानचा भूप्रदेश अंतर्भूत करण्यात आल्याने या केंद्रशासित प्रदेशाचे क्षेत्रफळ २८, २४१ चौ.किमी. झाले. १९६६ पर्यंत त्याची हीच स्थिती राहिली. राज्य पुनर्रचनेनुसार १९६६ मध्ये पंजाब प्रांतातील काही पर्वतीय प्रदेशाचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे हिमाचल प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ ५५,६७३ चौ. किमी. झाले. २५ जानेवारी १९७१ रोजी हिमाचल प्रदेश हे भारतातील अठरावे राज्य म्हणून अस्तित्वात आले. १ सप्टेंबर १९७२ रोजी राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचना करण्यात येऊन सोलन, हमीरपूर व उना या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. १९४० पासून हिमाचल प्रदेशाच्या स्वयंशासित राज्यासाठी चळवळ करणारे वाय्. एस्. परमार हे हिमाचल प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले (१९७२).

राज्यव्यवस्था : सांप्रत हिमाचल प्रदेश राज्यात बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांग्रा, किन्नौर, कुलू, लाहूल व स्पिती, मंडी, सिमला, सिरमौर, सोलन व उना असे बारा जिल्हे आहेत. ते भारतीय संघराज्यातील एक घटकराज्य असल्यामुळे राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालांच्या संमतीनुसार विधिमंडळाला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ राज्यकारभार पाहते. राज्यात ६८ सदस्यांचे एकसदनी विधिमंडळ असून लोकसभेवर राज्यातून ४ सदस्य व राज्यसभेवर ३ सदस्य निवडून दिले जातात. भारतीय जनता पक्ष, इंदिरा काँग्रेस पक्ष, हिमाचल विकास काँग्रेस, लोक जनशक्ती, लोकतांत्रिक मोर्चा हे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष होत. सांप्रत भारतीय जनता पक्षाची सत्ता तिथे असून प्रेमकुमार धुमल हे मुख्यमंत्री आहेत. राज्याने त्रिसूत्री पद्धतीची पंचायत राज्याची योजना स्वीकारली असून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व पंचायती ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचे कार्य करीत आहेत.


आर्थिक स्थिती : राज्यातील बहुतेक लोक (सु. ७१ टक्के) शेती करतात. काही पशुपालन, उद्यानविज्ञानात आणि वनविद्येत कार्यरत असलेले आढळतात. शिवालिक पर्वतश्रेणीतील जमिनीची धूप आणि डोंगरी कड्यांची पडझड यांच्याशी मुकाबला करण्यासाठी आणि परिसंस्था विकासासाठी राज्यशासन पुनर्वृक्षारोपण करून हा भूभाग वनाच्छादित करण्याचा कार्यक्रम राबवीत आहे. गाडी (गद्दी) पशुपालक ऋतुपरत्वे गवताळ प्रदेशातून भ्रमंती करतात. येथील जमीन बऱ्यापैकी सुपीक असून पाण्याची सोय असल्यास तिच्यात चांगली पिके येतात. कांग्रा खोऱ्यात गहू, जव, चणा, मटार, मका, धान व सर्व प्रकारच्या डाळी पिकतात. उंच पहाडी प्रदेशतील शेती ही पायऱ्यापायऱ्यांची सोपान असून ती अत्यंत कष्टमय असते. त्यात धान, मका, गहू, उडीद, राजमा, बटाटे, आले, ओगला, फाफर ही बारीक धान्ये, तसेच राई, सरसू इ. पिके होतात. स्थलांतरित (झूम) शेतीही येथे केली जाते. येथील राजमा आकाराने मोठा व स्वादिष्ट असतो. बियाणे म्हणून त्याची निर्यात होते. शेतीपेक्षा फळबागांना येथील हवामान अनुकूल असून मेहनत कमी लागते. सांप्रत राज्यात वीस निरनिराळ्या जातीची सफरचंदे होतात. कोटगढ हे सफरचंदाचे आगर असून कुलूखोरेही सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सफरचंदे पिकून तयार होतात पण उंच पहाडी प्रदेशातील थंड हवेमुळे ती अनेक दिवस टिकतात. किन्नौर जिल्ह्यात उत्तम प्रकारची द्राक्षे, अंजीर, पीच (सप्ताळू), अलुबुखार,अक्रोड, चिलगोझे इत्यादी फळे होतात. कांग्रा जिल्ह्यात आंबे, पेरू, केळी, प्येअर, संत्री इ. फळे खूप होतात. यांशिवाय येथे आडू, अलूचा, चेरी, चूली, जरदाळू, लिंबू जातीची फळे, लिटशी, स्ट्रॉबेरी, बेशमी इ. फळे तयार होतात. राज्यशासन फळबागांना सर्वतोपरी मदत करत असून ती टिकण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था करीत असते. फळांवर प्रक्रिया करण्याचा उद्योगही चालतो. सफरचंदांची अन्य राज्यांत निर्यात होते. राज्यातील उद्यान शेतीच्या एकात्मिक विकासासाठी उद्यानविज्ञान तंत्रविद्या मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या कृषी-जलवायुमानीय विभागांत चार प्रकर्ष केंद्रे निर्माण करण्यात आली असून तेथे पर्जन्यजल साठवण, गांडूळ खत, हरितगृहे, सेंद्रिय शेती व कृषी यांत्रिकीकरण इत्यादी सर्वसाधारण सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेत मागास आणि प्रगत विभागांचा योग्य तो समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. येथे अनेक प्रकारचे कुटीरउद्योग चालतात. त्यांपैकी जंगलातील मध गोळा करण्याचा व्यवसायसुद्धा येथे वाढत आहे. लोकर काढून त्याचे कापड विणणे, हा येथील व्यापक कुटीरउद्योग असून घराघरांतून तो चालतो. जंगलातील लाकूड तोडणे, त्याचे ओंडके कापणे आणि ते नद्यांतून वाहून वखारीत नेणे या कामातही अनेक लोक गुंतलेले आढळतात. चीडाच्या वृक्षापासून डिंकासारखा गंदा बरोजा नावाचा एक पदार्थ निघतो. तो विकण्याचाही धंदा चालतो.

प्रदूषण विरहित पर्यावरण, मुबलक वीज पुरवठा, वेगाने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा, शांततामय वातावरण, शासनाचा अनुकूल प्रतिसाद आणि सकारात्मक प्रशासकीय धोरण यांमुळे राज्याकडे उद्योगधंदे आकर्षित होत आहेत. राज्यात ३४९ मोठे व मध्यम उद्योग आणि ३३, २८४ लघुउद्योग असून त्यांमुळे दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येथे कृषिव्यवसायाला साहाय्यक अवजारे निर्मितीचा व्यवसाय मोठा आहे. टर्पेन्टाईन व रेझीन निर्मिती नाहन येथे टेलिव्हीजन संच, जोरखते, बीअर आणि मद्ये सोलन येथे सिमेंट राजबन येथे फळांची प्रक्रिया यंत्रणा पार्वानू येथे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सिमल्याजवळ बनविल्या जातात. राज्यशासनाने जलशक्तीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून खनिजद्रव्ये आणि लाकूड यांच्या उद्योगांना चालना दिलेली आहे. राज्यात सैंधव, स्लेट, जिप्सम, चुनखडी, पायराइट, डोलोमाइट, बॅराइट वगैरे खनिजद्रव्ये सापडतात. राज्यातील चिनाब, रावी, बिआस, सतलज व यमुना या नद्यांच्या खोऱ्यांना मिळून सु. २३,२३० मेवॉ. अशी फार मोठी जलविद्युतशक्ती निर्माणक्षमता आहे. यापैकी प्रत्यक्षात ६,४८० मेवॉ. इतकी वीज निर्माण केली जाते (२०११). शासनाने वीज निर्मिती विकास कार्यक्रमावर अधिक भर दिला असून देशातील ‘वीज राज्य’ बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्यातील सर्व खेड्यांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून उर्वरित वाड्यांचेही विद्युतीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ग्राहकांना वाजवी दरात वीजपुरवठा केला जात असून औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला विपुल प्रमाणात वीज पुरविली जाते. जोगिंदरनगर येथे उहल या बिआसच्या उपनदीवर जलविद्युतनिर्मितीकेंद्र असून याशिवाय सतलजवरील भाक्रा धरण, बिआसच्या उपनदीवरील पोंग धरण आणि सिरमौर जिल्ह्यातील गिरी नदीप्रकल्प यांतून राज्याची २० टक्के जलविद्युतनिर्मिती होते. सिमला जिल्ह्यात केंद्रशासन व राज्यशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाथपा झाकरी जलविद्युत् प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

पर्वतीय प्रदेशातील विखुरलेल्या वस्तीमुळे राज्यात रस्ते वाहतुकीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्या दृष्टीने सर्व उत्पादक प्रदेश बाजारपेठांशी जोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत तातडीने रस्ते काढण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेशाच्या निर्मितीच्या वेळी (१९४८) येथे फक्त २८८ किमी. लांबीचे रस्ते होते. सन २०१० मध्ये ही लांबी ३३,१७१ किमी.पर्यंत वाढली. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी १,७५३ किमी. आहे (२०१४). उना हे एकमेव रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून पठाणकोट ते जोगिंदरनगर आणि काल्का ते सिमला हे दोन अरुंदमापी लोहमार्ग आहेत. राज्यात भुंतर (कुलूखोरे), जुब्बरहट्टी (सिमला) आणि गग्गल (कांग्रा) हे तीन विमानतळ आहेत. 

लोक व समाजजीवन : राज्याची एकूण लोकसंख्या ६८,५६,५०९ (२०११) होती. त्यांपैकी पुरुष ३४,७३,८९२ आणि स्त्रिया ३३,८२,६१७ असून दर चौ.किमी. लोकसंख्येची घनता १२३ होती. राज्यात शहरीकरणाचे प्रमाण १०% असून लोकसंख्या मुख्यत्वे गद्दी, किन्नर, गुज्जर, पंगवाल आणि लाहुली या पाच समूहांत विभागलेली आहे. साक्षरतेचे प्रमाण ८३.७८% आढळते. त्यांपैकी महिला ७६.६०% व पुरुष ९०.८३% साक्षर आहेत. हिंदू धर्मीयांचे प्रयाण अधिक असून काही बौद्ध, शीख, इस्लाम व ख्रिश्‍चन धर्मीयही आहेत. राज्यात पहाडी, हिंदी, पंजाबी आणि किन्नौरी या भाषा बोलल्या जातात. हिमाचल प्रदेश हे एक राज्य असले, तरी प्रदेशपरत्वे निरनिराळ्या भागांतील लोकांची वेशभूषा, खाणेपिणे व रीतिरिवाज भिन्न आहेत. कांग्रा व सिरमौर जिल्ह्यांतील हवामान उबदार आहे. तेथील लोक सुती कपडे वापरतात परंतु लाहुल-स्पिती व किन्नौर यांसारख्या पहाडी प्रदेशांतील हवामान फार थंड असते. तेथील लोक बाराही महिने गरम कपडे घालतात. मात्र राज्यातील बहुतेक सर्व स्त्री-पुरुष विशेष प्रकारची लोकरी टोपी वापरतात. त्यांच्या भाषेवर तिबेटीचा प्रभाव असून रीतिरिवाजांवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. बौद्ध तांत्रिकांचा ‘ओम मणिपद्मे हुमङ’ हा मंत्र किन्नरांमध्ये प्रचलित असून लामा हा त्यांचा मुख्य पुरोहित असतो. सिमला, मंडी व कुलू भागांतील लोक उन्हाळ्यात किन्नौर-लाहुल या थंड प्रदेशात आपल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन जातात व हिवाळ्यात कांग्राच्या मैदानी प्रदेशात परततात. येथील सामान्य लोकांचे खाणेपिणे साधे असून भात, जव, मक्याची रोटी, डाळ, भाजी असा आहार असतो मात्र लुगडी नामक देशी दारू बहुतेक सर्व लोक पितात. खेड्यातील घरे दुमजली, स्लेट दगडाची व गवती छपरांची वा कौलारू असून खालच्या मजल्यावर जनावरे-मेंढ्या बांधतात.

राज्यात १९६० नंतर शिक्षणात आमूलाग्र बदल झाला आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या वाढली असून विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. उच्च शिक्षणासाठी हिमाचल प्रदेश विद्यापीठाची स्थापना सिमला येथे (१९७०) झाली असून पन्नासहून अधिक महा-विद्यालये या विद्यापीठाला संलग्न आहेत. याशिवाय सिमला येथे वैद्यकीय महाविद्यालय आहे. याशिवाय उच्च कृषी शिक्षणासाठी पालमपूर येथे कृषी विद्यापीठ आणि सोलन येथे उद्यानविज्ञान व वनविज्ञान या विषयांची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. सिमला येथे प्रगत अध्ययनासाठी ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी’ ही संस्था असून तेथे संशोधनात्मक कार्य चालते. अशाच प्रकारची दुसरी एक संशोधनात्मक द सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटक ‘सौली या ठिकाणी आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैव-तंत्रज्ञान क्षेत्राचाही येथे विकास केला जात आहे.


कला व संस्कृती : हिंदू देव-देवतांचे निवास या भूमीत आहेत, अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे या प्रदेशाला ‘देवभूमी’ किंवा ‘व्हॅली ऑफ गॉड्ज’ असे म्हणतात. राज्यात दगडातील तसेच लाकडांत बांधलेली अनेक मंदिरे आढळतात. हिमाचलमधील अनेकविध यात्रा-जत्रा या पारंपरिक हिंदू देवतांच्या सण-उत्सवांशी निगडित असून यांतून नृत्य-संगीतादी कार्यक्रम होतात. तसेच बाजार भरतो आणि अन्य प्रदेशांतूनही लोक तेथे जमतात. अशा सणांत दसरा, शिवरात्र इत्यादी सणांना विशेष महत्त्व असते. कुलू खोरे हे जसे पाईन, देवदार वृक्षांसाठी तसेच ते रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांसाठी आणि सफरचंदांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथील दसरा उत्सव तीन-चार दिवस चालतो. रघुनाथ हा या प्रदेशातील सर्वांत मोठा व पूज्य देव आहे. यात्रेनिमित्त सामूहिक नृत्य होते. तरुण-तरुणी त्यात भाग घेतात. या वेळी मोठा व्यापार भरतो व दुरून लोक जमतात. कुलूच्या दक्षिणेला १५ किमी.वर बाजौरा गावात बशेशर महादेवाचे भव्य व जुने (आठवे शतक) मंदिर असून त्यावर शिल्पांकन आहे.

सिरमोर जिल्ह्यात रेणुका तलाव असून रेणुकेची पूजा होते. चंबा येथे शिवमंदिर असून श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी तेथे जत्रा भरते. ती श्रावण संपेपर्यंत चालते. मंडीनगरातही शिवमंदिर असून शिवरात्रीला तेथे मोठी जत्रा भरते व ती आठ दिवस चालते. या वेळी देवतांच्या प्रतिमांची पालखीतून गावभर मिरवणूक काढतात. गंगुवाल (बिलासपूर जिल्हा) गावाजवळ पहाडी शिखरावर नैना देवीचे मंदीर आहे. भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो. त्याला अन्य राज्यांतूनही लोक येतात. नलवाणीच्या व्यापारी जत्रेत पशू खरेदी-विक्री, खेळांच्या स्पर्धा व नृत्य-नाटक यांचे आयोजन करतात. किन्नौरमध्ये उरव्यांग नामक जत्रा भरते. उरव्यांग म्हणजे फुलांचा उत्सव. लोक फुलांचा शृंगार करून देवतांना फुले वाहतात. राज्यात पहाडी जत्राही भरतात. त्यांना लबीची जत्रा म्हणतात. या जत्रेत राज्यात निर्मिती झालेल्या वस्तूंची विशेषत: लोकरी शाली (पशमी), रजया, पट्टू गालिचे यांची विक्री होते. तसेच फळे, घोडे, खेचरे, याक, बकऱ्या यांचीही खरेदी-विक्री होते. हिमाचल प्रदेशात इतरत्र न आढळणारी जमलू देवता (मलाना खोरे), मनू देवता, हिडिंबा (मनालीजवळ) यांची मंदिरे आहेत. सिमला येथे श्रीराम जाखू हनुमान, श्यामला (काळी देवी) ही मंदिरे आहेत. कांग्रात वज्रेश्वरी व जवळच ज्वालामुखीचे मंदिर आहे.

यात्रा-जत्रेतील नृत्य-गायनादी उपक्रमांशिवाय या राज्यात काही विशिष्ट नृत्यप्रकार आढळतात. त्यांत लाहलडी नृत्य (कुलू खोरे) तरुण-तरुणी सवाल-जवाबाद्वारे सादर करतात तर मालानामक नृत्यात मुली एक ओळ गातात आणि मुले वा पुरुष पुढील ओळ गातात. येथे नाट्टी नावाचे नृत्य प्रसिद्ध आहे. तसेच गद्दी, किन्नर वगैरे जमातींची सामूहिक नृत्ये प्रसिद्ध आहेत. गद्दी, किन्नर वगैरे जमातींची सामूहिक नृत्ये प्रसंगोपात्त आढळतात. त्यांतील लोकगीते ही विशेषकरून प्रणय आणि त्यातील विरह या विषयांशी निगडित असतात. हिमाचल प्रदेशात ५५ नगरे असून त्यांपैकी सिमला हेच सर्वार्थाने शहर आहे. उर्वरित नगरांत बिलासपूर, चंबा, कसौली, कुलू, मण्डी, नाहन, पालमपूर, सोलन आणि सुंदरनगर ही महत्त्वाची आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून या व्यवसायाचा येथे बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्या दृष्टीने शासनाने विविध पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपयोगांच्या सेवा, वेगवेगळ्या वाहतूक सुविधा, रस्ते, विमानतळ, संदेशवहन, पाणीपुरवठा, पुरेसा वीजपुरवठा, नागरी सुखसोयी, मनोरंजनाची साधने इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही या व्यवसायाच्या विकासास फार मोठा वाव आहे. बारमाही पर्यटन चालू राहण्याच्या दृष्टीने राज्यशासन प्रयत्नशील आहे. पर्यटन व्यवसायाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरणाला हानी न पोहोचता पर्यटनाशी निगडित पायाभूत सुविधा उभारण्यास खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याविषयी राज्यशासन सकारात्मक विचार करीत आहे. हिमाच्छादित हिमालयीन शिखरे, उष्ण पाण्याचे झरे, नैसर्गिक व मानवनिर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक व मानवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्थळे इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळांना भेट देतात. इतिहासाशी निगडित पर्यटन, ग्राम पर्यटन, तीर्थयात्रा पर्यटन, जनजाती क्षेत्र पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन, आरोग्य पर्यटन, वन्यजीव पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाच्या विकासावर शासनाचा भर आहे. येथील सिमला, कुलू, धरमशाला, डलहौसी, कांग्रा, पालमपूर, मनाली, नग्गर, मलाना ही गावे तेथील काही ना काही वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. यांपैकी डलहौसी, सिमला व मनाली ही थंड हवेची गिरिस्थाने असून उन्हाळ्यात अनेक पर्यटक त्यांना भेट देतात. सिमला या राजधानीत वस्तुसंग्रहालय, वनस्पतिउद्यान, हिमालयन पक्षी उद्यान, जुने चर्च, श्री गुरुसिंग सभा, गुरुद्वार इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील बाजारपेठ शाली, रजया, पट्टू, गालिचे नमदा, गुदमा, थोबी गालिचे (मेंढीच्या केसांचे), पुल्ला पादत्राणे (स्ट्रॉ शूज) इत्यादी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. पालमपूर हे चीड वृक्षाची जंगले व चहाच्या मळ्यांसाठी ख्यातनाम आहे. नग्गर येथे जुना राजवाडा व प्राचीन मंदिरे आहेत. मलाना येथे रंगीबेरंगी नैसर्गिक फुलांचे ताटवे असून औषधी वनस्पतींसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. धरमशाला हे दलाई लामांचे निवासस्थान होय. यांशिवाय राज्यात रोहतांग खिंड, कुफ्री-हिमालयन नेचर पार्क, रेणुका सरोवर, रेवल्सर-मण्डी धरण, गोविंद सागर इत्यादी निसर्गसुंदर ठिकाणे आहेत.

देशपांडे, सु. र


हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेश
धरमशाला येथील क्रिकेटचे मैदान बर्फावरील खेळांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण, गुलाबा, रोहतांग.
तुप्चिलिंग येथील प्रसिद्ध गंधोला बौद्धमठ, लाहूल खोरे. सिमला शहराचे दृश्य
.
पारंपरिक वेशभूषेत स्पिती जमातीच्या स्त्रिया दसरा महोत्सवाचे दृश्य, सिमला.
राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या-पाऱ्यांची शेती सिमला-कालका रेल्वेमार्गावरील वैशिष्ट्यपूर्ण सेतू