हिममानव : (यती) . मोठ्या आकारमानाच्या, शरीरावर केस असणाऱ्या अर्धकपि-अर्धमानवासारख्या दिसणाऱ्या आणि हिमालयात हिमरेषेवरील बर्फाळ भागात आढळल्याची नोंद असणाऱ्या प्राण्यास हिममानव असे म्हणतात. यासारखे काही प्राणी जगाच्या विविध दुर्गम भागांत आढळल्याची ऐकीव उदाहरणे आहेत. यांमध्ये प्रामुख्यानेहिमालयातील बर्फाच्छादित पर्वतरांगा, सिक्कीम, तिबेट व नेपाळच्या जंगल भागात आढळणारे यती, ऑस्ट्रेलियातील युवी, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पश्चिम भाग तसेच कॅनडा व ब्राझीलमध्ये आढळणारे मापीनगौरी (इसानशी), उत्तर अमेरिकेतील बिगफूट (मारिकोपा) चीनमधील अलमाज, केन्यातील केमोसिट, सायबीरियातील बिगफूट (च्युच्युना), व्हिएटनाममधील न्ग्वाईरुंग व सुमात्रातील पेनडेक यांचा समावेश होतो.
हिममानवास पाहिलेल्या पाश्चिमात्य व नेपाळी लोकांच्या मतानुसार मादी हिममानवामध्ये लोंबणारे स्तन असतात. नर व मादी यांच्या शरीरावर दाट केस असतात. ते दोन पायांवर चालतात. ते ज्या ठिकाणी जातातत्या ठिकाणी कस्तुरीसारखा सुगंध दरवळतो. त्याला बोलता येत नाही, परंतु तो विचित्र प्रकारचे आवाज काढतो. तो कच्चे मांस, फळे व कंदमुळे खातो.
बिगफूट, वनमानव व यती ही गूढ प्राणिविज्ञानाची उदाहरणे आहेत. या विषयास शास्त्रीय जगतात काल्पनिक वा खोटे विज्ञान (आभासी विज्ञान) समजून फार महत्त्व दिले जात नाही. हे प्राणी पाहिल्याची फारच थोडी उदाहरणे आहेत. तसेच यास शास्त्रीय व प्रत्यक्ष पुरावे फारसे उपलब्ध नाहीत. प्राण्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) व प्राणिसृष्टी यांच्या दृष्टीने अशा प्राण्यांची किंवा त्यांच्या जीवाश्मांची (शिळारूप अवेशषांची) कोठेही नोंद नाही किंवा पुरावेही नाहीत. काही व्यक्तींनी हे प्राणी पाहिल्याची ऐकीव माहिती हाच याचा आधार आहे. यामुळे प्राणिविज्ञानातील तज्ञ बिगफूट, वनमानव वा इतर प्राणी यांची दंतकथा लोकसाहित्य व इतरांना फसविण्यासाठी केलेली युक्ती यातून निर्माण झाली असावी, असे मानतात.
पाटील, चंद्रकांत प.
“