क्षेमेंद्र : (सु. ९९०–१०६६ ?) . विविध विषयांवर विपुललेखन करणारा प्रतिभासंपन्न संस्कृत पंडित. तो काश्मीरी होता. त्याचाजन्म सधन कुटुंबात झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव प्रकाशेंद्रआणि आजोबांचे सिंधू. बृहत्कथामंजरी आणि भारतमंजरी ह्या दोन ग्रंथांखेरीज त्याने सु. चाळीस ग्रंथ लिहिले आहेत. बृहत्कथामंजरी ह्या ग्रंथात तो सांगतो, की त्याने साहित्याचे अध्ययन अभिनवगुप्तांच्या पायांपाशी बसून केले. तो मूळचा शैव तथापि पुढे सोमाचार्य ह्या भागवतपंथी आचार्यां-कडून त्याने वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. त्याच्या जवळपास सगळ्या ग्रंथांतत्याने स्वतःचा निर्देश ‘व्यासदास’ असा केला आहे. राजतरंगिणीमध्येत्याच्या नृपावलि (राजावलि) ह्या ग्रंथाचा निर्देश येतो तथापि तो ग्रंथअद्याप अनुपलब्ध आहे. अलंकारशास्त्राला त्याचे योगदान फारसे झालेलेनाही आणि अलंकारशास्त्रावर त्याचा लक्षणीय असा कोणताही प्रभावपडलेला नाही. त्याच्या अन्य काही ग्रंथांचा थोडक्यात परिचय असा :

सुवृत्ततिलक (३ विन्यासांत विभागलेला ग्रंथ) मध्ये त्याने वृत्ते, त्यांचा वापर आणि कोणते कवी कोणते वृत्त उत्तम प्रकारे हाताळतात, ह्यासंबंधीची माहिती दिली आहे. उदा., अभिनंद (अनुष्टुभ), भारवी (वंशस्थ), कालिदास (मंदाक्रांता), भवभूति (शिखरिणी) . औचित्य-विचारचर्चा ह्या त्याच्या ग्रंथात त्याच्या वृत्तीसह काही कारिका, त्याचप्रमाणे विविध ग्रंथकारांच्या ग्रंथांतील उदाहरणे दिलेली आहेत. औचित्यविचारा-बद्दल त्याची भूमिका अशी होती, की औचित्य हेच रसाचे सत्त्व होय. ज्याला जे साजून दिसेल, ते उचित होय, असे आचार्यांनी म्हटले आहे. ह्या उचिताचा जो भाव त्याला औचित्य असे म्हणतात (कारिका ७). त्यानंतर पद, वाक्य, प्रबन्धार्थ, गुण (उदा., ओज), अलंकार, रसक्रिया, कारक, लिंग, वचन, उपसर्ग, काल, देश इत्यादींच्या संदर्भांत औचित्याचीउदाहरणे त्याने दिली आहेत. प्रत्येक विषयाच्या संदर्भात एक उदाहरण औचित्याचे, तर एक अनौचित्याचे अशी पद्धत त्याने अवलंबिली आहे. आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकात जे सांगितले आहे, त्याचाच सविस्तर विस्तार क्षेमेंद्राने येथे केला आहे. औचित्यविचारचर्चा ह्या ग्रंथात क्षेमेंद्राने कविकर्णिकाकाव्यालंकार ह्या आपल्या स्वतःच्या ग्रंथाचा उल्लेख केला आहे. हा ग्रंथही अद्याप उपलब्ध झालेला नाही. क्षेमेंद्राच्या कविकंठाभरण ह्या ग्रंथाचा तो एक भाग आहे, की काय हे नक्की सांगता येत नाही. कविकंठाभरण हा ग्रंथ सहा संधींमध्ये विभागलेला असून त्यात ५५ कारिका आहेत. कविकंठाभरणात त्याने शिष्यांचे तीन प्रकार सांगितले आहेत आणि कवींचे छायोपजीवी, पदकोपजीवी, पादोपजीवी, सकलोपजीवी आणि भुवनोपजीव्य असे प्रकार सांगितले आहेत. त्याचप्रमाणे काव्याचेगुण आणि दोष ह्यांच्या संदर्भात तसेच व्याकरण, तर्क, नाट्य ह्यांच्या अभ्यासा-बाबत कवींना काही मार्गदर्शनही केले आहे. ह्या ग्रंथात त्याने दहा प्रकारचे चमत्कारही निर्देशिले आहेत. उदा., रसास्वाद, विस्मय इत्यादी.

क्षेमेंद्राच्या अन्य ग्रंथांत अवसरसार, कनकजानकी, कलाविलास, बोधिसत्त्वावदानकल्पलता, चतुर्वर्गसंग्रह, रामायणमंजरी, दशावतारचरित् अशा काही ग्रंथांचा समावेश होतो.

संदर्भ : Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1951.

कुलकर्णी, अ. र.