क्षयरोग : हा रोग प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतीय वैद्यकात त्याचा उल्लेख राजयक्ष्मा किंवा क्षय असा आढळतो. क्षय हा शब्द झीज या अर्थाने वापरला जात असल्यानेव इतर दीर्घकालिक आजारांमध्येही शरीराची झीज होत असल्यानेत्याची व्याप्ती आजच्यापेक्षा अधिक असावी. तरीही फुप्फुसाच्या क्षय-रोगास कफक्षय या नावाने ओळखले जात असावे. ग्रीक वैद्यकातही ॲरिस्टॉटलच्या काळापासून हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्यास होत असल्याचे माहीत होते. इंग्रजीत कन्झम्पशन हा शब्द क्षय या अर्थाने वापरला जातो.
आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक (ॲलोपॅथी)
एकोणिसाव्या शतकात लूई (ल्वी) पाश्चर यांचा सूक्ष्मजंतुवाद रोगनिर्मितीच्या कारणांमध्ये अंतर्भूत होऊ लागला. त्याच सुमारास १८६२ मध्ये ए. जे. विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यांनी कफक्षयामुळे मेलेल्या एका माणसाचे शवविच्छेदन केले. त्यात आढळलेल्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) एका सशाला दिल्यानंतर साडेतीन महिन्यांनी त्याच्या फुप्फुसात कफक्षय झाल्याचे विलेमिन यांना आढळले. लवकरच १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख या जर्मन शास्त्रज्ञांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढले. त्या शोधामुळे क्षयरोगाचे कारण निश्चित झाले. अनेक वर्षे हा विकार ‘कॉख विकार’ या नावाने ओळखला जात असे.
क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. एका शिंकेमध्ये सु. ४०,००० सूक्ष्मथेंब बाहेर पडतात व प्रत्येक सूक्ष्म थेंब क्षयरोग पसरवू शकतो. हवेत पसरलेल्या या थेंबात हे सूक्ष्मजंतू अनेक तास जिवंत राहू शकतात. निरोगी व्यक्तीचा अशा सूक्ष्मजंतूंशी श्वसन मार्गे वारंवार संपर्क आल्यामुळेरोगसंसर्ग होतो. संसर्ग झालेल्या जवळपास ९०% रुग्णांमध्ये लक्षणेदिसत नाहीत. क्षयग्रस्त मातेकडून तिच्या भ्रूणास किंवा जन्म झाल्यानंतर अर्भकास संसर्ग होण्याची शक्यता असते. या सूक्ष्मजंतूंची दुसरी एक प्रजातीमा. बोव्हीस या नावाने ओळखली जाते. तिचा संसर्ग दुभत्या जनावरांकडून पाश्चरीकरण न केलेल्या दुधामुळे माणसास होऊ शकतो.
क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत शिरकाव झाल्यावर शरीराची प्रतिकार यंत्रणा त्यांचा नाश करते परंतु तसे न झाल्यास, म्हणजे प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास, संसर्गाच्या ठिकाणी म्हणजे फुप्फुसाच्या एखाद्या भागात श्वेत कोशिका आणि तंतुमय ऊतक यांच्या मदतीने तो बंदिस्त केला जातो. अशा बंदिस्त स्थितीत हे सूक्ष्मजंतू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यास [उदा., उतारवय, रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स), कुपोषण, दीर्घ काळ स्टेरॉइड औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर] ते परत सक्रिय होतात व आसपासच्या ऊतकांचा नाश करू लागतात किंवा रक्तातून शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.
लक्षणे : फुप्फुसाच्या क्षयरोगात अशक्तपणा, वजन घटणे व खोकला या लक्षणांपासून प्रारंभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी अतिशय घामयेतो. रोगाची तीव्रता वाढू लागल्यावर प्रामुख्याने सकाळी उठल्यावर खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. कधीकधी त्यात रक्ताचा अंश आढळू लागतो. बारीक ताप येतो. फुप्फुसावरणाचा शोथ होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास [→ परिफुप्फुसशोथ] किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत नवीनच रोग संसर्ग झाला असल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो [→ गंडमाळा].
फुप्फुसेतर ठिकाणच्या विकारातील लक्षणे विविध प्रकारची असतात, उदा., मेंदूच्या आवरणातील क्षयरोगात [→ मस्तिष्कावरणशोथ] प्रारंभी डोकेदुखी, मान अखडणे, ताप, मळमळणे, झापड येणे व नंतर शुद्ध हरपणे, आकडीसारखे अपस्माराचे झटके उदरपोकळीतील इंद्रियांच्या विकारात पोटात दुखणे, एखाद्या ठिकाणी अर्बुदाप्रमाणे गाठ जाणवणे, पचनात बिघाड सांध्यांमधील विकारात ⇨ संधिवातासारखी लक्षणे मणक्याच्या विकारात तीव्र वेदना आणि मणका ठिसूळ होऊन भंग पावल्यामुळे मेरुरज्जूवर दाब येऊन पक्षाघात किंवा फक्त पायाच्या संवेदना व हालचालींवरअनिष्ट परिणाम स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या जननेंद्रियातील विकारामुळेसूज, गाठ जाणवणे व वंध्यत्व. सर्व शरीरात पसरलेल्या ‘मिलियरी’ क्षयरोगात शरीरभर सर्व ऊतकांमध्ये डाळीच्या आकाराच्या क्षयविकृतींची वाढ होते. या प्रकारात लक्षणे फारच संदिग्ध असतात, परंतु लवकरच ती झपाट्याने वाढून गंभीर होतात व प्राणघातक ठरू शकतात.
निदान : क्ष-किरण चित्रण, थुंकी तपासणी आणि ट्युबरक्युलीनचाचणी या तीन परीक्षणांची मदत क्षयरोगाच्या निदानात होते. यापैकीक्ष-किरण चित्रण मुख्यतः फुप्फुसाच्या विकारासाठी वापरले जाते. कफ पडत नसून नुसताच खोकला येत असल्यास क्ष-किरण चित्रणामुळे मदत होते. या चित्रात सूक्ष्मजंतूंच्या वाढीमुळे फुप्फुसाच्या ऊतकांत तयारझालेली वर्तुळाकार पोकळी बऱ्याच वेळा आढळते परंतु अनेकदा सर्व छातीभर अल्प प्रमाणात झालेला बदलही दृष्टीस पडतो. परिफुप्फुसीयपोकळीत साठलेले पाणी किंवा हवा याचेही दर्शन अशा चित्रणातून मिळते. यातील बहुतेक बदल क्षयरोगामुळे झाले आहेत असा निष्कर्ष रुग्णाचा इतिहास, दीर्घकालिकता, संसर्गाची शक्यता यांवरून काढता येतो परंतु थुंकीमध्ये क्षयाचे सूक्ष्मजंतू आढळल्यास निदानास अधिक बळकटीयेते. श्वसन मार्गाखेरीज इतर ठिकाणच्या क्षयजन्य बदलांची व्याप्तीहीक्ष-किरण चित्रणामुळे कळू शकते.
श्वसन मार्गातील द्रवाचे म्हणजेच कफाचे (यालाच सामान्यपणे थुंकी म्हणतात) नमुने तपासणीसाठी उपलब्ध असल्यास सूक्ष्मदर्शकातून मायकोबॅक्टिरियम दिसू शकतात. यासाठी विशेष रंजनप्रक्रियेची आवश्यकता असते [→ कुष्ठरोग]. तसेच जंतूंची संख्या फार कमी असल्यास वारंवार – तीन ते चार वेळा – नमुने घेतल्याशिवाय ते सहजासहजी दिसू शकत नाहीत. क्वचित प्रसंगी नमुना मिळविण्यासाठी श्वसनीदर्शकाच्या मदतीने आतील द्रव गोळा करावा लागतो. उपचार सुरू केल्यानंतर थुंकी सूक्ष्म- जंतुविहीन झालेली आहे, म्हणजेच रुग्णाकडून इतरांना संसर्ग होणार नाही याची खात्री करण्यासाठी थुंकी तपासणी वरचेवर करणे आवश्यक ठरते. कफाखेरीज इतर ठिकाणचे द्रव, ऊतकांचे नमुने, मूत्र, मेरुरज्जूभोवतालचे प्रमस्तिष्क मेरुद्रव यांचे नमुनेही क्षयरोगाच्या निदानात उपयोगी पडतात.
ट्युबरक्युलीन चाचणीत क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंपासून काढलेले प्रथिन-द्रव्य हाताच्या त्वचेत (मनगट व कोपर यांच्या मधल्या भागात) टोचतात. २-३ दिवसांत त्या ठिकाणी सूज व लाली निर्माण होते. व्यक्तीस कधीतरी संसर्ग झाल्यामुळे त्याची प्रतिरक्षा यंत्रणा क्षयरोगाविरुद्ध प्रतिपिंड निर्माण करीत आहे, असा याचा अर्थ होतो परंतु याचा अर्थ सक्रिय क्षयरोग अस्तित्वात आहेच असा नव्हे. त्यामुळे या चाचणीची उपयुक्तता मर्यादित आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस क्षयरोगाला प्रतिबंधक लस तयार करण्याच्या प्रयत्नात कॉख यांनी ट्युबरक्युलीन तयार केले होते परंतु ते रोगाचा प्रतिबंध करण्यास असमर्थ आहे, असे लवकरच दिसून आले. त्यापासूनच तयार केलेले प्रथिनद्रव्य ट्युबरक्युलीन चाचणीसाठी उपयुक्त ठरले. फ्रेंच वैद्य चार्लस् मांटू यांच्या नावाने ही चाचणी ओळखली जाते.
उपचार : क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा शोध लागल्यानंतरही अनेक वर्षे एखादे प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने लक्षणानुवर्ती उपचारच केलेजात. खोकल्यावरची औषधे, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व पोषणासाठी कॉड लिव्हर तेल आणि रुग्णास विश्रांतीसाठी कोरड्या हवेच्या ठिकाणी लोकवस्तीपासून दूर ठेवणे यावर भर दिला जाई. संसर्गित फुप्फुसालाविश्रांती मिळाल्यास व ऑक्सिजनाचा पुरवठा कमी केल्यास जंतूंचीवाढ थांबेल या कल्पनेने काही उपाय केले जात. परिफुप्फुसीय पोकळीत किंवा उदरपोकळीत हवा भरून तिच्या दाबाने फुप्फुसाचे आकारमान कमी करण्याचा प्रयत्न केला जाई. कधीकधी फुप्फुसाचा विकारग्रस्त खंड शस्त्रक्रियेने काढून टाकण्याची आवश्यकता भासत असे.
प्रतिजैविकांच्या (अँटिबायॉटिक पदार्थांच्या) मालिकेतील स्ट्रेप्टोमाय –सिनाचा शोध सेल्मन आब्राहम वेक्समन यांनी १९४४ मध्ये लावल्यानंतर हे चित्र बदलले. त्यानंतरच्या २५–३० वर्षांमध्ये आयसोनियाझिड, पॅरा- ॲमिनोसॅलिसिलिक अम्ल (पीएएस PAS), इथँब्युटॉल व रायफँपीन ही औषधे उपलब्ध झाली. त्याबरोबरच हेही लक्षात आले की, क्षयरोगाची औषधे दीर्घकाल देणे आवश्यक असते. सूक्ष्मजंतू काही काळाने औषधाला दाद देत नाहीत आणि औषधांची निष्प्रभता टाळण्यासाठी व दुष्परिणामहोऊ नयेत म्हणून उपचारासाठी एका वेळी कमीत कमी दोन औषधेदेणे व औषधांची मिश्रणे वारंवार बदलणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या उपचाराच्या प्रारंभिक सत्रासाठी ४-५ औषधे व पर्यायी योजनेसाठीइतर ७-८ औषधे उपलब्ध आहेत. यापैकी स्ट्रेप्टोमायसीन अंतःक्षेपणाच्या स्वरूपात असल्यामुळे आणि पास याची मात्रा मोठी असल्यामुळे सध्याती फारशी वापरात नाहीत.
उपलब्ध औषधांचे प्राधान्य क्रमानुसार पुढील तीन वर्ग केले जातात : प्रथम प्राधान्य : आयसोनियाझिड, पिरॅझिनामाइड, रायफँपीन (I, P, R) ही तीन सूक्ष्मजंतूंना मारक औषधे इथँब्युटॉल हे सूक्ष्मजंतुरोधक (E). द्वितीय प्राधान्य : सिप्रोफ्लोक्सासीन, मॉक्सिफ्लोक्सासीन, पॅराॲमिनोसॅलिसिलिक अम्ल. तृतीय प्राधान्य : थायासिटॅझोन, थायोरिडॅझीन, क्लॅरिथ्रोमायसीन, रिफाब्युटीन आणि अन्य औषधे उदा., इथिओनामाइड, सायक्लोसेरीन.
उपचाराच्या प्रारंभी क्षयरोग सूक्ष्मजंतूंची संख्या वेगाने कमी करण्यासाठी प्रथम प्राधान्याची आयसोनियाझिड, पिरॅझिनामाइड व रायफँपीन ही तीन औषधे दोन महिने दिली जातात. नंतर चार महिने आयसोनियाझिडव रायफँपीन देण्यात येते. या सहा महिन्यांच्या उपचारानंतर बहुतेक सर्वरुग्ण बरे होतात. उपचार थांबल्यावर सु. ३% रुग्णांमध्ये रोगाचा पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. त्यामुळे वरचेवर तपासणी आवश्यक असते. आवश्यक वाटल्यास द्वितीय किंवा तृतीय प्राधान्यांतील औषधे वापरून आणखी चार महिने ते एक वर्ष उपचार पुढे चालू ठेवावे लागतात. औषधाची निवड आणि उपचाराचा काळ याबद्दलचे कार्यक्रम क्षयरोग सूक्ष्मजंतूंची प्रतिकारक्षमता, अनिष्ट परिणाम आणि रुग्णांची रोगप्रतिकार-क्षमता यांनुसार विसाव्या शतकाअखेरीस व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकदा बदलावे लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) याबद्दल वरचेवर मार्गदर्शन करीत असते.
असाच एक कार्यक्रम १९९३ पासून डॉट्स (DOTS) या नावाने अंमलात आला. रुग्णांना बरीच औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे सूचनांचे अनुपालन नीट होत नाही. ते सुधारण्यासाठी रुग्णांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत औषध घ्यावे, हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.त्यामुळे क्षयरोगाच्या निर्मूलनास चालना मिळाली आहे. शासकीय आणि अशासकीय यंत्रणांच्या मदतीने औषधांचा पुरवठा करून औषध-प्रतिकारक – विशेषतः बहुऔषधप्रतिकारक – क्षयरोग सूक्ष्मजंतू असलेल्या शतप्रतिशत रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न चालू आहे. जरी औषधांना प्रतिसाद देणारा क्षयरोगाचा उपचार शासनामार्फत मोफत होत असला, तरी बहुऔषध-प्रतिकारक क्षयरोगाचा उपचार खर्चिक आहे.
प्रतिबंध : रुग्णाकडून इतरांना सूक्ष्मजंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून त्याने खोकताना व शिंकताना नेहमी रुमाल वापरणे आवश्यक असते. तसेच काहीदिवस रुग्णास इतरांपासून दूर ठेवणे उपयुक्त असते, परंतु ते नेहमीच शक्य नसते. त्यामुळे ज्यांच्या थुंकीत सूक्ष्मजंतूंचे प्रमाण जास्त आहे अशा(उघड्या) व्यक्तींच्या कुटुंबांतील इतरांना काही दिवस आयसोनियाझिडया औषधाची उपचारापेक्षा कमी मात्रा रोज देता येते. तीन औषधांपेक्षा अधिक दिलेल्या उपचारांनी २–४ आठवड्यांत संसर्गजन्यता नाहीशी होऊ शकते. रुग्णांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी जंबुपार किरणांचे स्रोत बसविणे काही ठिकाणी अंमलात आणले जाते.
क्षयरोगप्रतिबंधक लशीचा शोध लेआँ शार्ल आल्बेर कालमेट आणि कामीय गेरँ या फ्रेंच संशोधकांनी १९०८ मध्ये लावला. या लशीची परिणामकारकता तसेच दुष्परिणाम याविषयी अनेक वर्षे वादविवाद झाले. सध्या क्षयरोगाची शक्यता असलेल्या देशांमध्ये नवजात अर्भकांनाही लस दिली जाते. बॅसिलस कालमेट गेरँ (बीसीजी) या नावाचे जिवंत, परंतु रोगनिर्मिती क्षमता नसलेले सूक्ष्मजंतू या लशीत असतात. लस त्वचेत टोचल्यावर तेथे (बहुतेक वेळा खांद्याच्या येथे) सूज येऊन फोड निर्माण होतो. काही दिवसांनी तो बरा होतो. तोपर्यंत क्षयरोगाविरुध्द प्रतिपिंडांचीनिर्मिती झालेली असते. ही प्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते. यूरोपमधील १९२४ पासून प्रारंभ झालेल्या या लशींचा अनुभव १९५६ अखेर पुनर्मूल्यमापनानंतर पाश्चात्त्य देशांनी स्वीकारला. मुख्यतः विकसनशील देशांत सध्या तिचा वापर होत आहे. लशीतील सूक्ष्मजंतू मा. बोव्हीसया प्रकारचे असतात.
क्षयरोगनियंत्रण व भारतातील स्थिती : एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीबरोबरच क्षयरोगाच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली. यूरोपमध्ये अशा रुग्णांना विश्रांती मिळून ताप थांबेपर्यंत मोकळ्या हवेचा लाभ व्हावा म्हणून पहिला आरोग्याश्रम (सॅनटोरिअम) १८५९मध्ये सायलीशियात (पूर्व जर्मनीचा भाग) हेर्मान ब्रेमर यांनी काढला. इतर देशांमध्येही त्या प्रकारचे आश्रम, झोपड्या आणि वसाहती निर्माण होऊ लागल्या. क्षयरुग्णांसाठी विशेष दवाखानेही निघाले. इंग्लंडमध्ये १९११ मध्ये रुग्णांची माहिती आरोग्याधिकाऱ्यास दिलीच पाहिजे, असा कायदा झाला. विशेष प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिका रुग्णाच्या घरी जाऊन तेथील स्थिती पाहून कुटुंबियांना भेटू लागल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांवरउपचाराची जबाबदारी टाकण्यात आली. या सर्व उपायांमुळे क्षयरोगाच्या प्रसारावर काही अंशी नियंत्रण आले. ब्रिटनसारख्याच काही उपाययोजना ब्रिटनशासित हिंदुस्थानातही अंमलात येऊ लागल्या. तरीही येथील क्षयरोगाचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस प्रभावी औषधे मिळेपर्यंत फारसे सुधारले नाही.
ब्रिटिशशासित हिंदुस्थानात १९२०-२१ या काळात दरवर्षी एक लाख लोकसंख्येमागे क्षयरोगाने सु. ४०० मृत्यू ओढवत. १९५०-५१ मध्येहे प्रमाण सु. २०० वर आले आणि १९६४ मध्ये ते सरासरी १००पर्यंत कमी झाले. तरीही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या म्हणून क्षयरोगाचा प्रश्न भेडसावत राहिला. जागतिक पातळीवर २००७ मध्येसु. १३.७ दशलक्ष रुग्ण आढळले. २०१० मध्ये ८.८ दशलक्ष नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले व १.४५ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ०.३५ दशलक्ष मृत्यू एचआयव्ही संसर्गामुळे झाल्याचे आढळले. भारतात १९९० च्या सुमारास जगातील एकूण क्षय रुग्णांपैकी २० प्रतिशत रुग्ण असावेत, असा अंदाज आहे. काही आकडेवारींनुसार एकूण संसर्गजनक रुग्णांची संख्या त्या वेळी ८.७ लक्ष होती. दरवर्षी सु. २० लक्ष नवीन रुग्णांना संसर्ग होत असे आणि जवळपास ३,३०,००० रुग्ण क्षयरोगाला बळी पडत होते. १९९३ मध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. त्यात डॉट्स पद्धतीने औषधे देण्यास प्रारंभ झाला. १९९७ मध्ये व पुन्हा २००५ मध्ये या कार्यक्रमांमध्ये आवश्यक ते फेरफार करण्यात आले. २००६ मध्ये भारताच्या सु. ६३३ जिल्ह्यांमध्ये १११ कोटी लोकसंख्येपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला. सु. १२,००० उच्च दर्जाची सूक्ष्मदर्शक केंद्रे आणि केंद्र ते परिघीय संस्था अशा ५ विविध पातळ्यांवर तो राबविला जातो. बहुऔषधप्रतिकारक रुग्णांना योग्य ती पर्यायी औषधे देऊन त्वरित रोगनियंत्रण करण्याचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (NACO), जागतिक आरोग्य संघटना, स्वयंसेवी संस्था (NGO’s), खाजगी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये या सर्वांच्या सहकार्याने क्षयरोगनियंत्रणाचे कार्यक्रम अंमलात येतात. एखाद्या देशातील वा प्रदेशातील क्षयरोग संसर्ग झालेल्या व्यक्तींचे प्रमाण त्या समाजाच्या सुस्थितीबद्दल कल्पना देणारा निर्देशक समजला जातो. कारण या सुस्थितीस हातभार लावणारे अनेक घटक क्षयरोगाच्या प्रतिबंधास मदत करतात. उदा., चांगल्या घरांची उपलब्धता, पोषक अन्न, शिक्षण, जीवन शैलीची गुणवत्ता, लग्नाचे वय ( योग्य वयातील विवाह), स्वत:ला होणाऱ्या आजाराबद्दलची जाणीव ( आरोग्य जाणीव) इत्यादी. त्यामुळे समाजकल्याणाच्या योजना या एक प्रकारे क्षयरोग प्रतिबंधाचा भागच असतात असे म्हणता येईल.
श्रोत्री, दि. शं.
आयुर्वेदीय चिकित्सा
आयुर्वेदात क्षयरोगाला राजयक्ष्मा असे म्हणतात. क्षयरोग म्हणजेज्यात दिवसेंदिवस शरीर क्षीण होत जाते शरीरक्षय हे ज्याचे मुख्यलक्षण असते तो रोग होय. अनेक रोग सहजासहजी होतील अशी शरीराची एक रोगावस्था होय. हा सुरू होण्याच्या आरंभी शरीराच्या कोणत्यातरी भागात ⇨ स्रोतसां चा अवरोध झालेला असतो. त्या अवरोधाच्या अवस्थेनुसार निरनिराळी चिन्हे उत्पन्न होतात. बरेच दिवस बारीक तापयेतो, अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जातो, वजन कमी होऊ लागते, काम करण्यास उत्साह वाटत नाही. अशा परिस्थितीत क्षयरोगाचीसमजली जाणारी जरी कोणतीही लक्षणे नसली, तरी क्षयरोग प्रतिबंधक अशी औषधे अवश्य घेतात.
क्षयरोगावरील औषधोपचारांत अनेक प्रकारची औषधे दिली आहेत परंतु या विकारावरील आनुभविक अशी ४–५ औषधे निरनिराळ्या अवस्थांत कशी घ्यावयाची याचे वर्णन पुढे दिले आहे.
च्यवनप्राश : हे औषध प्रसिद्ध आहे. अनेक वनस्पतींच्या काढ्यात आवळे शिजवून त्यात तेल, तूप, मध, खडीसाखर व काही औषधांचीचूर्णे मिसळून हा अवलेह तयार करतात. अष्टवर्ग म्हणून प्रसिद्ध असलेली आठ शक्तिवर्धक औषधे मिसळून केलेला च्यवनप्राश जास्त गुणकारीआहे. च्यवनप्राश हा क्षयासाठी सर्व ऋतूंत बहुतेक सर्व प्रकृतीच्यालोकांना मानवणारा आहे. क्षयरोगातील कोरडा खोकला, बारीक ताप, दररोज वाटत असणारा थकवा, मैथुनानंतर एकाएकी येणारा थकवा या लक्षणांवर दररोज सकाळी रिकाम्या पोटी व संध्याकाळी ४ वाजता प्रत्येकवेळी २-२ तोळे (१ तोळा = सु. ११.६६ ग्रॅम) च्यवनप्राश चावून चावून खावा व वर दूध प्यावे. दुधाचे प्रमाण २०–४० तोळे पचेलत्या प्रमाणाने असावे. सामान्यपणे २ महिने हे औषध सतत घेतल्यानेरोगी लक्षणमुक्त होईल. तसेच ज्या लोकांना क्षयप्रतिबंधक म्हणून या औषधाचा उपयोग करावयाचा असेल, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्यापोटी २ तोळे च्यवनप्राश दुधाबरोबर घ्यावा. भूक लागल्यावर जेवावे. दुसऱ्या अगर तिसऱ्या दिवशी १-१ तोळा च्यवनप्राश वाढवावा. याप्रमाणे ७ दिवसाच्या शेवटी १० तोळ्यांपर्यंत प्रमाण वाढवावे. पचेल त्या मानाने दुधाचे प्रमाण वाढवावे, असेच प्रत्येक सप्ताहाला कमी करत आणावे.असा हा आरोह-अवरोहयुक्त क्रम हेमंत व शिशिर ऋतूंत घ्यावा. याने शरीराची झीज थांबेल, रोगप्रतिकारक्षमता वाढेल, सर्व अवयवांची व इंद्रियांची शक्ती वाढेल, म्हातारपण उशिरा येईल, दीर्घायुष्य प्राप्त होईल. च्यवनप्राश क्षय व्याधीत प्रथमावस्थेत जितका उपयोगी आहे, तितका तो द्वितीय व तृतीय अवस्थांत उपयोगी नाही. त्या अवस्थांमध्ये अनेक औषधांचा ⇨ अनुपानासाठी उपयोग केला जातो. लहान मुले, वृद्धमाणसे, तरुण स्त्रिया-पुरुष, श्रमजीवी, बुद्धिजीवी अशा सर्व तर्हेच्या लोकांना कोठल्याही दुसऱ्या उपचाराबरोबर ह्या औषधांचा उपयोग होतो.[→ च्यवनप्राश].
आरोग्यवर्धिनी : हे औषध अभ्रक, लोह, ताम्र, शिलाजित, त्रिफळा, कडुलिंबाच्या रसाच्या भावना दिलेले असे राजयक्ष्मा यावरील परिपूरकअसे आहे. विशेषतः ज्या राजयक्ष्म्यामध्ये पहाटे घाम येतो, सततबारीक ताप असतो, अंग दुखते, अशक्तपणा असतो, डोके दुखते, हाता-पायांची व डोळ्यांची आग होते, सुस्ती फार असते, अग्निमांद्य बरेच असते, मलावरोध असतो. त्याप्रमाणे क्षयाच्या सुरुवातीची लक्षणे असताना हे औषध ४-८ गुंजा (१ गुंज = सु. ०.१२० ग्रॅम) सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर देतात. प्रकृतिमानाप्रमाणे मध, मोरावळा, तूप ही अनुपानेयोजतात. हे औषध घेत असताना दूध हाच मुख्य आहार ठेवतात.अगदी थोडासा दूध भात घेतात. फार श्रम करीत नाहीत. या औषधानेसुरुवातीला क्वचित प्रसंगी प्रथम १-२ वेळा जुलाब होतात. २-४ दिवसांनी हे जुलाब थांबतात. ह्या औषधाने शरीरातील स्रोतसे मोकळी होत असताना प्रथम शरीरामध्ये थोडीशी उष्णता वाढते, हलकेपणा येतो व वजनकमी होते यांमुळे बऱ्याच वेळा रोग वाढतो आहे, असा भ्रम निर्माणहोतो परंतु स्रोतसे मोकळी झाल्याने भूक चांगली लागते. सुस्तीनाहीशी होते. शरीरातील झिजणारे घटक लवकर भरून यावयास लागतात. रोगप्रतिकारक्षमता अभ्रकासारख्या औषधाने निर्माण व्हावयास लागते. रोगी आरोग्ययुक्त पूर्वस्थितीला येतो.
सुवर्ण मालिनी वसंत : हे औषध क्षयरोगावरील अनन्य साधारण औषध म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या औषधात सोने, मोती, हिंगूळ व कळखापरी ही शरीराला पुष्टी देणारी औषधे प्रथम लोणी घालून खलबत्त्यात खूप खलली जातात. लोण्यातील सर्व स्निग्धता या द्रव्यांशी एकरूप झाल्यावर लिंबाच्या रसाच्या भावना देतात. याने लोण्यातील ओशटपणा नाहीसाहोऊन विशिष्ट रासायनिक शक्ती उत्पन्न होते. औषध दीर्घकाळ टिकणारे होते. औषधीकरणातील खल्वी रसायन या औषधी द्रव्याला जुनेपणाची आवश्यकता शास्त्रात वर्णन केली आहे. लोणी हा स्वभावतः दीर्घकाळ खराब न होता टिकणारा पदार्थ नाही. लिंबाच्या रसाच्या संयोगामुळेदीर्घकाळ टिकाऊपणा त्यात उत्पन्न होतो. हे औषध ज्या राजयक्ष्म्यामध्ये दररोज शरीराची झीज होऊन थकवा येतो, थोडेसे चालले असता दम लागतो, फिकेपणा फार आलेला असतो, घशाशी चिकटा फार येतो, डबडबलेला खोकला असतो, शिवाय बारीक ताप, हात, पाय, डोळे ह्यांची जळजळ, मैथुनजन्य थकवा, वजनात कमालीची होणारी घट ही लक्षणे असतात, त्यावेळेस देतात. सुवर्ण मालिनी वसंत १ ते २ गुंज, पिंपळी चूर्ण ४ गुंज एक चमचाभर मधात चाटवावे व वर दूध प्यावे. जमल्यास दुधाला बदाम, वेलची, चारोळी, पिस्ते, केशर यांचा मसाला लावून ते दूध प्यावे. हे औषध साधारणपणे २ महिने घेतल्याने मुख्यतः शरीरघटकांची झीज कमी होऊन वजन घटण्याचे प्रमाण कमी होते. शरीराला आलेला निस्तेजपणा, भकासपणा हे सर्व कमी होऊन तेज वाढते. कोठल्याही ऋतूत हे औषध घ्यावयास हरकत नाही तथापि, सहसा पावसाळ्यात व हिवाळ्यात याचा उपयोग करतात.
शिलाजतुवटी : शरीरातील शुक्रधातू क्षीण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या राजयक्ष्म्यावर शिलाजतुवटी फार गुणकारी आहे. शुक्रक्षीणतेने येणारा फिकेपणा, ओजाचा नाश, येणारा भित्रेपणा, उदासीनता, दुबळेपणा, जीवना-बद्दल वाटत असणारी नैराश्याची भूमिका ही सर्व लक्षणे शुक्र, ओज, स्नेह ह्यांची क्षयदर्शक आहेत. स्वभावातील चंचलता, बारीक ताप, किंबहुना कोणतेही राजयक्ष्म्याचे लक्षण आहे असे भासवणारा रोगी शिलाजतुवटीने बरा होतो. साधारणपणे ४-८ गुंजा शिलाजतुवटी दुधात विरघळून दिवसातून २ वेळा घेतात. हे औषध घेत असताना पचेल असा स्निग्ध आहार, गोड फळे, सुकामेवा, विश्रांती यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. मैथुन वर्ज्य करतात. साधारणपणे हे औषध सुरू केल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्वप्नावस्था निर्माण झाली की, हे औषध लागू पडले आहे, असे समजतात. याप्रमाणे ८ आठवडे सतत उपचार केल्याने बराचसा फायदा होतो.
सुवर्णपर्पटी : राजयक्ष्म्यामध्ये पुष्कळ वेळा समान वायूच्या कार्यकारित्वाची ग्रहणीस्थानी येणारी प्रचीती म्हणजे सार-किट्ट विभाजन क्रिया होय. ग्रहणी अवयव व तदाश्रयी वायू ह्यांच्या अबलत्वाने नष्टहोते. अशा वेळी ग्रहणी अवयवासह सर्व महास्रोतसाला बल देणारा असा सिद्धौषधी योग सुवर्णपर्पटी आहे. राजयक्ष्म्यामध्ये वेगावरोधामुळे उदर शूळ सुरू होतो, अकस्मात पातळ शौचास होते. त्यामध्ये बऱ्याच वेळी आवही असते आणि जुलाब होताच क्षणी शरीराला थकवा येतो, घशाला कोरड पडते, अग्निमांद्य बेताचे असते, खाण्यापिण्यावरील इच्छा कमी होत नाही. मात्र, अन्नाचे प्रमाण थोडेसे अधिक झाले, तर आतड्यास गुरगुरते व पोट दुखून शौचाला होते. राजयक्ष्म्यामध्ये शरीरावर होणारा परिणाम पुढील तीन ठिकाणी पाहावयास मिळतो : (१) आतडी, (२) सांधे, (३) फुप्फुसे. या तीनही ठिकाणी गेलेले बल परत येण्यास सुवर्णपर्पटीचा उपयोग चांगला होतो. सुवर्णपर्पटी २ गुंजा बारीक करून तूप साखरेतून सकाळ-संध्याकाळ देतात. ज्यांना अम्लपित्ताचा त्रास असेल त्यांना २ गुंजा सुवर्णपर्पटी व ४ गुंजा शौतिकभस्म देतात. ज्यांची चव कमी झाली असेल अशांना सैंधव सुवर्णपर्पटीबरोबर तुपातून देतात. सुवर्णपर्पटी चालू असताना आहारामध्ये दूध व भात, तूप आणि भात, तूप व चपाती, उकडलेल्या भाज्या, गोड लोण्यासकट ताक हे देतात. साधारण हे औषध प्रथम २ महिने देतात. काही काळ थांबवून अधूनमधून देत राहतात. साधारणपणे वर्षभर हा उपचार केल्याने रोगी बराचसा सुधारतो.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
पशुवैद्यक
क्षयरोग पुरातन काळापासून कुप्रसिद्ध असलेला जुनाट स्वरूपाचा, अतिशय रेंगाळत राहणारा संसर्गजन्य रोग असून तो मानव आणि पशूंत आढळतो. मायकोबॅक्टिरियम नावाच्या क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूमुळेहोणाऱ्या या रोगात शरीराच्या एका विशिष्ट भागात सूक्ष्म गाठी निर्माण होतात व त्या वाढत जाऊन सर्व शरीरभर पसरतात. गाठीतून चिकटघट्ट स्राव निघतो व पुढे त्यात कॅल्शियम साठून तेथील ऊतक नष्टहोते. गाठी फार वाढल्या म्हणजे द्राक्षासारख्या दिसतात, म्हणून इंग्रजीतया रोगाला ‘ग्रेप्स’ म्हणतात. पुरातन काळी त्याला ‘थायसीस’ म्हणत असत. थायसीस हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ क्षय किंवा र्हासअसाच आहे. त्यानंतर रोगात दिसणाऱ्या क्षयरोगाच्या गाठीवरून त्याला ‘ट्युबरक्युलॉसिस’ असे नाव पडले. १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख यांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढल्यामुळे या जुनाट रोगाचीकारणमीमांसा स्पष्ट करता येऊ लागली. क्षयरोग संसर्गजन्य असल्यामुळे पशूंना होणाऱ्या प्रकारामध्ये त्या प्राण्यापासून मिळणारे दूध किंवा मांसदूषित होऊन त्यामुळे माणसांना रोग होण्याची चिंता उत्पन्न झाली. त्यामुळे रोगाचा अभ्यास विशेष केला गेला व त्याचे महत्त्व सिद्ध झाले आहे.
सर्व उष्ण-रक्ताच्या प्राण्यांत रोग होतो. रोगाचे सूक्ष्मजंतू हे क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जात असले, तरी त्याततीन उपजाती आहेत. माणसामध्ये क्षयरोग उत्पन्न करणारे बहुधा माणसातच रोग उत्पन्न करतात परंतु क्वचित कुत्र्यांमध्ये रोग निर्माण करतात. दुसऱ्या प्रकारचे बहुधा कोंबड्यांत व इतर पाळीव पक्ष्यांत क्षयरोग निर्माणकरतात परंतु क्वचित डुकरांत व मेंढ्यांतही या प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे क्षयरोग होतो. तिसऱ्या प्रकारचे सूक्ष्मजंतू गायी-म्हशी, घोडे, मेंढ्या, बकऱ्या, कुत्री व मांजरे यांच्यात क्षयरोग निर्माण करू शकतात परंतु माणसांनासुद्धा या प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे क्षयरोगाची बाधा होऊ शकते, ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. क्षयरोगी गुरांचे दूध, मांस यांच्याखाण्यामुळे व त्यांच्या सहवासात राहिल्याने माणसांनाही हा रोगहोण्याची भीती असते.
क्षयरोगाचे स्वरूप : हे सूक्ष्मजंतू बहुधा दूषित प्राण्यांच्याशरीरातच वाढतात. ते निसर्गात दुसरीकडे कोठेही वाढत नाहीत. ते स्वतःभोवती बीजुक निर्माण करणारे नसले, तरी ते उष्णता व पुष्कळ जंतुनाशकांना लवकर दाद देत नाहीत. रोगी जनावराच्या शेणातून किंवा श्वसनातून बाहेर पडलेले सूक्ष्म जंतू दमट व थोड्याशा उष्ण जागी पुष्कळ दिवस जिवंत राहू शकतात व संधी मिळताच निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करून रोग निर्माण करतात. रोगी जनावराच्या शेणातून, उच्छ्वासा-तून, दुधातून, मूत्रातून, योनिमार्गाने, गर्भाशयाच्या स्रावातून व उघड्या झालेल्या ग्रंथीतून सूक्ष्मजंतू बाहेर पडतात. शेणात सापडणारे रोगजंतू एकतर आतड्यातील रोगाच्या गाठीमुळे असतात किंवा छातीच्या क्षयरोगातील सूक्ष्मजंतू कफाबरोबर गिळल्यामुळे असतात. निरोगी जनावरे रोगी जनावराच्या सान्निध्यात असली तर रोग्यांच्या उच्छ्वासाबरोबर बाहेर हवेत फेकलेले रोगजंतू श्वसनाद्वारे निरोगी जनावराच्या शरीरात शिरून रोग पसरवितात. विशेष कोंदट जागी दाटीवाटीने गुरे बांधली असली किंवा वासरे कोंडलेली असली, तर अशा रीतीने रोगाचा संसर्ग संभवतो. दूषित चारा-दाणा-पाणी किंवा दूषित कुरणे यामधून रोग जास्त लवकर पसरतो. रोगी गायीचे दूध पिल्याने वासरांत नेहमी क्षयरोग पसरतो, तसाच तो लहान मुलांना होण्याचीही भीती असते. क्वचित दूषित योनिमार्गाच्या स्रावामुळे प्रजननाच्या वेळी वळूत (सांडात) रोग आढळतो. जास्त दूध देणाऱ्या गायीत यंत्राने दूध काढण्याच्या पद्धतीत यंत्रे एखाद्या क्षयरोगी गायीमुळे दूषित झाली, तर रोग निरोगी गायीतही पसरू शकतो. स्तनांत घालावयाच्या पोकळ नळ्या अस्वच्छ असतील, तर त्यामुळे रोग पसरतो. दूषित जनावराचे मांस खाल्यामुळे माणसांना रोग होण्याची भीती असते, म्हणून मांसासाठी मारलेल्या पशूंची कत्तलखान्यांत कसून परीक्षा करतात. व्यापारी पद्धतीच्या दुग्धालयातून दूध नेहमी उकळून विकले जाते व पाश्चात्त्य देशांत गायीची ‘ट्युबरक्युलीन’ लशींनी परीक्षा करून फक्त निरोगी गायीचे दूध उपयोगात आणतात.
क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शरीरात शिरले म्हणजे प्रवेश केलेल्या जागी रोगाच्या सूक्ष्म गाठी निर्माण करतात. जनावराची प्रतिकारशक्ती व उत्तम निकोप प्रकृती यांमुळे रोगजंतू शरीरात प्रवेश मिळूनही गाठी होऊशकत नाहीत व काही लक्षणे न दाखविता शरीरात फक्त वास्तव्य करून राहतात परंतु काही कारणाने प्रकृती ढासळली व अशक्तता आली, तरते जोर करून रोगाची लक्षणे निर्माण करतात. रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर ते अंतस्त्वचेवर किंवा लसीकांच्या ग्रंथीमध्ये वाढतात, दाह करतात व हळूहळू क्षयरोग गाठी निर्माण करतात. अशा गाठींमध्ये पिवळ्या रंगाचा स्राव किंवा पू झालेला असतो. कोणत्याही मार्गाने प्रवेश मिळविल्यानंतर रोग सर्व शरीरात पसरण्यास उशीर लागत नाही. श्वसनाच्या मार्गाने प्रवेश केलेले सूक्ष्मजंतू श्वसन मार्गात रोगाच्या गाठी निर्माणकरतात आणि तेथून खोकल्याच्या वेळी निघणाऱ्या कफातील सूक्ष्मजंतू पोटात कफ गिळल्याने पोहोचतात. त्यांपैकी काही प्रमाणात जठरातीलतीव्र रसाने नष्ट होतात, परंतु काही जठराच्या अंतस्त्वचेवर वास्तव्यकरून तेथे रोगाच्या गाठी निर्माण करतात. काही आतड्यापर्यंत पोहोचून तेथील अंतस्त्वचेवर रोगाच्या गाठी निर्माण करतात. काही लसीकातून, आतड्याच्या लसीका ग्रंथीवर व काही पोटाच्या पोकळीतील पडद्यावररोग निर्माण करतात. काही यकृताकडे धाव घेऊन त्याचा क्षयरोग निर्माण करतात, तर काही सूक्ष्मजंतू कोठेच थारा न मिळाल्यामुळे शेणातूनबाहेर पडतात.
रोगाच्या सूक्ष्मजंतूंपासून निघणारी विषे शरीरात भिनल्यामुळे जनावर जर्जर होऊन दुर्बल होत जाते. तसेच शरीरातील निरनिराळ्या इंद्रियां-वरील व घटकांवरील रोगाच्या गाठींमुळे भार पडून त्या इंद्रियाच्या व सभोवतालच्या इतर इंद्रियांच्या नैसर्गिक कार्यात व्यत्यय येतो. असेअसले, तरी हे कार्य अतिमंद गतीने रेंगाळत चाललेले असल्यामुळे क्षयरोगाची भावना लक्षात येण्यास फारच उशीर लागतो व रोगनिदानलवकर होत नाही. प्रथम स्वरूपाच्या लक्षणांत कधी थांबून थांबूनयेणारा खोकला, गिळण्याच्या वेळी होणारा त्रास, मधून मधून ताप वजनावर कृश होत जाणे ही लक्षणे दिसतात. गायी-म्हशीच्या श्वसनाच्या मार्गातील गाठींमुळे होणाऱ्या रोगात जुनाट स्वरूपाचा खोकला पुष्कळ दिवस येतो. तो पुष्कळ मोठ्याने किंवा जास्त वेळ उमाळी आल्यासारखा नसून सौम्य स्वरूपाचा, दिवसातून कधीतरी, विशेषत: थंडीत व सकाळच्या वेळी येतो. स्वरयंत्राच्या वर दाबले असता व व्यायामानंतर तो वाढतो. क्षयरोगाच्या गाठी फुप्फुसावर जास्त प्रमाणात वाढल्या की, श्वसनासाठी जास्त धडपड करावी लागते व खोल श्वास घेण्याचा जनावर प्रयत्न करते व त्यास गुदमरल्यासारखे होते. विशेषतः घशाच्या भागावर व श्वसन नलिकेवर रोगाच्या गाठी वाढल्या की, श्वसन नलिकेची पोकळी गाठीच्या वाढीमुळे कमी होऊन श्वसनात अडथळा होतो. अशा वेळी छातीची वैद्यकीय परीक्षा करून रोगाचे निदान करतात. जनावर खोकताना त्याच्या तोंडातून पिवळट पांढऱ्या रंगाचा कफ निघतो व तो कधीकधी जमिनीवर सांडलेला दिसतो परंतु बहुतेक वेळी गिळला जातो. जनावर चारा-दाणा कमीखाते, तर कधी तसाच टाकून देते. तोंडातील, नाकातील व डोळ्यांतील अंतस्त्वचा फिकट पांढरी दिसते. त्वचेचा लवचिकपणा नष्ट होऊन ती शरीराला घट्ट चिकटल्यासारखी दिसते. डोळ्यांतील तेज कमी होते, डोळे खोल गेलेले व निस्तेज दिसतात व चर्या दीनवाणी दिसते. रोग जसा वाढत जातो तसा खोकला जास्त होतो, श्वसन कष्टमय होते व जनावर मानखाली घालून स्वस्थ उभे राहते, जागेवरून हलत नाही, कृश होत जाते, शेवटी अशक्तपणामुळे उभे राहणे अशक्य होऊन खाली पडून राहते व मरते.
आतड्यावर रोगाच्या गाठींची वाढ झाल्यामुळे अन्नरस शोषणाचेकार्य स्थगित होऊन क्वचित आतड्यावर त्या सूक्ष्मजंतूंमुळे सूज येऊन अतिसार होतो व जनावर कृश होत जाते. यकृतावरील गाठीमुळे त्याच्या कार्यात अडथळा येतो. गायी-म्हशींना होणारा स्तनाचा क्षयरोग विशेष महत्त्वाचा मानला पाहिजे, कारण त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूषित दुधामुळे रोगाचा प्रसार होतो. स्तनाचा क्षयरोग अत्यंत सावकाश वाढत असल्यामुळे विशेष लक्षणे दिसत नाहीत, परंतु रोग जसा वाढत जातो व स्तनांत गाठी जशा वाढत जातात तसे स्तन जड व कठीण बनतात. गाठी वाढून लवचिकपणा कमी झाल्यामुळे, पूर्णपणे दूध काढल्यानंतरही स्तन चिंबलेले दिसत नाहीत. कासेवर दाबून पाहिल्यास कठीणपणा लक्षात येतो व गाठी असल्यास त्या हातास जाणवतात. स्तनाचा एकच भाग दूषित झाला असेल, तर भागांतील फरक चटकन लक्षात येतो. आचळ सुजलेलेनसतात व दाबून पाहताना वेदनाही होत नाहीत परंतु दूषित भागाचा टणकपणा व गाठी हाताला जाणवतात.
यकृत, प्लीहा व मूत्रपिंडावर क्षयरोगाच्या गाठी झाल्या, तरी त्याअत्यंत जास्त प्रमाणात असल्याशिवाय त्या त्या इंद्रियाचे कार्य बरेचदिवस व्यवस्थितपणे चालू असते. रोग इतका रेंगाळणारा आहे की, क्षयरोगाच्या गाठींची इंद्रियांनाही हळूहळू सवय झाल्यासारखी होते व त्यांच्यातील प्रतिकारशक्ती सवयीने जास्त जागृत होते, परंतु गाठी जास्त प्रमाणात वाढल्या की, इंद्रियाची कार्ये स्थगित होऊन मृत्यूच ओढवतो. मध्यवर्ती तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर) रोगजंतूंनी वास्तव्य केले की, अत्यंत कार्यक्षम कोमल इंद्रियांच्या कार्यांत व्यत्यय येतो व रोगाच्या गाठी मेंदूच्या आतील भागावर किंवा पृष्ठभागावर, मागील किंवा पुढील बाजूस ज्या संवेदन केंद्रावर असतील त्याप्रमाणे त्या त्या कार्यात अडथळा येतो. तंत्रिका तंतूंवर (मज्जातंतूंवर) क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंनी वास्तव्य केले, तर पुढील प्रकारची तंत्रिका तंतूच्या कार्यात व्यत्यय आणणारी लक्षणे दिसतात : मूर्च्छा येणे, स्नायूचे शीघ्र कंपन सुरू होणे, चेतनाहीनता प्राप्त होणे, दृष्टी अधू होणे, अंधत्व येणे इत्यादी. क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू हाडा-सारख्या कठीण भागावरही वास्तव्य करतात. विशेषतः सांध्यांच्या ठिकाणी ते हळूहळू वाढत जाऊन, सांधे सुजतात व त्यांत वेदना सुरू होतात. ही क्रिया इतकी सावकाश चालू असते की, हाडाच्या क्षयरोगाचे निदानजिवंत प्राण्यांत करणे जवळजवळ अशक्यच असते, तरीही सांध्यात वेदना होऊन जनावर लंगडू लागले व नेहमीच्या सर्व उपायांनी आराम वाटला नाही म्हणजे क्षयरोगाचा संशय पक्का होतो. क्षयरोग क्वचित त्वचेवरही होतो. यामध्ये कठीण गुल्मे दिसतात ती कधीकधी आपोआप फुटतात किंवा अपघातामुळे फुटून त्यातून चिकट, सरबरीत स्राव निघतो. अशा रीतीने फुटलेली गुल्मे त्वचेवर व्रण निर्माण करतात व ती नेहमीच्या उपायांनी बरी न होता सतत चिघळत जातात. क्षयरोग रेंगाळणारा असला तरी एखादे वेळी रक्तातील क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचे अभिसरण सुरू होऊन एकदम उग्रस्वरूप धारण करतो. अशा वेळी शरीरात पुष्कळ ठिकाणी फोड येतात, विशेषतः ते फुप्फुसात जास्त दिसून येतात. जनावराला खूप ताप चढतो, श्वसन अवघड होते, नाडी तेज परंतु कमजोर होते, जनावर चारा खातनाही व ८–१० दिवसांत मृत्युमुखी पडते. क्षयरोग सूक्ष्मजंतूच्या उपजाती असून त्या निरनिराळ्या प्राण्यांतील क्षयरोगात दिसून येत असल्या तरीसर्व सूक्ष्मजंतूंमुळे रोग निर्माण होण्याची व तो पसरविण्याची पद्धतसारखीच असते.
पक्ष्यांना किंवा गायी-बैलांना होणाऱ्या रोगजंतूंच्या उपजातींमुळे डुकरां-मध्ये क्षयरोग होतो. त्यांच्यात सापडेल ते खाण्याची प्रवृत्ती असल्यामुळे बहुधा रोगाची बाधा पोटातून सूक्ष्मजंतू गेल्यामुळेच होते. क्षयरोगाच्या गाठी पोटातील पोकळीतील इंद्रियावरच दिसून येतात व हे सूक्ष्मजंतू गायी-म्हशींत रोग निर्माण करणाऱ्या उपजातीचे असतात. पक्ष्यांमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू बहुधा श्वसन मार्गावर रोगाच्या गाठी निर्माण करतात. प्लीहेतील सूक्ष्म गाठी गोल असतात व त्यांच्यात पोकळीसारखे भाग असून त्यांत पाणी भरलेले असते. बकऱ्यांना विशेषेकरून रोग होत नाही, परंतु गायी-म्हशींच्या सान्निध्यात त्या राहिल्या, तर स्तनाचा क्षयरोग कधीकधी झालेला दिसून येतो. मेंढ्यांत व बकऱ्यांत श्वसनाद्वारे रोग पसरून फुप्फुसाचा दाह किंवा शोथ (सूज) झालेला कधीकधी आढळतो. अशा वेळी खोकला असतो व श्वसन कष्टप्रद होते. घोड्यामध्ये क्षयरोग फार कमी प्रमाणात आढळतो. श्वसनाच्या मार्गात क्षय रोग झाल्यास खोकला आढळतो, परंतु बहुधा घोड्याच्या मानेच्या मणक्यावर क्षयरोगाचा परिणाम होऊन मान ताठ राहते, ती नीट वाकविता येत नाही व जमिनीवरील चारा-दाणा मान वाकवून खाता येत नाही. चांगला चारा-दाणा मिळूनही घोडा दुबळा होत जातो, तहान फार वाढते व लघवीस फार होते. कुत्र्यांत हा रोग विशेष रेंगाळणाऱ्या स्वरूपाचा नसतो व तीव्र लक्षणे आढळतात. फुप्फुस, यकृत व मूत्रपिंड यांवर रोगाच्या गाठी दिसून येतात. कुत्र्यांपासून मुलांना रोगाची बाधा होण्याची शक्यता असल्यामुळे रोगाचे निदान करून रोगी कुत्री ताबडतोब नष्ट करतात.
बहुतेक प्राण्यांत क्षयरोग रेंगाळणारा असल्यामुळे त्याची स्पष्ट चिन्हे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे निदान करणे अत्यंत अवघड असते. पूर्वीच्या काळी रोगनिदान लवकर न झाल्यामुळे ते होईपर्यंत रोग बहुधा असाध्य अवस्थेतच पोहोचलेला असे. त्यामुळे ‘क्षयरोग म्हणजे मरण’ असेसमीकरण ठरून गेल्यासारखे होते परंतु प्राण्यांत रोगनिदान करण्यासाठी क्षयरोग-परीक्षण पद्धती शोधून काढण्यात आली व त्यामुळे रोगनिदान करण्यास बरीच मदत झालेली आहे. या पद्धतीचे मूळ १८९० मध्येरॉबर्ट कॉख यांनी शोधून काढलेल्या व प्रयोगशाळेत वाढविलेल्या रोग-जंतूच्या शोधात आहे. आता सूक्ष्मजंतू वाढविण्यासाठी एक खास प्रथिनापासून शुद्ध केलेला द्रव वापरतात व त्यामुळे परीक्षण पुष्कळअचूक होते. प्रयोगशाळेत सूक्ष्मजंतुहीन वातावरणात वाढविलेले रोगजंतू मारून त्यापासून या पद्धतीत लागणारी क्षयरोग-परीक्षण लस तयारकरतात व तिच्या साहाय्याने रोगनिदान करतात. प्रथम परीक्षण डोळ्यात लस घालून करीत असत. नंतर त्वचेखाली टोचून प्राण्यात झालेलीप्रक्रिया पाहून रोगनिदान करतात. क्षयरोग सूक्ष्मजंतू निरनिराळ्या उपजातीचे असल्यामुळे हल्ली पक्ष्यांमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू व सस्तन प्राण्यां-मध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू यांपासून तयार केलेली परीक्षण लस एकाच वेळी दोन निरनिराळ्या ठिकाणी त्वचेत खास सुईने टोचतातव त्वचेवर आलेली सूज, त्वचेची जाडी मापून रेागनिदान ठरवितात. ही त्वचेवरील प्रक्रिया नेमकी कोणत्या स्वरूपाची असते हे निश्चित सांगतायेत नाही.
क्षयरोगाचा प्रतिबंध : क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू निसर्गात फक्त रोग झालेल्या माणसांच्या किंवा जनावरांच्या शरीरातच वाढू शकतात, हीगोष्ट रोगाचा प्रतिबंध करताना विशेष लक्षात ठेवून रोगप्रतिबंधक उपायकेले पाहिजेत. त्या दृष्टीने रोग जनावरात झालेला असेल, तर परीक्षणपद्धतीद्वारा निदान करून अशी जनावरे त्यांच्यामुळे इतरांना रोग होऊनये म्हणून नष्ट करणे हिताचे आहे. पाश्चात्त्य देशांत परीक्षा करून रोगसिद्ध झाल्यावर तशी जनावरे नष्ट करतात परंतु भारतातील असे पशूनष्ट करण्याच्या बाबतीत पुष्कळ अडचणी आहेत. भावनाप्रधान लोकांनात्या पटणाऱ्या नाहीत. तरीही एकंदर पशुधनाच्या हिताच्या दृष्टीने क्षयरोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी रोगी जनावरे नष्ट करणे आवश्यक आहे, हेसहज लक्षात येण्यासारखे आहे. रोगजंतूंना प्राण्यांच्या शरीरात वाढ करण्यासारखी अनुुकूल परिस्थिती प्राप्त झाली नाही, तर ते संपूर्ण नष्ट होतील. कारण त्यांना वाढण्यासाठी निसर्गात इतरत्र कोठेही वाव नसतो. रोगप्रतिबंधक लस रोग्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्या प्राण्यांना टोचली, तर त्यांना क्षयरोगाची बाधा होणार नाही. मानव व पशुपक्षी यांच्यात उपयोगी क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस तयार करण्यात आली आहे. ही लस गायी-म्हशींत रोग उत्पन्न करणाऱ्या उपजातीच्या क्षयरोग सूक्ष्मजंतूपासून तयार करतात. लशीतील रोगजंतू जिवंत असतात, परंतु निष्क्रिय केलेले असतात. रोगी गुरांच्या सान्निध्यात राहणाऱ्या किंवा रोगाचा विशेष उपद्रव होणाऱ्या जागी बांधलेल्या गुरांनाही लस टोचून बऱ्याच प्रमाणात रोगप्रति-बंधक क्षमता निर्माण करावी लागते. कारण एकदा क्षयरोगाचा प्रादुर्भाव झाला की, ही लस विशेष उपयोगी पडत नाही. गोठ्यातील स्वच्छता व साफसफाई रोगप्रतिबंधासाठी विशेष उपयोगी पडते. उघड्यावर मोकळ्या हवेत व डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या गुरांना क्षयरोग क्वचितच होतो. उलटपक्षी दाटीदाटीने बांधलेल्या जनावरांत तो विशेष आढळून येतो. रोगप्रतिबंधक उपाय करताना प्रत्येक जनावराला शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक असलेली जागा, गोठ्यातील खेळती हवा व स्वच्छता याचे महत्त्व सहज लक्षात येईल. गोठे जंतुघ्न द्रावणाने दर आठ दिवसांनी धुणे आणि गव्हाणी, चारा-दाणा–पाणी ह्यांची भांडी स्वच्छ ठेवणे, शक्यतो शुद्ध पिण्याचे पाणी देणे यांवर विशेष लक्ष ठेवणे रोगप्रतिबंध कार्यात विशेष महत्त्वाचे ठरते. रोगप्रति-बंधक परीक्षण पद्धतीने दर सहा महिन्यांनी गुरे तपासून घेतात व रोगनिदान होताच रोगी गुरे कळपातून अलग करतात. शिवाय दूध व जनावराचे इतर स्राव प्रयोगशाळेत तपासून पाहतात. विशेषतः दुधामार्फत अर्भकांना क्षयरोगहोण्याची शक्यता असल्यामुळे दुग्धालयातील जनावरे क्षयरोगापासून मुक्त आहेत, याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन वगैरे प्रगत देशांत रोगमुक्त कळप नोंदविले जातात व अशा दाखला मिळालेल्या कळपातील दुधाचा वापर निश्चितपणे केला जातो.
क्षयरोग झाल्यानंतर उपचार करणे, हे जनावरांच्या बाबतीत विशेषफायद्याचे नाही. कारण दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या क्षयरोगाचे निदान होण्याच्यापूर्वीच किती तरी दिवस आधी रोगजंतू शरीरात ठाण मांडून बसलेलेअसतात व आपले कार्य करीतच असतात. दुसरे असे की, कितीही काळजी घेतली तरी रोग्यांच्या संसर्गाने रोग इतर जनावरांत पसरण्याचा धोकाराहतोच. शिवाय क्षयरोग मानवांनाही होण्याची भीती असते. आर्थिकदृष्ट्या रोगी जनावर परवडण्यासारखे नसते व मानवतेच्या दृष्टिकोनातूनपाहिले, तरी उपचार फायदेशीर नसल्यामुळे जनावराचे होत असलेले हाल पाहणे कोणालाही आवडणार नाही. पाश्चात्त्य देशांत रोगाच्या भावनेचे निदान होताच जनावरांना कत्तलखान्यात पाठवितात व तज्ञ पशुचिकित्सकांकडून परीक्षा करून दूषित मांस व इतर अवयव नष्ट करून इतर मांस वगैरे उपयोगात आणतात परंतु भारतात प्रत्येक ठिकाणी अनेक कारणांमुळेतेही शक्य नसते. अशा वेळी (शास्त्रीय पद्धतीने) वेदना होऊ न देतापशूंना नष्ट करणे व रोगजंतूचा नाश करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो.
गद्रे, य. त्र्यं.
पहा : गंडमाळा गर्भारपणा प्राणिजन्य मानवी रोग मस्तिष्कावरणशोथ रोग श्वसन तंत्र संसर्गजन्य रोग.
संदर्भ : 1. Bloom, B. R., Ed., Tuberculosis : Pathogenesis Protection and control, 1994.
2. Davies, P. D., Ed., Clinical Tuberculosis, 1993.
3. Eduonds, C. R. Waeker, G. K. Diseases of Animals in Tropical Countries,.
4. Felson, Benjamin Radiology of Tuberculosis, 1979.
5. Grzybowski, Stefan Tuberculosis and It’s Prevention, 1983.
6. Johnson, Joseph E., Ed., Rational Therapy and Control of Tuberculosis, 1970.
7. Keers, Robert Y. Pulmonary Tuberculosis : A Journey Down the Centuries, 1979.
8. Myers, Jay A. Steele, James Bovine Tuberculosis in Man and Animals, 1969.
9. Miller, W. C. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, 1962.
10. Park, K. Park’s Textbook of Preventive and Social Medicine, 2011.
11. Shennan Douglas H. Tuberculosis Control in Developing Countries, 1968.
12. Udall, D. H. The Practice of Veterinary Medicine,
१३. परांजपे, आ. श्री. आधुनिक वैद्यकशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७२.
“