ह्यूलँडाइट : झिओलाइट गटातील एक सिलिकेटी खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार; परंतु स्फटिकांची सममिती पुष्कळदा समचतुर्भुजीसारखी, बाजूचे पिनॅकॉइड (दोन समांतर फलक असलेले उघडे स्फटिकरूप) ठसठशीत, पुष्कळदा हिऱ्यासारखा आकार. ते पुष्कळदा पर्णित (पानांसारख्या) राशींच्या रूपांतही आढळते. ⇨ पाटन : ह्यूलँडाइटाची स्फटिक संरचना 1010 परिपूर्ण; कठिनता ३.५–४; वि.गु. २.१८–२.२०; चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी; रंग पांढरा, पिवळा, करडा, तांबडा, रंगहीन पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी; ठिसूळ [→ स्फटिकविज्ञान]. रा. सं. बहुधा सजल कॅल्शियम ॲल्युमिनियम सिलिकेट Ca(Al2Si2O18).6H2O. कॅल्शियमाच्या जागी सोडियम वा पोटॅशियम येऊ शकतात. ते बंद नळीत तापविल्यास पाणी मिळते. स्फटिकरूप व मोत्यासारखी चमक असलेली परिपूर्ण पाटनाची एक दिशा यांमुळे ते वेगळे ओळखता येते.
ह्यूलँडाइट हे द्वितीयक – नंतरच्या प्रक्रियांनी तयार झालेले – खनिज असून ते बहुधा अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) व अपघटित (विघटित) बेसाल्टाच्या पोकळ्यांत कॅल्साइट व इतर झिओलाइटांबरोबर आढळते. आइसलँड, सायप्रस, फेअरो बेटे, आंद्रिआसबर्ग, हार्झ पर्वत, टायरॉल (ऑस्ट्रिया) आणि भारतात मुंबईजवळ उत्तम गुणवत्तेचे ह्यूलँडाइट आढळते. शिवाय अमेरिका व नोव्हास्कोशा येथेही ते आढळते. पाणी मृदू करण्यासाठी ते वापरतात.
इंग्रज खनिजसंग्राहक एच्. ह्यूलँड यांच्या सन्मानार्थ या खनिजाला ह्यूलँडाइट हे नाव देण्यात आले आहे.
पहा : झिओलाइट गट.
बरीदे, आरती; ठाकूर, अ. ना.